पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?
सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;
’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!
तुझीच
कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच
(उत्तर लिही बरं का!!)’
सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!
सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो. मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो.
सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात.
सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही. अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं,
‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’
तितक्याच सहजतेने ती म्हणाली,
‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’
’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच.
तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र.
सखे, काय उत्तर देऊ तूच सांग.
हे माझं पत्र आहे. हे सगळं जरी माझ्या तुझ्या आयुष्यात असलं आणि कायम असणार आहे. तरीही त्यापलीकडे जाऊन आपण मित्र आहोत. वेड्यासारखं वाचणारे, चहासोबत आपल्याला भजी नाही फिलॉसॉफी हवी असलेले, कितीही महिन्यांनी फोन झाला तरी जिथे गाडी थांबली होती तिथून पुढचं सुरू ठेवणारे, जगाला बेफिजुल वाटणाऱ्या प्रश्नला कवटाळून ठेवणारे.
उत्तर द्याहटवाआपण माणसं म्हणून वेगळे आहोत. आपले स्वभाव वेगळे आहेत. पण, एक काहीतरी अगदी लहानशी गोष्ट आहे, जी आपल्याला जोडून ठेवून आहे. तिला connection म्हण किंवा काहीही.
आपला रोज फोन नाही, कुठे काय चाललं आहे माहीत नाही. पण तरीही आपण आहोत आणि असू
प्रेम - फक्त असं असू शकत नाही. आपल्यात जे आहे,ते सुद्धा प्रेमच. वेगळं. त्याला बंधनं नाहीत. Definations नाहीत आणि म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं.
तू सखा असलास,तरी माझी सखी होऊ शकतोस आणि मी सखी असले तरी सखा.
अत्यंत भावविभोर अन तरल शब्दचित्र रेखाटले आहे सर.....
उत्तर द्याहटवाअव्यक्त भावनाही अनेकदा व्यक्त कराव्या लागतात, जगण्याचं चित्र स्पष्ट करण्यासाठी त्यांची गरजही आहे बहुतेकदा....
तुम्हीही छान व्यक्त झालात.... 👍👍👌👌💐