सोमवार, २५ मे, २०२६

ऐतबार बढता है....

‘धुरंधर २’ पाहिल्यापासून एक गजल व समर्पक ठिकाणी वापरलेले त्यातील शेर हे गेले कित्येक दिवस डोक्यातून जात नव्हते. पण, एके ठिकाणी काही तरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते.


दिल पे ज़ख़्म खाते हैं जान से गुज़रते हैं
जुर्म सिर्फ़ इतना है उन को प्यार करते हैं


ही ती गझल आणि त्यातील एक शेर सिनेमा संपता संपता आहे.


ऐतबार बढ़ता है और भी मोहब्बत का
जब वो अजनबी बन कर पास से गुजरते है


या शेरमध्ये काही तरी चुकले आहे, असे वाटत होते. म्हणजे त्या प्रसंगाशी तो शेर जुळत असला, तरी अर्थाशी जुळत नव्हता.

ती ओळख न दाखवता समोरून जाते तेव्हा प्रेमावरचा माझा विश्‍वास आणखीनच दृढ होतो. असा या ओळीचा अर्थ होतो. तिचे ओळख न दाखवता जाणे प्रेमावरचा विश्‍वास अधिकच दृढ कसा बरे करेल, हा प्रश्न त्रास देत होता, हीच बाब खटकत होती. बरेच दिवस त्रासात काढले. नुसरत फतेह अली खान यांची मूळ रचना ऐकली, तिथेही ते पास म्हणत आहेत (कदाचित माझे ऐकणे चुकत असेल). व्यग्रतेत असल्याने ही इक्बाल सफीपुरी यांची मूळ गझल शोधून काढण्यास वेळच मिळाला नाही. आज अचानक ती गझल सापडली व तिच्यात तो शेरही सापडला.


ऐतबार बढ़ता है और भी मोहब्बत का
जब वो अजनबी बन कर यास से गुज़रते हैं


आणि बरोब्बर अर्थ जुळला. तो मूळ ऊर्दू शब्द ‘यास’ (یاس) असा आहे, ज्याचा अर्थ निराश, नैराश्य, उदास, दु:ख असा होतो. ती ओळख न दाखवता निराश, उदास समोरून जाते, तेव्हा प्रेमावरचा माझा विश्‍वास आणखीनच दृढ होतो. जरी मला ओळख दाखवली नाही (काही अन्य कारणांनी), तरी तसे करण्याचे दु:ख तिला सलते(म्हणजेच तिचे माझ्यावर प्रेम आहे), असा अर्थ त्या शेरातून निघतो.


दु:ख आपण प्रेयसीवर केलेल्या प्रेमातून येवो, ईशप्रेमातून येवो किंवा ते देशप्रेमातून येवो, त्याचे वैषम्य वाटत नाही. फक्त प्रेमात, दु:खात तितका अधिकार प्राप्त करावा लागतो. खूप कठीण असते ते....


अगदी, भाऊसाहेब पाटणकर म्हणतात तसे


रडलो आम्ही इश्कात, जेव्हा आम्हा रडावे वाटले
तेव्हा नव्हे, इश्कास जेव्हा, आम्ही रडावे वाटले
आसूवरी अधिकार हाही, इश्कात ज्याला साधला
नुसताच नाही इश्क, त्याला मोक्ष आहे साधला