सखे, ‘किती यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते लीनते, चारुते, सीते’ हे गीत आणि यातली शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात. अक्षरश: रडतो. आतल्या आत कोसळतो. तूसुद्धा हे गीत मुद्दाम ऐक. वाल्मिकी रामायणाशी पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिलेले हे गीत श्रीरामांची त्यावेळची भावना व्यक्त करतात. हे गीत तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक. त्यानंतर तू धाडलेली हिंदी कवी राजेश्वर वशिष्ठ यांची ‘जानकी के लिए’ ही कविता पुन्हा वाच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन तुझ्या लक्षांत येतील. सर्वांत आधी वाल्मिकी रामायणातील युद्धकांडाचे ११२ ते १२० हे सर्ग वाच. म्हणजे राजेश्वर वशिष्ठ यांची कविता, गदिमांचे काव्य आणि त्यांचा दृष्टिकोनही समजेल. ‘लीनते चारुते सीते’ ऐकताना मला का रडू कोसळते, तेही तुला समजेल. सीतेला पूर्णपणे असलेली श्रीरामाची जाणीव, तुलाही होईल.
सखे, श्रीरामांनी हनुमंताला विभीषणाची अनुज्ञा घेऊन सीतेला आपल्यासह सर्व सक्षेम आहेत व रावणाला मारून युद्ध जिंकल्याचा निरोप द्यायला सांगितलं. युद्ध जिंकूनही लंका रामाची नव्हती. ती विभीषणाची होती. त्याची अनुज्ञा घेऊन सीतेला निरोप द्यायला सांगितला. आपण स्वत: भेटायला गेले नाहीत. हनुमंताकरवी दिलेला निरोपही बारकाईने वाचण्याची आवश्यकता आहे. हनुमंताने सीतेचा निरोप श्रीरामांना दिल्यावरही, श्रीरामांनी विभीषणाला तिला घेऊन यायला सांगितले. सीता आंघोळ न करताच शिबिकेत बसायला निघते तेव्हा, विभीषण म्हणतो, ‘सचैल स्नान करून, उत्तम वस्त्रे, आभूषणे धारण करून यायला श्रीरामांनी सांगितले आहे.’ त्यानंतर सीता डोक्यावरून आंघोळ करते, वस्त्रे, आभूषणे धारण करते. शिबिका सरळ रामाजवळ घेऊन यायला श्रीराम मनाई करतात. तेव्हा सीतेला पडद्याआडून आणावे, अशी सूचना विभीषण करतो, ज्याला राम विरोध करतात. जिच्यामुळे हे भयानक युद्ध झाले तिला युद्धात सहभागी झालेल्या व हयात असलेल्या सर्व सैनिकांनी पाहावे, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून सीतेला पायी चालत यायला सांगितले. याचा सीतेला त्रास झाला किंवा वाईट वाटले, असे चित्रण वाल्मिकी करत नाहीत. श्रीरामांना भेटण्याची तिची ओढच इतकी तीव्र होती की, रघुवंशाच्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व ठसेल म्हणून मुद्दाम केलेल्या या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरणे साहजिक आहे.
सखे, त्यानंतर श्रीरामांनी जे काही सीतेला सांगितले, ते वाल्मिकींपेक्षाही गदिमांनी उत्कटपणे सांगितले आहे. ते ऐकल्यावर सीता काय म्हणाली, हेसुद्धा वाल्मिकी रामायणातील प्रत्येक शब्दावर लक्ष देत वाचण्यासारखे आहे. त्यानंतर लक्ष्मणला चिता पेटवायला सांगून सीता श्रीरामांना परिक्रमा घालते, तेव्हा श्रीराम मान खाली घालून उभे असल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे.
सखे, रामायणात श्रीराम स्वत:ला कधीच देव, भगवान असे म्हणत नाहीत. उलट, ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’, असे म्हणत आपण माणूस असल्याची ग्वाही ते अनेक ठिकाणी देतात. याच्या अगदी उलट महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपण भगवान असल्याची ग्वाही देतात. स्वत:ला ‘वासुदेव’ म्हणण्याचा आग्रह धरतात. सोळा सहस्र नारींना स्वत:चं नाव देण्यासाठी भगवान व्हावं लागतं. आपल्या मनात यत्किंचितही शंका नसताना, प्राणप्रिय असलेल्या स्वत:च्याच एकमेव पत्नीला संपूर्ण समाजासमोर पावित्र्य सिद्ध करायला लावताना, स्वत:ला सावरायला माणूस व्हावं लागतं. समाजव्यवस्था घडवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक भावना दूर सारत कर्तव्यकठोर माणसाचा देवत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीराम. स्वत: भगवंत आहोत हे माहीत असूनही माणूस म्हणून वागत समाज घडवण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण. आदर्श प्रस्थापित करताना देवत्व कठीण असतं, माणुसकी देवत्वापेक्षाही अधिक कठीण व निष्ठुर असते!
सखे, जिच्यासाठी इतके सायास केले, तिला असं वागवताना श्रीराम नावाच्या माणसाला काहीच दु:ख झालं नसेल का गं? सीतेची अग्निपरीक्षा देताना पाहून, श्रीराम आतल्या आत खाक झाले नसतील का गं? ‘हें तुझ्यामुळें गे झालें, तुजसाठी नाहीं केलें’ आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें’ या दोन ओळी उच्चारताना श्रीरामांची वेदना माझ्या डोळ्यातून ओघळते. या सर्व वेदनांचा आणि मर्यादांच्या छळवादाचा कडेलोट, ‘सखि, सरलें तें दोघांमधलें नातें’ या ओळींनी होतो. माझा प्रत्येक अश्रू पापण्यांची साथ सोडत मुक्तपणे कोसळतो. श्रीरामाला मोकळेपणी रडताही आलं नाही.
सखे, एक दुसरा, थोडासा वेगळा विचार करून पाहा. सीतेचं दु:ख पाहताना श्रीरामाच्या दु:खाकडेही पाहा. ‘स्त्री-पुरुष भेदभाव’, ‘स्त्रीवर अन्याय’, ‘पुरुषप्रधान संस्कृती’ वगैरे सिद्ध करताना आपण पुरुष असलेल्या श्रीरामाचं दु:ख पाहणेही आवश्यक आहे. स्त्रीची न्याय्य बाजू मांडताना, पुरुषावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्यक आहे. स्वाभाविक सहानुभूती मिळालेल्या दु:खाकडे पाहताना, त्याच दु:खाची दुसरी बाजू ‘अन्याय करणारीच आहे’, असे ठरवत तर नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे.
सखे, गालांवर ओघळलेली आसवे दु:खाची मर्यादा सांगतात आणि पापण्यांच्या काठावर संयमाने रोखलेले अश्रू दु:खाची व्याप्ती सांगतात. ओघळणेही महत्त्वाचे आणि रोखणेही महत्त्वाचेच. ‘तुला दाही दिशा मोकळ्या आहेत’, ‘सीतेला वनात सोडून ये’ हे राजाराम सांगताना, त्याच्या आत असलेल्या आपल्या रामराजाला काय दु:ख झालं असेल याची जाणीव सीतेला पूर्णपणे होती. म्हणूनच ती प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेली. सीतेला असलेली रामाची हीच जाणीव आपल्याला आहे?

क्या बात है. सखोल अभ्यास, चिंतन. खूप आवडला.
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवा