रविवार, ३ जुलै, २०२२

जीवन क्या है...

सखे, एखादी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडावी, ती मिळावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असावं. पण, ती त्या वेळेस मिळू नये. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती मिळावी, तेव्हा तिचं अप्रूप निघून गेलेलं असावं. तेव्हाची आसक्ती खरी म्हणावी की, आजची अनासक्ती खरी म्हणावी? की, दोनही खोटीच? हा संभ्रम, ही जी अवस्था आहे ना, ती माझी गेले दोन दिवस आहे. बरं झालं तू आलीस. कुणाला तरी हे सांगायचंच होतं. अन्यथा वेडा झालो असतो.

‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्‍या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’

माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्‍या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.

‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’

ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक. 

‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’

हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...

‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’

तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्‍या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या. 

आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही. 

तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते. 

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’

जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.  

‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’

हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही. 

गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्‍या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या? 

त्या  एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो, 

‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’

त्यावर शिवानी म्हणते,

‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’

सखे, आयुष्यात आपल्याला  हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे. 

हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.

‘जीवन क्या है....’

८ टिप्पण्या:

  1. खूप छान लिहिता तुम्ही. असेच लिहित रहा. या लेखांचे पुस्तक करा.

    उत्तर द्याहटवा
  2. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.
    माणूस नेहमी गतायुष्यात डोकावतो तेव्हा त्या जुन्या आठवणी त्याचं मन उचंबळवून टाकतात. त्या आठवणींनी तो अस्वस्थ होतो.ही बाब सर्वांच्याच बाबतीत घडत असे.आणि ते सुख किंवा आनंद किंवा दिवस आता निसटून गेलेले असल्यामुळे त्याचं दुःख मनाला टोचत असतं. म्हणून गतसुखाच्या आठवणीही दुःख देत असाव्यात असं मला वाटतं.
    मीरा प्रभूवेर्लेकर.

    उत्तर द्याहटवा
  3. सुखाशी पुन्हा झालेली भेट दुःख देऊन जाते . सुंदर तत्वज्ञान सांगणारं वाक्य.छान लेख.

    उत्तर द्याहटवा
  4. कितीही नको म्हटल किंवा नाही करायचं ठरवलं तरी आपण सर्व भूत वर्तमान भविष्य याना चिकटून राहतो तेच तर आपले जीवन आहे

    उत्तर द्याहटवा