सखे, काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये एक स्त्री आली होती. कुठे तरी झालेल्या कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी. सोबत फोटोही होता. तिने बातमीचा कागद दिल्यावर माझं लक्ष सहज तिच्या हातांकडे गेलं. चेहर्यावर लपवलेलं वय हात दाखवून देत होता. त्यातली विसंगती स्पष्ट जाणवत होती. बातमीचा कागद हाती देऊन, सगळ्यांना हात हालवून, हाय हॅलो करीत ती निघून गेली. तिने लावलेल्या अत्तराचा अघोरी वास हळूहळू कमी होत गेला. या स्त्रीला मी कुठे पाहिलं आहे याची संगती लावण्यासाठी स्मृतींची पानं चाळू लागलो. अचानक आठवलं, ही स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेली सौंदर्यवती, अभिनेत्री होती. तिची मुलाखत घेण्यासाठी, छायाचित्रे घेण्यासाठी पत्रकारांची रांग लागायची. तिच्या साध्या साध्या गोष्टींची खूप प्रसिद्धी व्हायची. तिच्या सौंदर्याच्या सगळीकडे चर्चा व्हायच्या. कालांतराने सौंदर्याला, अभिनयाला उतरती कळा लागली. प्रसिद्धीचे झोत बंद झाले. बातमीसाठी मागे लागणारे जवळपासही फिरकेनात. चर्चेत राहण्यासाठी समाजसेवा करणं तिला क्रमप्राप्त होतं. अशा प्रसिद्धी देणार्या समाज कार्याची बातमी स्वत:च लिहून, ती छापून येईपर्यंत पाठपुरावा करत राहणंही क्रमप्राप्तच होतं.
सखे, इतर कुठल्याही व्यसनाप्रमाणेच प्रसिद्धीचं व्यसनही घातकच आहे. हा प्रसिद्धीचा झोत जेवढं अंधारात ढकलतो, तेवढं अंधारात ढकलणं प्रत्यक्ष काळोखालाही जमत नाही. आपण कायम प्रसिद्ध राहू, कायम लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील, आपल्याला चांगलं म्हणतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ असतं. मुळात अशा गोष्टींची आवश्यकताही नसते. अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं हे तुला पटेल. पण, ’या गोष्टींची आवश्यकता नसते’ हा विचार तुला पटलेला दिसत नाही. हरकत नाही. तू खामोश देहलवी यांची ’उम्र जलवों मे बसर हो’ ही जगजित सिंगांच्या मखमली आवाजातली अप्रतिम गझल ऐक. कदाचित तुला माझं म्हणणं पटेल.
उम्र जल्वों में बसर हो ये ज़रूरी तो नहीं
हर शब-ए-ग़म की सहर हो ये ज़रूरी तो नहीं
सखे, आपलं आयुष्य कायम झगमगाटाने भारलेलं राहील असं नाही. आपल्या हातून कायम चांगलं, बरोबर घडेल असं होत नाही. कायम पूर्णावस्थाच प्राप्त होईल असं घडत नाही. कितीही केलं तरी करायचं काहीतरी शिल्लक राहतच. जे राहून गेलं आहे, त्यातून जे केलं आहे ते वजा होत नाही. अशी वजाबाकी करणार्यांची उत्तरे कायम नकारार्थी येतात. जे हातून घडलं त्याचं गुणगान करत बसणं आणि जे राहून गेलं त्याविषयी खंत करीत बसणं योग्य नव्हे. दु:खानंतर सुख येतं ही आपण आपली करून घेतलेली समजूत आहे. दु:खांच्या शेकडो धाग्यानंतर सुखाचा एक धागा विणला जातो. प्रत्येक दु:खाची पहाट सुख घेऊन येतेच असं नाही. सुखाच्या अपेक्षेने दु:ख भोगलं की अपेक्षाभंग होतो.
बेख़ुदी आठों पहर हो ये ज़रूरी तो नहीं
सखे, जे आहे ते कायम तसंच राहील अशी समजूत आपण करून घेतलेली असते. आपलं आयुष्यही आपण याच गृहीतकावर रेखाटत असतो. आपण करीत असलेली नोकरी, धंदा, व्यवसाय हा कायम ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो राहील असे आपण गृहीत धरून चालतो. जास्त मिळालेले पैसे जास्त खर्च करण्यावर घालवतो. कालांतराने मिळकत कमी झाली तरी जास्त खर्च करायची सवय जात नाही. याची कल्पना असल्याने माणूस जे आहे ते टिकवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो. असलेलं नाहीसं होईल तेव्हा काय यासाठी कोणतीही व्यवस्था करीत नाही. आपल्याजवळ जे आहे ते संपणार नाही याची धुंदी माणसाला संपवून टाकते. मिळालेलं यश, प्रसिद्धी, पैसा, नावलौकिक कायम टिकत नाही. म्हणूनच या न टिकणार्या गोष्टींची सवय माणसाला अगतिक बनवते. धुंदी कुठल्या मार्गाने येते व किती येते यापेक्षाही ती कायम टिकणारी नसते हे महत्त्वपूर्ण आहे. चश्म-ए-साकी म्हणजे प्रेयसीच्या डोळ्यातून प्या किंवा लब-ए-सागर म्हणजे प्याला ओठाला लावून प्या, येणारी धुंदी व होणारी आत्मविस्मृती कायम टिकत नाही.
उनकी अगोश मे सर हो ये ज़रूरी तो नहीं
सखे, आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला अलिप्ततेच्या एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. ही अलिप्तता एवढी सहज घडत नाही. व्यसन असणारा माणूस, व्यसनाचा संबंध आपल्या सुखप्राप्तीशी किंवा दु:खनिवारणाशी जोडून मोकळा होतो. गुटखा खाणार्या माणसाच्या मेंदूला तो खाल्ल्यामुळे चालना मिळते. गुटखा खाल्ला नाही तर आपल्या मेंदूला चालना मिळणार नाही, अशी त्यानं समजूत करून घेतलेली असते. गुटखा खाणं हे व्यसन नाही, तो न सुटणं हे व्यसन आहे. चुना, तंबाखू चोळून तोबरा भरल्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही, अशी समजूत करून घेणं हे व्यसन आहे. आपल्या क्षमतेवर आपणच दाखवलेला तो अविश्वास आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास असलेल्या शायर प्रेयसीला उद्देशून म्हणतो, झोप घ्यायची असेल तेव्हा दु:खाच्या शय्येवरही मी झोपेन, त्यासाठी तिच्या बाहुपाशाची आवश्यकता नाही. हे सामर्थ्य, ही अलिप्तता जेव्हा आपल्यात येते, तेव्हा आपल्याला खर्या अर्थाने प्रेम समजते.
उसके सजदों में असर हो ये ज़रूरी तो नहीं
सखे, आपल्याला प्रपंचात होणार्या दु:खांचं निवारण आपल्यालाच करावं लागतं. धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थामध्ये निर्माण होणारे संघर्ष, दु:ख यांची निवृत्ती आपल्यालाच करावी लागते. ती निवारण करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असतात, सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, ज्याला परमार्थ म्हटलं जातं, त्यात निर्माण होणारी दु:खं निवारण करण्यासाठी देवाजवळ मागावं. आपण नेमकं उलट करतो. प्रपंचातील दु:खांसाठी देवाजवळ मागणं मागतो. पारमार्थिक दु:ख आपल्याला होत नाही, कारण त्याची जाणीवच झालेली नसते. आपली अवस्था ढाल तलवार धारण करणार्या रडत-राउतासारखी असते. एक हात तलवारीत आणि दुसरा हात ढाल पकडण्यात गुंतला आहे, देवा आता लढण्यासारखी आणखी दोन हात दे, अशी मागणी तो करतो. आपल्या प्रार्थनेमध्ये बळ नसतच. परमेश्वराला करुणा वाटावी असं आपलं मागणं नसतं. करुणा म्हणजे दु:खितांचं दु:ख दूर व्हावं यासाठी दाखवलेली दया. स्वदु:खाची जाणीव होण्याबरोबर फक्त परमेश्वरच ते दु:ख निवारण करू शकतो, ही श्रद्धा असावीच लागते. तेव्हाच आपल्या मागण्याला अर्थ प्राप्त होतो.
सब पे साक़ी की नज़र हो ये ज़रूरी तो नहीं
सखे, इथे साकी हा शब्द परमेश्वर या अर्थाने आला आहे. परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी आपली प्रत्येकाची नजर त्याच्याकडे लागलेली असते. पण, त्याची मेहरनजर प्रत्येकावर होतेच असं नाही. लहानपणी आपण आईवडिलांचं बोट धरून देवळात जातो. पण, आपली नजर खाजे, फुगे, खेळणी यांच्यावर असते. याच जत्रेच्या निमित्ताने देवळात मोठेपणी जातो तेव्हा नजर चालत्या बोलत्या प्रेक्षणीय स्थळांकडे असते. म्हातारपणी घरी वेळ जात नाही म्हणून देवळात जातो. आपण आयुष्यभर आपल्याच कारणासाठी देवाकडे जातो. देवासाठी कधी जातो? देवळात जाताना पायातल्या चपला बाहेर ठेवतो. आपल्यावर असलेला प्रकाशझोत, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, पद या चपला मात्र मिरवत राहतो. आयुष्यात एकदा तरी त्याला भेटण्यासाठी उपाधीच्या चपला बाहेर ठेवून जावे. तो आपल्या स्वागतासाठी धावत येतो.
