‘आपण घेण्यासाठी हात पुढे करावा आणि देण्यासाठी पुढे झालेल्या हाताने वस्तू आपल्या हातात न देता टेबलवर ठेवावी, तेव्हा जसं वाटेल ना, तसं वाटतंय रे...’
सखे, तू कधी कधी दु:ख इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त करतेस की, ते तुझं न राहता माझं होऊन जातं. दु:ख दु:खात मिसळलं की, ‘काय झालं?’ असं विचारण्याची आवश्यकता राहत नाही. तपशिलाची माहिती विचारणार्या प्रश्नांची टरफले गळून पडतात. वेदना शिल्लक राहते.
‘मला आणि तुलाही माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतेय. तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही. पण, इतकं कळतं की, मला काय म्हणायचं आहे, हे तुला नेमकं समजतं. त्याच्या वागण्याचा त्रास होतोय रे. तो नव्हता असा. आम्ही दोघेही एकमेकांना आतबाहेर ओळखतो. तरीही तो ओळखच नसल्यासारखा का वागतो? का बदलला तो? माझं काही चुकतंय का? मी आणखी काय केलं की, तो पूर्वीसारखा वागेल? सगळे प्रश्न भुंग्यासारखे छळत राहतात.’
सखे प्रश्नांचा फार त्रास करून घेऊ नये आपण. ते त्रास देऊ लागले की, मस्त गझल ऐकावी. मला गझल का आवडते माहितीये, कारण ती माझ्यासारखी नाही. मी जास्तीत जास्त शब्दांत कमीत कमी सांगतो. गझल कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगून जाते. तुझा मूड ठीक होईल आणि कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातील. कतील शिफाई यांची ‘किया है प्यार जिसे हमने जिंदगी की तरह’ ही जगजित सिंग यांच्या आवाजातील गझल ऐक.
‘तू खपल्या नको ना काढूस. माझीही अत्यंत आवडती गझल आहे. त्यालाही प्रचंड आवडायची. तुला माहिती आहे, त्याला व मला गझल, सिनेमा, गाणी, कविता एकमेकांना शेअर करायला आवडतं. त्याहीपेक्षा एकमेकांची त्याबद्दलची मतं ऐकायला तर त्याहून जास्त आवडतं. आता आवडायचं असं म्हणावं लागेल. तो तुझ्यासारखाच खूप बारीक बारीक जागा सांगायचा. प्रत्येक शेर उलगडून सांगायचा. आता जागा असतो, पण मोबाइलमध्ये तोंड खुपसण्यासाठी. सगळी आवडच संपली आहे त्याची.’
सखे, यातला पहिला शेर आपल्याला खेचून घेतो, तो शेवटपर्यंत सोडत नाही. एखादी गझल आपल्याला आवडते कारण शायराने त्यात आपली वेदना नेमक्या शब्दांत मांडलेली असते म्हणून. एरव्ही यातना देणारे आपले दु:ख इतके छान वाटते की, आपल्या तोंडून सहज, ‘वाह क्या बात है!’ अशी दाद नकळत निघते. आपली वेदना आपलीच दाद घेऊन जाते.
सखे, आपलं आयुष्य आपल्या ओळखीचं असतं. त्यात जे घडतं, बिघडतं ते आपल्या ओळखीचं असतं. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करतो. ते आपलं असतं. असंच आपल्या आयुष्यासारखं आपण कुणावर तरी प्रेम करावं आणि त्यानं ओळखही दाखवू नये, याचं दु:ख प्रचंड असतं. आश्ना म्हणजे ओळखीचा, मित्र, प्रियकर. आता तुझ्याबाबतीत या सगळ्या पायर्या पार करून इथवर पोहोचलेला तुझा नवरा. त्याचं परक्यासारखं वागणं, तुला असह्य होत आहे, यात शंकाच नाही. तारीकी म्हणजे काळोख, रात्र. पण इथे, दुर्लक्ष करणे, बेफिकिरी असा त्याचा दुसरा अर्थही एकदम लागू होतो. तो लपेल, तो दिसणार नाही. त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे लपणार नाही. ते दिसेल. नाहीच दिसले तर तो दाखवून देईल. आपल्या या दु:खाची त्याला जाणीवही नसणं कायम जाणवत राहील.
सखे, या नंतरचं कडवं खूप लक्षपूर्वक ऐक. हा ऑडिओ २००६साली टॉरोन्टो येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमातील आहे. या कडव्याची पहिली ओळ म्हणून जगजित सिंग एक तान घेतात. त्यानंतर ‘हाथ छोड दिया’ म्हणताना एक जागा घेतात. एकदम लाजवाब. आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातातून निसटत आहे, आपण काहीही करू शकत नाही, ही अगतिक अवस्था त्या दोन शब्दांतून जगजित सिंग व्यक्त करतात त्याला तोड नाही. त्या सुरातून परित्यक्त झालेलं दु:ख थेट काळजात उतरतं. एका क्षणासाठी गाणारा, ऐकणारा नाहीसे होतात. राहते ते फक्त कारुण्य. आपण भानावर येतो ते त्यानंतरच्या ओळी आपल्याला छेदून वास्तवात घेऊन येतात म्हणून. मुरव्वत म्हणजे संकोच, भीड, चांगुलपणा, सौम्य वागणूक, मन राखणे अशा अर्थाने घेतला जातो. दिल-लगी म्हणजे करमणूक, मनोरंजन. आपलं मन राखणं हे त्याचं मनोरंजन होतं. तो आपलं मन राखतोय, हे त्याचं आपल्यावरचं प्रेम आहे हा भ्रम होता. तो त्याचा मन रमवण्याचा उद्योग होता. जवळ न येण्याच्या दु:खापेक्षाही त्याचं हळूहळू दूर जाणं जास्त वेदना देणारं आहे. ज्याची प्रत्येक वेदना आपण आपली मानली त्याचं आपलं नसणं जास्त वेदनादायी आहे.
‘तुला माहिती आहे आता मोबाइलमधून चेहरा वर करून पाहतही नाही. त्याला काही ऐकावसं वाटत नाही आणि काही सांगावसंही वाटत नाही. त्याला ट्विस्ट एन्ड असलेले सिनेमा खूप आवडतात. मी त्यातला ट्विस्ट उलगडून सांगितला की, त्याला ते खूप आवडायचं.एन्सेंडिस (एंसादी) या फ्रेंच सिनेमातील प्युअर मेथमेटिक्स, कोलात्झ कॉन्जेक्चर आणि त्यातील सायमनने आपली बहीण जेनीला ‘वन प्लस वन, डज इट मेक वन?’ विचारलेला हा प्रश्न, यावरून आम्ही प्रचंड खल केला होता. मी त्या सिनेमातील त्याला कळालेलं मर्म सांगेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. आमच्यात वादही झाला होता. आताशा तो वाद टाळतो. तो वाद टाळतो याचं दु:ख करू की, तो संवाद टाळतो याचं दु:ख करू तेच कळेनासं झालंय.’
सखे, कतील शिफाई यांचा;
हा शेर जगजित सिंग यांच्या या व्हर्जनमध्ये नाही. इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं. तुला त्रास होतोय तो नेमका या गोष्टीचा.
सखे, त्यावरचा उपाय मला नको विचारूस. तो माझ्याकडेही नाही. तसा तो कुणाचकडे नसतो. नवरा बायकोतील नातं स्थिरावणं कधी कधी दूर जाण्यासारखं भासतं. लग्नाच्या सुरुवातीला असलेल्या प्राथमिकता कालांतराने बदलतात. आपण आपल्या रूटीनमध्ये अडकत जातो. पत्नी माता होऊन संसारात गुरफटते. पती एककल्ली किंवा बाहेरख्याली होतो. सप्तपदीमधील शेवटचं वचन हे ‘सखा सप्तपदी भव’ आहे याचा आपल्याला विसर पडतो. मित्र-मैत्रीण, प्रियकर प्रेयसी, नवरा-बायको यापेक्षाही सखा-सखी यातील सख्यत्व फार महत्त्वाचं आहे, हे उलगडेपर्यंत हे खूप जवळ येऊन दूर होत जाण्याचं दु:ख भोगावं लागतं. तुझ्या माझ्यात सख्यत्व आहे, ते आपण दोघेही नवरा-बायको नाही, म्हणून आहे. तुमच्या नात्याकडे नवरा बायको या दृष्टिकोनातून पाहूच नकोस. तू त्याची सखी हो आणि त्याला तुझा सखा होऊ दे. मग दोघांचेही हात आवळलेही जाणार नाहीत आणि सुटणारही नाहीत.
‘तू म्हणतोस तसंच होईल की, नाही माहीत नाही. पण, तुला दु:ख समजतं. तुला ते आपलंसं करणं जमतं. तुझ्याकडे असलेल्या गाण्यांचा संग्रहही प्रचंड आहे व तू तो मला ऐकवत असतोस. म्हणूनच तर मी तुझ्याकडे येते.’
हो सखे, अशीच येत राहा, ऐकत राहा!
