शनिवार, २५ जून, २०२२

अजी कुछ तो बोलिए...

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.
सखे, आठवतंय तू एकदा विचारलं होतस मला, रडणं हे दुबळेपणाचे लक्षण नव्हे का? रडत रडत जन्माला येणार्‍या माणसाला समज आल्यानंतर तेच रडणं अप्रशस्त वाटू लागतं. पण तुला सांगू, जसं दिलखुलासपणे हसायला सामर्थ्य लागतं तसंच साचलेल्या दु:खाला वाट करून द्यायलाही प्रचंड सामर्थ्य लागतं. रडणं हा दुबळेपणा नाही. फक्त पापण्यांच्या आड अश्रू किती संयमाने साचले आहेत, त्यावर दु:खाचं सामर्थ्य ठरतं.  

‘आपलं दु:ख इतरांना सांगितल्याने मन हलकं होतं, असं म्हणतात ते चुकीचं आहे का मग?’ 

सखे, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या दु:खावर प्रचंड प्रेम असतं. दु:ख कुरवाळण्यासारखं सुख नसतं. समदु:खी माणसांचं दु:ख समान असतं, त्यातली तीव्रता नाही. म्हणूनच प्रत्येकाला आपलं दु:ख मोठं वाटतं. आपण जेवढे आपल्या दु:खाने दु:खी होतो, तेवढे इतरांच्या दु:खाने होत नाही. दु:खाची तुलना होते, जाणीव होत नाही. १९२४ साली याच दिवशी जन्मलेला मदनमोहन चुन्नीलाल कोहली हा अवलिया केवळ आपल्या संगीताच्या जोरावर त्याचं दु:ख आपलं करून टाकतो.  या जादूगाराने संगीत दिलेलं ‘यूं हसरतों के दाग’ हे अदालत(१९५८) या चित्रपटातील नर्गिसवर चित्रित झालेलं अप्रतिम आणि माझं खूप आवडतं गीत मुद्दाम ऐक. तुला जाणवेल की, हे दु:ख चित्रपटातील निर्मलेचं नाही, गीत लिहिणार्‍या राजेन्द्र कृष्ण दुग्गल यांचं नाही, लतादीदीचं नाही. हे दु:ख मदनमोहनचं आहे. आपल्या दु:खाची यथार्थ जाणीव केवळ सुरावटीतून करून देण्याचे जगावेगळं सामर्थ्य लाभलेला मदनमोहन हा बहुधा एकमेव संगीतकार असावा. 

सखे, प्रेमात आपण मारलेल्या आपल्या इच्छा पुढे येणार्‍या एकलेपणात छळतात. इच्छेमधला ओलावा निघून गेला की त्याचे डाग होतात. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते दिसू नये म्हणून प्रेमानेच ते धुवावेही लागतात, अगदी कितीही ‘अच्छे’ असले तरीही. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला हे दु:ख समजतच नाही. म्हणून आपण आपल्यालाच ते सांगायचं आणि आपणच ते ऐकायचं. वक्ता, श्रोता दोनही आपणच.

सखे, घर सोडून सुखाच्या शोधात निघावं. सुख काही शेवटपर्यंत सापडत नाही. वाटेत उभी असलेली दु:खं मग आपल्यासोबत प्रवासाला निघतात. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अश्रू आणि दु:खच साथ देतात. बाकी सुखांचे काय? ती येतात, निघून जातात. पडद्यावर हे कडवं जेव्हा येतं, तेव्हा प्राण येताना दिसतो. तोही पान ठेवलेल्या तबकाच्या आरशात. 

सखे, फूल सुकलं तरीही ते फूलच असतं. त्याचा काटा नाही होत. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला ते समजतं का? त्याला त्याची किंमत आहे का? तुझ्या तोंडीही हे वाक्य मी बर्‍याचदा ऐकले आहे, ‘त्याला काही माझं पडलेलंच नाही’. त्याला काय वाटतं यावरून आपलं प्रेमाचे मूल्य ठरवणार्‍या तमाम प्रेमिकांनी या गीतातील दुसरे कडवे अवश्य ध्यानात ठेवावे. आपल्याला समजून घेतलं जात नाही हा दोष आपला नाही. आपण जसे आहोत, तसे आहोत. तो किंवा ती आपल्याला काय समजते, ते त्या व्यक्तीवर सोडून द्यावे. सुकलेल्या फुलाला काट्यामध्ये कुणी तोलत असेल तर तो दोष फुलाचा कसा? असे करण्यात त्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर ते सुखही मान्य असणे, ही प्रेमाची उत्कट अवस्था आहे.

सखे, मदनमोहनला आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागली. जाणूनबुजून त्याची गळचेपी करण्यात आली. त्याच्या पासंगालाही न पुरणार्‍या संगीतकारांनी त्याला संपवला. आपलं नाणं बावनकशी असून चालत नाही. ते वाजवून दाखवावं लागतं. गाण्याशिवाय इतर काही वाजवणं हा या संगीतकाराचा पिंडच नव्हता. संगीतकारांच्या गळेकापू स्पर्धेत हा सुरांचा राजा गप्प राहिला. 

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.

मदनमोहनचं हे गप्प राहणं अनेकांना मानवलं नाही. ते विचारू लागले,  ‘अहो गप्प का? बोला ना काही तरी!‘ मदनमोहनने स्वत:ला मदिरेत बुडवून टाकले. त्यातच त्याचा शेवट झाला. कमालीचा एकलेपणा आणि कमालीचे मदिरासेवन, त्याला हवा असलेला मृत्यू देऊन गेले.

राजेंद्रकृष्णांनी लिहिलेल्या या गीतातल्या शेवटच्या दोन कडव्यांतले शेवटचे ‘तोलिये’ आणि ‘बोलिये’ हे शब्द जेव्हा मदनमोहनचं दु:ख घेऊन लताच्या गळ्यातून बाहेर पडतात ना सखे, तेव्हा काळीज चिरून जातात. लता हे दु:ख ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालते. गाणं थांबतं. स्वर विरून जातात. राहतं ते मदनमोहनचं साचलेलं दु:ख. खरं तर ते दु:ख त्याचं असं उरतच नाही. ते आपलं होतं. आपण नि:शब्द होतो आणि सुकून गेलेल्या आपल्याच इच्छांचे डाग आपल्याला म्हणतात,

‘अजी अजी कुछ तो बोलिए...’


५ टिप्पण्या:

  1. पापण्यांच्या आड अश्रू किती संयमाने साचले आहेत, त्यावर दु:खाचं सामर्थ्य ठरतं.

    हे वाक्य आवडलं

    त्याला काय वाटतं यावरून आपलं प्रेमाचे मूल्य ठरवणार्‍या तमाम प्रेमिकांनी या गीतातील दुसरे कडवे अवश्य ध्यानात ठेवावे. आपल्याला समजून घेतलं जात नाही हा दोष आपला नाही. आपण जसे आहोत, तसे आहोत. तो किंवा ती आपल्याला काय समजते, ते त्या व्यक्तीवर सोडून द्यावे. सुकलेल्या फुलाला काट्यामध्ये कुणी तोलत असेल तर तो दोष फुलाचा कसा? असे करण्यात त्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर ते सुखही मान्य असणे, ही प्रेमाची उत्कट अवस्था आहे.

    हे नाही पटलं. असं कोण वागतं? माझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याला माझ्याबद्दल काय वाटतं, याचा त्रास होतोच.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रसन्ना,
    मदन मोहन हा माझा सगळ्यात आवडता संगीतकार...लताच्या स्वर्गीय कंठातून निघालेल्या लाजवाब गीतांचे निर्माते म्हणून जे संगीतकार सिनेसृष्टीत होऊन गेले, त्यांमध्ये मदन मोहनचे नांव सर्वजण सर्वप्रथम घेतील इतकी ती गाणीं अप्रतीम झाली आहेत...

    " *अजि, कुछ तो बोलिए* " हा तुझा लेख, मदन मोहन यांची त्यांच्या अनेक चालीतील आर्तता, ही त्यांच्यातील इतरांहून एक अफाट संगीतकार म्हणून असलेली गुणवत्ता अधोरेखीत करतांना दिसतो. म्हणुनच नुसते चरित्र सांगणाऱ्या लेखांपेक्षा तो आगळा वेगळा झाला आहे.मदन मोहन यांच्या, अनेक दशकांनंतरही मोहिनी घालणाऱ्या संगीताची उकल करणारा ठरलाय. आणि, तुम्ही म्हणता त्या त्या प्रत्येक गाण्याची अविस्मरणीय चाल हे प्रामुख्याने मदन मोहनचे श्रेय आहे, हे अगदी खरे आहे...प्रत्येक संगीतप्रेमीने संग्रही ठेवावा हवा इतका उत्तम झालाय हा आपला लेख....
    🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. मदनमोहन हे माझेही अत्यंत आवडते संगीतकार .त्यांची सारीच दर्दभरी गाणी प्रत्येक
    वेळी ऐकताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.
    लेख अप्रतिम उतरलाय. पण एका विचाराशी मी सहमत नाही.प्रत्येकाला आपलं दुःख जास्त मोठं वाटतं असं तुम्ही लिहीता.पण तसं नाही .समाजात चौफेर नजर फिरवली तर अशा कित्येक व्यक्ती समोर येतील ज्या दुःखाने पूर्णपणे पिचलेल्या आहेत , शिवाय निराधारही आहेत.अशांकडे पाहिलं की आपलं दुःख त्यांच्यासमोर बोथट असल्याची जाणीव होते.
    अर्थात , दुसर्यांच्या दुःखात शिरून त्यांच्या मनःस्थितीची जाणीव होणे हे महत्तवाचे आहे.
    मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर.

    उत्तर द्याहटवा