‘अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...’
सखे, तू प्रेमात पडली आहेस असं म्हणतेस आणि घाबरतेसही. ज्याच्या प्रेमात पडली आहेस, त्याची भीती वाटते की, आई बाबांची?
‘तेच कळत नाही म्हणून तर तुझ्याकडे आले ना? सगळी जगावरची तत्त्वज्ञानं सांगतोस. आपले अनेक मित्रमैत्रिणी, ‘व्हेअर देअर इज नो वे देअर इज बर्वे’ असं म्हणत तुझ्याकडे येतात. तू त्यांचे प्रॉब्लेम सोडवतोसही. मी तर तुझी सखी आहे. मग, मला भीती कशाची वाटते हे तूच मला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकशील.’
घाल, माझे पाय माझ्याच गळ्यात घाल. वरून मी प्रचंड बोअर करतो, असं म्हणायलाही तू मोकळीच.
‘रागावू नकोस ना रे! तुझी लांबलचक, जड भाषेतील तत्त्वज्ञानं जाम बोअर करतात. पण, तुझ्याकडे उत्तरे असतात, मार्ग असतो. उशिरा का होईना, पण तू सांगतोस ते पटतं.’
सखे, लोण्याचा स्टॉक संपला? मला सांगायला, शेअर करायला आवडतं हे खरं आहे. पण, प्रत्येकाला ते त्याच्या सोयीनेच ऐकायला आवडतं हेही तितकंच खरं. असो! हरकत नाही. ‘भय इथले संपत नाही..’ या ग्रेस यांच्या प्रासादिक कवितेला लतादीदींचे स्वरदान लाभले आहे. सखे, ती मुद्दाम ऐक. घाबरू नकोस त्या कवितेचे विवेचन करणार नाही. तेवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञाही नाही. त्यातील शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा तू स्मरतेस. तुझे हे स्मरण, मला मरण येईपर्यंत काही जाणार नाही.
‘नको ना रे मरणाविषयी बोलूस. मला भीती वाटते.’
सखे, तुला ही भीती अगदी लहानपणापासून वाटते. अंधाराची, वेगाची, गणिताची आणि अनेक गोष्टींची भीती. तुला कुठल्या गोष्टींची भीती वाटते हे सहज, नकळत माझ्यासमोर उघड व्हायचं. त्यानंतर तू अगदी मोकळेपणाने माझ्याशी खूप बोलायचीस. मीही तुला माझ्या पद्धतीने त्याचे त्याचे विवेचन करायचो, अनेक उपाय सांगायचो. तूही निर्भय होऊन मला खूप काही सांगायचीस. का कोण जाणे पण, तुला नंतर माझीच भीती वाटू लागली. कदाचित माझंच काही चुकलं असावं किंवा मग, ‘हया यक-लख्त आयी और शबाब आहिस्ता आहिस्ता’ असंही झालं असावं. काहीही असो, जे अंतर पडलं ते आजवर काही अंतरलं नाही. असो!
सखे, भीती हा प्राण्यांचा मूलभूत गुण आहे, ती ओळख आहे प्राणी असण्याची. ही भीती का वाटते, याची अनेक कारणे आहेत. ज्यांची कारणे आपल्याला आता सापडत नाहीत किंवा भीती कशाची वाटते हेच समजत नाही, त्यामागे आपल्या पूर्वजन्मीचे काही संकेत असतात. बहुतांश आपला मृत्यू ज्या कारणाने पूर्वजन्मी झालेला असतो, ते या जन्मात आपल्या भयाचे कारण असते. या जन्मात घाबरण्यासारखे ठोस कारण नसूनही किंवा तसे काही न घडताही एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यामागे पूर्वजन्मात त्यामुळे आलेला मृत्यू हे कारण असू शकते.
सखे, वयोमानाप्रमाणेही आपली भीती कमी जास्त होत जाते, बदलत जाते. सामान्यत: लहानपणी बहुतांशी गणिताची, कठीण विषयांची भीती वाटते. प्रयत्न केला तर हे कठीण विषय आपल्यासाठी सोपे होऊन जातात. कालांतराने लक्षात येतं की, आपण ज्या विषयांना घाबरत होतो ते तर खूप सोप्पे होते, नाहीतर आयुष्यात अजिबात उपयोगाचे नव्हते. भीती आपल्याला तो विषय येत नाही म्हणून असते असे नव्हे तर तो परीक्षेमध्ये ठरावीक वेळेत तो कसा सोडवायचा याची भीती असते. दुसरा एक मुद्दा मांडतो. आपण का कोण जाणे पण, विद्यालयीन अभ्यासक्रमात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध जोडला आहे. त्यामुळे साहजिकच नापास होण्याची, कमी गुण मिळण्याची भीती डोक्यात बसते. प्रत्येक विद्यार्थ्याचे शास्त्रीय मूल्यमापन करून त्याला उपजत कुठल्या विषयात गती आहे, त्याच विषयात त्याला पुढे नेण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. ट्रिगॉनोमेट्रीची प्रमेये सोडवण्याचा जो हट्टाग्रह आपण प्रत्येक मुलाकडून का करवून घेतो, ज्याचा उपयोग केवळ आणि केवळ तो एका विशिष्ट क्षेत्रात गेला तरच होतो, अन्यथा नाही. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ ही अत्यंत चुकीची पद्धत आहे.
सखे, ज्याला ज्यात गती आहे, तेच शिक्षण त्याला सर्वार्थाने दिलं गेलं पाहिजे. अशी शिक्षण पद्धती गुरुकुल व्यवस्थेमध्ये होती. आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय, वैज्ञानिक पद्धतीने आपण कोवळ्या वयातच मुलांचे मूल्यमापन करू शकतो. पण, त्याउलट आपण आपण ज्या क्षेत्रात इच्छा असूनही जाऊ शकलो नाही किंवा ज्या क्षेत्रात आपण नाव कमावले आहे, तिकडेच मुलांना ढकलत आहोत. ती आयुष्यात अयशस्वी होतील, चांगली नोकरी मिळणार नाही, आयुष्य सेटल होणार नाही याची भीती आपल्याला असते. तीच भीती आपण त्यांच्या डोक्यात घालतो. ज्याला आपण जन्म दिला आहे, त्याच्यात काय उपजत गुण आहे, त्याचा वर्ण कुठला आहे, त्याला कशात गती आहे याचे मूल्यमापन आपण करतो का?
सखे, आपण आपल्या मुलांना चुकूच देत नाही. ही चुका करण्याची, नापास होण्याची भीती, त्यांच्यात असलेले निसर्गदत्त गुण, कला दाबून टाकते. त्यांनी इच्छा व्यक्त करण्याआधीच सर्व काही त्यांच्यापुढ्यात हजर करतो. नकार ऐकण्याची सवयच लावत नाही. मग, पुढे हा नकार, अपयश पचवणे त्यांना शक्यच होत नाही. अपयश, नकार यांची कायम भीतीच वाटत राहते. अपयश आले तरीही आपण त्यातून मार्ग कसा काढावा, याचा विचारही होत नाही. पर्यायांचा विचार होत नाही. त्यामुळे, परिणामांची भीती वाटते.
सखे, सगळ्या पर्यायांचा विचार केला आणि कुठलाच पर्याय परिणाम म्हणून स्वीकारला नाही तर आपण निर्भय होतो. निर्भय होणे म्हणजेच भीती नसणे आणि निष्काळजी असणे यात फरक आहे. करोना, ऑमिक्रोन याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याचा विचार केला आणि तसं वागलं की, झालं.
‘तू ना, पर्याय आणि परिणाम या तुझ्या संकल्पनेवर पेटंट लावून घे. किती वेळा ऐकवशील? तरीही ती कळत नाही. तिचा भीतीशी काय संबंध?’
सखे, चिडू नकोस ना. आता तुझंच उदाहरण घेऊ. तुझं प्रेम सफल होईल की, नाही ही भीती तुझ्या मनात आहे. आता आपण पर्यायांचा विचार करू. तो तुला फसवेल, आईबाबा लग्नाला परवानगी देणार नाहीत, आईबाबा आपलं काहीतरी बरंवाईट करून घेतील, ते आजन्म आपल्यासोबत काहीच संबंध ठेवणार नाहीत, असे असंख्य पर्याय प्रत्यक्षात घडू शकतात. यातील प्रत्येक पर्याय परिणाम म्हणून समोर आला तर आपण काय करायचं, तो परिणाम आपण कितपत स्वीकारू शकतो याचा पूर्ण विचार कर. पण, कुठलीच गोष्ट अशी होईल किंवा होणार नाही, असे स्वीकारू नकोस. यामुळे तू कुठल्याही परिस्थितीसाठी तयार होशील. निर्भय होशील. विचार केलेल्या पर्यायाशिवाय वेगळंच काही परिणाम म्हणून समोर आलं तरी त्याचं दु:ख होत नाही. उलट, ‘अरेच्चा! आपण याचा विचारही केला नव्हता’, असा विस्मय वाटेल. हे बुद्धिबळ खेळण्यासारखं आहे. हरलो तरी त्याचं दु:ख होत नाही. आपलं प्रत्येक हरणं नवीन चाल शिकवून जातं. त्याही पुढे जाऊन आपल्याला हरवणार्याचं कौतुक वाटतं.
सखे, भीती आवश्यकही आहे आणि अनावश्यकही आहे. ‘मी कुणालाही घाबरत नाही’ असं म्हणणारा माणूसच सगळ्यात जास्त भित्रा असतो. घाबरणं वाईट, चुकीचं किंवा कमीपणा आणणारी गोष्ट नाही. आपण त्यासाठी तयार नसणं हे चुकीचं आहे.
‘तुला एक विचारू?’
माझ्या होकारासाठी तू कधी थांबली आहेस? नको म्हटलं तरी विचारणारच आणि उत्तरासाठी हट्ट धरून बसणारच.
‘तुला आठवतं, आपण तुझ्या खोलीत बसलो होतो. तू टेबलला हात लावून भिंतीला टेकून बसला होतास. मी हेतुपूर्वक तुझ्या हाताला स्पर्श केला होता. तू घाबरून लगेच हात काढून घेतलास. त्या क्षणी कुठली भीती वाटली होती तुला?’
अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...
नोंद घेण्यासारखे :
या लेखाच्या चित्रामध्ये वापरलेले सुलेखन माझे मित्र अमित वाघचौरे यांचे आहे....