मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

काय उत्तर देऊ तूच सांग...

पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअ‍ॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?

सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्‍यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;

’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्‍यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!

तुझीच

कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच

(उत्तर लिही बरं का!!)’

सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही  नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!

सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो.  मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो. 

सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्‍याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्‍या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्‍याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात. 

सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही.  अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्‍यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं, 

‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’ 

तितक्याच सहजतेने ती म्हणाली, 

‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’

’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच. 

तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र. 

सखे, काय उत्तर देऊ तूच सांग. 


शनिवार, ३० जुलै, २०२२

कचपाश मोकळे, मोकळे रेशीम...

सखे, तू रागावणार नसलीस तर एक गोष्ट सांगू? ऐकशील?

‘सांग ना! मी रागावेन म्हणून तू सांगायचा राहिला आहेस का कधी? तुला आवडलेली, न आवडलेली गोष्ट तुझ्या आप्तां
ना तू साखरेच्या पाकात घोळवून सांगतोस. जे सांगतोस ते कडू असलं तरी ऐकायला गोड वाटतं.’

सखे, तसं फार महत्त्वाचं नाही. पण, माझ्यासाठी निश्‍चितच आहे. तुझे कापलेले केस तू पुन्हा वाढव. का कोण जाणे, मला लांब केसांचं फार अप्रूप आहे. नागिणीसारखी पाठीवर सळसळत नितंबांवर हेलकावे खाणारी वेणी चित्त वेधून घेते. लांब केसांचं हे ऐश्‍वर्य जिला लाभलं तिच्यासारखी भाग्यवान स्त्री दुसरी नाही. दुपेडी, तिपेडी हे वेणीचे प्रकार आता दर्शनदुर्लभ झाले आहेत. या निसर्गदत्त ऐश्‍वर्याला विंचरायला वेळ नाही’, आउट ऑफ फॅशन’ या सबबीखाली कात्री लावली जाते. केसाने गळा कापता येईल एवढेतरी लांब केस स्त्रियांनी ठेवले पाहिजेत. पदर गेले, ओढण्या गेल्या त्यामुळे यौवनाच्या धनाचे रक्षण करण्याकरिता ही काळी नागीण पाठीवर असणे आवश्यकच आहे.  

सखे, हे लांब केस जेवढे हाल करतात ना, तेवढे हाल कुणीच करीत नाही. तुला खोटं वाटतं? मग सदानंद डबीर यांचे ‘कचपाश मोकळे मोकळे रेशीम’ हे गीत ऐक. संगीत यशवंत देव यांचं आहे आणि स्वर श्रीधर फडके यांचा. मोकळ्या केसांच्या या पाशातून माझी काही आजतागायत सुटका झाली नाही. व्हावी, असंही वाटत नाही. काही काही बंधनच अशी असतात की मोकळी असली तरी त्यापासून मुक्त व्हावं असं वाटतच नाही. तिच्या मोकळ्या केसांचं बंधनही असंच आहे, अडकवून ठेवणारं.

सखे, तशी ती पहिल्यांदाच दिसली, तेव्हा पाठमोरी दिसली. देहाच्या कमनीयतेपेक्षाही नजर स्थिरावली ती तिच्या लांबसडक, मोकळ्या रेशमी केसांवर. कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेऊन यौवनाच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. तिच्या पाठीवर विसावलेल्या त्या काळ्या मेघांनी मला पाऊस न पाडताही भिजवलं. भिजलेलं मन  आणि थिजलेला देह या अवस्थेत मी पहिल्या पायरीशी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. ती देवळाचा उंबरठा ओलांडून कधीच आत निघून गेली होती. पाणी भरण्यासाठी ती पुन्हा पायर्‍या उतरून खाली आली तेव्हा हरवलेला मी तिच्या दृष्टीस पडलो. तिने एकवार मला पाहिले आणि उंबरठ्याकडे पाहिले. माझ्या चेहर्‍याकडे पाहात तिने विचारले, 

‘कुणाला पाहताय?’

मी भानावर आलो. मोगर्‍याच्या कळीत उतरलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं, भर दुपारी देवळाच्या दारात माझ्यासमोर उभं होतं. तिच्या सोज्वळ सौंदर्यापुढे तिच्या देहाची कमनीयता ही अतिशय क्षुल्लक गोष्ट होती. पाठमोर्‍या कमनीय देहाला, सुंदर चेहरा असतोच असं नाही आणि सौंदर्य ओसंडून वाहणारा चेहरा, प्रमाणबद्ध देहाचा असतोच असंही नाही. सौंदर्य आणि कमनीयता यांचा मूर्तिमंत आकृतिबंध माझं देहभान हरवून गेला.  तिचा प्रश्‍न माझ्या डोळ्यांनी ऐकला आणि अनिमिष डोळ्यांनी उत्तरही दिले. तिला ते समजेल किंवा न समजेल, असं ओठांना वाटलं, म्हणून ओठातून नकळत शब्द बाहेर पडला,

परमेश्‍वराला...

सखे, मुखातून सहज निघालेल्या उत्तराचे तुला आश्‍चर्य वाटले असेल. तिचे मूर्तिमंत सौंदर्य पाहून परमेश्‍वराची आठवण का व्हावी? तो ज्या ज्या रूपामध्ये समोर आला त्या त्या रूपामध्ये आजवर त्याची पूजाच केली होती. ठळकपणे आलेली शुद्ध चैतन्याची प्रचिती म्हणजे सौंदर्य. मग ते देहाचं असो किंवा विचारांचं. समोरच्याला ओढ लावतंच. निर्जीव, काळ्या पाषाणाच्या ओबडधोबड मूर्तीमधून जसं परमेश्‍वराचं दर्शन घडतं, तसंच ते सजीव, नितळ उजळ रंग लाभलेल्या कमनीय देहातूनही घडतं. मूर्तीतच गुंतून राहिलं तर भक्त होता येत नाही आणि देहातच गुंतून राहिलं तर प्रियकर होता येत नाही!

सखे, मी तिच्या चेहर्‍याकडे अनिमिष नेत्रांनी पाहात राहिलो. तिने माझ्या चेहर्‍यासमोर आपला हात फिरवला. मला तिचा हात दिसत होता, जाणवत नव्हता. सगळ्या जाणिवा, संवेदना या पलीकडची स्तब्धता आली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून, खांदे हलवत मला भानावर आणायचा प्रयत्न केला. तिच्या हाताचा चुटपुटसा झालेला तो कोवळा स्पर्श मला वेड लावून गेला. 

सखे, त्यानंतर आमच्या गाठीभेटी होतच राहिल्या. पण, तिचं हे पहिलं दर्शन जे मनावर ठसलं ते ठसलं. ओळख वाढत गेली. वरलिया रंगापेक्षा तिचे अंतरंग खूपच नितळ होते, स्वच्छ होते. आपल्या लाभलेल्या सौंदर्याच्या निसर्गदत्त देणगीचा तिला सार्थ अभिमान होता, पण गर्व नव्हता. म्हणूनच त्या सौंदर्यावर उल्लू होणार्‍यांचा वापर करून घेणं तिला पटत नव्हतं. ती अशा पागल मजनूंना त्यांची जागा व्यवस्थित दाखवून देत होती, त्यांना आपल्यापासून एका अंतरावर ठेवत होती. तिचं मन तिच्या देहापेक्षाही सुंदर होतं. म्हणूनच तिच्या देहाचं आकर्षण उरलं नाही. तनाने रूपवान आणि मनाने कुरूप असणार्‍या स्त्रिया जगात कमी का आहेत? मनाचं सौंदर्य चेहर्‍यावर प्रकट झालं की स्त्री रूपवान होते. ती सुंदर होती, म्हणून सुंदर दिसत होती! 

सखे, आम्ही मनाने जवळ आलो होतो. आमच्या दोघांमध्ये लपवण्यासारखं असं काही नव्हतं. एकमेकांच्याबद्दल प्रचंड खात्री होती, विश्‍वास होता. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नात्यामध्ये एक प्रकारचा निर्भीडपणा येतो, तो आला होता. आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. एकदा पावसात भिजत भिजत फिरत होतो. दोघेही चिंब भिजलो होतो. तिच्या लांबसडक केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब कोवळे मोती होऊन टपकत होते. अचानक वीज कोसळली. तिने घाबरून मिठीच मारली. त्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर आम्ही भानावर आलो, सावरलो. लज्जेची वसने ढळली होती, डोळ्यांमध्ये संमती होती. तरीही त्यापुढे पाऊल टाकलं नाही. पायरी समजली की उंबरठा कधी ओलांडायचा आणि कधी नाही हे लक्षात येतं.  ती निघून गेली. मी तसाच न बोलता पावसात भिजत राहिलो. तिची पाठमोरी आकृती पाहात राहिलो. ती जशी पहिल्यांदा दिसली होती, तशीच दिसत होती. पाठमोरा कमनीय देह, लांबसडक केस आणि चिंब भिजलेला मी. 


चित्रस्रोत : आंतरजाल

रविवार, ३ जुलै, २०२२

जीवन क्या है...

सखे, एखादी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडावी, ती मिळावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असावं. पण, ती त्या वेळेस मिळू नये. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती मिळावी, तेव्हा तिचं अप्रूप निघून गेलेलं असावं. तेव्हाची आसक्ती खरी म्हणावी की, आजची अनासक्ती खरी म्हणावी? की, दोनही खोटीच? हा संभ्रम, ही जी अवस्था आहे ना, ती माझी गेले दोन दिवस आहे. बरं झालं तू आलीस. कुणाला तरी हे सांगायचंच होतं. अन्यथा वेडा झालो असतो.

‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्‍या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’

माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्‍या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.

‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’

ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक. 

‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’

हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...

‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’

तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्‍या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या. 

आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही. 

तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते. 

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’

जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.  

‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’

हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही. 

गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्‍या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या? 

त्या  एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो, 

‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’

त्यावर शिवानी म्हणते,

‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’

सखे, आयुष्यात आपल्याला  हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे. 

हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.

‘जीवन क्या है....’

शनिवार, २५ जून, २०२२

अजी कुछ तो बोलिए...

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.
सखे, आठवतंय तू एकदा विचारलं होतस मला, रडणं हे दुबळेपणाचे लक्षण नव्हे का? रडत रडत जन्माला येणार्‍या माणसाला समज आल्यानंतर तेच रडणं अप्रशस्त वाटू लागतं. पण तुला सांगू, जसं दिलखुलासपणे हसायला सामर्थ्य लागतं तसंच साचलेल्या दु:खाला वाट करून द्यायलाही प्रचंड सामर्थ्य लागतं. रडणं हा दुबळेपणा नाही. फक्त पापण्यांच्या आड अश्रू किती संयमाने साचले आहेत, त्यावर दु:खाचं सामर्थ्य ठरतं.  

‘आपलं दु:ख इतरांना सांगितल्याने मन हलकं होतं, असं म्हणतात ते चुकीचं आहे का मग?’ 

सखे, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या दु:खावर प्रचंड प्रेम असतं. दु:ख कुरवाळण्यासारखं सुख नसतं. समदु:खी माणसांचं दु:ख समान असतं, त्यातली तीव्रता नाही. म्हणूनच प्रत्येकाला आपलं दु:ख मोठं वाटतं. आपण जेवढे आपल्या दु:खाने दु:खी होतो, तेवढे इतरांच्या दु:खाने होत नाही. दु:खाची तुलना होते, जाणीव होत नाही. १९२४ साली याच दिवशी जन्मलेला मदनमोहन चुन्नीलाल कोहली हा अवलिया केवळ आपल्या संगीताच्या जोरावर त्याचं दु:ख आपलं करून टाकतो.  या जादूगाराने संगीत दिलेलं ‘यूं हसरतों के दाग’ हे अदालत(१९५८) या चित्रपटातील नर्गिसवर चित्रित झालेलं अप्रतिम आणि माझं खूप आवडतं गीत मुद्दाम ऐक. तुला जाणवेल की, हे दु:ख चित्रपटातील निर्मलेचं नाही, गीत लिहिणार्‍या राजेन्द्र कृष्ण दुग्गल यांचं नाही, लतादीदीचं नाही. हे दु:ख मदनमोहनचं आहे. आपल्या दु:खाची यथार्थ जाणीव केवळ सुरावटीतून करून देण्याचे जगावेगळं सामर्थ्य लाभलेला मदनमोहन हा बहुधा एकमेव संगीतकार असावा. 

सखे, प्रेमात आपण मारलेल्या आपल्या इच्छा पुढे येणार्‍या एकलेपणात छळतात. इच्छेमधला ओलावा निघून गेला की त्याचे डाग होतात. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते दिसू नये म्हणून प्रेमानेच ते धुवावेही लागतात, अगदी कितीही ‘अच्छे’ असले तरीही. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला हे दु:ख समजतच नाही. म्हणून आपण आपल्यालाच ते सांगायचं आणि आपणच ते ऐकायचं. वक्ता, श्रोता दोनही आपणच.

सखे, घर सोडून सुखाच्या शोधात निघावं. सुख काही शेवटपर्यंत सापडत नाही. वाटेत उभी असलेली दु:खं मग आपल्यासोबत प्रवासाला निघतात. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अश्रू आणि दु:खच साथ देतात. बाकी सुखांचे काय? ती येतात, निघून जातात. पडद्यावर हे कडवं जेव्हा येतं, तेव्हा प्राण येताना दिसतो. तोही पान ठेवलेल्या तबकाच्या आरशात. 

सखे, फूल सुकलं तरीही ते फूलच असतं. त्याचा काटा नाही होत. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला ते समजतं का? त्याला त्याची किंमत आहे का? तुझ्या तोंडीही हे वाक्य मी बर्‍याचदा ऐकले आहे, ‘त्याला काही माझं पडलेलंच नाही’. त्याला काय वाटतं यावरून आपलं प्रेमाचे मूल्य ठरवणार्‍या तमाम प्रेमिकांनी या गीतातील दुसरे कडवे अवश्य ध्यानात ठेवावे. आपल्याला समजून घेतलं जात नाही हा दोष आपला नाही. आपण जसे आहोत, तसे आहोत. तो किंवा ती आपल्याला काय समजते, ते त्या व्यक्तीवर सोडून द्यावे. सुकलेल्या फुलाला काट्यामध्ये कुणी तोलत असेल तर तो दोष फुलाचा कसा? असे करण्यात त्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर ते सुखही मान्य असणे, ही प्रेमाची उत्कट अवस्था आहे.

सखे, मदनमोहनला आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागली. जाणूनबुजून त्याची गळचेपी करण्यात आली. त्याच्या पासंगालाही न पुरणार्‍या संगीतकारांनी त्याला संपवला. आपलं नाणं बावनकशी असून चालत नाही. ते वाजवून दाखवावं लागतं. गाण्याशिवाय इतर काही वाजवणं हा या संगीतकाराचा पिंडच नव्हता. संगीतकारांच्या गळेकापू स्पर्धेत हा सुरांचा राजा गप्प राहिला. 

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.

मदनमोहनचं हे गप्प राहणं अनेकांना मानवलं नाही. ते विचारू लागले,  ‘अहो गप्प का? बोला ना काही तरी!‘ मदनमोहनने स्वत:ला मदिरेत बुडवून टाकले. त्यातच त्याचा शेवट झाला. कमालीचा एकलेपणा आणि कमालीचे मदिरासेवन, त्याला हवा असलेला मृत्यू देऊन गेले.

राजेंद्रकृष्णांनी लिहिलेल्या या गीतातल्या शेवटच्या दोन कडव्यांतले शेवटचे ‘तोलिये’ आणि ‘बोलिये’ हे शब्द जेव्हा मदनमोहनचं दु:ख घेऊन लताच्या गळ्यातून बाहेर पडतात ना सखे, तेव्हा काळीज चिरून जातात. लता हे दु:ख ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालते. गाणं थांबतं. स्वर विरून जातात. राहतं ते मदनमोहनचं साचलेलं दु:ख. खरं तर ते दु:ख त्याचं असं उरतच नाही. ते आपलं होतं. आपण नि:शब्द होतो आणि सुकून गेलेल्या आपल्याच इच्छांचे डाग आपल्याला म्हणतात,

‘अजी अजी कुछ तो बोलिए...’


शुक्रवार, ३ जून, २०२२

हात छोड दिया...

इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं.

‘आपण घेण्यासाठी हात पुढे करावा आणि देण्यासाठी पुढे झालेल्या हाताने वस्तू आपल्या हातात न देता टेबलवर ठेवावी, तेव्हा जसं वाटेल ना, तसं वाटतंय रे...’

सखे, तू कधी कधी दु:ख इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त करतेस की, ते तुझं न राहता माझं होऊन जातं. दु:ख दु:खात मिसळलं की, ‘काय झालं?’ असं विचारण्याची आवश्यकता राहत नाही. तपशिलाची माहिती विचारणार्‍या प्रश्नांची टरफले गळून पडतात. वेदना शिल्लक राहते. 

‘मला आणि तुलाही माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतेय. तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही. पण, इतकं कळतं की, मला काय म्हणायचं आहे, हे तुला नेमकं समजतं. त्याच्या वागण्याचा त्रास होतोय रे. तो नव्हता असा. आम्ही दोघेही एकमेकांना आतबाहेर ओळखतो. तरीही तो ओळखच नसल्यासारखा का वागतो? का बदलला तो? माझं काही चुकतंय का? मी आणखी काय केलं की, तो पूर्वीसारखा वागेल? सगळे प्रश्न भुंग्यासारखे छळत राहतात.’

सखे प्रश्नांचा फार त्रास करून घेऊ नये आपण. ते त्रास देऊ लागले की, मस्त गझल ऐकावी. मला गझल का आवडते माहितीये, कारण ती माझ्यासारखी नाही. मी जास्तीत जास्त शब्दांत कमीत कमी सांगतो. गझल कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगून जाते. तुझा मूड ठीक होईल आणि कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातील. कतील शिफाई यांची ‘किया है प्यार जिसे हमने जिंदगी की तरह’ ही जगजित सिंग यांच्या आवाजातील गझल ऐक. 

‘तू खपल्या नको ना काढूस. माझीही अत्यंत आवडती गझल आहे. त्यालाही प्रचंड आवडायची. तुला माहिती आहे, त्याला व मला गझल, सिनेमा, गाणी, कविता एकमेकांना शेअर करायला आवडतं. त्याहीपेक्षा एकमेकांची त्याबद्दलची मतं ऐकायला तर त्याहून जास्त आवडतं. आता आवडायचं असं म्हणावं लागेल. तो तुझ्यासारखाच खूप बारीक बारीक जागा सांगायचा. प्रत्येक शेर उलगडून सांगायचा. आता जागा असतो, पण मोबाइलमध्ये तोंड खुपसण्यासाठी. सगळी आवडच संपली आहे त्याची.’

सखे, यातला पहिला शेर आपल्याला खेचून घेतो, तो शेवटपर्यंत सोडत नाही. एखादी गझल आपल्याला आवडते कारण शायराने त्यात आपली वेदना नेमक्या शब्दांत मांडलेली असते म्हणून. एरव्ही यातना देणारे आपले दु:ख इतके छान वाटते की, आपल्या तोंडून सहज, ‘वाह क्या बात है!’ अशी दाद नकळत निघते. आपली वेदना आपलीच दाद घेऊन जाते. 

सखे, आपलं आयुष्य आपल्या ओळखीचं असतं. त्यात जे घडतं, बिघडतं ते आपल्या ओळखीचं असतं. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करतो. ते आपलं असतं. असंच आपल्या आयुष्यासारखं आपण कुणावर तरी प्रेम करावं आणि त्यानं ओळखही दाखवू नये, याचं दु:ख प्रचंड असतं. आश्ना म्हणजे ओळखीचा, मित्र, प्रियकर. आता तुझ्याबाबतीत या सगळ्या पायर्‍या पार करून इथवर पोहोचलेला तुझा नवरा. त्याचं परक्यासारखं वागणं, तुला असह्य होत आहे, यात शंकाच नाही. तारीकी म्हणजे काळोख, रात्र. पण इथे, दुर्लक्ष करणे, बेफिकिरी असा त्याचा दुसरा अर्थही एकदम लागू होतो. तो लपेल, तो दिसणार नाही. त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे लपणार नाही. ते दिसेल. नाहीच दिसले तर तो दाखवून देईल. आपल्या या दु:खाची त्याला जाणीवही नसणं कायम जाणवत राहील. 

सखे, या नंतरचं कडवं खूप लक्षपूर्वक ऐक. हा ऑडिओ २००६साली टॉरोन्टो येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमातील आहे. या कडव्याची पहिली ओळ म्हणून जगजित सिंग एक तान घेतात. त्यानंतर ‘हाथ छोड दिया’ म्हणताना एक जागा घेतात. एकदम लाजवाब. आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातातून निसटत आहे, आपण काहीही करू शकत नाही, ही अगतिक अवस्था त्या दोन शब्दांतून जगजित सिंग व्यक्त करतात त्याला तोड नाही. त्या सुरातून परित्यक्त झालेलं दु:ख थेट काळजात उतरतं. एका क्षणासाठी गाणारा, ऐकणारा नाहीसे होतात. राहते ते फक्त कारुण्य. आपण भानावर येतो ते त्यानंतरच्या ओळी आपल्याला छेदून वास्तवात घेऊन येतात म्हणून. मुरव्वत म्हणजे संकोच, भीड, चांगुलपणा, सौम्य वागणूक, मन राखणे अशा अर्थाने घेतला जातो. दिल-लगी म्हणजे करमणूक, मनोरंजन. आपलं मन राखणं हे त्याचं मनोरंजन होतं. तो आपलं मन राखतोय, हे त्याचं आपल्यावरचं प्रेम आहे हा भ्रम होता. तो त्याचा मन रमवण्याचा उद्योग होता. जवळ न येण्याच्या दु:खापेक्षाही त्याचं हळूहळू दूर जाणं जास्त वेदना देणारं आहे. ज्याची प्रत्येक वेदना आपण आपली मानली त्याचं आपलं नसणं जास्त वेदनादायी आहे. 

‘तुला माहिती आहे आता मोबाइलमधून चेहरा वर करून पाहतही नाही. त्याला काही ऐकावसं वाटत नाही आणि काही सांगावसंही वाटत नाही. त्याला ट्विस्ट एन्ड असलेले सिनेमा खूप आवडतात. मी त्यातला ट्विस्ट उलगडून सांगितला की, त्याला ते खूप आवडायचं.एन्सेंडिस (एंसादी) या फ्रेंच सिनेमातील प्युअर मेथमेटिक्स, कोलात्झ कॉन्जेक्चर आणि त्यातील सायमनने आपली बहीण जेनीला ‘वन प्लस वन, डज इट मेक वन?’ विचारलेला हा प्रश्न, यावरून आम्ही प्रचंड खल केला होता. मी त्या सिनेमातील त्याला कळालेलं  मर्म सांगेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. आमच्यात वादही झाला होता. आताशा तो वाद टाळतो. तो वाद टाळतो याचं दु:ख करू की, तो संवाद टाळतो याचं दु:ख करू तेच कळेनासं झालंय.’

सखे, कतील शिफाई यांचा;

कभी न सोचा था हम ने ’क़तील’ उस के लिए 
करेगा हम पे सितम वो भी हर किसी की तरह

हा शेर जगजित सिंग यांच्या या व्हर्जनमध्ये नाही. इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं. तुला त्रास होतोय तो नेमका या गोष्टीचा. 

सखे, त्यावरचा उपाय मला नको विचारूस. तो माझ्याकडेही नाही. तसा तो कुणाचकडे नसतो. नवरा बायकोतील नातं स्थिरावणं कधी कधी दूर जाण्यासारखं भासतं. लग्नाच्या सुरुवातीला असलेल्या प्राथमिकता कालांतराने बदलतात. आपण आपल्या रूटीनमध्ये अडकत जातो. पत्नी माता होऊन संसारात गुरफटते. पती एककल्ली किंवा बाहेरख्याली होतो. सप्तपदीमधील शेवटचं वचन हे ‘सखा सप्तपदी भव’ आहे याचा आपल्याला विसर पडतो. मित्र-मैत्रीण, प्रियकर प्रेयसी, नवरा-बायको यापेक्षाही सखा-सखी यातील सख्यत्व फार महत्त्वाचं आहे, हे उलगडेपर्यंत हे खूप जवळ येऊन दूर होत जाण्याचं दु:ख भोगावं लागतं. तुझ्या माझ्यात सख्यत्व आहे, ते आपण दोघेही नवरा-बायको नाही, म्हणून आहे. तुमच्या नात्याकडे नवरा बायको या दृष्टिकोनातून पाहूच नकोस. तू त्याची सखी हो आणि त्याला तुझा सखा होऊ दे. मग दोघांचेही हात आवळलेही जाणार नाहीत आणि सुटणारही नाहीत.

‘तू म्हणतोस तसंच होईल की, नाही माहीत नाही. पण, तुला दु:ख समजतं. तुला ते आपलंसं करणं जमतं. तुझ्याकडे असलेल्या गाण्यांचा संग्रहही प्रचंड आहे व तू तो मला ऐकवत असतोस. म्हणूनच तर मी तुझ्याकडे येते.’

हो सखे, अशीच येत राहा, ऐकत राहा!

मंगळवार, १० मे, २०२२

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता

सखे, तू उदास असलीस, खिन्न असलीस की मला त्रास होतो. का कोण जाणे, पण तू नेहमी प्रसन्न असावंस असच वाटतं. तुझ्या मनातली प्रसन्नता चेहर्‍यावर झळकते, तेव्हा त्या निर्व्याज स्मितहास्याच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये असं वाटतं. अपूर्णत्व मनाला खिन्नता आणतं. ही खिन्नता घालवण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुला भेटलो की मनाची मरगळ नाहीशी होते. धकाधकीचं आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते. 

‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’

सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही. 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता 
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता 

सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्‍या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता 

सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्‍याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्‍या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं. 

बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता 

सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.

तेरे जहाँ में ऐसा नही के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता 

सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला. 

सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो. 

सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे. 

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

तो राजहंस एक...

आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...

‘मी काय करू सांग ना रे?’

सखे, तू असा ओठांचा चंबू करून प्रश्न विचारला की, मला एक प्रश्न पडतो. तुझ्या ओठांनी टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ की, तू विचारलेल्या?

‘चावटपणा पुरे झाला. तू मला सखी म्हणतोयस खरा, पण आपल्या वयातील अंतर पाहिले आहेस का? यावर ते गेल्या खेपेला ऐकवलंस तसं, ‘ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो’ या ओळी  असलेलं गीत नको ऐकवूस.’

सखे, तुझं वयात येणं खरं तर माझ्यासाठी अडचणीचं झालं आहे. आधी तू किती छान मोकळेपणी बोलायचीस. त्या संवादाला आधीच ठरवलेल्या अर्थाचे कंगोरे नसायचे. जाऊ दे. भांडण होईल आपलं. काय झालं ते सांग.

‘ही दहावी म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखी झाली आहे. ‘पुढे काय करणार तू?’ हा प्रश्न मला सगळ्या नातेवाइकांनी विचारून झालाय. मला काय करायचं आहे, हे सांगितलं तर ते कसं चुकीचं आहे, हेच प्रत्येकजण ऐकवतो. बरं, ‘नाही ठरवलं अजून’, असं म्हटलं तर प्रत्येका जास्तच चेव येतो. मोबाइलमध्ये गुरफटलेल्या पिढीपासून ते ‘आमच्यावेळी हे असं नव्हतं’ इथपर्यंत सगळे विषय येऊन जातात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता मी आर्टस्ला जायचं ठरवलं तर केवढा गहजब घरात! एका नातेवाइकांनी तर अशा काही तुच्छतेने पाहिलं की, बेचाळीस पिढ्या नरकातच गेल्याचा भास झाला.  मला इंग्रजी हा विषय घेऊन आर्टस् करायचे आहे, तर आईबाबांना वाटते मी एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग करावे. आता मला सांग मी करू तरी काय?’

सखे, ही शेकडा नव्वद घरांतल्या मुलांची समस्या आहे. आईवडिलांच्या अपेक्षा, नातेवाइकांचे सल्ले यातून गोंधळलेली मुलं हे घराघरांतील चित्र आहे. याला एकच एक कारण जबाबदार आहे, असं म्हणता येणार नाही. शिक्षणव्यवस्थेपासून ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत. त्या सगळ्या घोळात तू नको पडूस. तू छानपैकी एक गीत ऐक. गदिमांनी लिहिलं आहे आणि खळेकाकांनी स्वरबद्ध केलेलं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे अप्रतिम गीत ऐक. आशाताईंनी गायलेल्या या गीतातील शेवटच्या कडव्याचा शेवट जिथे होतो, तिथून पुन्हा ध्रुवपद येत नाही. एकदा ते अढळपद प्राप्त झालं की, ध्रुवपदावर यायचंही नसतं.

सखे, आपण सर्वांना सर्व शिक्षण या चक्रात अडकलो आहोत. यात उपजत आपल्याजवळ काय आहे, याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही. हे उपजत गुण वेळेत शोधले तर कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग निश्चित होतो. एखादे मूल गणितात हुशार असेल तर त्याला इंग्रजी व इतिहास या विषयांत कमी पडलेले गुण त्याची एकूण मार्कांची टक्केवारी खाली आणतात. केवळ गणित हाच विषय घेऊन त्याला पुढे जाता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. इतर विषयांत जरी त्याला काठावर मार्क पडले तरी जेवढे गणितात पडले आहेत, तेवढी त्याची एकूण टक्केवारी धरली जात नाही. याचा सर्वांत मोठा दोष म्हणजे पडलेल्या गुणांवरून गुणवत्ता ठरवली जाते.

ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे, तेवढे मार्क मिळवण्यासाठी आपण धडपडतो. अन्यथा, जेवढी आपली टक्केवारी आहे त्यानुसार आपला मार्ग निवडणे हा पर्याय शिल्लक राहतो. ‘शिक्षणाची कुठलीच शाखा दुय्यम नसते’ असं कायम म्हणणारी माणसं कला शाखेत जाणार्‍या मुलांकडे तुच्छतेने पाहतात. अमुक इतके मार्क पडले तर विज्ञान, अमुक इतके पडले तर कॉमर्स, अमुक इतके पडले तर इंजिनिअरिंग अशी गुणांप्रमाणे केलेली गुणवत्तेमधील उच्चनीचता या समानताप्रेमी विचारवंतांना खटकत नाही. 

सखे, आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही! 

सखे, आपले नातेवाईक आप्तही विद्येच्या या शाखांकडे पोटापाण्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन पाहत नाहीत. ‘कुठे गेल्यावर अधिक स्कोप आहे?’ हा विचार पालकांच्या मनात येणे चुकीचे नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता लाभावी, पुढील आयुष्य किमान पैशाच्या दृष्टीने तरी ‘सेफ झोन’मध्ये असावं असं वाटण्यात काहीच गैर नाही. 

‘त्यांचे चूक नाही, याचा अर्थ माझं चुकतंय असं तुला म्हणायचं आहे का?’

सखे, कायम चूक विरुद्ध बरोबर असा संघर्ष नसतो. आईबाबा बरोबर म्हणजे तू चूक आणि तू बरोबर म्हणजे ते चूक असं नसतं. दोघेही आपापल्या विचारांच्या कक्षेत बरोबर आहात. फक्त ते सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. 

‘म्हणजे तू म्हणतोयस की, आय हॅव टू प्रूव्ह देम राँग.’

नाही सखे, ते चुकत आहेत हे तुला नाही सिद्ध करायचं. तुला हे सिद्ध करायचं आहे की, तू बरोबर आहेस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण, त्यासाठी तुला आधी स्वत:ला ओळखलं पाहिजे. बुद्धी ही एक ऊर्जा आहे. आपण तिला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने ती वळते. आपल्याच मनाला घातलेले भीतीचे बांध आपल्याला ऊर्जेला वळवण्यापासून रोखतात. तुला इंग्रजी विषय घेऊन आर्टस् का करायचं आहे, याचा पक्का व पूर्ण विचार तू कर. आत्तापर्यंत तू किमान जेवढे टक्के मिळवीत आली आहेस, ते ९५ टक्के मार्क मिळव आणि  मग तू आर्टस्ला जा. कमी मार्क मिळाले म्हणून आर्टस्चा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला, असे म्हणायला जागा ठेवू नकोस. त्यावरही तुझा निर्णय कसा चुकीचा आहे, हे इतरांच्या अनुभवाने तुला सांगण्याचा प्रयत्न होईलच. तो अजिबात मनावर घेऊ नकोस. ठामपणे वाटचाल करीत राहा. 

सखे, सर्वांत आधी आपल्याला ज्या दिशेने, ज्या शाखेला जायचे आहे, त्यात उपजत गती आहे का, याचा विचार कर. केवळ तुझी मैत्रीण किंवा मित्र आर्टस् करतात म्हणून तू जाऊ नकोस. आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, ‘मी काय करू?’ हे मला विचारावं लागणार नाही. तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...