
विस्कटलेल्या रांगोळीतला प्रत्येक कण आपला रंग बाळगून असतो. तेच कण घेऊन त्याहीपेक्षा सुंदर रांगोळी पुन्हा रेखाटता येते. आयुष्याची राखरांगोळी करणारे क्षण कितीही मोहक असले तरी ते क्षण घेऊन विस्कटलेलं आयुष्य पुन्हा रेखाटता येत नाही.
सखे, जे घडून गेलं आहे त्या वृत्ताकडे निवृत्त मनाने पहावं. पण, हे फार कर्मकठीण असतं. आपलं मन त्यात गुंतलेलं असतं. आयुष्यातले चांगले क्षण सुखावून जातात आणि दु:खाचे क्षण दु:ख देऊन जातात. क्षण धरून ठेवता येत नाहीत. त्यातली क्षणभंगुरता कायम त्रास देत राहतेच. या न विसरता येण्यार्या क्षणांना आपल्या काव्यामध्ये नेमकेपणाने टिपणे पाडगावकरांना छान जमते. आयुष्यातले जीवघेणे क्षण पाडगावकर अशा रितीने मांडतात की, ते क्षण पुन्हा जगणं शक्य होतं. त्यांचं काव्य अनुभव देत नाही तर अनुभूती देतं. अनुभव आणि अनुभूती यातला फरक सांगेन नंतर पण त्याआधी अरुण दातेंनी गायलेलं ’ती रात्र कुसुंबी बहराची’ हे गीत ऐक. खळेकाकांंनी अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच ’स्पर्शाच्या’ हा शब्द जसा उच्चारला आहे तो डोळे मिटून ऐक, तुला सगळे स्पर्श जाणवू लागतील. मला तर हे गीत ज्या ज्या वेळी कानावर येतं त्या त्या वेळी तिच्यासोबत घालवलेले ते क्षण सजीव होतात. तिच्या मिठीतली मिठास जाणवू लागते. तिचा स्पर्श गात्रागात्रांतून विहरू लागतो.
सखे, हे गीत जेव्हा पहिल्यांदाच ऐकलं तेव्हा त्यातल्या ’कुसुंबी’ या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. अनेक कादंबर्यांतून डोकावलेला ’सांद्र’ हा शब्दही मला ’सांद्र’ करून गेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुसुंबी नावाचं एक गाव आहे. कुसुंबी नावाचा एक वृक्षही असतो. केशरी आणि किरमिजी रंग एकत्र येऊन तयार होणार्या अत्यंत देखण्या रंगालाही कुसुंबी म्हणतात. रंग या अर्थानं हा शब्द पाडगावकरांनी योजला असावा असं मला वाटतं. प्रत्येक रंगाला स्वत:ची वृत्ती असते. केशरी हा विरागी, विरक्त, त्यागी वृत्ती दर्शवतो. किरमिजी रंग उत्कट प्रणयार्तता प्रकट करतो. कमालीची आसक्ती आणि कमालीची अनासक्ती जेव्हा प्रणयाच्या पटलावर एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यातून जो जहरापेक्षाही अधिक खोलवर भिनणारा रंग तयार होतो. तो म्हणजे कुसुंबी.
सखे, त्या रात्री ती मला भेटायला आली होती. कोणती दिव्ये तिने पार केली होती तीच जाणे. पण, तिची प्रणयार्तता तिच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होती. धावत येऊन तिने घातलेली मिठी, तिच्या हृदयातली धडधड माझ्या हृदयी कवळून गेली. तिला मिठीत घेण्यासाठी सरसावलेले बाहू, काही क्षण तसेच राहिले. तिच्या मिठीला जे सांगायचं होतं त्याची जाणीव हातांना झाल्यानंतर ते तिच्या पाठीवर जाण्याऐवजी खांद्यांवर स्थिरावले. बाहूपाशातून मुक्त करणं तिला अनपेक्षित असावं. तिच्या डोळ्यातही ते स्पष्ट जाणवलं.
’हे मीलनाचे क्षण पुन्हा येणार नाहीत.’ हे तिने आपले डोळे माझ्या डोळ्यांत जडवून सांगितलं. तिच्या आर्ततेच्या कहरातून सावरताना संयमाची पराकाष्ठा झाली. जे हवं होतं, ते वेळेआधीच मिळत होतं. अयाचित मिळत होतं, आपणहून मिळत होतं. संधी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस सज्जनच असतो. संधी मिळाल्यानंतरही सज्जनत्व टिकून राहण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो.
’का? लग्न झालं नाही म्हणून?’ तिनं विचारलं. मी मानेनेच होकार दिला. काही क्षण असेच मुग्धतेत निघून गेले.
’फक्त लग्न झालं नाही म्हणून नव्हे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुझ्यासकट तुझ्या चारित्र्याला मी जबाबदार आहे म्हणून.’ बोलता बोलता माझा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. तिलाही अश्रू आवरेनात. तिने पुन्हा मिठी मारली. तो वेग आणि आवेग एवढा जबरदस्त होता की, दोघेही गवतावर कोसळलो. आधी मारलेल्या मिठीत प्रणयार्तता होती, आता प्रेम ओसंडून वहात होतं.
प्रत्येक मिठी वेगळी असते आणि तिची मिठासही.
सखे, त्या ’अलौकिक’ अवस्थेतून सावरल्यावर माझ्या तोंडून सहज शीळ निघून गेली. पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिच्या रूपसौंदर्याच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी विधात्याने तिच्या गालावर तीळ बहाल केला होता. एरव्ही कृष्णवर्णीय असणारा सौंदर्यांचा राखणदार तीळ, चांदण्यात भिजून पिठूरला होता. त्या चंद्रालाही हेवा वाटावा असा चंद्र माझ्यासमोर होता. मी एकवार आकाशीच्या चंद्राकडे पाहिलं आणि मला त्याचं हसू आलं. गालावरच सुकलेल्या आसवांकडे पहात तिने विचारलं,
’का रे हसलास?’
काही नाही गं. या चंद्राच्या संसारव्यथेने हसू आलं. हा चंद्र पुरुषासारखा पुरुष असूनही हे कविलोक त्याची उपमा सुंदर स्त्रीच्या चेहर्याला देतात. आधीच कायम तारकांच्या गराड्यात असणार्या चंद्राची बायको रोहिणी त्याच्यावर किती रागवत असेल, याची कल्पना करून हसू आलं. लग्न झाल्यानंतर तू नाही ना रागावणार माझ्यावर?
माझ्या प्रश्नावर का कोण जाणे ती गंभीर झाली. लगेच चेहरा बदलत खो खो हसत सुटली. क्षणात चेहरा पालटण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या चेहर्यात ओतणार्या मदनाचा प्रहर आठवणीच्या साम्राज्यात जो झिंगला तो झिंगलाच.
सखे, दोघांची हृदये प्रेमाच्या माधुर्यात बुडून गेली होती. हा प्रेमाचा गोडवा मोठा विलक्षण असतो. स्वत:बरोबर सर्व गोष्टींना तो मधात बुडवून काढतो. रातराणीच्या मोहक सुगंधालाही मधुर करून सोडतो, सारा आसमंत माधुर्याने भारावतो. ’मधुरधिपते: अखिलं मधुरं’ म्हणजे कोणती अवस्था आहे, हे समजण्यासाठी हृदये प्रेमाने ओतप्रोत भरलेली असणे आवश्यक आहे. आम्ही हातात हात घेऊन चांदणे सांडलेल्या वाटेवर हरवलो. या वाटेवर पाहिलेली स्वप्नं धूसर होती. याची जाणीव थोड्याच दिवसांनी झाली जेव्हा त्याच वाटेवरून गेलेली ती पुन्हा आली नाही तेव्हा. मीच कदाचित समजू शकलो नाही, तिची मीलनोत्सुकता विरहाच्या जाणिवेतूनच आली होती. पुन्हा कधीच भेटणार नाही याची पक्की खात्री होती म्हणून ती भेटण्यासाठी आली होती. ती जे द्यायला आली होती, ते शरीरसुख मला नको होतं का? याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. पण, ते घेणं मात्र माझ्याकडून घडलं नाही.
सखे, जे घडलं ते बरोबर होतं की चुकीचं हे सापेक्ष आहे. त्या क्षणी जसा मी वागलो तसा पुन्हा वागेन की नाही, हे माझं मलाही सांगता येणार नाही. एवढच का, ते मला ठरवताही येत नाही. कधी कधी आपल्या दुर्गुणांपेक्षाही आपला पराभव आपल्यामधले चांगले गुणच करतात. आयुष्यात घायाळ करणं जेवढं सौंदर्याला जमलं नाही, तेवढं घायाळ आणि त्याहूनही अधिक विदीर्ण मला माझ्या संयमाने केलं आहे.