‘मी काय करू सांग ना रे?’
सखे, तू असा ओठांचा चंबू करून प्रश्न विचारला की, मला एक प्रश्न पडतो. तुझ्या ओठांनी टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ की, तू विचारलेल्या?
‘चावटपणा पुरे झाला. तू मला सखी म्हणतोयस खरा, पण आपल्या वयातील अंतर पाहिले आहेस का? यावर ते गेल्या खेपेला ऐकवलंस तसं, ‘ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो’ या ओळी असलेलं गीत नको ऐकवूस.’
सखे, तुझं वयात येणं खरं तर माझ्यासाठी अडचणीचं झालं आहे. आधी तू किती छान मोकळेपणी बोलायचीस. त्या संवादाला आधीच ठरवलेल्या अर्थाचे कंगोरे नसायचे. जाऊ दे. भांडण होईल आपलं. काय झालं ते सांग.
‘ही दहावी म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखी झाली आहे. ‘पुढे काय करणार तू?’ हा प्रश्न मला सगळ्या नातेवाइकांनी विचारून झालाय. मला काय करायचं आहे, हे सांगितलं तर ते कसं चुकीचं आहे, हेच प्रत्येकजण ऐकवतो. बरं, ‘नाही ठरवलं अजून’, असं म्हटलं तर प्रत्येका जास्तच चेव येतो. मोबाइलमध्ये गुरफटलेल्या पिढीपासून ते ‘आमच्यावेळी हे असं नव्हतं’ इथपर्यंत सगळे विषय येऊन जातात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता मी आर्टस्ला जायचं ठरवलं तर केवढा गहजब घरात! एका नातेवाइकांनी तर अशा काही तुच्छतेने पाहिलं की, बेचाळीस पिढ्या नरकातच गेल्याचा भास झाला. मला इंग्रजी हा विषय घेऊन आर्टस् करायचे आहे, तर आईबाबांना वाटते मी एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग करावे. आता मला सांग मी करू तरी काय?’
सखे, ही शेकडा नव्वद घरांतल्या मुलांची समस्या आहे. आईवडिलांच्या अपेक्षा, नातेवाइकांचे सल्ले यातून गोंधळलेली मुलं हे घराघरांतील चित्र आहे. याला एकच एक कारण जबाबदार आहे, असं म्हणता येणार नाही. शिक्षणव्यवस्थेपासून ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत. त्या सगळ्या घोळात तू नको पडूस. तू छानपैकी एक गीत ऐक. गदिमांनी लिहिलं आहे आणि खळेकाकांनी स्वरबद्ध केलेलं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे अप्रतिम गीत ऐक. आशाताईंनी गायलेल्या या गीतातील शेवटच्या कडव्याचा शेवट जिथे होतो, तिथून पुन्हा ध्रुवपद येत नाही. एकदा ते अढळपद प्राप्त झालं की, ध्रुवपदावर यायचंही नसतं.
सखे, आपण सर्वांना सर्व शिक्षण या चक्रात अडकलो आहोत. यात उपजत आपल्याजवळ काय आहे, याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही. हे उपजत गुण वेळेत शोधले तर कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग निश्चित होतो. एखादे मूल गणितात हुशार असेल तर त्याला इंग्रजी व इतिहास या विषयांत कमी पडलेले गुण त्याची एकूण मार्कांची टक्केवारी खाली आणतात. केवळ गणित हाच विषय घेऊन त्याला पुढे जाता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. इतर विषयांत जरी त्याला काठावर मार्क पडले तरी जेवढे गणितात पडले आहेत, तेवढी त्याची एकूण टक्केवारी धरली जात नाही. याचा सर्वांत मोठा दोष म्हणजे पडलेल्या गुणांवरून गुणवत्ता ठरवली जाते.
ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे, तेवढे मार्क मिळवण्यासाठी आपण धडपडतो. अन्यथा, जेवढी आपली टक्केवारी आहे त्यानुसार आपला मार्ग निवडणे हा पर्याय शिल्लक राहतो. ‘शिक्षणाची कुठलीच शाखा दुय्यम नसते’ असं कायम म्हणणारी माणसं कला शाखेत जाणार्या मुलांकडे तुच्छतेने पाहतात. अमुक इतके मार्क पडले तर विज्ञान, अमुक इतके पडले तर कॉमर्स, अमुक इतके पडले तर इंजिनिअरिंग अशी गुणांप्रमाणे केलेली गुणवत्तेमधील उच्चनीचता या समानताप्रेमी विचारवंतांना खटकत नाही.
सखे, आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही!
सखे, आपले नातेवाईक आप्तही विद्येच्या या शाखांकडे पोटापाण्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन पाहत नाहीत. ‘कुठे गेल्यावर अधिक स्कोप आहे?’ हा विचार पालकांच्या मनात येणे चुकीचे नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता लाभावी, पुढील आयुष्य किमान पैशाच्या दृष्टीने तरी ‘सेफ झोन’मध्ये असावं असं वाटण्यात काहीच गैर नाही.
‘त्यांचे चूक नाही, याचा अर्थ माझं चुकतंय असं तुला म्हणायचं आहे का?’
सखे, कायम चूक विरुद्ध बरोबर असा संघर्ष नसतो. आईबाबा बरोबर म्हणजे तू चूक आणि तू बरोबर म्हणजे ते चूक असं नसतं. दोघेही आपापल्या विचारांच्या कक्षेत बरोबर आहात. फक्त ते सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे.
‘म्हणजे तू म्हणतोयस की, आय हॅव टू प्रूव्ह देम राँग.’
नाही सखे, ते चुकत आहेत हे तुला नाही सिद्ध करायचं. तुला हे सिद्ध करायचं आहे की, तू बरोबर आहेस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण, त्यासाठी तुला आधी स्वत:ला ओळखलं पाहिजे. बुद्धी ही एक ऊर्जा आहे. आपण तिला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने ती वळते. आपल्याच मनाला घातलेले भीतीचे बांध आपल्याला ऊर्जेला वळवण्यापासून रोखतात. तुला इंग्रजी विषय घेऊन आर्टस् का करायचं आहे, याचा पक्का व पूर्ण विचार तू कर. आत्तापर्यंत तू किमान जेवढे टक्के मिळवीत आली आहेस, ते ९५ टक्के मार्क मिळव आणि मग तू आर्टस्ला जा. कमी मार्क मिळाले म्हणून आर्टस्चा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला, असे म्हणायला जागा ठेवू नकोस. त्यावरही तुझा निर्णय कसा चुकीचा आहे, हे इतरांच्या अनुभवाने तुला सांगण्याचा प्रयत्न होईलच. तो अजिबात मनावर घेऊ नकोस. ठामपणे वाटचाल करीत राहा.
सखे, सर्वांत आधी आपल्याला ज्या दिशेने, ज्या शाखेला जायचे आहे, त्यात उपजत गती आहे का, याचा विचार कर. केवळ तुझी मैत्रीण किंवा मित्र आर्टस् करतात म्हणून तू जाऊ नकोस. आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, ‘मी काय करू?’ हे मला विचारावं लागणार नाही. तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...

सुंदर लेख
उत्तर द्याहटवाकिती मुले आणि पालक याचा विचार करतील?
super writing style. gud explanation
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख. सध्या मुलांना हा दृष्टिकोन आणि प्रोत्साहन देण्याची खूप गरज आहे.
उत्तर द्याहटवाTooo gd. शब्दांची पेरणी मस्त
उत्तर द्याहटवासुंदर लेख, खरच हे निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत!🌿🙌🏻
उत्तर द्याहटवाBestt 😍
उत्तर द्याहटवाठरवणे... चा अधिकार मुलांवरच सोडा, अर्थात त्या पूर्वी सारे कसे मनात स्पष्ट हवे, त्यासाठी हा संवाद महत्त्वाचा। मार्क्स, मार्क्सवादी उत्तम वाक्य। लेखन उत्तमच।...म्हांबरे जी.
उत्तर द्याहटवालेख छान आहे.लेखाचं नाव खूप आवडलं.तीन प्रश्नही अगदी योग्य आहेत .
उत्तर द्याहटवाKhupp chan lekh ahe sir 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखरंच सुंदर लेख... प्रत्येक विद्यार्थीने कुठल्या शाखेत जायचय ते मनाशी पक्क करूनच पुढे जावं आणि आपल्या निर्णयावर ठाम रहावं.. दुसरे सांगतात म्हणून काहीही करू नेये.. शेवटी आपल्याला ज्यात आनंद मिळेल तेच करने योग्य
उत्तर द्याहटवाह्यात पालकांचा अथवा विद्यार्थ्यांचा दोष नाही परंतु शिक्षण व्यवस्थेत योग्य पर्याप्त उपाय नसल्याने हा प्रश्न पडतो.
उत्तर द्याहटवाटक्केवारी बंद झाली पाहिजे. प्रत्येक पालकाने शिक्षण तज्ञाने आवाज उठवायला पाहिजे. अशानेच मेक इन इंडिया खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही!
उत्तर द्याहटवाYou nailed it, Mr. Barve
विचारांना मार्गदर्शन करणारा लेख
उत्तर द्याहटवा- केशव जोशी
खुप सुंदर, वैचारिक पातळीवर चा, सखोल, अभ्यास पूर्ण लेख आहे.खरच प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे.काही प्रश्नांवली जी दिल्या गेली तीची स्वतः भोवती गुंफण केली पाहिजे. मार्गदर्शनाचा दीपस्तंभ ठरेल हा सुंदर लेख.
उत्तर द्याहटवा- Dr. Neeta Kumathekar
हा लेख म्हणजे आपल्या बुद्धिमान मुलांनी केवळ मेडिकल किंवा इंजिनायरिंगला जावं असा अट्टाहास धरणार्या पालकांना दिलेला शब्दांचा डोज आहे असं मला वाटतं.आपल्या पाल्ल्यांची आवड ओळखून त्यांना ते क्षेत्र निवडण्याची मुभा दिली जावी.लेखाद्वारे दिलेला सल्ला विद्यार्थ्यांला ' राजहंस' बनण्यास नक्कीच कामी येईल.
उत्तर द्याहटवाज्या मुलीवर हा लेख लिहिला होता, त्या मुलीचा आत्ता फोन आला. तिने गोवा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९३% मार्क मिळवले आहेत. आर्टस्ला जाण्याच्या तिच्या निर्णयाचा आदर तिच्या पालकांनी या आधीच केला आहे. मला अभिमान आहे त्यांचा.
उत्तर द्याहटवाAs per my son's experience she will achieve her desirable target whether service or self service etc.
उत्तर द्याहटवाThis is an excellent writeup to inculcate such beautiful decesion.
जे स्वतःला आवडते त्याच्या मुळाशी जाऊन सखोल अभ्यास केल्यास स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो.हीच खरी सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
उत्तर द्याहटवालेख अतिकाळजीवाहू पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा , उत्तम मार्गदर्शक आहे.
असाच लिहीत रहा.तुझ्या लेखणीतून सत्य साकारते हे निर्विवाद.
🙏 *फारच सुंदर लेख..*
उत्तर द्याहटवा*मुलांच्या दहावी परिक्षेच्या गुणसंख्येवर आधारित, "पुढे काय करावे", या विषयीच्या* *पालकांच्या* *मानसिकते विषयी, आपण केलेले विश्लेषण केवळ अप्रतीम...*
या संबंधीचे आपले निरिक्षण (मार्क्स व मार्क्सवाद) वादातीत व प्रामुख्याने खरे आहे...
उत्तम मार्क्स मिळवून ही, एखादा विद्यार्थी जर आपल्या आवडत्या विद्या शाखेकडे, (प्रचलित मतप्रवाहाविरुद्ध) जायला लागला, तर त्याकडे ' काय हा वेडेपणा!' म्हणणारे आपोआप थंड होत जातील..जसे, आपण या लेखात, योग्य सल्ला दिल्यानुसार, ही विद्यार्थिनी ९३ % गुण मिळवून, आर्टस शाखेकडे जात आहे, याचे आता कौतुक व्हायला हवे... घरांतल्यांची व इतरेजनांची आतां कमी होत चाललेली टीका, हे आपण प्रतिपादिल्याप्रमाणे योग्य लक्षण नव्हे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार व त्या त्या विषयातील प्राविण्यानुसारच उच्च शिक्षणाची शाखा निवडायची असल्यास विरोध नसावा. यातुन, आपणास अभिप्रेत असलेली एक सक्षम पिढी तयार होईल, हा आपला युक्तीवाद १०० नंबरी आहे..
उदाहरण द्यायचे झाल्यास...मी स्वत: १९७१ साली, चांगले मार्क्स मिळाल्याने (बोर्डात ७४ वा) प्रचलित पद्धतीनुसार विज्ञान शाखेत गेलो. पुढे पोटापाण्याचा प्रश्न उद्भवल्यामुळे व morning college करु शकत नसल्याने B.Sc तिसरे वर्ष सोडून FYBCom ला सकाळच्या सत्रात, नोकरी करीत, प्रवेश घेतला..व पुढे काही मोठा career झाला नाही.. *पण* *आमच्या वेळेस, बोर्डात ६ वा* *आलेला गुंजाळ नांवाचा एक मुलगा, त्याच्या स्वत:च्या आवडी* *नुसार, आमच्याच Ruia College मध्ये आर्ट्स ला आला. (आर्ट्स शाखेतील इतर मुलांना* *४० ते फार फार तर ५०% मार्कस). केस फेंदारलेले, साधी राहणी,* *असा हा मुलगा, डाॅक्टर/ईजिनिअर होण्याचे सोडून, आर्ट्स ला गेला, हे पाहून, तो एक चेष्टेचा विषय बनला... *कालांतराने, आम्ही तथाकथित (बहुतांश) हुशार मुले कारकुनी* *करतांना दिसलो तर गुंजाळ महाशय पुढे, Economics मध्ये, मुंबई विद्यापिठात, विक्रमी मार्क्स मिळवून पहिला आला होता व लवकरच World Bank चा CEO* *झाला, असे कळले...*
*प्रसन्न, **या अशा उदाहरणांमधे, आपल्या "तो राजहंस एक", या लेखाचे मर्म दडले आहे, असे मला वाटते..*
प्रसिद्ध शायर *निदा फाजली* यांचा याबाबतीतला एक शेर बोलका आहे...
" *किसी के वास्ते राहें कहाॅ बदलती हैं*
*तुम अपने आपको खुद ही बदल सको तो चलो"...*
असो. माफ करा, माझी प्रतिक्रिया फारच लांबली.
पण, एक सुंदर व विचारप्रवर्तक लेख लिहिल्याने, एक भरकटलेला विद्यार्थी व आताचा पालक म्हणून, आपले मी कौतुक करतो व आभार मानतो..
*असेच, सुंदर सुंदर व अभ्यासपूर्ण लेख लिहित रहा, छान लिहितां...*
......ज्ञानेश्वर शंकर मांद्रेकर, मुंबई.