रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कार्पे डिअम

‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.

‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात?  तू पाहिला आहेस का तो? ’

सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर.  बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.

‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’

सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.

‘ए! सोप्या मराठीत सांग..’ 

अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो. 

‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’

सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अ‍ॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस. 

सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.

सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.

‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’

सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही. 

सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्‍या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.

सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे. 



चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे


७ टिप्पण्या:

  1. मस्त लेख, लेखाला साजेसे चित्र. खूप छान

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान. सिनेमाच्या आधारे जे घडलं पाहिजे पण घडत नाही हे वास्तव समोर आणलेले आहे. संवादाने अनेक गोष्टींचं समाधान होतं, पण आज तोच संवाद सोशल मीडियाच्या जाळ्यात हरवलाय तो वाढणं खूपच गरजेचे आहे. सहज सोपी आणि सुटसुटीत सजीव उदाहरणे देऊन मांडणी छान झालीय. शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. कनेक्टींग रहाण्याची महत्व छान विषद केले आहे .छान लेख.

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर चित्र 🎨. खरा लेख चित्रात आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रत्युत्तरे
    1. लक्षांत आणून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. आपल्या म्हणण्याप्रमाणे बदल केला आहे. आरोग्य व इतर समस्या असल्यामुळे स्वत:च्याच ब्लॉगवर भेट द्यायला उशीर झाला.

      हटवा