रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
इस मोड से जाते हैं...
रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२
रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे
अगं झालं काय ते तरी सांगशील? मघापासून नुसते हुंदके. चला काही चार शब्द ऐकू आले तर तेही असंबद्ध. काय सखे, काय झालंय? तो काही म्हणाला का तुला?
‘हे बघ! तू त्याची बाजू घेणार असशील तर मी सरळ निघून जाईन. संपवेन स्वत:ला. तुलाही ऐकून घ्यायचं नसेल, माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग जगून काय फायदा?’
सखे, माझ्या एवढ्या बोअरिंग प्रवचनांचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का गं? एकही विचार त्यातून तुला घ्यावासा वाटला नाही का गं? गुण नाही निदान वाण तरी लागायला हवा होता. मारक्या म्हशीसारखी नको बघूस आता. ते जाऊ दे. मी त्याच्या किंवा तुझ्या बाजूचा नाही गं, तुमचाच आहे. तू माझी सखी आहेस. मरणाआधी मरणं आपल्याला जमत नाही, पटतही नाही. पूस पाहू डोळे. काय झालं सांग.
‘तुला माहितीय सगळं. तूच तर साक्षीदार आहेस आमच्या प्रेमाचा. त्यानंही तुझाच सल्ला घेतला होता आणि मीही तुझाच.’
अरे देवा! देशील बर्व्या पुन्हा प्रेमाचे सल्ले देशील?
‘मी तुला ब्लेम करत नाही. समजून घेऊ शकशील असा तूच आहेस, म्हणून सांगते. त्याचं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावर. त्याच्यावर प्रेम करणार्या त्या सुनितेची याला काळजी. जे हवं ते मिळाल्यावर लग्न झालेले सगळे पुरुष मेले असेच वागतात. तू हसू नकोस रे. वंदनाला विचारेन मी.’
सखे, हसू नको तर काय करू? सगळ्या पुरुषांना एकाच मापात मोजणं बरं नव्हे.
‘ते जाऊ दे. मरणाची इच्छा नाही. पण, जगणंच ओझं झालं आहे. त्याचं प्रेम नाही तिच्यावर हे मान्य आहे. पण, माझा काही विचार नको करायला का त्याने? आमच्यातलं नातं बिघडत चाललं आहे, ते कसं सावरावं हेच कळत नाही.’
सखे, रिलॅक्स हो. तुझ्यामाझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करतो. तोपर्यंत तू लताचं ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे’ हे गाणं ऐक. माझ्या आवडत्या मदन मोहनचं गाणं आहे. नक्श लायलपुरी यांना जे सांगायचं आहे, ते थेट हृदयात पोहोचवणारा सूर लताकडे आणि सुरावट मदनमोहनकडे आहे. डोळे मीट आणि ऐक. तोपर्यंत कॉफी बनवतो.
‘ऐकलंय रे. हजारवेळा ऐकलंय. मग आता काय वेगळं समजणार आहे?’
सखे, या अजरामर गीतांची खासियतच ही आहे की, जेवढ्या वेळा ऐकावं तितकी ती नव्याने समजतात. प्रत्येक वेळी अर्थाची एक वेगळीच छटा समोर येते, जिचा आधी कधी अनुभवच नसतो. कदाचित त्या शब्दांचा अर्थ ऐकल्याक्षणी समजतो, पण पटायला तसा अनुभव यावा लागतो. तुला जे दु:ख झालंय ते आधी तुला नव्हतं, म्हणून तू मुद्दाम हे गीत ऐक. या गीतात एकूण पाच वेळा ‘कैसे’ हा शब्द येतो. पण, प्रत्येकवेळी लतादीदीने तो वेगवेगळा गायला आहे. स्वरातलं मला काही कळत नाही. पण, वेदना सुराला चिकटली की तो सूर प्रत्येकवेळी वेगळीच अनुभूती देऊन जातो. आपल्याच लोकांनी उभ्या केलेल्या आपल्यातल्या भिंती पाडणार तरी कशा, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाला हजारो पद्धतींनी सांगता येईल पण, ज्या हृदयाने ते सांगायचं आहे, तेच भंगलेलं असेल तर सांगावं कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाचं ओझं कितीही असतं तर उचललं असतं पण, आयुष्यच ओझं झालं तर ते उचलावं तरी कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ तर अगदीच वेगळं. या प्रत्येक ‘कैसे’तलं वेगळेपण वेदनेची वेगळी अनुभूती देऊन जातं. आपलीच वेदना आपल्याला इतक्या प्रभावीपणे ऐकू येते की, आपणही तिला सहज दाद देऊन जातो. आपल्या वेदनेचं आपण दु:ख करतो. आपली वेदना आपल्याला दु:ख देऊन जाते. पण तीच वेदना लता ऐकवते आणि आपली दाद घेऊन जाते.
सखे, तुला येत असलेला अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक संसारात येत असतो. आपल्याला त्रास देणारी माणसे आपलीच असतात. त्या त्रासापेक्षाही ती आपली असतात याचंच जास्त दु:ख असतं. ती परकी असती, तर एका मिनिटात प्रश्न सुटतो. हे न सुटणारे प्रश्न अर्जुनापासून द्रौपदीपर्यंत सगळ्यांना पडले व पडत आहेत. उत्तरेही कृष्णाने दिलेली तीच आहेत. वेगळी अजिबात नाहीत. तुला एक प्रश्न विचारतो. तुला त्याच्या मनाची मालकी हवी की शरीराची मालकी हवी आहे?
‘दोहोंपैकी एक हा पर्याय ठेवत आहेस का? तो शरीरानं आणि मनानंही माझाच असावा, असं वाटतं. काही चूक आहे का त्यात?’
सखे, दोन्ही हवं असल्यास दोन्हीवरची मालकी पूर्णपणे सोडावी लागेल.
‘हा शुद्ध वेडेपण आहे. असं प्रत्येक स्त्री करू लागली तर पुरुषांना रान मोकळंच मिळेल. त्याची काही जबाबदारी उरणारच नाही. तसंही, ‘सगळं हवं तर सगळं सोड’ हे काय लॉजिक आहे? तुझं नेहमी काही तरी वेगळंच असतं. नाही पटत.’
सखे, प्रत्येकीनं असं करावं असं मी नाही म्हणणार. पण, तू तसं करावंस असा माझा आग्रह आहे. नीट ऐक, मी मालकी सोडायला सांगितली आहे, त्याला नाही.
‘हे काय भलतंच?’
सखे, नवरा मालक नसतो आणि बायको मालकीण नसते. पण, तरीही दोघे एकमेकांवर मालकीहक्क गाजवत असतात. प्रेमाचा हक्क असावा, हक्काचं प्रेम असू नये.
सखे, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट जशी महाभारतात आहे, तशी न सांगता थोडी वेगळी सांगतो. दु:शासन जेव्हा द्रौपदीचं वस्त्र ओढू लागतो तेव्हा एकवस्त्रा असल्याने ती पदर घट्ट धरून ठेवते. कृष्णाचा धावा करू लागते. कृष्ण येत नाही. ती याज्ञसेनी रडू लागते, त्याला हाका मारते, तरीही तो येत नाही. दु:शासनाच्या बळापुढे तिचं काही चालत नाही. ती पदराचा नाद सोडून देते. घातलेल्या निर्या घट्ट पकडते. तिची अब्रू वाचवणारी ती शेवटची गोष्ट असते. उघडे पडू नयेत म्हणून एक हात वक्षांवर असतो व दुसर्या हाताने निर्या घट्ट धरून ठेवलेल्या असतात. तशातही कृष्णाचा धावा सुरूच असतो. कृष्ण काही येत नाही. द्रौपदीला खूप दु:ख होतं. दु:शासनाच्या बलप्रयोगापुढे ती हतबल असते. त्याहीपेक्षा आपण धावा करूनही आपला कृष्ण येत नाही, याचं तिला दु:ख वाटत असतं. शेवटी काय व्हायचं ते होवो, असं म्हणत सावरण्यात गुंतलेले दोन्ही हात वर करून ‘कृष्णा....’, अशी आर्त हाक मारते.
सखे, एकच असलेलं तिचं वस्त्र दु:शासनाच्या हातात असतं, तिच्या अंगभर वस्त्रे असतात आणि कृष्ण हसत उभा असतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी द्रौपदी विचारते, ‘कृष्णा, कुठे होतास?, किती उशीर केलास रे यायला.’ हसत हसत कृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी मी इथेच तर होतो. जसा मी सर्वत्र आहे, तसाच इथेही आहे, हे तुला माहीत होतं. पण, आला नाही तर, आपण सर्वांसमोर नग्न झाले तर, याची तुला भीती होती. त्यावेळी, सगळं जग, तू आणि मी इथे होतो. मग त्या भीतीची जागा ‘माझा असूनही येत नाही’ या दु:खाने घेतली. तेव्हा जग विसरलीस, फक्त तू आणि मी होतो. जेव्हा तू भीती आणि दु:ख दोन्ही सोडलेस, स्वत:लाही विसरलीस, तेव्हा जग नव्हतं, तू नव्हतीस, फक्त मीच मी होतो. मान खाली घालून बसलेले पांडवही मीच होतो, मदांधतेने हसणारे कौरवही मीच होतो, द्रौपदीही मीच होतो, वस्त्र ओढणारा दु:शासनही मीच होतो. एवढेच कशाला ते वस्त्रही मीच होतो. याची तुला माहिती होती, त्याच माहितीचे ज्ञान झाले तेव्हा मी दिसलो.
सखे, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला आपण बंधनात बांधून ठेवू पाहतो. आपल्या पोटच्या पोरावरही इतकं प्रेम करतो, की ते पोर त्या प्रेमानेच घुसमटतं. प्रेम सर्वत्र आहे. आपण त्याला आडाख्यांमध्ये बांधू पाहतो. अमुक एखादी गोष्ट केली तर प्रेम आहे, नाही केलं तर प्रेम नाही, असले आडाखे नाती संपवतात. हजारो पहारे बसवलेस तरी व्यभिचार करणारा माणूस, संधी मिळताच केल्याशिवाय राहणार नाही.
सखे, सुनिताचं दु:ख हे त्याचं आहे म्हणून ते तुझंही आहे. आपण सगळे आधी मित्र होतो, तेव्हाही तुझा नवरा इतरांचे प्रॉब्लेम्स सोडवायचा, मदतीला धावून जायचा. तेव्हा तुला त्यानं मैत्रिणीला केलेली मदत त्रास देत नव्हती. आता काय बदललंय? तेव्हाही तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, आजही तसंच आहे. फरक इतकाच झालाय की, तुम्ही नवराबायको झाले आहात. हक्क म्हणजे प्रेम आणि हक्कभंग म्हणजे प्रेमभंग झालाय.
सखे, प्रेम करायचं नसतं, ते होतं. ते ‘होणं’ फक्त सांभाळायचं असतं. प्रेम होण्यावर भाळणं सोपं, सांभाळणं कठीण. गाठीशी असलेलं सगळं सोडून द्यावं लागतं. प्रसंगी, ते प्रेमही सोडावं लागतं.
सखे, तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांत, अवती भवती आणि सगळीकडे आहे. अगदी, कृष्णासारखं. ते शोधू गेलीस, तर सापडणार नाही, पाहू गेलीस तर दिसणार नाही. त्याला जसं आहे, तसंच राहू दे. असं केलंस तर कुठल्याही भिंती आड येणार नाहीत, मन मारावं लागणार नाही किंवा मन मोडणार नाही आणि आयुष्य ओझं वाटणार नाही!
शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२
लीनते, चारुते, सीते...
सखे, ‘किती यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते लीनते, चारुते, सीते’ हे गीत आणि यातली शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात. अक्षरश: रडतो. आतल्या आत कोसळतो. तूसुद्धा हे गीत मुद्दाम ऐक. वाल्मिकी रामायणाशी पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिलेले हे गीत श्रीरामांची त्यावेळची भावना व्यक्त करतात. हे गीत तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक. त्यानंतर तू धाडलेली हिंदी कवी राजेश्वर वशिष्ठ यांची ‘जानकी के लिए’ ही कविता पुन्हा वाच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन तुझ्या लक्षांत येतील. सर्वांत आधी वाल्मिकी रामायणातील युद्धकांडाचे ११२ ते १२० हे सर्ग वाच. म्हणजे राजेश्वर वशिष्ठ यांची कविता, गदिमांचे काव्य आणि त्यांचा दृष्टिकोनही समजेल. ‘लीनते चारुते सीते’ ऐकताना मला का रडू कोसळते, तेही तुला समजेल. सीतेला पूर्णपणे असलेली श्रीरामाची जाणीव, तुलाही होईल.
सखे, श्रीरामांनी हनुमंताला विभीषणाची अनुज्ञा घेऊन सीतेला आपल्यासह सर्व सक्षेम आहेत व रावणाला मारून युद्ध जिंकल्याचा निरोप द्यायला सांगितलं. युद्ध जिंकूनही लंका रामाची नव्हती. ती विभीषणाची होती. त्याची अनुज्ञा घेऊन सीतेला निरोप द्यायला सांगितला. आपण स्वत: भेटायला गेले नाहीत. हनुमंताकरवी दिलेला निरोपही बारकाईने वाचण्याची आवश्यकता आहे. हनुमंताने सीतेचा निरोप श्रीरामांना दिल्यावरही, श्रीरामांनी विभीषणाला तिला घेऊन यायला सांगितले. सीता आंघोळ न करताच शिबिकेत बसायला निघते तेव्हा, विभीषण म्हणतो, ‘सचैल स्नान करून, उत्तम वस्त्रे, आभूषणे धारण करून यायला श्रीरामांनी सांगितले आहे.’ त्यानंतर सीता डोक्यावरून आंघोळ करते, वस्त्रे, आभूषणे धारण करते. शिबिका सरळ रामाजवळ घेऊन यायला श्रीराम मनाई करतात. तेव्हा सीतेला पडद्याआडून आणावे, अशी सूचना विभीषण करतो, ज्याला राम विरोध करतात. जिच्यामुळे हे भयानक युद्ध झाले तिला युद्धात सहभागी झालेल्या व हयात असलेल्या सर्व सैनिकांनी पाहावे, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून सीतेला पायी चालत यायला सांगितले. याचा सीतेला त्रास झाला किंवा वाईट वाटले, असे चित्रण वाल्मिकी करत नाहीत. श्रीरामांना भेटण्याची तिची ओढच इतकी तीव्र होती की, रघुवंशाच्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व ठसेल म्हणून मुद्दाम केलेल्या या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरणे साहजिक आहे.
सखे, त्यानंतर श्रीरामांनी जे काही सीतेला सांगितले, ते वाल्मिकींपेक्षाही गदिमांनी उत्कटपणे सांगितले आहे. ते ऐकल्यावर सीता काय म्हणाली, हेसुद्धा वाल्मिकी रामायणातील प्रत्येक शब्दावर लक्ष देत वाचण्यासारखे आहे. त्यानंतर लक्ष्मणला चिता पेटवायला सांगून सीता श्रीरामांना परिक्रमा घालते, तेव्हा श्रीराम मान खाली घालून उभे असल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे.
सखे, रामायणात श्रीराम स्वत:ला कधीच देव, भगवान असे म्हणत नाहीत. उलट, ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’, असे म्हणत आपण माणूस असल्याची ग्वाही ते अनेक ठिकाणी देतात. याच्या अगदी उलट महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपण भगवान असल्याची ग्वाही देतात. स्वत:ला ‘वासुदेव’ म्हणण्याचा आग्रह धरतात. सोळा सहस्र नारींना स्वत:चं नाव देण्यासाठी भगवान व्हावं लागतं. आपल्या मनात यत्किंचितही शंका नसताना, प्राणप्रिय असलेल्या स्वत:च्याच एकमेव पत्नीला संपूर्ण समाजासमोर पावित्र्य सिद्ध करायला लावताना, स्वत:ला सावरायला माणूस व्हावं लागतं. समाजव्यवस्था घडवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक भावना दूर सारत कर्तव्यकठोर माणसाचा देवत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीराम. स्वत: भगवंत आहोत हे माहीत असूनही माणूस म्हणून वागत समाज घडवण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण. आदर्श प्रस्थापित करताना देवत्व कठीण असतं, माणुसकी देवत्वापेक्षाही अधिक कठीण व निष्ठुर असते!
सखे, जिच्यासाठी इतके सायास केले, तिला असं वागवताना श्रीराम नावाच्या माणसाला काहीच दु:ख झालं नसेल का गं? सीतेची अग्निपरीक्षा देताना पाहून, श्रीराम आतल्या आत खाक झाले नसतील का गं? ‘हें तुझ्यामुळें गे झालें, तुजसाठी नाहीं केलें’ आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें’ या दोन ओळी उच्चारताना श्रीरामांची वेदना माझ्या डोळ्यातून ओघळते. या सर्व वेदनांचा आणि मर्यादांच्या छळवादाचा कडेलोट, ‘सखि, सरलें तें दोघांमधलें नातें’ या ओळींनी होतो. माझा प्रत्येक अश्रू पापण्यांची साथ सोडत मुक्तपणे कोसळतो. श्रीरामाला मोकळेपणी रडताही आलं नाही.
सखे, एक दुसरा, थोडासा वेगळा विचार करून पाहा. सीतेचं दु:ख पाहताना श्रीरामाच्या दु:खाकडेही पाहा. ‘स्त्री-पुरुष भेदभाव’, ‘स्त्रीवर अन्याय’, ‘पुरुषप्रधान संस्कृती’ वगैरे सिद्ध करताना आपण पुरुष असलेल्या श्रीरामाचं दु:ख पाहणेही आवश्यक आहे. स्त्रीची न्याय्य बाजू मांडताना, पुरुषावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्यक आहे. स्वाभाविक सहानुभूती मिळालेल्या दु:खाकडे पाहताना, त्याच दु:खाची दुसरी बाजू ‘अन्याय करणारीच आहे’, असे ठरवत तर नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे.
सखे, गालांवर ओघळलेली आसवे दु:खाची मर्यादा सांगतात आणि पापण्यांच्या काठावर संयमाने रोखलेले अश्रू दु:खाची व्याप्ती सांगतात. ओघळणेही महत्त्वाचे आणि रोखणेही महत्त्वाचेच. ‘तुला दाही दिशा मोकळ्या आहेत’, ‘सीतेला वनात सोडून ये’ हे राजाराम सांगताना, त्याच्या आत असलेल्या आपल्या रामराजाला काय दु:ख झालं असेल याची जाणीव सीतेला पूर्णपणे होती. म्हणूनच ती प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेली. सीतेला असलेली रामाची हीच जाणीव आपल्याला आहे?
रविवार, २१ ऑगस्ट, २०२२
कार्पे डिअम
‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात? तू पाहिला आहेस का तो? ’
सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर. बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.
‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’
सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.
‘ए! सोप्या मराठीत सांग..’
अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो.
‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’
सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस.
सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.
सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.
‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’
सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही.
सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.
सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.
चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे
मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२
काय उत्तर देऊ तूच सांग...
पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?
सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;
’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!
तुझीच
कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच
(उत्तर लिही बरं का!!)’
सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!
सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो. मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो.
सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात.
सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही. अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं,
‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’
तितक्याच सहजतेने ती म्हणाली,
‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’
’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच.
तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र.
सखे, काय उत्तर देऊ तूच सांग.
शनिवार, ३० जुलै, २०२२
कचपाश मोकळे, मोकळे रेशीम...
‘सांग ना! मी रागावेन म्हणून तू सांगायचा राहिला आहेस का कधी? तुला आवडलेली, न आवडलेली गोष्ट तुझ्या आप्तां
ना तू साखरेच्या पाकात घोळवून सांगतोस. जे सांगतोस ते कडू असलं तरी ऐकायला गोड वाटतं.’
सखे, तसं फार महत्त्वाचं नाही. पण, माझ्यासाठी निश्चितच आहे. तुझे कापलेले केस तू पुन्हा वाढव. का कोण जाणे, मला लांब केसांचं फार अप्रूप आहे. नागिणीसारखी पाठीवर सळसळत नितंबांवर हेलकावे खाणारी वेणी चित्त वेधून घेते. लांब केसांचं हे ऐश्वर्य जिला लाभलं तिच्यासारखी भाग्यवान स्त्री दुसरी नाही. दुपेडी, तिपेडी हे वेणीचे प्रकार आता दर्शनदुर्लभ झाले आहेत. या निसर्गदत्त ऐश्वर्याला ‘विंचरायला वेळ नाही’, ‘आउट ऑफ फॅशन’ या सबबीखाली कात्री लावली जाते. केसाने गळा कापता येईल एवढेतरी लांब केस स्त्रियांनी ठेवले पाहिजेत. पदर गेले, ओढण्या गेल्या त्यामुळे यौवनाच्या धनाचे रक्षण करण्याकरिता ही काळी नागीण पाठीवर असणे आवश्यकच आहे.
सखे, हे लांब केस जेवढे हाल करतात ना, तेवढे हाल कुणीच करीत नाही. तुला खोटं वाटतं? मग सदानंद डबीर यांचे ‘कचपाश मोकळे मोकळे रेशीम’ हे गीत ऐक. संगीत यशवंत देव यांचं आहे आणि स्वर श्रीधर फडके यांचा. मोकळ्या केसांच्या या पाशातून माझी काही आजतागायत सुटका झाली नाही. व्हावी, असंही वाटत नाही. काही काही बंधनच अशी असतात की मोकळी असली तरी त्यापासून मुक्त व्हावं असं वाटतच नाही. तिच्या मोकळ्या केसांचं बंधनही असंच आहे, अडकवून ठेवणारं.
सखे, तशी ती पहिल्यांदाच दिसली, तेव्हा पाठमोरी दिसली. देहाच्या कमनीयतेपेक्षाही नजर स्थिरावली ती तिच्या लांबसडक, मोकळ्या रेशमी केसांवर. कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेऊन यौवनाच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. तिच्या पाठीवर विसावलेल्या त्या काळ्या मेघांनी मला पाऊस न पाडताही भिजवलं. भिजलेलं मन आणि थिजलेला देह या अवस्थेत मी पहिल्या पायरीशी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. ती देवळाचा उंबरठा ओलांडून कधीच आत निघून गेली होती. पाणी भरण्यासाठी ती पुन्हा पायर्या उतरून खाली आली तेव्हा हरवलेला मी तिच्या दृष्टीस पडलो. तिने एकवार मला पाहिले आणि उंबरठ्याकडे पाहिले. माझ्या चेहर्याकडे पाहात तिने विचारले,
‘कुणाला पाहताय?’
मी भानावर आलो. मोगर्याच्या कळीत उतरलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं, भर दुपारी देवळाच्या दारात माझ्यासमोर उभं होतं. तिच्या सोज्वळ सौंदर्यापुढे तिच्या देहाची कमनीयता ही अतिशय क्षुल्लक गोष्ट होती. पाठमोर्या कमनीय देहाला, सुंदर चेहरा असतोच असं नाही आणि सौंदर्य ओसंडून वाहणारा चेहरा, प्रमाणबद्ध देहाचा असतोच असंही नाही. सौंदर्य आणि कमनीयता यांचा मूर्तिमंत आकृतिबंध माझं देहभान हरवून गेला. तिचा प्रश्न माझ्या डोळ्यांनी ऐकला आणि अनिमिष डोळ्यांनी उत्तरही दिले. तिला ते समजेल किंवा न समजेल, असं ओठांना वाटलं, म्हणून ओठातून नकळत शब्द बाहेर पडला,
परमेश्वराला...
सखे, मुखातून सहज निघालेल्या उत्तराचे तुला आश्चर्य वाटले असेल. तिचे मूर्तिमंत सौंदर्य पाहून परमेश्वराची आठवण का व्हावी? तो ज्या ज्या रूपामध्ये समोर आला त्या त्या रूपामध्ये आजवर त्याची पूजाच केली होती. ठळकपणे आलेली शुद्ध चैतन्याची प्रचिती म्हणजे सौंदर्य. मग ते देहाचं असो किंवा विचारांचं. समोरच्याला ओढ लावतंच. निर्जीव, काळ्या पाषाणाच्या ओबडधोबड मूर्तीमधून जसं परमेश्वराचं दर्शन घडतं, तसंच ते सजीव, नितळ उजळ रंग लाभलेल्या कमनीय देहातूनही घडतं. मूर्तीतच गुंतून राहिलं तर भक्त होता येत नाही आणि देहातच गुंतून राहिलं तर प्रियकर होता येत नाही!
सखे, मी तिच्या चेहर्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहात राहिलो. तिने माझ्या चेहर्यासमोर आपला हात फिरवला. मला तिचा हात दिसत होता, जाणवत नव्हता. सगळ्या जाणिवा, संवेदना या पलीकडची स्तब्धता आली होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून, खांदे हलवत मला भानावर आणायचा प्रयत्न केला. तिच्या हाताचा चुटपुटसा झालेला तो कोवळा स्पर्श मला वेड लावून गेला.
सखे, त्यानंतर आमच्या गाठीभेटी होतच राहिल्या. पण, तिचं हे पहिलं दर्शन जे मनावर ठसलं ते ठसलं. ओळख वाढत गेली. वरलिया रंगापेक्षा तिचे अंतरंग खूपच नितळ होते, स्वच्छ होते. आपल्या लाभलेल्या सौंदर्याच्या निसर्गदत्त देणगीचा तिला सार्थ अभिमान होता, पण गर्व नव्हता. म्हणूनच त्या सौंदर्यावर उल्लू होणार्यांचा वापर करून घेणं तिला पटत नव्हतं. ती अशा पागल मजनूंना त्यांची जागा व्यवस्थित दाखवून देत होती, त्यांना आपल्यापासून एका अंतरावर ठेवत होती. तिचं मन तिच्या देहापेक्षाही सुंदर होतं. म्हणूनच तिच्या देहाचं आकर्षण उरलं नाही. तनाने रूपवान आणि मनाने कुरूप असणार्या स्त्रिया जगात कमी का आहेत? मनाचं सौंदर्य चेहर्यावर प्रकट झालं की स्त्री रूपवान होते. ती सुंदर होती, म्हणून सुंदर दिसत होती!
सखे, आम्ही मनाने जवळ आलो होतो. आमच्या दोघांमध्ये लपवण्यासारखं असं काही नव्हतं. एकमेकांच्याबद्दल प्रचंड खात्री होती, विश्वास होता. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नात्यामध्ये एक प्रकारचा निर्भीडपणा येतो, तो आला होता. आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. एकदा पावसात भिजत भिजत फिरत होतो. दोघेही चिंब भिजलो होतो. तिच्या लांबसडक केसांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब कोवळे मोती होऊन टपकत होते. अचानक वीज कोसळली. तिने घाबरून मिठीच मारली. त्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर आम्ही भानावर आलो, सावरलो. लज्जेची वसने ढळली होती, डोळ्यांमध्ये संमती होती. तरीही त्यापुढे पाऊल टाकलं नाही. पायरी समजली की उंबरठा कधी ओलांडायचा आणि कधी नाही हे लक्षात येतं. ती निघून गेली. मी तसाच न बोलता पावसात भिजत राहिलो. तिची पाठमोरी आकृती पाहात राहिलो. ती जशी पहिल्यांदा दिसली होती, तशीच दिसत होती. पाठमोरा कमनीय देह, लांबसडक केस आणि चिंब भिजलेला मी.
चित्रस्रोत : आंतरजाल
रविवार, ३ जुलै, २०२२
जीवन क्या है...
‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’
माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.
‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’
ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक.
‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’
हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...
‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’
तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या.
आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही.
तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते.
‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’
जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.
‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’
हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही.
गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या?
त्या एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो,
‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’
त्यावर शिवानी म्हणते,
‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’
सखे, आयुष्यात आपल्याला हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे.
हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.
‘जीवन क्या है....’
-
सखे, तुझे डोळे खूप सुंदर आहेत. पाणीदार आहेत. तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तुझ्या डोळ्यांवरच माझे डोळे जडले होते. त्या अथांगतेत इतका बुडत गे...
-
सखे, गेले तीन चार महिने आजारपणामुळे झोपून काढले. डॉक्टरी आदेशावरून आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. लहानपणी आम्हांला ‘आजारी पडण्याचे प्रयोग’ ...
-
सखे, माझा मित्र जय जोशी याने विचारले की, ‘मृत्यू, नकारात्मक असेच का लिहिता?’ तेव्हा थोडा विचारात पडलो. आपले लिखाण नकारात्मक तर होत नाही ना, ...





