पं. जितेंद्र अभिषेकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पं. जितेंद्र अभिषेकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ जुलै, २०२३

पूजेतल्या पानाफुलां

सखे, आज तुझ्या चेहर्‍यावर विलक्षण मिश्किल प्रश्‍नांची नांदी मला दिसत आहे. खूप वेळ श्‍वास कोंडून ठेवून एकदम सोडला, तर चेहर्‍यावर जसे भाव प्रकटतील तसेच काहीसे भाव तुझ्या चेहर्‍यावर आहेत. 

‘काही नाही रे. एक वाक्य वाचलं एका पुस्तकात आणि असं का होतं या विचारात मन गढून गेलं. माझ्यावर बेतलेले प्रसंग आठवले. काहीच सुचेना. वाटलं तुला विचारावं. पण, तुझं ते लांबलचक स्पष्टीकरण, अतर्क्य बोलणं सगळं डोक्याच्या फार वरून जातं. तरीही तुझीच वाट पाहात होते. इतक्यात तू आलास.’

काय विचारायचं काय होतं सखे, आणि कुठलं असं वाक्य वाचलस ज्यामुळे तू एवढी विचारात गर्क झालीस?

‘माणसाच्या चांगल्या गोष्टी पाण्यावर लिहिल्या जातात आणि वाईट गोष्टी लोखंडावर कोरल्या जातात, असं काहीसं ते वाक्य होतं. एखाद्यासाठी आपण खूप गोष्टी कराव्यात, पण एखादीच राहून जावी. त्यानही नेमकी न केलेली गोष्टच लक्षात ठेवावी व केलेल्या सगळ्याचा त्याला विसर पडावा. हे असे मैत्रीत, प्रेमात निदान माझ्याबाबतीत तरी अनेकदा घडून गेले आहे. असं का होतं रे?’

सखे, तू आपण केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींना फार महत्त्व देतेस म्हणून तुला त्याचा त्रास होतो. त्याच्या लक्षात न केलेल्या गोष्टी राहतात आणि तुझ्या लक्षात केलेल्या. आपण मोजदाद करण्यामध्ये केलेल्या गोष्टी घालवून बसतो. इतरांच्या लक्षात राहतं किंवा राहात नाही हा त्यांच्या स्मृतीचा दोष आहे. बरेचदा हे असं स्मरण किंवा विस्मरण सोयीनुसार घडतं. या सगळ्या गोष्टींची मोजणी करणं सोडलस की तुला खर्‍या मैत्रीची, प्रेमाची ओळख पटेल. तुझ्या चेहर्‍यावरून लक्षात येतय की तुला नाही पटली ही गोष्ट. ठीक आहे, माझं नको ऐकूस बा. भ. बोरकरांचं ‘नाही पुण्याची मोजणी’ हे प्रासादिक गीत ऐक. स्थितप्रज्ञता कशी असावी याचं उत्कट प्रत्यंतर ज्या काव्यातून येतं, ते हे काव्य. अभिषेकीबुवांचा धीरगंभीर आवाज. सखे, तुला सांगतो जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा हेे कान शाबूत असावेत आणि ‘नाही पुण्याची मोजणी’ व ‘इतना तो करना स्वामी’ ही दोनच गाणी ऐकायला मिळावीत. आयुष्याचं सार्थक होईल. गंमत म्हणजे दोन्ही गाणी अभिषेकीबुवांनीच गायली आहेत. 

सखे, पाप पुण्य या फार मोठ्या गोष्टी झाल्या. आपण केलेलं चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही आपल्याला त्रास देत राहतात. केलेल्या कृतीचा चांगलेपणा आणि वाईटपणा आपणच ठरवत असतो. हे त्या त्रास होण्यामागचं कारण आहे. कृती चांगली की वाईट हे आपण प्रत्यक्ष कृती, त्यामागचा हेतू आणि झालेल्या परिणामांवरून ठरवतो. चांगल्या कृतीची मालकी आपण आपल्याकडे आणि वाईट कृतीला आपल्याशिवाय सगळे जबाबदार अशी पद्धतशीर विभागणी करून टाकतो. सगळ्या चांगल्या किंवा बरोबर कृतीची मोजणी करीत बसतो. वाईट, चुकीच्या गोष्टी आणि हातून न घडलेल्या श्रेयस्कर गोष्टींची टोचणी मनाला लावून घेतो. इथेच आपली फसगत होते. केलेल्या चांगल्या कामांचं संचित म्हणजे पुण्य आणि हातून घडलेल्या वाईट कर्मांचं संचित म्हणजे पाप. जेवढी पुण्याची मोजणी घातक तेवढी पापाची टोचणीही घातकच.

सखे, प्रिय गोष्टी करण्यासाठी आणि श्रेयस्कर गोष्टींसाठी आपण फार धावाधाव करतो, जिवाचा आटापिटा करतो. माणूस तारुण्याचा उंबरठ्यापर्यंत प्रेयसाच्या मागे धावतो. प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते करणं. तारुण्याचा आवेग थोडासा ओसरला की, श्रेयसाच्या मागे लागतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी केल्याने श्रेय मिळतं अशा गोष्टी. या वयात माणूस श्रेय मिळत असेल तर अप्रिय गोष्टही करतो. या दोनच अवस्थांमध्ये आयुष्य संपून जातं. या दोनच गोष्टींमुळे माणसाचा विकासही होतो. तिसरी एक महत्त्वाची अवस्था म्हणजे निश्रेयस. प्रियही नाही आणि श्रेयस्करही नाही, तरीही ते करणे आवश्यक आहे म्हणून जे काही केलं जातं त्याला निश्रेयस असं म्हणतात. ते करण्यामध्ये आपला कसलाच लागभाग नसतो, कशाचा पाठलागही नसतो. ही स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे. हा विचार कायमचाच आचरणात आणला की आयुष्य फुलांच्या परागासारखं होतं.

सखे, एकदा ही स्थिती आली की मग आपल्या नावाचं, रूपाचं, आपल्या कृतीचं सुख दु:ख वाटणं बंद होतं. बाह्य लक्षणाने हीच स्थिती कोडगेपणाचीही असते. त्यातला फरक लक्षात आला की फसगत होत नाही. निसर्ग आपल्याला देताना कधी त्याची मोजणी करीत नाही. तसच, आपल्यापासून हिरावून घेतल्याची टोचणीही त्याला नसते. आपल्या हातून घडणार्‍या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पाहायला शिकले पाहिजे. असे सहजतेने घडू लागले की, आपण आकाशस्वरूप होतो. आयुष्य धूपाप्रमाणे सुगंधित होऊन जातं.

सखे, आपल्या बाबतीत जन्म आणि मृत्यू यांचा सोहळा एकांगी असतो. या दोन्ही सोहळ्यात आपला सहभाग हा ते सोहळे आपल्यासाठी आहेत एवढ्यापुरताच असतो. जन्म झाल्यानंतर आपल्याला पाळण्यात ठेवतात, नाव ठेवतात, बारसं साजरं करतात ते सर्व आपल्याला दिसतं, पण समजत नाही. आपल्या मृत्यूनंतर होणारे सोहळे आपल्याला दिसतही नाहीत आणि समजतही नाहीत. जन्माच्या वेळी आपण तो सोहळा समजण्याच्या खूप अलीकडे असतो व मृत्यूच्या वेळी आपण तो सोहळा समजण्यापलीकडे गेलेलो असतो. पूजेसाठी देवावर वाहिलेली पानं फुलं काही देवावर वाहिली म्हणून दुसर्‍या दिवशी ताजी नाही राहात. ती शिळीच होतात. पण सखे, तीच शिळी पानं फुलं आपण  प्रसाद म्हणून स्वीकारतो. देवावर वाहिलेल्या त्या फुलांचा मृत्यू सर्वांगाने परिपूर्ण होतो. स्थितप्रज्ञता ही अवस्थाच अशी आहे की, इथे एकदा माणूस पोहोचल्यावर त्याचा जन्म आणि मृत्यू सर्वांग सोहळा होतो.