तू का आवडतेस? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तू का आवडतेस? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

यूँही नहीं दिल लुभाता कोई...


सखे, तू मला का आवडतेस, हे नाही सांगता येत. तू अनेकदा ’मी तुला इतकी का आवडते’ हा प्रश्न विचारून मला भंडावून सोडतेस. नेमकं असं एकच कारण नाही. फक्त ते कारण मला माहिती नाही. या जगात काहीच अकारण घडत नाही. एखाद्या घटनेमागचं कारण आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण आपल्यापरिने त्याची संगती लावण्याचा प्रयास करीत असतो. आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या माणसांना भेटतो, ते अचानक, योगायोगाने वगैरे नव्हे तर ऋणानुबंधांच्यामुळे भेटतो. म्हणूनच एखादा माणूस आपल्याला इतरांपेक्षा अधिक का आवडतो हे तर्कानं पटवता येत नाही. बस तो आवडतो, या पलीकडे आपल्याला काही सांगता येत नाही. 

सखे, तू बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. त्यामुळं तर्कानं न पटवता येणं तुला पटणार नाही. बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर काही अनाकलनीय असतच नाही हा तुझा ठाम ग्रह आहे. त्यावरून आपली अनेकदा भांडणेही झाली आहेत. वादग्रस्त मुद्दे विसंवाद घडवतात. ’असं असू शकेल’ असं मान्यच नसणं, कुठेही श्रद्धा नसणं म्हणजे विज्ञाननिष्ठ असणं असा तुझा दृढ समज आहे. अरे देवा! तुझा कोमल चेहरा रागाने करपू लागला आहे, यथेच्छ, तुडुंब भांडणाची नांदी तुझ्या चेहर्‍यावर दिसू लागली आहे. तेव्हा शांत हो माझ्या आई!

’मी तुझी आई नाही.’

माहिती आहे. रागावू नकोस. प्रेम नाही, निदान रागावू तरी नकोस. सोड ना, किती रागावशील? चल मी तुला किशोर कुमारचं मस्त गाणं ऐकवतो. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं ’तेरा मुझ से है पहले का नाता कोई’ हे गाणं तू ऐक.  पंचमदांचं मस्त मनमोहक संगीत आहे. मस्तपैकी अशी खुर्चीत बैस. कॉफी घे, गाणं ऐक. तुझा मूडही ठीक होईल. 

’हे बरं जमतं तुला. माझा राग कसा घालवायचा, त्यासाठी कोणती कळ फिरवायची हे तुला चांगलंच माहिती आहे. तुम्हा पुरुषांना बायकांना पटवण्यासाठी ही अशी अतर्क्य गाणी बरी ऐनवेळी सुचतात. मॅन विल बी मॅन हेच खरं.’

सखे, आता मी म्हणू का, तुम्हा बायकांचा पुरुषांकडे पाहण्याचा हा परंपरागत, अतर्क्य दृष्टिकोन आहे? पुरुष स्त्रीकडे ’त्याच’ एका कारणासाठी आकर्षित होतो, तिच्याशी लाडीगोडी करतो, जवळीक साधायचा प्रयत्न करतो, असं स्त्रियांना नेहमी वाटतं. स्वत:च्या प्रमाणबद्ध सौंदर्याची प्रमाणाबाहेर जाणीव झालेली असेल, तर मग प्रत्येक पुरुष आपल्याकडे ’त्याच’ नजरेने पाहतो असा दृष्टिकोन तयार होतो. 

’पुरुष ज्या पद्धतीने स्त्रीकडे पाहतात आणि त्या पाहण्याचा त्या स्त्रीला किती त्रास होतो, हे तू स्त्री असतास तर तुला कळालं असतं.’

मान्य आहे. बहुतांशी पुरुषांचा दृष्टिकोन तसा असतो. पण त्यामुळे संपर्कात येणारा पुरुष तसाच असतो असं म्हणणं कितपत योग्य आहे? स्त्रीवर तिच्या देहापलीकडे जाऊन प्रेम करणार्‍या पुरुषावर हा अन्याय नाही का? अमृत मासिकामध्ये एक गोष्ट आली होती. एक नवरा आपल्या बायकोला वाचवा म्हणून डॉक्टरच्या पाया पडत असतो. ’डाक्टरसाब कैसा भी करके जोरू को बचाओ. गरीब हूं लेकीन पाई पाई चुकाउंगा. पांव पडता हूं साहब’. पाया पडणारा, गयावया करणारा माणूस दिसायला हॅन्डसम असतो. त्याची मरणासन्न बायको कुरूप असते. त्याला अजिबात शोभणारी नसते. डॉक्टरला आश्चर्य वाटतं. डॉक्टर त्याला म्हणतो, ’वाईट वाटून घेऊ नकोस. पण, तुझी बायको गेली तर तू सुटशील. एखादी सुंदर स्त्री तुझ्यावर सहज भाळेल. मग तू हिला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का करतोस?’ तेव्हा तो माणूस म्हणतो, ’साब, इसे मेरी आंखोसे देखो’. 

एखाद्याचं सगळ्या गोष्टी अनुकूल असताना नाकारणं आणि सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतानाही स्वीकारणं, बुद्धिप्रामाण्याने पटवता येणार नाही. हे अनेक जन्मांचे ऋणानुबंध, पूर्वी कुठेतरी ओळख असणं, नातं असणं मान्य करावं लागतं. 

’म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की, पुनर्जन्म असतो. पुनर्जन्म वगैरे असं काही खरंच असतं का?’  

सखे, पुनर्जन्म असतो. नसते ती स्मृती. जन्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म या शृंखलेला जोडणारी स्मृती नसते. वेगळ्या अर्थाने सांगायचे तर, स्मरण नसणे हेच मरण. तू संगणकातली एखादी संचिका (फाईल) नाहीशी (डिलीट) करतेस तेव्हा नेमकं काय होतं? त्या संचिकेचे हेडर आणि फूटर वेगळे होतात, त्यातली माहिती तशीच राहते. हेच हेडर व फूटर पुन्हा जुळवता आले तर नाहीशी केलेली संचिका परत मिळवता येते. कमी अधिक फरकानं तसंच पुनर्जन्माचं असतं. 

सखे, एखाद्याला एखादी गोष्ट चटकन समजते, करताही येते. त्याच्याहीपेक्षा हुशार गणलेल्याला त्याच गोष्टीचे लवकर आकलन होत नाही, असं का? मला आंबा प्रचंड आवडतो, माझ्या धीरज म्हांबरे नावाच्या मित्राला अजिबात आवडत नाही. असं का? मन, मेंदू, बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, दोघांनाही असते. तरी मग असं का होतं? क्रिया प्रतिक्रियांच्या प्रक्रियेतून ज्याचा जिथपर्यंत अभ्यास झालेला असतो, तिथून पुढे तो जात असतो. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचं, विचारांचं मुद्रण आपल्या गुणसूत्रांवर होत असतं. मेल्यानंतर आपण काहीच घेऊन जात नाही असं नाही. मिळवलेलं ज्ञान,  अभ्यास, आवड निवड, विचार आपण घेऊन जात असतो.  

सखे, हीच आवड निवड, ज्ञान घेऊन आपणच पुन्हा जन्माला येतो. मागील पानावरून पुढे प्रवास सुरू होतो.  हे मागचं पुढे घेऊन जाणं म्हणजे संचित.  संचित वासनेला प्रेरित करतं, वासना बुद्धीला, बुद्धी मनाला, मन इंद्रियांना प्रेरित करतं आणि पुन्हा कार्य घडतं. 

आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन इतरांपेक्षा सहज का होतं, एखादी गोष्ट का आवडते, त्यामागे ही कारणपरंपरा असू शकते. तू मला का आवडतेस, हे नेमकं सांगता येत नसलं तरी, काही तरी ऋणानुबंध आहेत एवढं निश्चित...