’प्रत्येक क्षण जगला पाहिजे, हे समजलं. पण, आधीची आणि नंतर होणारी वंचना नाही समजली.’
सखे, आपण एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्यकाळात. भूतकाळातील घटना कितीही रमणीय असल्या तरी त्या घडून गेलेल्या असतात. भविष्यकाळ असा चांगला असेल, तसा चांगला असेल याच्या कल्पनासुद्धा रमणीय असतात. दोन्ही ठिकाणी मन रमतं. वास्तविक ते वर्तमानकाळात रमलं पाहिजे. ज्यांचं मन केवळ वर्तमानात असतं, त्यांचा गतकाळही संस्मरणीय असतो आणि येणारा काळही.
’हे खरं आहे की, माणूस बहुतांशी भूतकाळातल्या चांगल्या आठवणींशी आणि भविष्यातील स्वप्नांत गुंग होऊन जातो. पण, असं का घडतं? वर्तमानात फार वेळ का राहता येत नाही?’
सखे, याचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नाही. मी ते शोधतोय. गेलेले क्षण आणि येणारे क्षण हे फसवे समाधान देणारे असतात. त्यांना ओढून ताणून वर्तमानाशी जोडू लागलो की, आत्मवंचनेशिवाय हाती काहीच लागत नाही. आपण गृहीत धरून चालतो, ’जे आहे ते असंच राहणार आहे’. जे आज मिळत आहे, ते कायम असंच मिळत राहणार आहे. जे आहे ते जाईल, याचा विचारही मनात भीती निर्माण करून जातो. ’जाणं’ सूचित करणारी प्रत्येक गोष्ट माणूस अप्रिय किंवा वाईट ठरवत जातो. मग तो नाश असो, र्हास असो, मृत्यू असो, सवयी घालवणारा नियम असो किंवा प्राण हरण करणारा यम असो. अगदी दक्षिण दिशाही आपण अपवित्र ठरवतो. येणारा क्षण असाच राहणार आहे, तो जाणार नाही, यासारखी दुसरी फसगत नाही. आपण असो किंवा क्षण असो, जाण्यासाठीच येतो.
सखे, बघ तुझा चेहराही बदलला. चल. तुझा मूड ठीक करण्यासाठी एक छानसं गाणं ऐकवतो. गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. संगीत पंचमदांचं आणि आवाज किशोर कुमार यांचा. ’आनेवाला पल जानेवाला है’ हे गीत तू ऐकलं असशील, तरीही पुन्हा ऐक. खूप सुंदर शब्द आहेत. खूप चांगला विचार आहे. सामान्यत: आपले विचार हे एका मर्यादेपर्यंत जाणारे असतात. त्यापलीकडे जाणं आपल्याला जमत नाही. आपलं आयुष्य म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्राप्त झालेल्या क्षणांचा संचय असतो. आयुष्यात अनेक क्षण घालवणे आपल्याला माहीत असतं, पण एका क्षणात संपूर्ण आयुष्य सामावणं आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असतं. समुद्रात अनेक थेंब आहेत याची कल्पना असते. प्रत्येक थेंबात समुद्र असतो, ही आपल्या कल्पनेपलीकडली गोष्ट असते.
’तुझं आपलं काहीतरीच. कविकल्पना म्हणून ठीक आहे. पण, एका क्षणात कसं आयुष्य जगता येईल?’
सखे, येणारा क्षण हा शेवटचाच क्षण आहे या आर्ततेने तो क्षण जग. जे सबंध आयुष्य जिवंत राहून मिळालं नाही, ते हा एक क्षण जगण्यानं मिळून जाईल. अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं तर, ’बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.’ हे बघ. आता कशी हसलीस! एका क्षणात सबंध आयुष्य जगता येईल, असा क्षणच आयुष्याचं सोनं करून जातो. आपल्या आयुष्याचं सोनं करून जाणारा तो क्षण नेमका त्यावेळी पकडता येत नाही, सांगता येत नाही आणि धरूनही ठेवता येत नाही.
एकदा एका वाटसरूला एका निर्जन स्थळी एक म्हातारा दिसतो. म्हातार्याच्या पाठंगुळीला सोन्याच्या सळ्यांची मोळी असते. एका हातात लोखंडाचा लहानसा तुकडा घेऊन तो म्हातारा मिळेल तो दगड त्या तुकड्याला लावून पाहतो व फेकून देतो. त्याला वाकवत नसतं, चालवत नसतं. तरीही तो म्हातारा कसातरी कण्हत, कुढत पुन्हा पुन्हा दगड उचलून लोखंड्याच्या तुकड्याला लावून पाहत असतो व फेकून देत असतो. वाटसरूला मोठं आश्चर्य वाटतं. हा वयोवृद्ध माणूस पाठीवर सोन्याच्या सळ्यांची मोळी वागवीत, हातातल्या लोखंडाला दगड का लावतो? वाटसरू त्याला थांबवतो आणि विचारतो, ’आजोबा, तुम्ही हे काय करता आहात?’
’मी परीस शोधतोय’
’परीस म्हणजे तोच दगड ना जो लोखंडाला सोनं करतो तो? तुमच्या पाठीवर तर सोन्याची मोळी आहे. मग, एवढ्याशा लोखंडाच्या तुकड्याला सोनं करायच्या मागे का लागला आहात?’
म्हातारबुवा विषण्ण हसतो.
’मुला मी तरुणपणी पाठीवर लोखंडाचा भरा घेऊन बाहेर पडलो होतो. परिसाच्या शोधात. मिळेल तो दगड उचलायचो आणि पाठीवरच्या लोखंडाला लावायचो. लोखंडाचं सोनं झालं नाही हे पाहून निराशेने दगड टाकून द्यायचो. लोखंडाला दगड लावून तो टाकून द्यायची इतकी सवय झाली होती, की पाठीवरल्या लोखंडाचं सोनं कधी झालं हे कळलंच नाही.’
सखे, आपल्या वाट्याला येणारा क्षणही असाच कधीतरी आपल्या आयुष्याचं सोनं करून गेलेला असतो. त्याला धरून ठेवता येत नाही. येणारा क्षण जाणाराच असतो. मग तो दु:खाचा असो किंवा सुखाचा. येणारा प्रत्येक क्षण एक हुरहुर मात्र कायम देऊन जातो. क्षण दु:खाचे असतील तर सुखाची हुरहुर आणि क्षण सुखाचे असतील तर ते धरून ठेवता आले नाहीत, याची हुरहुर.
सखे, क्षण हे फुलपाखरासारखे असतात. आपण त्यांना चिमटीत धरायला जावं तर ते उडून जातात. जाताना आपल्या बोटांना रंग लावून जातात. निसटलेल्या फुलपाखरावर भाळायचं की बोटांना न कळत चिकटलेल्या रंगांना आपल्या अंतरंगात सांभाळायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. क्षणावर भाळणारी माणसं त्याच्यामागे पळतात. क्षण सांभाळणारी माणसं स्थिर असतात. कारण, त्यांना माहीत असतं, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो.
