आनंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आनंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

आनंदाचे डोही आनंदतरंग...



सखे, आपल्या आयुष्यात सुख हे प्राधान्यक्रमाने येतं. आपण जे जे काही करत असतो ते ते सर्व सुखासाठी करत असतो. स्वत: दु:खी होण्यासाठी कुणी प्रयत्न करीत नाही. असं असूनही सुख म्हणजे नक्की काय? याचा कुणीही गांभीर्याने विचार करीत नाही. म्हणूनच आपण नेहमी ’कशात तरी‘ सुख शोधतो. मुळात सुखी होणे म्हणजे काय, याचा विचार आपण सहसा करीत नाही. केवळ सुखी माणसाचे सदरे शोधत फिरतो. 

’जगात सदा सर्वकाळ सुखी असा कुणीच नसतो. दुसर्‍या बाजूने विचार केला तर सदा सर्वकाळ दु:खी असाही कुणीच नसतो. प्रत्येकाला आपलं दु:ख इतरांपेक्षा मोठ्ठं वाटत असतं.’

सखे, तूसुद्धा लागलीस की माझ्यासारखी प्रवचनं झोडायला. गंमत केली गं. तुझा विचार बरोबर आहे. 

’तुझं ऐकून ऐकून असा विचार आपोआप येत असेल कदाचित. समर्थ रामदास स्वामींनीही प्रश्‍न विचारलाच आहे, ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ 

सखे, थोडासा वेगळा विचार मांडतो. चुकत असेनही कदाचित, पण ऐक. समर्थांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर आपण नकारार्थी घेतो. ’विचारी मना’ या दोन शब्दांनंतर आपण थांबतो आणि मग म्हणतो ’तूचि शोधून पाहे’. मनाला विचार, तूच शोधून पहा. म्हणजे तुला पटेल की, जगात कुणीच सुखी नाही, असा त्याचा अर्थ आपण घेतो. त्याऐवजी आपण विचारी या शब्दापाशी थांबलो, तर एक वेगळा विचार, निराळा अर्थ समोर येतो. समर्थ प्रश्‍न विचारतात आणि त्याचं उत्तरही देतात. जगात सर्वसुखी असा कोण आहे? याचं उत्तर विचारी असं समर्थांनी दिलं आहे. आणि वर पुन्हा सांगत आहेत की, आपण सांगतो म्हणून विश्‍वास ठेवू नकोस, स्वत: शोधून पाहा. विचार केला तर लक्षात येतं की, ज्याच्यासाठी आपण एवढी धडपड करतो, त्यात सुख नसतच. म्हणूनच आपला प्रवास सुखाकडून दु:खाकडे आणि दु:खाकडून सुखाकडे एकसारखा होत राहतो. आपण सुखी होतो, दु:खी होतो. पण कधी सुखरूप होण्याचा, आनंदी होण्याचा विचारही आपण करीत नाही. 

’एक मिनिट. तू ना काहीच्या काही बोलतोस. सुखी माणूस सुखरूप किंवा आनंदी नसतो असं तुला म्हणायचं आहे का? सुखात असलेला माणूस म्हणतो ना, मी सुखात आहे, मी आनंदात आहे.’

सखे, सुख वेगळं आणि आनंद वेगळा. नाही पटत. सुख याला विरुद्धार्थी शब्द दु:ख. तसाच आनंद याला विरुद्धार्थी शब्द सांग पाहू! सापडणारच नाही, कारण तो नाहीच. सुखामध्ये दु:ख अनुस्यूत असतं. सुखी झाला की समजावं तो दु:खी होणारच. आनंदामध्ये आनंदच अनुस्यूत असतो. दुसरं काहीच असत नाही. जे परिवर्तनीय असतं ते सुख आणि जो अपरिवर्तनीय असतो तो आनंद. अवघड होत चाललं आहे का? तुला तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवतो. मुद्दाम ऐक. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अभंग लतादिदींच्या तोंडून ऐकताना वेगळाच अनुभव येतो. त्यात खळेकाकांची चाल म्हणजे, ऐकायला सोपी व नादमधूर. पण, त्यातले खाचखळगे गाणार्‍यालाच समजतात.  

सखे, मला वांगी आणि वांग्याचा कुठलाही खाद्यपदार्थ खूप आवडतो. भरलेली वांगी खाल्ली की, मला बरं वाटतं. सुख मिळाल्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक वांगं खाल्ल्यामुळे सुख मिळालेलं नसतं, तर माझं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत व स्थिर झाल्यामुळे मला सुख प्राप्त होतं. वांगं हे फक्त निमित्त असतं. वांगं खावं अशी वासना झाली की, त्याचा संकल्प मन करतं. बाजारात जावं, वांगी विकत घ्यावी, हे मनाचे संकल्प सुरू होतात. आत्ता जावं की उद्या, भाजीवालीकडे वांगी नसलीच तर, एटीएमपुढे लांबच्या लांब रांग असली तर, असे नाना तर्‍हेचे विकल्प मन करू लागतं. मनाचं कामच आहे संकल्प आणि विकल्प करणे. हो, नाही करता करता जायचा निश्‍चय होतो. बाजारातून वांगी आणल्यानंतर ते त्याची भाजी होऊन पानात पडेपर्यंत आपण अनेक अवस्थांमधून गेलेले असतो. पानात वाढलेल्या भाजीचा पहिला घास घेतल्याबरोबर मन, बुद्धी,चित्त आणि अहंकार शांत झालेल्या अनुभवास आपण सुख म्हणतो. चव बिघडली तर मन विचलित होतं. चव तीच असली आणि बायकोचा मूड बिघडला की आपलं चित्त बिघडतं. जे सुख त्या पदार्थातून अपेक्षित असतं ते मिळत नाही. कारण, अंत:करणचतुष्टय अशांत, अस्थिर असतं. 

सुख साधनांत किंवा विषयात नाही. अमुक एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं वाटणं हा आपला भ्रम आहे. त्याहीपुढे जाऊन त्या गोष्टीत सुख आहे, असा दृढनिश्‍चय होणं ही भ्रांतीची परिसीमा आहे. 

’ज्यापासून सुख मिळतं, त्यात ते नसतं असं कसं म्हणतोस तू?’

सखे, समजा असं धरू की वस्तू किंवा विषय यामध्ये सुख असतं. तर जेवढी ती वस्तू आपल्या संग्रही जास्त तेवढं सुख जास्त मिळालं पाहिजे. ज्यात सुख आहे त्या विषयाचं सेवन जेवढं आपण जास्त करू तेवढं सुख आपल्याला जास्त मिळालं पाहिजे. प्रत्यक्षात तसं होत नाही. तुला माझ्यासारखीच कॉफी आवडते. तुझ्या म्हणण्याप्रमाणे कॉफी प्यायल्याने सुख मिळतं, म्हणून कॉफीत सुख आहे. मग, जेवढी तू कॉफी जास्त पिशील तेवढं सुख तुला जास्त मिळालं पाहिजे. तेही प्रत्येक वेळी. असं घडत नाही. कॉफी पिऊन पिऊन किती पिशील? एका मर्यादेनंतर कॉफीचं नाव काढलं तरी तुला मळमळायला लागेल. म्हणूनच कॉफीत सुख नाही, कॉफी पिण्यात सुख नाही. ज्याला आपण सुख म्हणतो, ते अंत:करण चतु:ष्टय आत्मसुखात लीन झाल्यानंतर येणारा तात्पुरता अनुभव आहे. 

सुख हे बाहेर नाही आपल्या अंत:करण चतु:ष्टयातच आहे, असा पक्का निश्‍चय झाला, की आपण सुखरूप होण्याच्या दिशेने आपोआप जाऊ लागतो. पण, शेकडा नव्याण्णव लोकांना हे पटत नाही. तुलाही ते अजिबात पटणार नाही. आपल्या गुणसूत्रांमध्येच ही धारणा पक्की बसलेली आहे की, ज्यामुळे सुख मिळतं, त्यातच सुख आहे. ते मिळवण्यासाठी अखंड धडपड सुरू राहते. साधनांचं सामर्थ्य संपलं, की दुसरं साधन शोधायचं. साधनांचा संग्रह करत रहायचं. एकातून एक असं न संपणारं चक्र सुरूच राहतं. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण फक्त पळत राहतो. वयोपरत्वे सुखाची साधनं बदलत राहतात. कायम राहते ती तृष्णा. संसारात सुख, मुलाबाळांमध्ये सुख, पैशात सुख, घरादारात सुख. हे सगळं मिळवण्यासाठी पैसा. पैशासाठी काम, नोकरी. प्रत्येकाने एकदा तरी थांबावं आणि विचार करावा. ज्यासाठी पळत होतो ते मिळालं आहे? ज्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण धडपडत आहोत, त्या मुलांना देण्यासाठी वर्तमानात आपल्याकडे वेळ आहे? ज्याक्षणी आपण थांबून या सगळ्याचा आढावा घेऊ, तेव्हा ते आपण सुखरूप होण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल. 

सखे, सुखी असणं वेगळं आणि सुखरूप असणं वेगळं. आपलं सुखी असणं कशावर तरी आधारित असतं. ते नसलं की आपण दु:खी होतो. मनासारखं अनुकूल घडलं तर सुखी होतो आणि प्रतिकूल घडलं तर दु:खी होतो. आपलं सुखी असणं साधनांवर अवलंबून असतं. चहात साखर हवी तशी पडली की सुखी आणि जरा कमी जास्त झाली की दु:खी. आयुष्यातील लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी, प्रत्येक गोष्ट आपण सुखाशी किंवा दु:खाशी जोडतो. या ना त्या कारणाने आपला मूड लगेच ऑफ होऊ लागला की समजावं आपण अजून सुखरूप झालो नाही. ’मी सुखी आहे’ इथपासून ’माझ्यात सुख आहे‘ इथपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखरूप करत जातो. ’मी सुखी आहे’ आणि ’माझ्यात सुख आहे’ या दोन अवस्थांमधून पुढे गेल्यानंतर एकच अवस्था शिल्लक राहते, ती म्हणजे ’मीच सुख आहे’ याची जाणीव. इथे आपण सुखरूप होतो. ’मीच सुख आहे’ यातही कुठेतरी मी म्हणजे अहं शिल्लक राहतो. तोही निसटला की जे शिल्लक राहतं त्याला ’आनंद’ असं म्हणतात. तीच शांती, तेच ब्रह्म. वेगळं काही नाही.

सखे, आनंदात आनंद मिसळला तरीही आनंदच आणि आनंदातून आनंद वजा केला तरीही आनंदच शिल्लक राहतो. डोहाच्या तळापर्यंत, जे अथांग, अंतरंग असतं ते पाणी असतं आणि डोहाच्यावर उठणारे उथळ तरंगही पाण्याचेच असतात. तसंच या आनंदाच्या डोहाचंही आहे. आत बाहेर आनंदच आहे. दुसरं काही नाही. 

सखे, इथे सगळी धडपड, पळापळ थांबते. आपण स्थिर होतो, आपलं अंत:करण स्थिर होतं. जे मिळवायचं ते आधीच प्राप्त झालेलं असतं. याचा अर्थ बरेच प्रयत्नवादी निष्क्रियता असा घेतात. उलट आनंदी माणूस जेवढा क्रियाशील असतो, तेवढा सुखासाठी धडपडणाराही नसतो.  आनंदी माणूस आणि आपल्याच जगात वावरणारा वेडसर माणूस यात बाह्यांगाने काही फरक नसतो. अगदी तसाच कोडगा मनुष्य आणि स्थितप्रज्ञ यातही बाह्यांगाने काही फरक नसतो. दोघांचेही वर्तन सारखेच दिसते. फरक असतो तो दृष्टिकोनात.  दैनंदिन व्यवहार होतच राहतात. त्याच्या परिणामांचा कोणताच परिणाम आनंदी माणसावर होत नाही. आनंदी माणूस सुखाचा अव्हेर करतो असं नव्हे. सुखाला महत्त्वच देत नाही. मिळालं तरी आनंदी आणि नाही मिळालं तरी आनंदी. 

सखे, सुखापेक्षाही सुखाचं व्यसन वाईट असतं. सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने सुखाचा अनुभव येतो. पण, चहा प्यायल्याशिवाय सकाळच होत नसेल किंवा न पिण्यामुळे दिनचर्या बिघडत असेल तर समजावे, चहा पिणं हे आपलं ते व्यसन बनलं आहे. सुखाच्या अनुभवाला आपल्या क्रियाशीलतेशी जोडल्याने व्यसनाची निर्मिती होते. आमचे एक मस्त डिझायन मित्र आहेत. तोंडात चुना तंबाखूचे मिश्रण ठेवूनच काम करतात. मी त्यांना एकदा विचारलंही, साहेब, काय मिळतं हो यातून? ते म्हणाले, ’तुम्हांला नाही कळणार बर्वे. त्यातून ’किक’ येते‘. ते मिश्रण तोंडात ठेवलं की सुचतं, असा त्यांचा समज होता. त्याशिवाय त्यांना सुचत नाही, ही वस्तुस्थिती होती. हीच ’किक’ येण्यासाठी लागणारे मिश्रण, द्रव्य यांची मात्रा सेवनागणिक वाढत जाते. आपण स्वत:ला निर्व्यसनी म्हणवून घेणारी माणसं, ’सुख’ नावाच्या व्यसनामध्ये गुरफटलो आहोत. तेही इतके की, सुख हे व्यसन आहे, असंही आपल्याला वाटत नाही. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणणार्‍या तुकाराम महाराजांचं आयुष्य सुखाचं नव्हतं. पण, ते स्वत: आनंदी होते.