रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

जीवन से भरी तेरी आँखें...

जीवन से भरी तेरी आँखें...

सखे, तुझे डोळे खूप सुंदर आहेत. पाणीदार आहेत. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तुझ्या डोळ्यांवरच माझे डोळे जडले होते. त्या अथांगतेत इतका बुडत गेलो, की आजही त्यातून बाहेर येणे जमलेच नाही. 

‘खरंच! म्हणजे तुला माझे डोळे सोडून आणखी काहीच आवडलं नाही, आकर्षकही वाटलं नाही?’

सखे, अवयवांनी आकर्षित करून मनापर्यंत पोहोचू न देण्याचे तुझे तेव्हा वयच नव्हते. तू वयात येत होतीस. तू तेव्हा नुकतीच सोडलेली निरागसता तुझ्या डोळ्यांत जाऊन वसली होती. निरागसतेसोबत आलेली चंचलता व चपलता यांचा तुझ्या पापण्यांआड एकमेकींशी लपंडाव सुरू होता. तुझ्या डोळ्यांत तुला शोधता शोधता स्वत:च हरवलो.

‘इतका हरवलास, की कधी गवसलाच नाहीस. का अचानक दूर गेलास? तोही न सांगता!’

सखे, कारणे खूप आहेत. सांगेन कधी तरी. पण, तुझ्यासवे तुझाच होतो व तुझ्याविनाही तुझाच राहिलो. तुझ्यावाचून मला या तुझ्या डोळ्यांनीच जिवंत ठेवले. खरं नाही वाटत? ठीक आहे, हरकत नाही. तशी माझी कुठली गोष्ट तुला पटत होती? ते जाऊ दे! तू हे इंदिवरचे ‘जीवन से भरी तेरी आँखें मजबूर करे जीने के लिए’ हे गीत ऐक. कल्याणजी आनंदजी यांचे सूर आणि किशोर कुमारांचा स्वर! हेडफोन लाव आणि फक्त ऐकत राहा.

सखे, तुझ्या डोळ्यांनी जगायला लावलं म्हणून मी जिवंत राहिलो. अन्यथा कधीचाच गेलो असतो. त्या अर्थाने माझं जीवन तुझ्या डोळ्यांत होतं; पाण्याला ‘जीवन’ हेही एक नाव आहे, ते उगाच नाही! तुझं सौंदर्य कशात आहे, याची तुला कल्पना नव्हती. इतरांच्या नजरा जिथे थांबत, तिथे ते नव्हतंच. ते होतं तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेत, व्यक्तिमत्त्वात. म्हणून असेल कदाचित पण मला तुझं चित्र कधीच काढता आलं नाही. तुला शब्दबद्धही करता आलं नाही. रेषांतून, अक्षरांतून तुला रेखाटण्याएवढी क्षमता कदाचित माझ्याजवळच्या कुंचल्यात, लेखणीत नसावी.  

सखे, वयात येऊ लागलेल्य नवयुवतीला जेव्हा स्वदेहाच्या कमनीयतेची जाणीव पुरुषाच्या नजरेतून होऊ लागते तेव्हा प्रारंभी त्या पाहण्याचे व्यसन जडते. तो देहाचा, सौंदर्याचा गौरव वाटू लागतो. इतरांचे पाहणे तिच्या अभिमानाचा विषय होतो.  स्वत:तल्या स्त्रीत्वाची जाणीव होते, तेव्हा पुरुषांची नजर खटकू लागते. आपला फक्त देह हवाय; मनाशी, स्त्रीत्वाशी काही देणेघेणे नाही हे कळते. चीड येते. प्रत्येक पुरुष त्याच नजरेने स्त्रीकडे पाहतो ही भावना दृढ होत जाते. आपल्यासाठी म्हणून केलेली प्रत्येक गोष्ट आपला देह हवाय म्हणून केली जातेय, असे वाटू लागते. निखळ असे काहीही उरत नाही. तुझ्यासाठी मी केलेली कुठलीही गोष्ट तुला नकोशी होत गेली. मला टाळण्याची हजारो कारणे तुझ्याजवळ होती; मीही न कंटाळता ती ऐकत गेलो. 

सखे, ज्या क्षणी तुझ्या टाळण्याचे कारण जाणवले, तेव्हा स्वत:ला तुझ्यापासून दूर केले. तुला माझ्यातून दूर करणे मात्र जमले नाही. माझी तर जिवंत राहायचीही इच्छा नव्हती; तुझ्या डोळ्यांनी जगायला भाग पाडले. देह टाळून थेट मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत राहिलो. अजूनही गवसला नाही. तुला सापडलाय का गं?


मंगळवार, २० मे, २०२५

मरीज ए इश्क का क्या है...

सखे, आपलं प्रेम आणि भक्ती सामान्यत: कशावर तरी आधारलेली असते. प्रिय व्यक्ती किंवा परमेश्वर. आपण कोसळताना प्रिय व्यक्तीने, परमेश्वराने आधार द्यावा, आपल्याला सावरावं, असं आपल्याला वाटतं. प्रेम आणि भक्ती यांची उत्कट अवस्था ही आहे की, या आधाराचीच आवश्यकता राहत नाही. अर्थ, आधार यापलीकडची ही अलौकिक अवस्था असते. लौकिकार्थाने यालाच कदाचित आजारी पडणं म्हणत असावेत.
सखे, गेले तीन चार महिने आजारपणामुळे झोपून काढले. डॉक्टरी आदेशावरून आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. लहानपणी आम्हांला ‘आजारी पडण्याचे प्रयोग’ नावाचा एक धडा होता. आजारी माणसाची केली जाणारी सेवा, घेतली जाणारी काळजी याने भारावलेला एक मुलगा आजारी पडण्यासाठी खटपटी करतो, असं काहीसं ते चित्रण होतं, ते सहज आठवून गेलं. पडल्या पडल्या काय काय नाही आठवलं ते विचार. अगदी जन्म मृत्यूपासून सगळं आठवलं. आपल्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यासाठी माणसाला आजारी तरी पडावं लागतं किंवा प्रेमात तरी पडावं लागतं. प्रेमात आजारी पडणाऱ्यांची तऱ्हा तर याहून फारच निराळी होते. केवळ जगणंच नव्हे तर मृत्यूही हवाहवासा वाटू लागतो.

सखे, मृत्यू या विषयावर आपण बोलणं सहसा टाळतो. मला माहिती आहे, तुलाही तो विषय अजिबात आवडत नाही. अटळ, निश्चित गोष्टींचा उल्लेख टाळला म्हणून त्या टळत नाहीत. मृत्यू कधी येणार आहे, हे कुणालाच माहिती नसतं. निश्चित मृत्यूची तिथी दोघांना समजली होती. त्यापैकी एक म्हणजे देवव्रत आणि दुसरा राजा परीक्षित. बाकी आपण सर्वजण त्या अर्थाने ‘अतिथी’च असतो. दोघांनीही आपापल्या परीने आपल्या कल्याणाचे मार्ग निवडले. आपण या अज्ञात आणि अटळ गोष्टीकडे भीतीनेच पाहतो. त्याविषयी बोलणंही टाळतो. प्रेमात पडलेला माणूस एकूणच जगण्याकडे आणि मृत्यूकडेही फार वेगळ्या तऱ्हेने पाहतो.

ऐसे नव्हे मृत्यूस आम्ही, केव्हाच नाही पाहिले
खूप आहे पाहिले त्याला, प्रत्येक  जन्मी पाहिले
मारीले आहे आम्हीही, मृत्यूस या प्रत्येकदा
नुसतेच ना मेलो आम्ही, जन्मलो प्रत्येकदा

मृत्यो अरे तू का कुणाला, येऊ नयेसा वाटतो?
येतो असाही काळ जेव्हा, तूच यावा वाटतो
असते जरी काळी अशा, तूही कुणा सन्मानिले
देवाहूनीही जास्त असते, आम्ही तुला सन्मानिले


‘येतो असाही काळ जेव्हा, तूच यावा वाटतो’ अशा ओळी भाऊसाहेब पाटणकर लिहितात तेव्हा ती निराशा नसते, ती वस्तुस्थिती असते. प्रेमात जन्म आणि मृत्यू यांची आसक्ती, भीती निघून जाते. तुला मृत्यू हा विषयच आवडत नसल्याने कदाचित मी म्हणतो, ते ऐकायला आवडणार नाही. डॉ. सफी हसन यांची ‘मरीज - ए- इश्क का क्या है’ ही गजल तू ऐक. लाइव्ह ऐकायला मिळाली तर आणखीनच गंमत येते. उस्ताद झाकिर हुसेन यांचा तबला आणि हरिहरन यांचा स्वर. अप्रतिम जुगलबंदी रंगली आहे या गाण्यात.

मरीज ए इश्क का क्या है, जिया जिया ना जिया
है एक सॉंस का झगड़ा, लिया लिया ना लिया...

सखे, प्रेमात विव्हल झालेल्या, आजारी पडलेल्या माणसाला जीवन आणि मृत्यू यामध्ये फारसं स्वारस्य राहिलेलं नसतं. जगलो तर जगलो, नाही तर नाही, काय त्यात एवढं? असं आपण एरव्ही म्हणत नाही. माणसाला मृत्यू हवा हवासा वाटणं, ही अवस्था कंटाळ्यातून उत्पन्न होते. ज्यात ‘जगणं’ नाही  असं जिवंत राहण्यापेक्षा मृत्यू चांगला, असं वाटणं साहजिक आहे. मरण येत नाही म्हणून नाइलाजाने जिवंत असणाऱ्या माणसाच्या पराभूत मानसिकतेची ती उत्कटता आहे. जिवंतपणी जगणाऱ्या माणसाला मृत्यू यावासा वाटत नाही. त्याची कल्पनाही त्याला नको असते. प्रेम आणि भक्ती ही दोनच शक्तिस्थळं अशी आहेत ज्या ठिकाणी माणूस जेवढ्या उत्कटतेने जगणं स्वीकारतो, तेवढ्याच उत्कटतेने मृत्यूही स्वीकारतो. शेवटचा श्वास आणि त्या आधीचा श्वास यामध्ये एका श्वासाचं अंतर असतं. आपण घेऊ तो कुठला श्वास शेवटचा असेल, हे सांगताही येत नाही. त्या शेवटच्या एका श्वासाचं अज्ञात असणं, जगण्यावरचा विश्वास वाढवतं.

बदन है आज अगर, तार तार है मेरा
तो एक चाक-ए-गिरेबॉं, सिया सिया ना सिया...

सखे, आपण प्रतिष्ठेच्या, सुसंस्कृत असण्याच्या मागे फार लागतो. भले आयुष्य चुरगळलेलं असलं तरी चालतं, शर्टची कॉलर इस्त्री-टाईट लागते. आपण कसं असावं यापेक्षाही आपण कसं दिसावं, याला प्रचंड महत्त्व देतो. आपलं शिक्षण, समाजातला दर्जा, मान-सन्मान यांना प्रेमापेक्षाही जास्त जपतो. प्रेमात पडलेला माणूस असा विचार करतो की, जिथं माझा देह छिन्नविछिन्न झाला आहे, तिथे फाटलेली कॉलर शिवली काय आणि नाही शिवली काय? काही फरक पडत नाही. जिथे स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवही नाहीशी झाली आहे तिथे त्या अस्तित्वाच्या उपाधीची फिकीर तरी कशाला करायची?

ये और बात के, तू हर राह-ए-खयाल मे है
के तेरा नाम जबॉंसे, लिया लिया ना लिया...

सखे, असलेलं प्रेम व्यक्त करता येतच असं नाही. व्यक्त होत नाही म्हणजे ते नसतं, असं समजणं चुकीचं आहे. दाही दिशांना ओरडून, किंचाळून ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्यांच्या हृदयात प्रेमाचा लवलेशही नसण्याचा संभव अधिक असतो. स्त्रीच्या बाबतीत एक विचित्र विरोधाभास कायम आढळतो. लग्नाआधी ‘प्रेम आहे हे सांगितल्याशिवाय कळणार कसं?’ असं प्रियकराला विचारणारी स्त्री, त्याच प्रियकराचा नवरा झाल्यानंतर त्याच्याकडून ‘न सांगता आपणास समजून घेण्याची’ कायम अपेक्षा ठेवते. जे प्रेमात तेच भक्तीतही. तोंडात कायम रामनाम असणाऱ्यांच्या हृदयात राम असेलच याची खात्री देता येत नाही. भक्त असण्याचा पुरावा म्हणजे एकसारखं देवाचं नाव घेणे नव्हे. देव विचारांत हवा, प्रेयसी विचारांत हवी. मग, तोंडात नाव असलं काय आणि नसलं काय, काही फरक पडत नाही.

ये हाल-ए-दिल है ‘साफि’, मै तो सोचता ही नहीं
के क्यों किसने सहारा, दिया दिया ना दिया....

सखे, आपलं प्रेम आणि भक्ती सामान्यत: कशावर तरी आधारलेली असते. प्रिय व्यक्ती किंवा परमेश्वर. आपण कोसळताना प्रिय व्यक्तीने, परमेश्वराने आधार द्यावा, आपल्याला सावरावं, असं आपल्याला वाटतं. प्रेम आणि भक्ती यांची उत्कट अवस्था ही आहे की, या आधाराचीच आवश्यकता राहत नाही. अर्थ, आधार यापलीकडची ही अलौकिक अवस्था असते. लौकिकार्थाने यालाच कदाचित आजारी पडणं म्हणत असावेत.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

जो नही मिला उसे भूल जा....

‘आता हे वर्ष संपत आले. नवीन वर्ष येईल. पण सगळे तसेच आहे. काही फरक पडला नाही. कॅलेंडर बदलते, तारखा बदलतात. परिस्थिती तशीच राहते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातील दरी वाढतच आहे. तत्त्वज्ञांनी फक्त जगाचे अनेक प्रकारे विवेचन केले, पण हे जुने जग बदलण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीत’

सखे, बरी आहेस ना? तुला माझ्यापेक्षा मार्क्स जास्त मिळाले होते हे ठीक आहे, पण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सांगायला आलीस आणि हे काय ऐकवत आहेस?

‘तोच संकल्प आहे. काय नाही मिळाले यापेक्षाही काय मिळाले याचा विचार मी पहिल्यांदा करेन, हाच संकल्प आहे. प्रगतीसाठी ‘नाही’ विरुद्ध ‘आहे’ याचा संघर्ष होणे अटळ आहे. मला कायम जे नाही मिळाले तेच पहिल्यांदा आठवते’. 

सखे, तो संघर्ष वगैरे जाऊ दे. त्यामुळे प्रगती वगैरे होते की अधोगती होते, तेही जाऊ दे. आपल्यामध्ये भांडणे मात्र निश्चितच होतात. या दोन्ही गोष्टी सुखात किंवा दु:खात ढकलतात. समाधानाने जगू देत नाहीत. 

‘कितीही तत्त्वज्ञ वगैरे असलास तरी ती गोमंतकीय असल्यामुळे ‘सुशेगाद’ आहेस. जग बदलण्यासाठी तुला काहीच करायचे नाही’.

सखे, तत्त्वज्ञ वगैरे म्हणून शिव्या नको घालूस. मी सामान्य माणूस आहे. ‘सुशेगाद’ म्हणजे तुला वाटते तसे आळशी, कृती न करणे नव्हे; ‘सुशेगाद’ म्हणजे समाधानी असणे.

‘समाधान म्हणजे मनाची समजूत घालणे. नाही मिळाले ना सोडून दे असे म्हणणे. प्रयत्न न करणे’. 

सखे, तुला माझे म्हणणे कधी पटले आहे, जे आज पटेल. त्यामुळे, हे भांडण, वादविवाद सोड आणि मस्तपैकी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहाँ आ के रुकने थे रास्ते’ ही गझल ऐक. तोवर मी कॉफी करतो. हृदयाची सतार छेडत येणारा उस्ताद शुजात खान यांचा स्वर ऐक. 

सखे, आपण ‘मिळाले’ आणि ‘मिळाले नाही’, यात फार अडकतो. दु:खात बुडतो आणि सुखात वाहवत जातो. ‘आहे रे’ला ‘नाही रे’च्या विरुद्ध ठेवल्यामुळे आपण कायम संघर्ष करण्यात सगळी शक्ती घालवतो. त्यातून मागणी आणि तक्रार करू लागतो. वास्तविक, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. 

‘तुझे नेहमी काहीतरी वेगळे, विचित्र असते. पूरक कसे असेल, विरुद्धच तर आहे’.

सखे, सगळ्यांजवळ असते किंवा सगळ्यांजवळ नसते तर आहे आणि नाही याला काही अर्थच उरत नाही. गरीब आहे म्हणून कुणीतरी श्रीमंत आहे. सगळेच श्रीमंत असते तर गरिबीला अर्थ उरला नसता आणि सगळेच गरीब असते तर श्रीमंतीला अर्थ उरला नसता. कमी जास्त हे असायचेच. विषमता हा संघर्षाचा पाया नाही तर एकत्र येण्याचा मार्ग आहे. कामगार विरुद्ध नोकर असा संघर्ष निर्माण केल्याने, संपूर्ण आशिया खंडात एकेकाळी प्रथम स्थानावर असलेला पश्चिम बंगाल, आज भिकेकंगाल आहे. हे मालक विरुद्ध नोकर करण्याचं लोण कुटुंबातही पोहोचलं. बायकोचे नवर्‍याला ‘मालक’ म्हणणेही खटकू लागले. ‘मालक म्हणायला बायको काय नोकर आहे का?’ असले प्रश्न विचारले जाऊ लागले. नवरा मालक असेल तर बायको मालकीण असते, हे लक्षांत आले नाही. त्यामुळे, नवरा विरुद्ध बायको असा नाते-संघर्ष निर्माण झाला. स्त्री विरुद्ध पुरुष या प्रकारात सगळी नाती भरडली. स्त्री व पुरुष विरुद्ध नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत. 

आपल्या नवर्‍याचा कायम सर्वांसमक्ष पाणउतारा करणार्‍या बायकोने कधीतरी तो किती राबतो याचा विचार करून पाहावा. बायकोने केलेल्या स्वयंपाकाचे शेवटचे कौतुक आपण कधी केले होते हे नवर्‍याने एकदा आठवून पाहावे. नवर्‍याच्या उणीवा काढल्याने बायको चांगली ठरत नाही आणि बायकोच्या उणीवा काढल्याने नवरा श्रेष्ठ ठरत नाही. जिथे उणीव आहे तिथे दोघांपैकी कुणीही उभे राहत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. 

सखे, आपल्याला नसण्याची तक्रार तेव्हाच करता येते जेव्हा आपण असण्याबद्दल कृतज्ञ असतो. आहे ते टिकवण्यासाठी आणि नाही ते मिळवण्यासाठी धावताना कधी तरी थांबून आपण त्याचा विचार करतो का? प्रत्येक गोष्ट आपण घट्ट धरून बसतो व त्यात अडकतो. बनारसच्या व्यापार्‍यांना माकडे फार त्रास देतात. म्हणून ते व्यापारी अरुंद तोंडाच्या भांड्यात खाद्यपदार्थ घालून बाहेर ठेवतात. माकड त्यात हात घालून मुठीत जे असेल ते घेते, पण हात अडकतो. मुठीत घट्ट धरून ठेवलेले सोडल्याशिवाय हात बाहेर येत नाही. आपलेही तसेच आहे. जे मिळाले व जे मिळाले नाही, त्यांना जोवर आपण घट्ट धरून बसतो तोवर आपली सुटका होत नाही. आपण अडकत जातो. जी परिस्थिती आहे ती स्वीकारत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे. आम्ही परिस्थितीला स्वीकारत नाही हा आमचा दोष आहे, परिस्थितीचा नाही. 

सखे, म्हणूनच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्हींच्या भानगडीत पडू नकोस. अगदीच जमत नसेल तर, अमजद इस्लाम अमजद या गझलेत म्हणतात तसे, ‘जो मिल गया उसे याद रख, जो नही मिला उसे भूल जा’ असे तरी वागून पाहा. एका शब्दात सांगायचे तर ‘सुशेगाद’ राहा!



शनिवार, ६ जुलै, २०२४

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें..

‘ही पानं चिकटली आहेत बघ. यावर लिहिलेली अक्षरंही पुसट झाली आहेत. बरं झालं तू आलास.’

वाचलीस सगळी? 

‘नाही रे. तुझी वाट पाहून कंटाळा आला. मग, तुझ्या टेबलावर ही डायरी सापडली. अंगठ्याने पाने गर्रकन फिरवताना, चिकटलेल्या पानांवर बोट स्थिरावलं. तीच पानं उघडून पाहिली. सुकलेलं फूल होतं आणि खराब झालेली अक्षरं. अरे, एवढा सिरीयस का झालास?’  

काही नाही गं. चल, तुला एक गझल ऐकवतो. अहमद फराज यांची ’अब के हम बिछड़े तो शायद’ ही गझल अप्रतिम आहे. मेहंदी हसनचा मखमली आवाज. प्रत्येक शेराच्या शेवटी जीवघेणी आर्तता. तू स्वत:च ऐक.

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें 
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें 

सखे, काल घर स्वच्छ करायला घेतलं. तेव्हा ही खूप जुनी रोजनिशी सापडली.  तू पहिल्यांदा भेटलीस त्यादिवशी लिहिलेलं पान वाचताना तो दिवस, तो क्षण डोळ्यांसमोरून जाईना. त्यावेळेस जे वाटलं होतं, ज्या भावना हृदयात होत्या, त्या आजही तशाच आहेत. त्या पुढची पानं वेड्यासारखा चाळत गेलो. कालपासून खूपच अस्वस्थ झालो.  वाचता वाचता ज्या पानांनी त्रास दिला तीच तुला पहिल्यांदा सापडली. आयुष्य असो किंवा एखादं पुस्तक, ते चाळताना दुमडलेल्या, चिकटलेल्या पानांकडे पहिल्यांदा लक्ष जातं. अक्षरं पुसट होतात, फुलं सुकतात. आठवणी मात्र स्पष्ट, ताज्या असतात. 

ढूँढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती 
ये ख़ज़ाने तुझे मुम्किन है ख़राबों में मिलें 

सखे, प्रेम, मैत्री, विश्‍वास, चांगुलपणा ह्या गोष्टी आजकाल फार दुर्मीळ झाल्या आहेत. यांचा वापर आकर्षक वेष्टनासारखा केला जातो. वेष्टनाला भुलून स्वीकारलेली भेट उघडायला जावं तर आत स्वार्थ, सत्ता, संपत्ती आणि सोय ही विष्ठाच सापडते. आपल्याला हव्या असलेल्या मैत्रीपायी, आपुलकीपायी आपला फक्त वापरच झाला, हे लक्षात येईपर्यंत आयुष्य बरबाद झालेलं असतं. म्हणूनच विश्‍वास, प्रेम वगैरे हे अनमोल, दुर्मीळ मोती शोधायचे असतील, तर तुला या मोत्यांपायी बरबाद झालेल्या, भंगारात निघालेल्या माणसांकडे शोधावे लागतील.

तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा 
दोनों इंसॉं हैं तो क्यों इतने हिजाबों में मिलें 

सखे, भक्ती म्हणजे प्रेमच आहे. मनुष्यावर केलं की त्याला प्रेम म्हणतात आणि परमेश्‍वरावर केलं की त्याला भक्ती असं म्हणतात. नश्‍वराने नश्‍वराची केलेली भक्ती म्हणजे प्रेम आणि नश्‍वराने ईश्‍वरावर केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. परमेश्‍वराची थेट भेट घडत नाही. निर्गुणाच्या आड दडलेला भगवंत भेटावा म्हणून भक्त स्वत:ला समजेल, आवडेल अशा सगुण रूपामध्ये त्याला घेऊन येतो. त्याला माणसांप्रमाणे गुण, अवगुण, नातीगोती चिकटवतो. यालाच ’आलंबन’ असं म्हणतात. मूर्ती हे आलंबन आहे. मूर्तीमधून अमूर्ताकडे पोहोचावं लागतं. भक्त आणि भगवंत यामध्ये असलेले हे पडदे आहेत. हिजाब याचा अर्थ पडदा. तू माझ्यासमोर मूर्तिमंत उभी होतीस. तरीही आमच्यामध्ये सौंदर्य, संपत्ती, नाव, प्रतिष्ठा, वय हे पडदे होतेच. त्यामुळे तू भेटूनही भेटलीच नाहीस. अगदी, त्या परमेश्‍वरासारखी. 

ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें 

सखे, तू न भेटल्याचे दु:ख तुझ्या प्रत्येक भेटीनंतर व्हायचे. जेवढा मी तुझ्याजवळ जायचा प्रयत्न करायचो, तेवढीच तू दूर जायचीस. मला तुझ्या मनापर्यंत पोहोचण्यापुरतंच तुझं शरीर हवं होतं. तुला मात्र कायम वाटत राहिलं, हा शरीरासाठी मन जवळ करतोय. आमच्यामध्ये हे अंतर कायम राहिलं. तुला कायमचा अंतरलो हे दु:ख आयुष्यातल्या अनेक दु:खांपेक्षा वरचढ होतं. ग़म-ए-दुनिया म्हणजे दुनियेने दिलेली दु:खं आणि ग़म-ए-यार म्हणजे प्रिय व्यक्तीनं दिलेलं दु:ख. ही दोन्ही दु:खं एकमेकात मिसळली तर धुंद करणार्‍या वेदनेची एक निराळीच चव निर्माण होते. मदिरा मदिरेत मिसळल्यानंतर वाढत जाणारी धुंदी असावी तशी. 

आज हम दार पे खेंचे गये जिन बातों पर 
क्या अजब कल वो ज़माने को निसाबों में मिलें 

सखे, एक गंमत सांगतो. आपण आज जो शहाणपणा म्हणून अभ्यासक्रमातून शिकतो, तो गतकाळातला वेडेपणाच असतो. आपल्याकडे आयुष्यभर छळवाद करून, जिवंतपणी मरणयातना देऊन, मेल्यानंतर संतत्व प्राप्त होतं. जिवंतपणी संतत्व हा आजकाल व्यवसायाचा भाग झाला आहे. इतिहास पाहता, मेल्याशिवाय संतत्व नाही. या संतांनी रचलेले अभंग, मांडलेले विचार, ते जिवंत असताना समाजाच्या लेखी वेडेपणाचेच होते. आज त्याच विचारांवर लिखाण करून आपण पीएचडी मिळवतो. ’दार पे खेंचे’ म्हणजे सुळावर चढवणे आणि  ’निसाबों में’ म्हणजे पाठ्यपुस्तकात, अभ्यासक्रमात. न जाणो आज ज्या प्रेमातल्या वेडेपणासाठी तू मला सुळावर देत आहेस, तेच वेडेपण उद्या कदाचित पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल.

अब न वो मैं हूँ न तू है न वो माज़ी है ’फ़राज़’ 
जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें 

सखे, पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल की माहीत नाही, पण तुझं वेड मात्र मला निश्‍चितच आहे. ही रोजनिशी वाचताना निसटून गेलेला गतकाळ पुन्हा वर्तमानात आला. ते वेड प्रकर्षाने जाणवलं, ती मृगतृष्णा पुन्हा कंठशोष करून गेली. असं असलं तरीही आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. मीही बदललोय, तूसुद्धा बदलली आहेस आणि हा काळही बदलला आहे. आता आपली भेट घडते ती इच्छेच्या मृगतृष्णेमागे धावताना किंवा स्वत:च्याच आयुष्यातली दुमडलेली, चिकटलेली पाने चाळताना. सखे, त्या चिकटलेल्या पानांमध्ये जो सुकलेला गुलाब आहे ना, तो तुलाच देण्यासाठी त्या दिवशी मी घेऊन आलो होतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायचं होतं. तू तुझं लग्न ठरल्याच्या आनंदात एवढी मग्न होतीस की, माझं सांगणं राहूनच गेलं. तुला न सांगितलेलं रोजनिशीत लिहिलं, तुला देता न आलेला गुलाब तिथेच ठेवून दिला. त्यानंतरची पानं आयुष्यभर कोरीच राहिली. त्याआधी लिहिलेली अक्षरं पुसट झाली, गुलाब सुकून गेला आणि पानं चिकटली.


बुधवार, १५ मे, २०२४

ये ज़रूरी तो नहीं


सखे, काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये एक स्त्री आली होती. कुठे तरी झालेल्या कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी. सोबत फोटोही होता. तिने बातमीचा कागद दिल्यावर माझं लक्ष सहज तिच्या हातांकडे गेलं. चेहर्‍यावर लपवलेलं वय हात दाखवून देत होता. त्यातली विसंगती स्पष्ट जाणवत होती. बातमीचा कागद हाती देऊन, सगळ्यांना हात हालवून, हाय हॅलो करीत ती निघून गेली. तिने लावलेल्या अत्तराचा अघोरी वास हळूहळू कमी होत गेला. या स्त्रीला मी कुठे पाहिलं आहे याची संगती  लावण्यासाठी स्मृतींची पानं चाळू लागलो. अचानक आठवलं, ही स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेली सौंदर्यवती, अभिनेत्री होती. तिची मुलाखत घेण्यासाठी, छायाचित्रे घेण्यासाठी पत्रकारांची रांग लागायची. तिच्या साध्या साध्या गोष्टींची खूप प्रसिद्धी व्हायची. तिच्या सौंदर्याच्या सगळीकडे चर्चा व्हायच्या. कालांतराने सौंदर्याला, अभिनयाला उतरती कळा लागली. प्रसिद्धीचे झोत बंद झाले. बातमीसाठी मागे लागणारे जवळपासही फिरकेनात. चर्चेत राहण्यासाठी समाजसेवा करणं तिला क्रमप्राप्त होतं. अशा प्रसिद्धी देणार्‍या समाज कार्याची बातमी स्वत:च लिहून, ती छापून येईपर्यंत पाठपुरावा करत राहणंही क्रमप्राप्तच होतं. 


सखे, इतर कुठल्याही व्यसनाप्रमाणेच प्रसिद्धीचं व्यसनही घातकच आहे. हा प्रसिद्धीचा झोत जेवढं अंधारात ढकलतो, तेवढं अंधारात ढकलणं प्रत्यक्ष काळोखालाही जमत नाही. आपण कायम प्रसिद्ध राहू, कायम लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील, आपल्याला चांगलं म्हणतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ असतं. मुळात अशा गोष्टींची आवश्यकताही नसते. अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं हे तुला पटेल. पण, ’या गोष्टींची आवश्यकता नसते’ हा विचार तुला पटलेला दिसत नाही. हरकत नाही. तू खामोश देहलवी यांची ’उम्र जलवों मे बसर हो’ ही जगजित सिंगांच्या मखमली आवाजातली अप्रतिम गझल ऐक. कदाचित तुला माझं म्हणणं पटेल.


उम्र जल्वों में बसर हो ये ज़रूरी तो नहीं 
हर शब-ए-ग़म की सहर हो ये ज़रूरी तो नहीं 


सखे, आपलं आयुष्य कायम झगमगाटाने भारलेलं राहील असं नाही. आपल्या हातून कायम चांगलं, बरोबर घडेल असं होत नाही. कायम पूर्णावस्थाच प्राप्त होईल असं घडत नाही. कितीही केलं तरी करायचं काहीतरी शिल्लक राहतच. जे राहून गेलं आहे, त्यातून जे केलं आहे ते वजा होत नाही. अशी वजाबाकी करणार्‍यांची उत्तरे कायम नकारार्थी येतात. जे हातून घडलं त्याचं गुणगान करत बसणं आणि जे राहून गेलं त्याविषयी खंत करीत बसणं योग्य नव्हे. दु:खानंतर सुख येतं ही आपण आपली करून घेतलेली समजूत आहे. दु:खांच्या शेकडो धाग्यानंतर सुखाचा एक धागा विणला जातो. प्रत्येक दु:खाची पहाट सुख घेऊन येतेच असं नाही. सुखाच्या अपेक्षेने दु:ख भोगलं की अपेक्षाभंग होतो. 


चश्म-ए-साक़ी से पियो या लब-ए-साग़र से पियो
बेख़ुदी आठों पहर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, जे आहे ते कायम तसंच राहील अशी समजूत आपण करून घेतलेली असते. आपलं आयुष्यही आपण याच गृहीतकावर रेखाटत असतो. आपण करीत असलेली नोकरी, धंदा, व्यवसाय हा कायम ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तो राहील असे आपण गृहीत धरून चालतो. जास्त मिळालेले पैसे जास्त खर्च करण्यावर घालवतो. कालांतराने मिळकत कमी झाली तरी जास्त खर्च करायची सवय जात नाही. याची कल्पना असल्याने माणूस जे आहे ते टिकवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो. असलेलं नाहीसं होईल तेव्हा काय यासाठी कोणतीही व्यवस्था करीत नाही. आपल्याजवळ जे आहे ते संपणार नाही याची धुंदी माणसाला संपवून टाकते. मिळालेलं यश, प्रसिद्धी, पैसा, नावलौकिक कायम टिकत नाही. म्हणूनच या न टिकणार्‍या गोष्टींची सवय माणसाला अगतिक बनवते. धुंदी कुठल्या मार्गाने येते व किती येते यापेक्षाही ती कायम टिकणारी नसते हे महत्त्वपूर्ण आहे. चश्म-ए-साकी म्हणजे प्रेयसीच्या डोळ्यातून प्या किंवा लब-ए-सागर म्हणजे प्याला ओठाला लावून प्या, येणारी धुंदी व होणारी आत्मविस्मृती कायम टिकत नाही.  



नींद तो दर्द के बिस्तर पे भी आ सकती है
उनकी अगोश मे सर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला अलिप्ततेच्या एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. ही अलिप्तता एवढी सहज घडत नाही. व्यसन असणारा माणूस, व्यसनाचा संबंध आपल्या सुखप्राप्तीशी किंवा दु:खनिवारणाशी जोडून मोकळा होतो. गुटखा खाणार्‍या माणसाच्या मेंदूला तो खाल्ल्यामुळे चालना मिळते. गुटखा खाल्ला नाही तर आपल्या मेंदूला चालना मिळणार नाही, अशी त्यानं समजूत करून घेतलेली असते. गुटखा खाणं हे व्यसन नाही, तो न सुटणं हे व्यसन आहे. चुना, तंबाखू चोळून तोबरा भरल्याशिवाय आपल्याला काही सुचतच नाही, अशी समजूत करून घेणं हे व्यसन आहे. आपल्या क्षमतेवर आपणच दाखवलेला तो अविश्‍वास आहे. आपल्या क्षमतेवर विश्‍वास असलेल्या शायर प्रेयसीला उद्देशून म्हणतो, झोप घ्यायची असेल तेव्हा दु:खाच्या शय्येवरही मी झोपेन, त्यासाठी तिच्या बाहुपाशाची आवश्यकता नाही. हे सामर्थ्य, ही अलिप्तता जेव्हा आपल्यात येते, तेव्हा आपल्याला खर्‍या अर्थाने प्रेम समजते. 



शेख़ करता तो है मस्जिद में ख़ुदा को सजदे
उसके सजदों में असर हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, आपल्याला प्रपंचात होणार्‍या दु:खांचं निवारण आपल्यालाच करावं लागतं. धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थामध्ये निर्माण होणारे संघर्ष, दु:ख यांची निवृत्ती आपल्यालाच करावी लागते. ती निवारण करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असतात, सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं असतं. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, ज्याला परमार्थ म्हटलं जातं, त्यात निर्माण होणारी दु:खं निवारण करण्यासाठी देवाजवळ मागावं. आपण नेमकं उलट करतो. प्रपंचातील दु:खांसाठी देवाजवळ मागणं मागतो. पारमार्थिक दु:ख आपल्याला होत नाही, कारण त्याची जाणीवच झालेली नसते. आपली अवस्था ढाल तलवार धारण करणार्‍या रडत-राउतासारखी असते. एक हात तलवारीत आणि दुसरा हात ढाल पकडण्यात गुंतला आहे, देवा आता लढण्यासारखी आणखी दोन हात दे, अशी मागणी तो करतो. आपल्या प्रार्थनेमध्ये बळ नसतच. परमेश्‍वराला करुणा वाटावी असं आपलं मागणं नसतं.  करुणा म्हणजे दु:खितांचं दु:ख दूर व्हावं यासाठी दाखवलेली दया.  स्वदु:खाची जाणीव होण्याबरोबर फक्त परमेश्‍वरच ते दु:ख निवारण करू शकतो, ही श्रद्धा असावीच लागते. तेव्हाच आपल्या मागण्याला अर्थ प्राप्त होतो.


सब की नज़रों में हो साक़ी ये ज़रूरी है मगर
सब पे साक़ी की नज़र हो ये ज़रूरी तो नहीं


सखे, इथे साकी हा शब्द परमेश्‍वर या अर्थाने आला आहे. परमेश्‍वराची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी आपली प्रत्येकाची नजर त्याच्याकडे लागलेली असते. पण, त्याची मेहरनजर प्रत्येकावर होतेच असं नाही. लहानपणी आपण आईवडिलांचं बोट धरून देवळात जातो. पण, आपली नजर खाजे, फुगे, खेळणी यांच्यावर असते. याच जत्रेच्या निमित्ताने देवळात मोठेपणी जातो तेव्हा नजर चालत्या बोलत्या प्रेक्षणीय स्थळांकडे असते. म्हातारपणी घरी वेळ जात नाही म्हणून देवळात जातो. आपण आयुष्यभर आपल्याच कारणासाठी देवाकडे  जातो. देवासाठी कधी जातो? देवळात जाताना पायातल्या चपला बाहेर ठेवतो. आपल्यावर असलेला प्रकाशझोत, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, पद या चपला मात्र मिरवत राहतो. आयुष्यात एकदा तरी त्याला भेटण्यासाठी उपाधीच्या चपला बाहेर ठेवून जावे. तो आपल्या स्वागतासाठी धावत येतो. 



शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

सजण दारी उभा...

‘बर्वे, तुम्हाला मी सांगितलं होतं मला कवितेचं इंटरप्रिटेशन तुमच्याकडून ऐकायला आवडतं. तुम्ही मला ते ऐकवणारही होतात. कुठल्या जन्मी?’

सखे, असा एकदम हल्ला नकोस ना चढवू. मान्य आहे मी आळशी आहे, सुख म्हणजे झोप, असं माझं साधं सोपं गणित आहे. त्यामुळे अनेक गोष्टी राहून जातात. माझं तुला ऐकवणं होत नाही आणि तू मला लेख देत नाहीस. 

‘मी लिहित नाही म्हटलंय का? पण, मला सुचतच नाही.’

लिहित राहा म्हणजे सुचत जाईल. तुझ्याकडे लिहिण्याचं सामर्थ्य आहे म्हणून तुझ्यामागे लागतो. एवढा त्या परमेश्‍वराच्या मागे लागलो असतो, तर एव्हाना तोच होऊन गेलो असतो. तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून नको लिहूस. ते सांगणं आवश्यक आहे म्हणून लिही. जाऊ दे! मी सांगायचं आणि तू अजिबात कानामनावर घ्यायचं नाही हे नेहमीचंच झालं आहे. 

‘रागावू नका हो. मी लिहीन. पंधरवड्यातून एक लेख तरी लिहून देत जाईन.’

देवच पावला म्हणायचा! बाकी देव पावला आणि खरोखरंच समोर येऊन उभा राहिला तर काय अवस्था होईल, हे आपल्या विचार करण्यापलीकडलं आहे. संत आणि कवी यांना हे नेमकं जमतं. वास्तवतेच्या निखार्‍यात धगधगणारं समाजमन आणि प्रियकर प्रेयसीचं कोवळं शृंगारिक मन ज्या एकाच लेखणीतून तितक्याच नेमकेपणानं उतरतं, ती समर्थ लेखणी सुरेश भटांची. त्यांचीच ‘सजण दारी उभा’ कविता तू ऐक. हे गाणं भारती आचरेकर, आर्या आंबेकर आणि सलिल कुलकर्णींच्या आवाजात ऐकलं आहे. ‘भटां’च्या काव्याला प्रत्यक्ष ‘देवां’नी संगीत दिलं आहे, पण ते ऐकण्याचं भाग्य नाही मिळालं. ज्या कवितेने अनेकांना वेड लावलं आहे ते एकदा नव्हे अनेकदा ऐक.

‘अनेकदा का? एकदा वाचल्यावर अर्थ समजतोच की’

नाही सखे! एकच कविता आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर वाचावी. प्रत्येकवेळी तिचा कोणतातरी नवीन पैलू समोर येतो. आपण वाचताना शब्द वाचतो, अनुभवास आलेला अर्थ त्याच्याशी जोडतो. नवा अनुभव कवितेचा वेगळा अर्थ सांगून जातो. म्हणून कविता अनेकदा वाचावी. आता हीच कविता घे! काय वाटतं तुला वाचल्यानंतर?

‘हे काय! साधा सरळ अर्थ आहे. प्रेयसी प्रियकराची वाट पाहत होती. वाट पाहण्यातच तिचं सगळं काम राहून गेलं. मग, तो अचानक आला. तिला काय करावं तेच सुचेना. या सगळ्यात होणारी तिच्या मनाची घालमेल भटांनी टिपली आहे. तीही अप्रतिम!’

सखे, हा एक अर्थ आहे. तो नाही अशातला भाग नाही. त्याही पलीकडे एक खोल अर्थ त्यात दडला आहे. तो थोडासा आध्यात्मिक आहे. 

‘उगाच काहीतरी! तुम्हांला आध्यात्म आवडतं आणि त्याहीपुढे जाऊन आलेल्या गेलेल्याला ते ऐकवण्याचीही खाज आहे म्हणून तुम्ही त्याच्यातून तसे अर्थ काढता. प्रियकर अचानक दारात उभा राहिल्यावर प्रेयसीचा उडणारा गडबडगोंधळ एवढाच काय तो भटांना सांगायचा आहे. बाकी काही नाही.’

सखे, ओढून ताणून अर्थ लावणे आणि अन्वयार्थ काढणे यात फरक आहे. एखादा शब्द तसाच आणि तिथेच का योजला आहे, यावर कवितेचा नेमका अर्थ ठरतो. प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन म्हणूनच वेगळं असतं. कविला तेच सांगायचं आहे, असा दावा करण्यात अर्थ नसतो. ‘सांगणार्‍याला काय वाटतं?’ ते त्याला त्याच्या पद्धतीने सांगायचं असतं. ते बरोबर की, चूक हे ऐकणार्‍याने ठरवावं. जाऊ दे! 

सखे, ‘दुबळी कुडी’, ‘प्राणपूजा’ या कवितेत आलेल्या शब्दांचा विचार कर. शेवटचं कडवं तर माझं सगळ्यांत आवडतं कडवं. त्यामागची भावना प्रेमापलीकडलं काहीतरी सांगते. 

‘हं...! तुम्हीच सांगा!!’

सखे, शब्द, स्वर यातून अर्थ पोहोचला पाहिजे. त्याहीपलीकडे जाऊन भावना पोहोचली पाहिजे. आता बघ! प्रियकर अचानक आल्यामुळे प्रेयसीला प्रश्‍न पडलाय घर कधी आवरू आणि स्वत:ला कधी सावरू. आवरावं तेव्हा लागतं जेव्हा पसारा झालेला असतो आणि सावरावं तेव्हा लागतं जेव्हा तोल गेलेला असतो. जशी ही अवस्था प्रेयसीची होते, तशीच ती जिवाचीही होते. शरीर हे जिवाला राहायला मिळालेलं तात्पुरतं घर आहे. हे घर सोडायच्या वेळेला जिवाला शिव करण्यासाठी शिव (तत्त्व) येतो. पण, जीव मृत्यूचा उंबरठा ओलांडून पुन्हा दुसर्‍या घरात जाणं पसंत करतो. शिव होत नाही. शिव होण्यासाठी लागणारी तयारी केलेलीच नसते. काम क्रोधाने शरीरात केलेला पसारा आवरायला आणि ‘वेळ थोडा राहिलाय’ या धक्क्यातून सावरायला वेळ मिळत नाही. 

सखे, प्रेयसी स्वत:ला आपण कशी दिसायला हवी असा विचार करते तेव्हा आरशात ‘पाहते’. त्याला मी कशी दिसायला हवी, तशी होण्यासाठी ती स्वत:ला ‘निरखून पाहते’. परमेश्‍वराला हवं तसं आपण कधी वागतो? आपण आपल्याला हवं तसंच वागतो. प्रियकर जिला स्वत:ला भेटायला आलाय ती शृंगार करताना स्वत:ला दुबळी का म्हणेल? तिथेही शब्द ‘देह’ असा नाही, ‘कुडी’ असा आहे. समर्पणाचा भाव असल्याशिवाय दुबळेपणाची जाणीव होत नाही. मला मी कशी दिसायला हवी यापेक्षाही त्याला मी कशी दिसायला हवी, त्याप्रमाणे तिला सजायचं आहे. 

सखे, साज, शृंगार करण्यासाठी तरी तिच्याकडे अलंकार कुठे आहेत? तिनं प्रचंड सोसलं आहे. पदरी खूप आसवं आहेत. तीच माळायचं ती ठरवते. पण, माळताना त्यातली थोडीच माळते. अजून खूप आसवं शिल्लक आहेत. जी काही माळली आहेत ती त्याच्याच विरहात गाळलेली आहेत. आपल्याला झालेलं दु:ख, आपण होता होईल तेवढं मोठं करून दाखवत असतो. दु:खाने दु:खी होण्याएवढं सुख, सुखाने सुखी होण्यातही नसतं. त्यासाठी नसलेली आसवेही आपण खूप गाळत असतो. प्रेयसीला दु:खाचं प्रदर्शन नाही घडवायचं, फक्त जाणीव करून द्यायची आहे. म्हणून प्रेयसी प्रियकराच्या विरहात झालेलं दु:खही, त्याला दु:ख होऊ नये म्हणून लपवते. आसवेही ती ‘माळते’, गाळत नाही. 

सखे, शब्द अर्थप्रवाही असतात. म्हणूनच ते कसेही वापरता येत नाहीत. ते जपून वापरावे लागतात. आपण जेव्हा पूजा ही कृती सांगतो तेव्हा ‘घातली’, ‘केली’, ‘उरकली’ असे शब्द वापरतो. इथे भटसाहेबांनी वापरलेला शब्द आहे ‘बांधली’. तीसुद्धा ‘प्राणपूजा’! आपल्यासाठी परमेश्‍वराची पूजा झाली की, ती घातली, केली किंवा उरकली जाते. परमेश्‍वरासाठी परमेश्‍वराची पूजा ही कायम ‘बांधली’ जाते. हे कसं तरी करणं नाही. हे सृजन आहे, ही निर्मिती आहे. 

सखे, शेवटच्या कडव्यातला ‘पुन्हा’ हा शब्द उच्चारताना, ‘दारावर आधी थाप वाजली होती’ हे स्वरातून सांगणे हे गायकाचं कसब. दारावर वाजलेली थाप ही जन्मजन्मांतरी ऐकलेली आहे, हे प्रेयसीच्याबाबतीत कितीही काव्यात्म असलं तरी जीवाच्याबाबतीत ते सत्य आहे. ही ओळख पटण्याचा तो क्षण इतका अचूक टिपला आहे की, शब्दच थांबतात. आपलंच हृदय आपणच कसं हृदयी धरायचं, हा प्रेयसीला पडलेला प्रश्‍न खरं तर जिवाला पडलेला प्रश्‍न आहे. आपणच ब्रह्म आहोत याची जिवाला ‘जीव’ जाताना झालेली जाणीव आणि तरीही ‘आपण जीव आहोत’ असं वाटणं ही संभ्रमावस्थाच विचित्र. ती तडफड, ती तगमग यात भटांनी नेमकी सांगितली आहे. अद्वैताचा अनुभव आल्यानंतरही जाणिवेने द्वैत स्वीकारणार्‍या ज्ञानेश्‍वरांच्या विरहिणीची ही व्यथा आहे. आपण एकच आहोत, तर मग तो न्यायला का आलाय आणि मी त्याची वाट का पाहते? हे वेगळेपण का आहे? आपण एकच आहोत तर त्याला कसं पाहू? असे असंख्य गोंधळात टाकणारे प्रश्‍न प्रेयसीला पडतात. 

सखे, आपण ब्रह्म आहोत ही जाणीव झाल्यानंतरही जिवाला मिळालेलं तात्पुरतं घर सोडवत नाही. त्यात तो गुंतलेला असतो. त्याचा मोह सुटत नाही. कितीही मोह असला, तरी ते नष्ट होणारं असतं, म्हणून त्याचा त्याग करावाच लागतो. पण, जीव दुसरं घर निवडतो.  तेही नष्ट होणारंच असतं. ते घर सोडताना पुन्हा शिव दारावर थाप मारतो. थाप ओळखीची असते, जन्मजन्मांतरी ऐकलेली असते. तरीही दार उघडताना पुन्हा तोच गोंधळ, तीच संभ्रमावस्था. जीव शिव किंवा ब्रह्म होईपर्यंत हे चक्र सुरूच राहतं. ‘मी आहे’ या स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेने सुरू झालेला प्रवास, ‘मी ब्रह्म आहे’ या जाणिवेनंतर, ‘ब्रह्मच आहे’ या शुद्ध जाणिवेत संपतो. या प्रवासातील स्थित्यंतरात होणारी घालमेल, तगमग, तडफड जशी जिवाची होत असते तशीच प्रेयसीचीही होत असते. हा समान धागा पकडून संतांनी आणि कवींनी अध्यात्म सोपं करून आपल्याला कळेल अशा भाषेत मधुराभक्तीच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. जे ज्ञानमार्गाने समजतं तेच भक्तिमार्गानेही समजतं. मार्ग वेगवेगळे असले, तरीही गंतव्य एकच!

‘हे लिहिताना असा, एवढा विचार भटसाहेबांनी केला असेल?’

सखे, एखादी गोष्ट प्रत्यक्षात येते तो क्षणच आपल्या ओळखीचा असतो. त्याआधी त्यामागे त्याच्या निर्मितीची सुरू असलेली अखंड प्रक्रिया आपल्यासाठी अज्ञातच राहते. कवितेची रचना होतेवेळी एवढा सगळा विचार कवी करतो आणि मग काव्य रचतो, असं आपण समजतो ते याचमुळे. कवीच्या बाबतीत, विचारांच्या निरंतर प्रक्रियेचं प्रकटीकरण एके क्षणी होण्याला काव्य म्हटलं जातं. आपल्याला हे कसं सुचलं याचं आश्‍चर्य कवीला वाटत असतं आणि ते नेमकेपणानं सांगता येत नाही. एकाच कवितेचे अनेक पैलू आपल्याही कालांतराने प्रत्ययाला येतात. म्हणूनच सखे, खूप ऐक, खूप वाच आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सातत्याने लिही! 

‘लिहिते बर्वे! खरंच लिहिते!!’

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

दर्द के रिश्ते...

सखे, पाऊस मला खूप आवडतो. अगदी, तिच्यासारखा. पाऊस अनेकांना अनेक अर्थांनी आठवत असतो.  पाऊस, ती आणि मी यांच्यात वेगळंच नातं आहे; दु:खाचं.  तुला गंमत वाटली असेल ना हे मी सगळं तुला का ऐकवतोय?. अगं, आमचे दोघांचे वाद व्हायचे पाऊस यायच्या आधी आणि नंतरही. पाऊस पहिल्यांदा चिंब भिजवून गेला. तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी परत देऊन गेला. तिच्यासोबतचा प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण असा थेंबा थेंबांतून बरसवून गेला. तिची आणि माझी भेट त्याच्या सोबतीनेच झाली होती. पहिली मिठी, पहिलं चुंबन, पहिलं भांडण या सगळ्याचा साक्षीदार हा पाऊस आहे. तिची पहिली भेट आणि शेवटची भेट, पहिल्या पावसातच झाली होती. प्रत्येकवर्षी येणारा पाऊस मला असा शेवटपर्यंत छळत राहणार बहुतेक.

सखे, एरव्हीसुद्धा मला आवडणारा पाऊस, तिच्यामुळे खूपच आवडतो. तिलाही आवडतो. नाही, असं नाही. पण, ती त्याचा राग करते. तो नाही आला तरीही रागावते आणि खूप आला तरीही रागावते. मला मात्र त्याचं वाट पाहायला लावणं आणि बेधुंद बरसणं दोन्ही आवडतं. अगदी, तिच्या प्रेमासारखं. कुठल्यातरी एका शायरानं म्हटलंच आहे,

प्रेम तुझे पावसासारखे आहे सखे
मरतो दुष्काळातही अन् पुरातही

ती खूप हळवी होती. पाऊस नाही आल्याने होणारी त्राही त्राही तिला कधीच पाहावत नव्हती. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या झोपड्या तिला विचलित करून सोडायच्या. वास्तविक नेमेचि येणार्‍या पावसाळ्यात या गोष्टी घडतच राहायच्या. पण दरवर्षी असं व्हायचं आणि दरवर्षी आमचं भांडण व्हायचं. ती पावसाबरोबर मलाही हृदयशून्य, कठोर म्हणायची. ’पावसाला हृदय असतं का गं?’ या प्रश्‍नावर आणखीनच चिडायची. तिला पाऊस आवडायचा. पण, तिला हवा तसा तो कधी बरसलाच नाही. मलाही ती खूप आवडायची. पण, मला हवी तशी ती कधी माझी झालीच नाही. हे आमच्यामध्ये असलेलं अंतर, आपल्या अंतरात ठेवून हा पहिला पाऊस मला उभा आडवा छळतो. तरीही खूप आवडतो, अगदी तिच्यासारखा.

सखे, अचानक आलेल्या पावसाने चिंब भिजवून टाकलं. सगळे कपडे यथासांग ओले झाले. घरी परतलो. मस्तपैकी कॉफी करून घेतली. तिची आठवण मनात घोळवत गाणी ऐकत होतो. हरीहरन यांनी गायिलेली एक गझल लागली. कुठेतरी झालेल्या लाइव्ह कार्यक्रमाचं ते ध्वनिमुद्रण होतं. झाकिर हुसेनांचा तबला आणि हरिहरन यांचा आवाज.  ’दर्द के रिश्ते न कर डाले उसे बेकल कहीं' ही गझल तू मुद्दाम ऐक. ही गझल कुणी लिहिली आहे हे माहिती नाही, पण फारच सुंदर गझल आहे. ही गझल मी तिलाही ऐकवली होती, आमचं भांडण झालं तेव्हा. ते भांडण जसंच्या तसं आठवलं. 

सखे, विचाराला अहंकार चिकटला की भांडणं होतात. 

विचार, हा ’विचार’ म्हणून केला तर आपण तो साकल्याने करू लागतो. पण, जेव्हा हाच विचार, ’माझा विचार’ होतो तेव्हा त्याला अहंकार चिकटलेला असतो. त्यापेक्षा वेगळा विचार बरोबर असू शकतो हे आपण मनातही आणत नाही.  

सखे, आटत चाललेल्या विहिरी, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या बातम्या ऐकून ती खूपच विचलित व्हायची. स्वत:च्या घरात चोवीस तास पाणी असतानाही, पाण्याचा थेंब मिळत नाही अशांसाठी तिच्या डोळ्यात पाणी यायचं. मग, पाय आपटत आपटत ती माझ्याकडे यायची. थेट मलाच प्रश्‍न विचारायची, 

’कुठे गेला तुझा तो पाऊस? एकेका थेंबासाठी मैलो न मैल चालत जातात माणसं. त्याला दया येत नाही?’

पाऊस काही माझ्या सांगण्यावरून कोसळत नाही. पण, तो मला आवडतो म्हणून तिची बोलणी मला खावी लागायची.  तिच्या भाबडेपणाला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.  रक्ताच्या नात्यातही एवढा कळवळा नाही सापडत. नात्यांमध्ये संबंध कोणते व कसे असावेत हे व्यवहार ठरवतो, नाती नाहीत. नाती या शब्दाचा अर्थच बहुधा ना ती म्हणून ’नाती‘ असा झाला असावा. फक्त व्यवहारापुरती असतात, एरव्ही नसतात म्हणून नाती. बातम्या ऐकून आपल्यालाच पाणी मिळत नाही अशा पद्धतीने ती कळवळायची म्हणून थोडं विचित्र वाटायचं.  मुसळधार पावसामुळे घरात शिरलेलं पाणी, वाहून गेलेल्या झोपड्या तिला अशाच विचलित करून जायच्या. वास्तविक दु:ख करण्यासाठी यातलं कुणीही तिच्या नात्याचं नव्हतं. दुसर्‍याचं दु:ख माणसाला कायम आपल्या दु:खापेक्षा कमीच वाटत असतं. म्हणूनच इतरांच्या दु:खाचा आपण किती त्रास करून घ्यायचा याचेही ठोकताळे आपण ठरवलेले असतात. नात्यातली दु:ख सगळ्यानाच समजतात पण ही दु:खाची नाती समजायला थोडी अवघड होती. मग, मी म्हणायचो, बाई गं, तू बातम्या बघू नकोस, सिरियली बघ. ती आणखीन चिडायची.

सखे, तिचं हे भावुक होणं मला फार आवडायचं. या गोष्टी होतच असतात असं म्हणून त्या सोडून देणं, तिला पटत नसे. या तिच्या भावविश्‍वातून तिला बाहेर काढणं अनेकदा खूपच कठीण होत असे. लहान मूल जत्रेत रमतं, तेव्हा त्याला रमू द्यायचं असतं. फक्त त्याचं बोट सोडायचं नसतं. तिच्या उसन्या दु:खातून ओढून बाहेर काढणं तिला आणखी यातना देणारं ठरलं असतं. ती माझ्यापासून दूर जाईल अशीही भीती वाटायची. तिचा हात हाती धरून लांब कुठे तरी निघायचो. तिची लांबसडक बोटं स्वत:च्या बोटात गुंफून घ्यायचो. चांदण्यात गुंडाळलेलं रेशीम हाती यावं तसा तिचा तो मृदू मुलायम हात हाती आला की सुखाच्या स्वर्गात घेऊन जायचा. त्याचवेळी नेमका पाऊस कोसळायचा. ती बिलगायची. चिंब भिजायची माझ्यासोबत. नको असलेलं बेरंग आयुष्य हवंहवंसं वाटायचं. तिनं कधीच सोडून जाऊ नये असं वाटायचं. 

सखे, आपल्याला जसं वाटतं तसं घडत नाही. तिची प्रत्येक कृती, भेट हे आपल्यावरचं तिचं प्रेम आहे असं मला वाटायचं. तिच्या डोळ्यातून ते नेहमी जाणवायचं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी ती सांगायची. खूप बोलायची, खूप भांडायची. पहिल्यांदा एखादी गोष्ट केली की ती आणून दाखवायची. ड्रेस असो की ड्रेसिंग केलेला खाद्यपदार्थ. आयुष्याची प्रत्येक चव ती माझ्याकडून चाखायची. न विसरता, हवं, नको ते सगळं सांगायची.  फक्त तिचं माझ्यावर प्रेम नाही, हे सांगायला विसरली. आता पुन्हा आपली भेट नाही, हे सांगून ती निघाली तेव्हा मी कोसळलो. आपण तहानेने गतप्राण व्हावे आणि पाऊस भलतीकडेच धो धो कोसळावा, असंही वागतो पाऊस कधी कधी. अगदी तिच्यासारखा.


चित्रस्रोत : आंतरजाल

शनिवार, ८ जुलै, २०२३

पूजेतल्या पानाफुलां

सखे, आज तुझ्या चेहर्‍यावर विलक्षण मिश्किल प्रश्‍नांची नांदी मला दिसत आहे. खूप वेळ श्‍वास कोंडून ठेवून एकदम सोडला, तर चेहर्‍यावर जसे भाव प्रकटतील तसेच काहीसे भाव तुझ्या चेहर्‍यावर आहेत. 

‘काही नाही रे. एक वाक्य वाचलं एका पुस्तकात आणि असं का होतं या विचारात मन गढून गेलं. माझ्यावर बेतलेले प्रसंग आठवले. काहीच सुचेना. वाटलं तुला विचारावं. पण, तुझं ते लांबलचक स्पष्टीकरण, अतर्क्य बोलणं सगळं डोक्याच्या फार वरून जातं. तरीही तुझीच वाट पाहात होते. इतक्यात तू आलास.’

काय विचारायचं काय होतं सखे, आणि कुठलं असं वाक्य वाचलस ज्यामुळे तू एवढी विचारात गर्क झालीस?

‘माणसाच्या चांगल्या गोष्टी पाण्यावर लिहिल्या जातात आणि वाईट गोष्टी लोखंडावर कोरल्या जातात, असं काहीसं ते वाक्य होतं. एखाद्यासाठी आपण खूप गोष्टी कराव्यात, पण एखादीच राहून जावी. त्यानही नेमकी न केलेली गोष्टच लक्षात ठेवावी व केलेल्या सगळ्याचा त्याला विसर पडावा. हे असे मैत्रीत, प्रेमात निदान माझ्याबाबतीत तरी अनेकदा घडून गेले आहे. असं का होतं रे?’

सखे, तू आपण केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींना फार महत्त्व देतेस म्हणून तुला त्याचा त्रास होतो. त्याच्या लक्षात न केलेल्या गोष्टी राहतात आणि तुझ्या लक्षात केलेल्या. आपण मोजदाद करण्यामध्ये केलेल्या गोष्टी घालवून बसतो. इतरांच्या लक्षात राहतं किंवा राहात नाही हा त्यांच्या स्मृतीचा दोष आहे. बरेचदा हे असं स्मरण किंवा विस्मरण सोयीनुसार घडतं. या सगळ्या गोष्टींची मोजणी करणं सोडलस की तुला खर्‍या मैत्रीची, प्रेमाची ओळख पटेल. तुझ्या चेहर्‍यावरून लक्षात येतय की तुला नाही पटली ही गोष्ट. ठीक आहे, माझं नको ऐकूस बा. भ. बोरकरांचं ‘नाही पुण्याची मोजणी’ हे प्रासादिक गीत ऐक. स्थितप्रज्ञता कशी असावी याचं उत्कट प्रत्यंतर ज्या काव्यातून येतं, ते हे काव्य. अभिषेकीबुवांचा धीरगंभीर आवाज. सखे, तुला सांगतो जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा हेे कान शाबूत असावेत आणि ‘नाही पुण्याची मोजणी’ व ‘इतना तो करना स्वामी’ ही दोनच गाणी ऐकायला मिळावीत. आयुष्याचं सार्थक होईल. गंमत म्हणजे दोन्ही गाणी अभिषेकीबुवांनीच गायली आहेत. 

सखे, पाप पुण्य या फार मोठ्या गोष्टी झाल्या. आपण केलेलं चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही आपल्याला त्रास देत राहतात. केलेल्या कृतीचा चांगलेपणा आणि वाईटपणा आपणच ठरवत असतो. हे त्या त्रास होण्यामागचं कारण आहे. कृती चांगली की वाईट हे आपण प्रत्यक्ष कृती, त्यामागचा हेतू आणि झालेल्या परिणामांवरून ठरवतो. चांगल्या कृतीची मालकी आपण आपल्याकडे आणि वाईट कृतीला आपल्याशिवाय सगळे जबाबदार अशी पद्धतशीर विभागणी करून टाकतो. सगळ्या चांगल्या किंवा बरोबर कृतीची मोजणी करीत बसतो. वाईट, चुकीच्या गोष्टी आणि हातून न घडलेल्या श्रेयस्कर गोष्टींची टोचणी मनाला लावून घेतो. इथेच आपली फसगत होते. केलेल्या चांगल्या कामांचं संचित म्हणजे पुण्य आणि हातून घडलेल्या वाईट कर्मांचं संचित म्हणजे पाप. जेवढी पुण्याची मोजणी घातक तेवढी पापाची टोचणीही घातकच.

सखे, प्रिय गोष्टी करण्यासाठी आणि श्रेयस्कर गोष्टींसाठी आपण फार धावाधाव करतो, जिवाचा आटापिटा करतो. माणूस तारुण्याचा उंबरठ्यापर्यंत प्रेयसाच्या मागे धावतो. प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते करणं. तारुण्याचा आवेग थोडासा ओसरला की, श्रेयसाच्या मागे लागतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी केल्याने श्रेय मिळतं अशा गोष्टी. या वयात माणूस श्रेय मिळत असेल तर अप्रिय गोष्टही करतो. या दोनच अवस्थांमध्ये आयुष्य संपून जातं. या दोनच गोष्टींमुळे माणसाचा विकासही होतो. तिसरी एक महत्त्वाची अवस्था म्हणजे निश्रेयस. प्रियही नाही आणि श्रेयस्करही नाही, तरीही ते करणे आवश्यक आहे म्हणून जे काही केलं जातं त्याला निश्रेयस असं म्हणतात. ते करण्यामध्ये आपला कसलाच लागभाग नसतो, कशाचा पाठलागही नसतो. ही स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे. हा विचार कायमचाच आचरणात आणला की आयुष्य फुलांच्या परागासारखं होतं.

सखे, एकदा ही स्थिती आली की मग आपल्या नावाचं, रूपाचं, आपल्या कृतीचं सुख दु:ख वाटणं बंद होतं. बाह्य लक्षणाने हीच स्थिती कोडगेपणाचीही असते. त्यातला फरक लक्षात आला की फसगत होत नाही. निसर्ग आपल्याला देताना कधी त्याची मोजणी करीत नाही. तसच, आपल्यापासून हिरावून घेतल्याची टोचणीही त्याला नसते. आपल्या हातून घडणार्‍या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पाहायला शिकले पाहिजे. असे सहजतेने घडू लागले की, आपण आकाशस्वरूप होतो. आयुष्य धूपाप्रमाणे सुगंधित होऊन जातं.

सखे, आपल्या बाबतीत जन्म आणि मृत्यू यांचा सोहळा एकांगी असतो. या दोन्ही सोहळ्यात आपला सहभाग हा ते सोहळे आपल्यासाठी आहेत एवढ्यापुरताच असतो. जन्म झाल्यानंतर आपल्याला पाळण्यात ठेवतात, नाव ठेवतात, बारसं साजरं करतात ते सर्व आपल्याला दिसतं, पण समजत नाही. आपल्या मृत्यूनंतर होणारे सोहळे आपल्याला दिसतही नाहीत आणि समजतही नाहीत. जन्माच्या वेळी आपण तो सोहळा समजण्याच्या खूप अलीकडे असतो व मृत्यूच्या वेळी आपण तो सोहळा समजण्यापलीकडे गेलेलो असतो. पूजेसाठी देवावर वाहिलेली पानं फुलं काही देवावर वाहिली म्हणून दुसर्‍या दिवशी ताजी नाही राहात. ती शिळीच होतात. पण सखे, तीच शिळी पानं फुलं आपण  प्रसाद म्हणून स्वीकारतो. देवावर वाहिलेल्या त्या फुलांचा मृत्यू सर्वांगाने परिपूर्ण होतो. स्थितप्रज्ञता ही अवस्थाच अशी आहे की, इथे एकदा माणूस पोहोचल्यावर त्याचा जन्म आणि मृत्यू सर्वांग सोहळा होतो.



बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

आयुष्याची आता झाली उजवण...

सखे, माझा मित्र जय जोशी याने विचारले की, ‘मृत्यू, नकारात्मक असेच का लिहिता?’ तेव्हा थोडा विचारात पडलो. आपले लिखाण नकारात्मक तर होत नाही ना, असा एक प्रश्न स्वत:ला पडला. ‘मृत्यू’ हा अटळ विषय नकारात्मक नाही. आपण त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्याला टाळतो. या विषयावर भाऊसाहेब पाटणकर यांनी खूप चांगले विचार मांडले आहेत. मला आवडतात ते बा. भ. बोरकरांचे विचार. मृत्यूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारच सुंदर आहे. विशेषत: ‘मृत्यू यावा’ असं वाटण्याच्या स्थितीकडे पाहण्याचे वेगळेपण. ती सार्थक, तृप्त आणि परिपक्व आयुष्य जगल्याची खूण आहे. 

सखे, त्यासाठी तुला बोरकरांची आयुष्याची आता झाली उजवण, ही कविता ऐकावी लागेल. सलिल कुलकर्णी यांनी ती  ‘संधिप्रकाशात’ या कवितेशी जोडून सादर केली आहे. आयुष्याची झाली उजवण ही मृत्यूपूर्वीची देवाकडे केलेली अपेक्षा आहे, तर संधिप्रकाशात ही सखीकडे मृत्यूनंतर केलेली अपेक्षा आहे. ‘आयुष्य कसं कृतार्थ जगून दाखवलंय’ या संचितावर देवाला भक्तीने आणि सखीला प्रेमाने केलेली प्रार्थना म्हणजे या दोन कविता आहेत. 

सखे, उजवण या शब्दाला दोन अर्थ आहेत. भूमी, वस्त्र, मनुष्य इत्यादींची ऊर्जित अवस्था म्हणजे उजवण हा एक अर्थ. उजवण म्हणजे समाप्ती, अखेर असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ घेतल्यास त्या जागी, तो शब्द अगदी योग्य ठरतो. ऊर्जित किंवा समाप्तीची अवस्था आयुष्याला प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे दु:ख नाही उरत. कारण, बोरकर म्हणतात की, येतो तो तो क्षण अमृताचा. प्रत्येक क्षण अमृताचा असेल, तर मृत्यू कसा संभवेल? मग ती अवस्था कोणती? चैतन्यात विलीन होऊन जाणे, सद्-चित-आनंद होणे ही ती अवस्था.

सखे, आयुष्याची कृतार्थता स्थितप्रज्ञतेत आहे. मागणी किंवा अपेक्षा आणि तक्रारी थांबल्या की आपण स्थितप्रज्ञ होत जातो. वेगळं काही करण्याची आवश्यकता राहत नाही. ‘तो करी तो परमार्थु’ या अवस्थेला आपण येऊन पोहोचतो. ज्याला हात लावू तो दगड, धोंडा इतरांसाठी परीस, चिंतामणी होतो. ज्या पाण्याला स्पर्श करू, ते पाणी गंगोदक होते. कुठलातरी परीस माझ्या आयुष्याचे सोने करेल, कुणीतरी चिंतामणी नावाचा दगड माझ्या चिंता हरण करेल,  या अपेक्षाच शिल्लक राहत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वर्गीच्या नवलाईचे कौतुकही उरत नाही. जे जे स्वर्गात जाऊन मिळवायचे ते ते सर्व इथे या गोव्याच्या भूमीने मला दिले आहे, हा सार्थ अभिमान झळकतो. पृथ्वीवरल्या नश्वर गोष्टींची फिकीर उरत नाही ती नाहीच, त्याही पुढे जाऊन त्या ईश्वराचीही फिकीर, कौतुक उरत नाही.

सखे, आपण जे पाहतो, ते परब्रह्माचेच प्रतिबिंब असते. फक्त जे दिसते ते कायम टिकणारच आहे, असे आपण धरून चालतो. ब्रह्म, चैतन्य कायम आहे, त्याचे झालेले प्रकटीकरण न टिकणारे किंवा बदलत जाणारे आहे, हे सत्य आपल्याला मान्य नसते. आपल्यासह या सर्व स्थिरचराला ‘एक्स्पायरी डेट’ आहे, हे आपण नाकारतो. आपणच चैतन्य आहोत याची जाणीव झाली की, आयुष्य कृतार्थ होते. 

सखे, या ब्रह्मचैतन्यात विलीन व्हायची ओढ लागते. सासरी येताना संपून न संपणारी वाट, सासरहून माहेरी जाताना मात्र लवकर संपते. वाट तीच असते, अंतर तेच असतं. हृदयीचा जिव्हाळा पायीं आला की पावलांनाही स्थळकाळाचे भान राहत नाही. आतबाहेर आनंद भरून राहतो. श्वास कस्तुरीसारखे परिमळतात. बोरकरांंनी इथे दरवळ असा शब्द न वापरता परिमळ असा शब्द वापरला आहे. दरवळ सुरुवातीला खूप उग्र असतो, नंतर हळूहळू कमी कमी होत जात नाहीसा होतो. परिमळ हा कायम तसाच राहतो, तो उग्र नसतो आणि नाहीसाही होत नाही. आतबाहेर आनंदी असलेला माणूस, सकारात्मक ऊर्जेने भारलेला असतो. त्याचा सहवास इतरांनाही आनंदी करतो. अगदी कस्तुरीसारखा.

सखे, ही रडकी, नकारात्मक अवस्था अजिबात नाही. हा सुखाचा उत्सव आहे. तरीही त्याचे अप्रूप नाही. ‘शिव’ होण्यासाठी ‘जीव’ अनावर झालेला आहे. सोनेरी पिंजर्‍यात अडकलेला हा जीव चैतन्यमयी होण्यासाठी आतुर आहे. 

सखे,  बोरकरांची ही कविता म्हणजे मृत्यूपूर्वी कशी अवस्था असावी, याचा वस्तुपाठ आहे. तृप्त आयुष्य जगल्यानंतर चैतन्यमयी होण्याचं मागणं आहे. इथे रडारड नाही. चैतन्यमय होण्याचं साधन म्हणून मृत्यूकडे पाहिलं आहे. मरण येत नाही म्हणून जिवंत असणं नाही. जिवंत असणं असह्य झालं म्हणून मरण हवंय असंही नाही. उलट इतरांना जेव्हा, ‘आता मृत्यूने येऊच नये’, असे वाटेल अशावेळी केलेली मृत्यूची मागणी आहे. तृप्त, कृतार्थ आणि व्रतस्थ आयुष्याचं हे उद्यापन आहे, ही उजवण आहे.


रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

इस मोड से जाते हैं...

सखे, तू हळूहळू माझ्यापासून दुरावत गेलीस. तुझं वय आणि आमच्यातील अंतर वाढत गेलं. तुझं वयात येणं आणि आमचं दुरावणं हातात हात घालून चालत होतं. त्यांची ही संथ गतीच फार भयानक होती. तू पेन ड्राइव्ह हातात न देता, टेबलवर ठेवलास, त्यातून तू हे दुरावणं दाखवून दिलंस. तुझ्यापाशी येणार्‍या माझ्या सगळ्या वाटा तू बंद केल्याचा तो संकेत होता. तुझ्यापाशी घेऊन जाणारी एकही वाट माझ्याकडे नव्हती. 

सखे, आपली वेदना गीतातून ऐकावी, छान वाटते. एरव्ही वेदना ठसठसते, त्या वेदनेचं गीत झालं की, वेदना झंकारते. माझ्याप्रमाणे तूही गुलजार यांचं आंधी चित्रपटातलं ‘इस मोड से जाते हैं’, हे गीत ऐक. त्यातील ‘इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’, ही ओळ लक्षपूर्वक ऐक. सगळी वेदना या एका ओळीत सामावली आहे. सगळ्या वाटा बंद झाल्यानंतरचा मार्ग, गुलजार यातून दाखवतात. सन्मार्गावर चालणार्‍यांच्या पावलांची चाळण होते, तर हेतूवरच शंका घेतल्याने हृदयाची चाळण होते. माझ्या एका सन्मित्राचा हा शेर तुलाही आवडेल;

रक्ताळलेली, फाटलेली होती पावले त्याची
आजन्म बहुधा सन्मार्गावरून चालला असावा

सखे, सन्मार्ग आणि प्रेमाचा मार्ग कधीच निष्कंटक, साधा, सरळ नसतो. तसा आपल्या आयुष्याचा रस्ता, जगण्याच्या पाऊलवाटाही सरळ वळणाच्या नसतातच. काही पायवाटांना रस्तेच सापडत नाहीत. त्या अंतहीन प्रवास करत राहतात. खास करून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार्‍या पाऊलवाटा. तुझ्या देहाशी नव्हे तर तुझ्या हृदयाशी पोहोचायचं होतं, खूप दूरवर जाणार्‍या पाऊलवाटेचा हा न संपणारा प्रवास माझ्याबरोबरच संपेल कदाचित.

सखे, माझ्यासारखीच तूसुद्धा मनस्वी आहेस. दूर गेलेली आपुलकी हे मनस्वी माणसाचं सर्वांत मोठं दु:ख असतं. एकाच घरात राहत असल्याने जवळ जाण्याच्या वाटा, रस्ते असा प्रश्नच नसतो. त्यामुळेच, आपण जवळ असूनही खूप दूर असतो. ओळखीचे असूनही अनोळखी असतो. 

सखे, ओळख व्हायच्या आधी संवाद साधण्याचे अनेक मार्ग असतात. ओळख झाल्यानंतर या वाटाच हरवतात. वाटांची आवश्यकताच नसलेल्या गावी येऊन आपण पोहोचतो. खूप जवळ असलेल्या व्यक्तीकडे घेऊन जाणारी एखादी वाट शोधत राहतो.

सखे, दूर गेलेल्या आपल्याच जवळच्या माणसापाशी घेऊन जाणार्‍या तयार वाटा नसतातच. त्या तयार कराव्या लागतात. कधी अहंकाराची झुडपं कापून, तर कधी आपल्यालाच तुडवून ही वाट तयार करावी लागते. 

सखे, इतकं करूनही आपलं माणूस गवसेल, हे नक्की नाही सांगता येत. पण, प्रयत्न तर करावेच लागतात. कधी कधी जेथे पोहोचायचे आहे, त्यापेक्षाही तेथे जाण्याचा प्रवासच खूप काही देऊन जातो. मग, आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर स्थिरावलेली माणसं इतरांना सांगतात, 

‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे...’

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे

‘तो आता माझा नाही उरला...’

अगं झालं काय ते तरी सांगशील? मघापासून नुसते हुंदके. चला काही चार शब्द ऐकू आले तर तेही असंबद्ध. काय सखे, काय झालंय? तो काही म्हणाला का तुला?

‘हे बघ! तू त्याची बाजू घेणार असशील तर मी सरळ निघून जाईन. संपवेन स्वत:ला. तुलाही ऐकून घ्यायचं नसेल, माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग जगून काय फायदा?’ 

सखे, माझ्या एवढ्या बोअरिंग प्रवचनांचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का गं? एकही विचार त्यातून तुला घ्यावासा वाटला नाही का गं? गुण नाही निदान वाण तरी लागायला हवा होता. मारक्या म्हशीसारखी नको बघूस आता. ते जाऊ दे. मी त्याच्या किंवा तुझ्या बाजूचा नाही गं, तुमचाच आहे. तू माझी सखी आहेस. मरणाआधी मरणं आपल्याला जमत नाही, पटतही नाही. पूस पाहू डोळे. काय झालं सांग.

‘तुला माहितीय सगळं. तूच तर साक्षीदार आहेस आमच्या प्रेमाचा. त्यानंही तुझाच सल्ला घेतला होता आणि मीही तुझाच.’

अरे देवा! देशील बर्व्या पुन्हा प्रेमाचे सल्ले देशील? 

‘मी तुला ब्लेम करत नाही. समजून घेऊ शकशील असा तूच आहेस, म्हणून सांगते. त्याचं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावर. त्याच्यावर प्रेम करणार्‍या त्या सुनितेची याला काळजी. जे हवं ते मिळाल्यावर लग्न झालेले सगळे पुरुष मेले असेच वागतात. तू हसू नकोस रे. वंदनाला विचारेन मी.’ 

सखे, हसू नको तर काय करू? सगळ्या पुरुषांना एकाच मापात मोजणं बरं नव्हे. 

‘ते जाऊ दे. मरणाची इच्छा नाही. पण, जगणंच ओझं झालं आहे. त्याचं प्रेम नाही तिच्यावर हे मान्य आहे. पण, माझा काही विचार नको करायला का त्याने? आमच्यातलं नातं बिघडत चाललं आहे, ते कसं सावरावं हेच कळत नाही.’

सखे, रिलॅक्स हो. तुझ्यामाझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करतो. तोपर्यंत तू लताचं ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे’ हे गाणं ऐक. माझ्या आवडत्या मदन मोहनचं गाणं आहे. नक्श लायलपुरी यांना जे सांगायचं आहे, ते थेट हृदयात पोहोचवणारा सूर लताकडे आणि सुरावट मदनमोहनकडे आहे. डोळे मीट आणि ऐक. तोपर्यंत कॉफी बनवतो.

‘ऐकलंय रे. हजारवेळा ऐकलंय. मग आता काय वेगळं समजणार आहे?’

सखे, या अजरामर गीतांची खासियतच ही आहे की, जेवढ्या वेळा ऐकावं तितकी ती नव्याने समजतात. प्रत्येक वेळी अर्थाची एक वेगळीच छटा समोर येते, जिचा आधी कधी अनुभवच नसतो. कदाचित त्या शब्दांचा अर्थ ऐकल्याक्षणी समजतो, पण पटायला तसा अनुभव यावा लागतो. तुला जे दु:ख झालंय ते आधी तुला नव्हतं, म्हणून तू मुद्दाम हे गीत ऐक. या गीतात एकूण पाच वेळा ‘कैसे’ हा शब्द येतो. पण, प्रत्येकवेळी लतादीदीने तो वेगवेगळा गायला आहे. स्वरातलं मला काही कळत नाही. पण, वेदना सुराला चिकटली की तो सूर प्रत्येकवेळी वेगळीच अनुभूती देऊन जातो. आपल्याच लोकांनी उभ्या केलेल्या आपल्यातल्या भिंती पाडणार तरी कशा, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाला हजारो पद्धतींनी सांगता येईल पण, ज्या हृदयाने ते सांगायचं आहे, तेच भंगलेलं असेल तर सांगावं कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाचं ओझं कितीही असतं तर उचललं असतं पण, आयुष्यच ओझं झालं तर ते उचलावं तरी कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ तर अगदीच वेगळं. या प्रत्येक ‘कैसे’तलं वेगळेपण वेदनेची वेगळी अनुभूती देऊन जातं. आपलीच वेदना आपल्याला इतक्या प्रभावीपणे ऐकू येते की, आपणही तिला सहज दाद देऊन जातो. आपल्या वेदनेचं आपण दु:ख करतो. आपली वेदना आपल्याला दु:ख देऊन जाते. पण तीच वेदना लता ऐकवते आणि आपली दाद घेऊन जाते. 

सखे, तुला येत असलेला अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक संसारात येत असतो. आपल्याला त्रास देणारी माणसे आपलीच असतात. त्या त्रासापेक्षाही ती आपली असतात याचंच जास्त दु:ख असतं. ती परकी असती, तर एका मिनिटात प्रश्न सुटतो. हे न सुटणारे प्रश्न अर्जुनापासून द्रौपदीपर्यंत सगळ्यांना पडले व पडत आहेत. उत्तरेही कृष्णाने दिलेली तीच आहेत. वेगळी अजिबात नाहीत. तुला एक प्रश्न विचारतो. तुला त्याच्या मनाची मालकी हवी की शरीराची मालकी हवी आहे?

‘दोहोंपैकी एक हा पर्याय ठेवत आहेस का? तो शरीरानं आणि मनानंही माझाच असावा, असं वाटतं. काही चूक आहे का त्यात?’

सखे, दोन्ही हवं असल्यास दोन्हीवरची मालकी पूर्णपणे सोडावी लागेल. 

‘हा शुद्ध वेडेपण आहे. असं प्रत्येक स्त्री करू लागली तर पुरुषांना रान मोकळंच मिळेल. त्याची काही जबाबदारी उरणारच नाही. तसंही, ‘सगळं हवं तर सगळं सोड’ हे काय लॉजिक आहे? तुझं नेहमी काही तरी वेगळंच असतं. नाही पटत.’

सखे, प्रत्येकीनं असं करावं असं मी नाही म्हणणार. पण, तू तसं करावंस असा माझा आग्रह आहे.  नीट ऐक, मी मालकी सोडायला सांगितली आहे, त्याला नाही. 

‘हे काय भलतंच?’

सखे, नवरा मालक नसतो आणि बायको मालकीण नसते. पण, तरीही दोघे एकमेकांवर मालकीहक्क गाजवत असतात. प्रेमाचा हक्क असावा, हक्काचं प्रेम असू नये. 

सखे, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट जशी महाभारतात आहे, तशी न सांगता थोडी वेगळी सांगतो. दु:शासन जेव्हा द्रौपदीचं वस्त्र ओढू लागतो तेव्हा एकवस्त्रा असल्याने ती पदर घट्ट धरून ठेवते. कृष्णाचा धावा करू लागते. कृष्ण येत नाही. ती याज्ञसेनी रडू लागते, त्याला हाका मारते, तरीही तो येत नाही. दु:शासनाच्या बळापुढे तिचं काही चालत नाही. ती पदराचा नाद सोडून देते. घातलेल्या निर्‍या घट्ट पकडते. तिची अब्रू वाचवणारी ती शेवटची गोष्ट असते. उघडे पडू नयेत म्हणून एक हात वक्षांवर असतो व दुसर्‍या हाताने निर्‍या घट्ट धरून ठेवलेल्या असतात. तशातही कृष्णाचा धावा सुरूच असतो. कृष्ण काही येत नाही. द्रौपदीला खूप दु:ख होतं. दु:शासनाच्या बलप्रयोगापुढे ती हतबल असते. त्याहीपेक्षा आपण धावा करूनही आपला कृष्ण येत नाही, याचं  तिला दु:ख वाटत असतं. शेवटी काय व्हायचं ते होवो, असं म्हणत सावरण्यात गुंतलेले दोन्ही हात वर करून ‘कृष्णा....’, अशी आर्त हाक मारते. 

सखे, एकच असलेलं तिचं वस्त्र दु:शासनाच्या हातात असतं, तिच्या अंगभर वस्त्रे असतात आणि कृष्ण हसत उभा असतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी द्रौपदी विचारते, ‘कृष्णा, कुठे होतास?, किती उशीर केलास रे यायला.’ हसत हसत कृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी मी इथेच तर होतो. जसा मी सर्वत्र आहे, तसाच इथेही आहे, हे तुला माहीत होतं. पण, आला नाही तर, आपण सर्वांसमोर नग्न झाले तर, याची तुला भीती होती. त्यावेळी, सगळं जग, तू आणि मी इथे होतो. मग त्या भीतीची जागा ‘माझा असूनही येत नाही’ या दु:खाने घेतली. तेव्हा जग विसरलीस, फक्त तू आणि मी होतो. जेव्हा तू भीती आणि दु:ख दोन्ही सोडलेस, स्वत:लाही विसरलीस, तेव्हा जग नव्हतं, तू नव्हतीस, फक्त मीच मी होतो. मान खाली घालून बसलेले पांडवही मीच होतो, मदांधतेने हसणारे कौरवही मीच होतो, द्रौपदीही मीच होतो, वस्त्र ओढणारा दु:शासनही मीच होतो. एवढेच कशाला ते वस्त्रही मीच होतो. याची तुला माहिती होती, त्याच माहितीचे ज्ञान झाले तेव्हा मी दिसलो. 

सखे, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला आपण बंधनात बांधून ठेवू पाहतो. आपल्या पोटच्या पोरावरही इतकं प्रेम करतो, की ते पोर त्या प्रेमानेच घुसमटतं. प्रेम सर्वत्र आहे. आपण त्याला आडाख्यांमध्ये बांधू पाहतो. अमुक एखादी गोष्ट केली तर प्रेम आहे, नाही केलं तर प्रेम नाही, असले आडाखे नाती संपवतात. हजारो पहारे बसवलेस तरी व्यभिचार करणारा माणूस, संधी मिळताच केल्याशिवाय राहणार नाही. 

सखे, सुनिताचं दु:ख हे त्याचं आहे म्हणून ते तुझंही आहे. आपण सगळे आधी मित्र होतो, तेव्हाही तुझा नवरा इतरांचे प्रॉब्लेम्स सोडवायचा, मदतीला धावून जायचा. तेव्हा तुला त्यानं मैत्रिणीला केलेली मदत त्रास देत नव्हती. आता काय बदललंय? तेव्हाही तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, आजही तसंच आहे. फरक इतकाच झालाय की, तुम्ही नवराबायको झाले आहात. हक्क म्हणजे प्रेम आणि हक्कभंग म्हणजे प्रेमभंग झालाय. 

सखे, प्रेम करायचं नसतं, ते होतं. ते ‘होणं’ फक्त सांभाळायचं असतं. प्रेम होण्यावर भाळणं सोपं, सांभाळणं कठीण. गाठीशी असलेलं सगळं सोडून द्यावं लागतं. प्रसंगी, ते प्रेमही सोडावं लागतं. 

सखे, तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांत, अवती भवती आणि सगळीकडे आहे. अगदी, कृष्णासारखं. ते शोधू गेलीस, तर सापडणार नाही, पाहू गेलीस तर दिसणार नाही. त्याला जसं आहे, तसंच राहू दे. असं केलंस तर कुठल्याही भिंती आड येणार नाहीत, मन मारावं लागणार नाही किंवा  मन मोडणार नाही आणि आयुष्य ओझं वाटणार नाही! 


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

लीनते, चारुते, सीते...

सखे, ‘किती यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते लीनते, चारुते, सीते’ हे गीत आणि यातली शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात. अक्षरश: रडतो. आतल्या आत कोसळतो. तूसुद्धा हे गीत मुद्दाम ऐक. वाल्मिकी रामायणाशी पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिलेले हे गीत श्रीरामांची त्यावेळची भावना व्यक्त करतात. हे गीत तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक. त्यानंतर तू धाडलेली हिंदी कवी राजेश्वर वशिष्ठ यांची ‘जानकी के लिए’ ही कविता पुन्हा वाच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन तुझ्या लक्षांत येतील. सर्वांत आधी वाल्मिकी रामायणातील युद्धकांडाचे ११२ ते १२० हे सर्ग वाच. म्हणजे राजेश्वर वशिष्ठ यांची कविता, गदिमांचे काव्य आणि त्यांचा दृष्टिकोनही समजेल. ‘लीनते चारुते सीते’ ऐकताना मला का रडू कोसळते, तेही तुला समजेल. सीतेला पूर्णपणे असलेली श्रीरामाची जाणीव,  तुलाही होईल.

सखे, श्रीरामांनी हनुमंताला विभीषणाची अनुज्ञा घेऊन सीतेला आपल्यासह सर्व सक्षेम आहेत व रावणाला मारून युद्ध जिंकल्याचा निरोप द्यायला सांगितलं. युद्ध जिंकूनही लंका रामाची नव्हती. ती विभीषणाची होती. त्याची अनुज्ञा घेऊन सीतेला निरोप द्यायला सांगितला. आपण स्वत: भेटायला गेले नाहीत. हनुमंताकरवी दिलेला निरोपही बारकाईने वाचण्याची आवश्यकता आहे. हनुमंताने सीतेचा निरोप श्रीरामांना दिल्यावरही, श्रीरामांनी विभीषणाला तिला घेऊन यायला सांगितले. सीता आंघोळ न करताच शिबिकेत बसायला निघते तेव्हा, विभीषण म्हणतो, ‘सचैल स्नान करून, उत्तम वस्त्रे, आभूषणे धारण करून यायला श्रीरामांनी सांगितले आहे.’ त्यानंतर सीता डोक्यावरून आंघोळ करते, वस्त्रे, आभूषणे धारण करते. शिबिका सरळ रामाजवळ घेऊन यायला श्रीराम मनाई करतात. तेव्हा सीतेला पडद्याआडून आणावे, अशी सूचना विभीषण करतो, ज्याला राम विरोध करतात. जिच्यामुळे हे भयानक युद्ध झाले तिला युद्धात सहभागी झालेल्या व हयात असलेल्या सर्व सैनिकांनी पाहावे, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून सीतेला पायी चालत यायला सांगितले. याचा सीतेला त्रास झाला किंवा वाईट वाटले, असे चित्रण वाल्मिकी करत नाहीत. श्रीरामांना भेटण्याची तिची ओढच इतकी तीव्र होती की, रघुवंशाच्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व ठसेल म्हणून मुद्दाम केलेल्या या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरणे साहजिक आहे. 

सखे, त्यानंतर श्रीरामांनी जे काही सीतेला सांगितले, ते वाल्मिकींपेक्षाही गदिमांनी उत्कटपणे सांगितले आहे. ते ऐकल्यावर सीता काय म्हणाली, हेसुद्धा वाल्मिकी रामायणातील प्रत्येक शब्दावर लक्ष देत वाचण्यासारखे आहे. त्यानंतर लक्ष्मणला चिता पेटवायला सांगून सीता श्रीरामांना परिक्रमा घालते, तेव्हा श्रीराम मान खाली घालून उभे असल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे. 

सखे, रामायणात श्रीराम स्वत:ला कधीच देव, भगवान असे म्हणत नाहीत. उलट, ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’, असे म्हणत आपण माणूस असल्याची ग्वाही ते अनेक ठिकाणी देतात. याच्या अगदी उलट महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपण भगवान असल्याची ग्वाही देतात. स्वत:ला ‘वासुदेव’ म्हणण्याचा आग्रह धरतात. सोळा सहस्र नारींना स्वत:चं नाव देण्यासाठी भगवान व्हावं लागतं. आपल्या मनात यत्किंचितही शंका नसताना, प्राणप्रिय असलेल्या स्वत:च्याच एकमेव पत्नीला संपूर्ण समाजासमोर पावित्र्य सिद्ध करायला लावताना, स्वत:ला सावरायला माणूस व्हावं लागतं. समाजव्यवस्था घडवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक भावना दूर सारत कर्तव्यकठोर माणसाचा देवत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीराम. स्वत: भगवंत आहोत हे माहीत असूनही माणूस म्हणून वागत समाज घडवण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण. आदर्श प्रस्थापित करताना देवत्व कठीण असतं, माणुसकी देवत्वापेक्षाही अधिक कठीण व निष्ठुर असते!

सखे, जिच्यासाठी इतके सायास केले, तिला असं वागवताना श्रीराम नावाच्या माणसाला काहीच दु:ख झालं नसेल का गं? सीतेची अग्निपरीक्षा देताना पाहून, श्रीराम आतल्या आत खाक झाले नसतील का गं? ‘हें तुझ्यामुळें गे झालें, तुजसाठी नाहीं केलें’ आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें’ या दोन ओळी उच्चारताना श्रीरामांची वेदना माझ्या डोळ्यातून ओघळते. या सर्व वेदनांचा आणि मर्यादांच्या छळवादाचा कडेलोट, ‘सखि, सरलें तें दोघांमधलें नातें’ या ओळींनी होतो. माझा प्रत्येक अश्रू पापण्यांची साथ सोडत मुक्तपणे कोसळतो. श्रीरामाला मोकळेपणी रडताही आलं नाही. 

सखे, एक दुसरा, थोडासा वेगळा विचार करून पाहा. सीतेचं दु:ख पाहताना श्रीरामाच्या दु:खाकडेही पाहा. ‘स्त्री-पुरुष भेदभाव’, ‘स्त्रीवर अन्याय’, ‘पुरुषप्रधान संस्कृती’ वगैरे सिद्ध करताना आपण पुरुष असलेल्या श्रीरामाचं दु:ख पाहणेही आवश्यक आहे. स्त्रीची न्याय्य बाजू मांडताना, पुरुषावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्यक आहे. स्वाभाविक सहानुभूती मिळालेल्या दु:खाकडे पाहताना, त्याच दु:खाची दुसरी बाजू ‘अन्याय करणारीच आहे’, असे ठरवत तर नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे. 

सखे, गालांवर ओघळलेली आसवे दु:खाची मर्यादा सांगतात आणि पापण्यांच्या काठावर संयमाने रोखलेले अश्रू दु:खाची व्याप्ती सांगतात. ओघळणेही महत्त्वाचे आणि रोखणेही महत्त्वाचेच. ‘तुला दाही दिशा मोकळ्या आहेत’, ‘सीतेला वनात सोडून ये’ हे राजाराम सांगताना, त्याच्या आत असलेल्या आपल्या रामराजाला काय दु:ख झालं असेल याची जाणीव सीतेला पूर्णपणे होती. म्हणूनच ती प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेली. सीतेला असलेली रामाची हीच जाणीव आपल्याला आहे?


रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कार्पे डिअम

‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.

‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात?  तू पाहिला आहेस का तो? ’

सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर.  बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.

‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’

सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.

‘ए! सोप्या मराठीत सांग..’ 

अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो. 

‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’

सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अ‍ॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस. 

सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.

सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.

‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’

सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही. 

सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्‍या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.

सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे. 



चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे


मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

काय उत्तर देऊ तूच सांग...

पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअ‍ॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?

सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्‍यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;

’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्‍यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!

तुझीच

कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच

(उत्तर लिही बरं का!!)’

सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही  नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!

सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो.  मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो. 

सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्‍याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्‍या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्‍याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात. 

सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही.  अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्‍यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं, 

‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’ 

तितक्याच सहजतेने ती म्हणाली, 

‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’

’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच. 

तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र. 

सखे, काय उत्तर देऊ तूच सांग. 


शनिवार, ३० जुलै, २०२२

कचपाश मोकळे, मोकळे रेशीम...

सखे, तू रागावणार नसलीस तर एक गोष्ट सांगू? ऐकशील?

‘सांग ना! मी रागावेन म्हणून तू सांगायचा राहिला आहेस का कधी? तुला आवडलेली, न आवडलेली गोष्ट तुझ्या आप्तां
ना तू साखरेच्या पाकात घोळवून सांगतोस. जे सांगतोस ते कडू असलं तरी ऐकायला गोड वाटतं.’

सखे, तसं फार महत्त्वाचं नाही. पण, माझ्यासाठी निश्‍चितच आहे. तुझे कापलेले केस तू पुन्हा वाढव. का कोण जाणे, मला लांब केसांचं फार अप्रूप आहे. नागिणीसारखी पाठीवर सळसळत नितंबांवर हेलकावे खाणारी वेणी चित्त वेधून घेते. लांब केसांचं हे ऐश्‍वर्य जिला लाभलं तिच्यासारखी भाग्यवान स्त्री दुसरी नाही. दुपेडी, तिपेडी हे वेणीचे प्रकार आता दर्शनदुर्लभ झाले आहेत. या निसर्गदत्त ऐश्‍वर्याला विंचरायला वेळ नाही’, आउट ऑफ फॅशन’ या सबबीखाली कात्री लावली जाते. केसाने गळा कापता येईल एवढेतरी लांब केस स्त्रियांनी ठेवले पाहिजेत. पदर गेले, ओढण्या गेल्या त्यामुळे यौवनाच्या धनाचे रक्षण करण्याकरिता ही काळी नागीण पाठीवर असणे आवश्यकच आहे.  

सखे, हे लांब केस जेवढे हाल करतात ना, तेवढे हाल कुणीच करीत नाही. तुला खोटं वाटतं? मग सदानंद डबीर यांचे ‘कचपाश मोकळे मोकळे रेशीम’ हे गीत ऐक. संगीत यशवंत देव यांचं आहे आणि स्वर श्रीधर फडके यांचा. मोकळ्या केसांच्या या पाशातून माझी काही आजतागायत सुटका झाली नाही. व्हावी, असंही वाटत नाही. काही काही बंधनच अशी असतात की मोकळी असली तरी त्यापासून मुक्त व्हावं असं वाटतच नाही. तिच्या मोकळ्या केसांचं बंधनही असंच आहे, अडकवून ठेवणारं.

सखे, तशी ती पहिल्यांदाच दिसली, तेव्हा पाठमोरी दिसली. देहाच्या कमनीयतेपेक्षाही नजर स्थिरावली ती तिच्या लांबसडक, मोकळ्या रेशमी केसांवर. कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेऊन यौवनाच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. तिच्या पाठीवर विसावलेल्या त्या काळ्या मेघांनी मला पाऊस न पाडताही भिजवलं. भिजलेलं मन  आणि थिजलेला देह या अवस्थेत मी पहिल्या पायरीशी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. ती देवळाचा उंबरठा ओलांडून कधीच आत निघून गेली होती. पाणी भरण्यासाठी ती पुन्हा पायर्‍या उतरून खाली आली तेव्हा हरवलेला मी तिच्या दृष्टीस पडलो. तिने एकवार मला पाहिले आणि उंबरठ्याकडे पाहिले. माझ्या चेहर्‍याकडे पाहात तिने विचारले, 

‘कुणाला पाहताय?’

मी भानावर आलो. मोगर्‍याच्या कळीत उतरलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं, भर दुपारी देवळाच्या दारात माझ्यासमोर उभं होतं. तिच्या सोज्वळ सौंदर्यापुढे तिच्या देहाची कमनीयता ही अतिशय क्षुल्लक गोष्ट होती. पाठमोर्‍या कमनीय देहाला, सुंदर चेहरा असतोच असं नाही आणि सौंदर्य ओसंडून वाहणारा चेहरा, प्रमाणबद्ध देहाचा असतोच असंही नाही. सौंदर्य आणि कमनीयता यांचा मूर्तिमंत आकृतिबंध माझं देहभान हरवून गेला.  तिचा प्रश्‍न माझ्या डोळ्यांनी ऐकला आणि अनिमिष डोळ्यांनी उत्तरही दिले. तिला ते समजेल किंवा न समजेल, असं ओठांना वाटलं, म्हणून ओठातून नकळत शब्द बाहेर पडला,

परमेश्‍वराला...

सखे, मुखातून सहज निघालेल्या उत्तराचे तुला आश्‍चर्य वाटले असेल. तिचे मूर्तिमंत सौंदर्य पाहून परमेश्‍वराची आठवण का व्हावी? तो ज्या ज्या रूपामध्ये समोर आला त्या त्या रूपामध्ये आजवर त्याची पूजाच केली होती. ठळकपणे आलेली शुद्ध चैतन्याची प्रचिती म्हणजे सौंदर्य. मग ते देहाचं असो किंवा विचारांचं. समोरच्याला ओढ लावतंच. निर्जीव, काळ्या पाषाणाच्या ओबडधोबड मूर्तीमधून जसं परमेश्‍वराचं दर्शन घडतं, तसंच ते सजीव, नितळ उजळ रंग लाभलेल्या कमनीय देहातूनही घडतं. मूर्तीतच गुंतून राहिलं तर भक्त होता येत नाही आणि देहातच गुंतून राहिलं तर प्रियकर होता येत नाही!

सखे, मी तिच्या चेहर्‍याकडे अनिमिष नेत्रांनी पाहात राहिलो. तिने माझ्या चेहर्‍यासमोर आपला हात फिरवला. मला तिचा हात दिसत होता, जाणवत नव्हता. सगळ्या जाणिवा, संवेदना या पलीकडची स्तब्धता आली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून, खांदे हलवत मला भानावर आणायचा प्रयत्न केला. तिच्या हाताचा चुटपुटसा झालेला तो कोवळा स्पर्श मला वेड लावून गेला. 

सखे, त्यानंतर आमच्या गाठीभेटी होतच राहिल्या. पण, तिचं हे पहिलं दर्शन जे मनावर ठसलं ते ठसलं. ओळख वाढत गेली. वरलिया रंगापेक्षा तिचे अंतरंग खूपच नितळ होते, स्वच्छ होते. आपल्या लाभलेल्या सौंदर्याच्या निसर्गदत्त देणगीचा तिला सार्थ अभिमान होता, पण गर्व नव्हता. म्हणूनच त्या सौंदर्यावर उल्लू होणार्‍यांचा वापर करून घेणं तिला पटत नव्हतं. ती अशा पागल मजनूंना त्यांची जागा व्यवस्थित दाखवून देत होती, त्यांना आपल्यापासून एका अंतरावर ठेवत होती. तिचं मन तिच्या देहापेक्षाही सुंदर होतं. म्हणूनच तिच्या देहाचं आकर्षण उरलं नाही. तनाने रूपवान आणि मनाने कुरूप असणार्‍या स्त्रिया जगात कमी का आहेत? मनाचं सौंदर्य चेहर्‍यावर प्रकट झालं की स्त्री रूपवान होते. ती सुंदर होती, म्हणून सुंदर दिसत होती! 

सखे, आम्ही मनाने जवळ आलो होतो. आमच्या दोघांमध्ये लपवण्यासारखं असं काही नव्हतं. एकमेकांच्याबद्दल प्रचंड खात्री होती, विश्‍वास होता. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नात्यामध्ये एक प्रकारचा निर्भीडपणा येतो, तो आला होता. आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. एकदा पावसात भिजत भिजत फिरत होतो. दोघेही चिंब भिजलो होतो. तिच्या लांबसडक केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब कोवळे मोती होऊन टपकत होते. अचानक वीज कोसळली. तिने घाबरून मिठीच मारली. त्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर आम्ही भानावर आलो, सावरलो. लज्जेची वसने ढळली होती, डोळ्यांमध्ये संमती होती. तरीही त्यापुढे पाऊल टाकलं नाही. पायरी समजली की उंबरठा कधी ओलांडायचा आणि कधी नाही हे लक्षात येतं.  ती निघून गेली. मी तसाच न बोलता पावसात भिजत राहिलो. तिची पाठमोरी आकृती पाहात राहिलो. ती जशी पहिल्यांदा दिसली होती, तशीच दिसत होती. पाठमोरा कमनीय देह, लांबसडक केस आणि चिंब भिजलेला मी. 


चित्रस्रोत : आंतरजाल