शनिवार, ८ जुलै, २०२३

पूजेतल्या पानाफुलां

सखे, आज तुझ्या चेहर्‍यावर विलक्षण मिश्किल प्रश्‍नांची नांदी मला दिसत आहे. खूप वेळ श्‍वास कोंडून ठेवून एकदम सोडला, तर चेहर्‍यावर जसे भाव प्रकटतील तसेच काहीसे भाव तुझ्या चेहर्‍यावर आहेत. 

‘काही नाही रे. एक वाक्य वाचलं एका पुस्तकात आणि असं का होतं या विचारात मन गढून गेलं. माझ्यावर बेतलेले प्रसंग आठवले. काहीच सुचेना. वाटलं तुला विचारावं. पण, तुझं ते लांबलचक स्पष्टीकरण, अतर्क्य बोलणं सगळं डोक्याच्या फार वरून जातं. तरीही तुझीच वाट पाहात होते. इतक्यात तू आलास.’

काय विचारायचं काय होतं सखे, आणि कुठलं असं वाक्य वाचलस ज्यामुळे तू एवढी विचारात गर्क झालीस?

‘माणसाच्या चांगल्या गोष्टी पाण्यावर लिहिल्या जातात आणि वाईट गोष्टी लोखंडावर कोरल्या जातात, असं काहीसं ते वाक्य होतं. एखाद्यासाठी आपण खूप गोष्टी कराव्यात, पण एखादीच राहून जावी. त्यानही नेमकी न केलेली गोष्टच लक्षात ठेवावी व केलेल्या सगळ्याचा त्याला विसर पडावा. हे असे मैत्रीत, प्रेमात निदान माझ्याबाबतीत तरी अनेकदा घडून गेले आहे. असं का होतं रे?’

सखे, तू आपण केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींना फार महत्त्व देतेस म्हणून तुला त्याचा त्रास होतो. त्याच्या लक्षात न केलेल्या गोष्टी राहतात आणि तुझ्या लक्षात केलेल्या. आपण मोजदाद करण्यामध्ये केलेल्या गोष्टी घालवून बसतो. इतरांच्या लक्षात राहतं किंवा राहात नाही हा त्यांच्या स्मृतीचा दोष आहे. बरेचदा हे असं स्मरण किंवा विस्मरण सोयीनुसार घडतं. या सगळ्या गोष्टींची मोजणी करणं सोडलस की तुला खर्‍या मैत्रीची, प्रेमाची ओळख पटेल. तुझ्या चेहर्‍यावरून लक्षात येतय की तुला नाही पटली ही गोष्ट. ठीक आहे, माझं नको ऐकूस बा. भ. बोरकरांचं ‘नाही पुण्याची मोजणी’ हे प्रासादिक गीत ऐक. स्थितप्रज्ञता कशी असावी याचं उत्कट प्रत्यंतर ज्या काव्यातून येतं, ते हे काव्य. अभिषेकीबुवांचा धीरगंभीर आवाज. सखे, तुला सांगतो जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा हेे कान शाबूत असावेत आणि ‘नाही पुण्याची मोजणी’ व ‘इतना तो करना स्वामी’ ही दोनच गाणी ऐकायला मिळावीत. आयुष्याचं सार्थक होईल. गंमत म्हणजे दोन्ही गाणी अभिषेकीबुवांनीच गायली आहेत. 

सखे, पाप पुण्य या फार मोठ्या गोष्टी झाल्या. आपण केलेलं चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही आपल्याला त्रास देत राहतात. केलेल्या कृतीचा चांगलेपणा आणि वाईटपणा आपणच ठरवत असतो. हे त्या त्रास होण्यामागचं कारण आहे. कृती चांगली की वाईट हे आपण प्रत्यक्ष कृती, त्यामागचा हेतू आणि झालेल्या परिणामांवरून ठरवतो. चांगल्या कृतीची मालकी आपण आपल्याकडे आणि वाईट कृतीला आपल्याशिवाय सगळे जबाबदार अशी पद्धतशीर विभागणी करून टाकतो. सगळ्या चांगल्या किंवा बरोबर कृतीची मोजणी करीत बसतो. वाईट, चुकीच्या गोष्टी आणि हातून न घडलेल्या श्रेयस्कर गोष्टींची टोचणी मनाला लावून घेतो. इथेच आपली फसगत होते. केलेल्या चांगल्या कामांचं संचित म्हणजे पुण्य आणि हातून घडलेल्या वाईट कर्मांचं संचित म्हणजे पाप. जेवढी पुण्याची मोजणी घातक तेवढी पापाची टोचणीही घातकच.

सखे, प्रिय गोष्टी करण्यासाठी आणि श्रेयस्कर गोष्टींसाठी आपण फार धावाधाव करतो, जिवाचा आटापिटा करतो. माणूस तारुण्याचा उंबरठ्यापर्यंत प्रेयसाच्या मागे धावतो. प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे ते करणं. तारुण्याचा आवेग थोडासा ओसरला की, श्रेयसाच्या मागे लागतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी केल्याने श्रेय मिळतं अशा गोष्टी. या वयात माणूस श्रेय मिळत असेल तर अप्रिय गोष्टही करतो. या दोनच अवस्थांमध्ये आयुष्य संपून जातं. या दोनच गोष्टींमुळे माणसाचा विकासही होतो. तिसरी एक महत्त्वाची अवस्था म्हणजे निश्रेयस. प्रियही नाही आणि श्रेयस्करही नाही, तरीही ते करणे आवश्यक आहे म्हणून जे काही केलं जातं त्याला निश्रेयस असं म्हणतात. ते करण्यामध्ये आपला कसलाच लागभाग नसतो, कशाचा पाठलागही नसतो. ही स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे. हा विचार कायमचाच आचरणात आणला की आयुष्य फुलांच्या परागासारखं होतं.

सखे, एकदा ही स्थिती आली की मग आपल्या नावाचं, रूपाचं, आपल्या कृतीचं सुख दु:ख वाटणं बंद होतं. बाह्य लक्षणाने हीच स्थिती कोडगेपणाचीही असते. त्यातला फरक लक्षात आला की फसगत होत नाही. निसर्ग आपल्याला देताना कधी त्याची मोजणी करीत नाही. तसच, आपल्यापासून हिरावून घेतल्याची टोचणीही त्याला नसते. आपल्या हातून घडणार्‍या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीभावाने पाहायला शिकले पाहिजे. असे सहजतेने घडू लागले की, आपण आकाशस्वरूप होतो. आयुष्य धूपाप्रमाणे सुगंधित होऊन जातं.

सखे, आपल्या बाबतीत जन्म आणि मृत्यू यांचा सोहळा एकांगी असतो. या दोन्ही सोहळ्यात आपला सहभाग हा ते सोहळे आपल्यासाठी आहेत एवढ्यापुरताच असतो. जन्म झाल्यानंतर आपल्याला पाळण्यात ठेवतात, नाव ठेवतात, बारसं साजरं करतात ते सर्व आपल्याला दिसतं, पण समजत नाही. आपल्या मृत्यूनंतर होणारे सोहळे आपल्याला दिसतही नाहीत आणि समजतही नाहीत. जन्माच्या वेळी आपण तो सोहळा समजण्याच्या खूप अलीकडे असतो व मृत्यूच्या वेळी आपण तो सोहळा समजण्यापलीकडे गेलेलो असतो. पूजेसाठी देवावर वाहिलेली पानं फुलं काही देवावर वाहिली म्हणून दुसर्‍या दिवशी ताजी नाही राहात. ती शिळीच होतात. पण सखे, तीच शिळी पानं फुलं आपण  प्रसाद म्हणून स्वीकारतो. देवावर वाहिलेल्या त्या फुलांचा मृत्यू सर्वांगाने परिपूर्ण होतो. स्थितप्रज्ञता ही अवस्थाच अशी आहे की, इथे एकदा माणूस पोहोचल्यावर त्याचा जन्म आणि मृत्यू सर्वांग सोहळा होतो.



बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

आयुष्याची आता झाली उजवण...

सखे, माझा मित्र जय जोशी याने विचारले की, ‘मृत्यू, नकारात्मक असेच का लिहिता?’ तेव्हा थोडा विचारात पडलो. आपले लिखाण नकारात्मक तर होत नाही ना, असा एक प्रश्न स्वत:ला पडला. ‘मृत्यू’ हा अटळ विषय नकारात्मक नाही. आपण त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. त्याला टाळतो. या विषयावर भाऊसाहेब पाटणकर यांनी खूप चांगले विचार मांडले आहेत. मला आवडतात ते बा. भ. बोरकरांचे विचार. मृत्यूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारच सुंदर आहे. विशेषत: ‘मृत्यू यावा’ असं वाटण्याच्या स्थितीकडे पाहण्याचे वेगळेपण. ती सार्थक, तृप्त आणि परिपक्व आयुष्य जगल्याची खूण आहे. 

सखे, त्यासाठी तुला बोरकरांची आयुष्याची आता झाली उजवण, ही कविता ऐकावी लागेल. सलिल कुलकर्णी यांनी ती  ‘संधिप्रकाशात’ या कवितेशी जोडून सादर केली आहे. आयुष्याची झाली उजवण ही मृत्यूपूर्वीची देवाकडे केलेली अपेक्षा आहे, तर संधिप्रकाशात ही सखीकडे मृत्यूनंतर केलेली अपेक्षा आहे. ‘आयुष्य कसं कृतार्थ जगून दाखवलंय’ या संचितावर देवाला भक्तीने आणि सखीला प्रेमाने केलेली प्रार्थना म्हणजे या दोन कविता आहेत. 

सखे, उजवण या शब्दाला दोन अर्थ आहेत. भूमी, वस्त्र, मनुष्य इत्यादींची ऊर्जित अवस्था म्हणजे उजवण हा एक अर्थ. उजवण म्हणजे समाप्ती, अखेर असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ घेतल्यास त्या जागी, तो शब्द अगदी योग्य ठरतो. ऊर्जित किंवा समाप्तीची अवस्था आयुष्याला प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे दु:ख नाही उरत. कारण, बोरकर म्हणतात की, येतो तो तो क्षण अमृताचा. प्रत्येक क्षण अमृताचा असेल, तर मृत्यू कसा संभवेल? मग ती अवस्था कोणती? चैतन्यात विलीन होऊन जाणे, सद्-चित-आनंद होणे ही ती अवस्था.

सखे, आयुष्याची कृतार्थता स्थितप्रज्ञतेत आहे. मागणी किंवा अपेक्षा आणि तक्रारी थांबल्या की आपण स्थितप्रज्ञ होत जातो. वेगळं काही करण्याची आवश्यकता राहत नाही. ‘तो करी तो परमार्थु’ या अवस्थेला आपण येऊन पोहोचतो. ज्याला हात लावू तो दगड, धोंडा इतरांसाठी परीस, चिंतामणी होतो. ज्या पाण्याला स्पर्श करू, ते पाणी गंगोदक होते. कुठलातरी परीस माझ्या आयुष्याचे सोने करेल, कुणीतरी चिंतामणी नावाचा दगड माझ्या चिंता हरण करेल,  या अपेक्षाच शिल्लक राहत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वर्गीच्या नवलाईचे कौतुकही उरत नाही. जे जे स्वर्गात जाऊन मिळवायचे ते ते सर्व इथे या गोव्याच्या भूमीने मला दिले आहे, हा सार्थ अभिमान झळकतो. पृथ्वीवरल्या नश्वर गोष्टींची फिकीर उरत नाही ती नाहीच, त्याही पुढे जाऊन त्या ईश्वराचीही फिकीर, कौतुक उरत नाही.

सखे, आपण जे पाहतो, ते परब्रह्माचेच प्रतिबिंब असते. फक्त जे दिसते ते कायम टिकणारच आहे, असे आपण धरून चालतो. ब्रह्म, चैतन्य कायम आहे, त्याचे झालेले प्रकटीकरण न टिकणारे किंवा बदलत जाणारे आहे, हे सत्य आपल्याला मान्य नसते. आपल्यासह या सर्व स्थिरचराला ‘एक्स्पायरी डेट’ आहे, हे आपण नाकारतो. आपणच चैतन्य आहोत याची जाणीव झाली की, आयुष्य कृतार्थ होते. 

सखे, या ब्रह्मचैतन्यात विलीन व्हायची ओढ लागते. सासरी येताना संपून न संपणारी वाट, सासरहून माहेरी जाताना मात्र लवकर संपते. वाट तीच असते, अंतर तेच असतं. हृदयीचा जिव्हाळा पायीं आला की पावलांनाही स्थळकाळाचे भान राहत नाही. आतबाहेर आनंद भरून राहतो. श्वास कस्तुरीसारखे परिमळतात. बोरकरांंनी इथे दरवळ असा शब्द न वापरता परिमळ असा शब्द वापरला आहे. दरवळ सुरुवातीला खूप उग्र असतो, नंतर हळूहळू कमी कमी होत जात नाहीसा होतो. परिमळ हा कायम तसाच राहतो, तो उग्र नसतो आणि नाहीसाही होत नाही. आतबाहेर आनंदी असलेला माणूस, सकारात्मक ऊर्जेने भारलेला असतो. त्याचा सहवास इतरांनाही आनंदी करतो. अगदी कस्तुरीसारखा.

सखे, ही रडकी, नकारात्मक अवस्था अजिबात नाही. हा सुखाचा उत्सव आहे. तरीही त्याचे अप्रूप नाही. ‘शिव’ होण्यासाठी ‘जीव’ अनावर झालेला आहे. सोनेरी पिंजर्‍यात अडकलेला हा जीव चैतन्यमयी होण्यासाठी आतुर आहे. 

सखे,  बोरकरांची ही कविता म्हणजे मृत्यूपूर्वी कशी अवस्था असावी, याचा वस्तुपाठ आहे. तृप्त आयुष्य जगल्यानंतर चैतन्यमयी होण्याचं मागणं आहे. इथे रडारड नाही. चैतन्यमय होण्याचं साधन म्हणून मृत्यूकडे पाहिलं आहे. मरण येत नाही म्हणून जिवंत असणं नाही. जिवंत असणं असह्य झालं म्हणून मरण हवंय असंही नाही. उलट इतरांना जेव्हा, ‘आता मृत्यूने येऊच नये’, असे वाटेल अशावेळी केलेली मृत्यूची मागणी आहे. तृप्त, कृतार्थ आणि व्रतस्थ आयुष्याचं हे उद्यापन आहे, ही उजवण आहे.


रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

इस मोड से जाते हैं...

सखे, तू हळूहळू माझ्यापासून दुरावत गेलीस. तुझं वय आणि आमच्यातील अंतर वाढत गेलं. तुझं वयात येणं आणि आमचं दुरावणं हातात हात घालून चालत होतं. त्यांची ही संथ गतीच फार भयानक होती. तू पेन ड्राइव्ह हातात न देता, टेबलवर ठेवलास, त्यातून तू हे दुरावणं दाखवून दिलंस. तुझ्यापाशी येणार्‍या माझ्या सगळ्या वाटा तू बंद केल्याचा तो संकेत होता. तुझ्यापाशी घेऊन जाणारी एकही वाट माझ्याकडे नव्हती. 

सखे, आपली वेदना गीतातून ऐकावी, छान वाटते. एरव्ही वेदना ठसठसते, त्या वेदनेचं गीत झालं की, वेदना झंकारते. माझ्याप्रमाणे तूही गुलजार यांचं आंधी चित्रपटातलं ‘इस मोड से जाते हैं’, हे गीत ऐक. त्यातील ‘इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’, ही ओळ लक्षपूर्वक ऐक. सगळी वेदना या एका ओळीत सामावली आहे. सगळ्या वाटा बंद झाल्यानंतरचा मार्ग, गुलजार यातून दाखवतात. सन्मार्गावर चालणार्‍यांच्या पावलांची चाळण होते, तर हेतूवरच शंका घेतल्याने हृदयाची चाळण होते. माझ्या एका सन्मित्राचा हा शेर तुलाही आवडेल;

रक्ताळलेली, फाटलेली होती पावले त्याची
आजन्म बहुधा सन्मार्गावरून चालला असावा

सखे, सन्मार्ग आणि प्रेमाचा मार्ग कधीच निष्कंटक, साधा, सरळ नसतो. तसा आपल्या आयुष्याचा रस्ता, जगण्याच्या पाऊलवाटाही सरळ वळणाच्या नसतातच. काही पायवाटांना रस्तेच सापडत नाहीत. त्या अंतहीन प्रवास करत राहतात. खास करून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार्‍या पाऊलवाटा. तुझ्या देहाशी नव्हे तर तुझ्या हृदयाशी पोहोचायचं होतं, खूप दूरवर जाणार्‍या पाऊलवाटेचा हा न संपणारा प्रवास माझ्याबरोबरच संपेल कदाचित.

सखे, माझ्यासारखीच तूसुद्धा मनस्वी आहेस. दूर गेलेली आपुलकी हे मनस्वी माणसाचं सर्वांत मोठं दु:ख असतं. एकाच घरात राहत असल्याने जवळ जाण्याच्या वाटा, रस्ते असा प्रश्नच नसतो. त्यामुळेच, आपण जवळ असूनही खूप दूर असतो. ओळखीचे असूनही अनोळखी असतो. 

सखे, ओळख व्हायच्या आधी संवाद साधण्याचे अनेक मार्ग असतात. ओळख झाल्यानंतर या वाटाच हरवतात. वाटांची आवश्यकताच नसलेल्या गावी येऊन आपण पोहोचतो. खूप जवळ असलेल्या व्यक्तीकडे घेऊन जाणारी एखादी वाट शोधत राहतो.

सखे, दूर गेलेल्या आपल्याच जवळच्या माणसापाशी घेऊन जाणार्‍या तयार वाटा नसतातच. त्या तयार कराव्या लागतात. कधी अहंकाराची झुडपं कापून, तर कधी आपल्यालाच तुडवून ही वाट तयार करावी लागते. 

सखे, इतकं करूनही आपलं माणूस गवसेल, हे नक्की नाही सांगता येत. पण, प्रयत्न तर करावेच लागतात. कधी कधी जेथे पोहोचायचे आहे, त्यापेक्षाही तेथे जाण्याचा प्रवासच खूप काही देऊन जातो. मग, आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर स्थिरावलेली माणसं इतरांना सांगतात, 

‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे...’

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे

‘तो आता माझा नाही उरला...’

अगं झालं काय ते तरी सांगशील? मघापासून नुसते हुंदके. चला काही चार शब्द ऐकू आले तर तेही असंबद्ध. काय सखे, काय झालंय? तो काही म्हणाला का तुला?

‘हे बघ! तू त्याची बाजू घेणार असशील तर मी सरळ निघून जाईन. संपवेन स्वत:ला. तुलाही ऐकून घ्यायचं नसेल, माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग जगून काय फायदा?’ 

सखे, माझ्या एवढ्या बोअरिंग प्रवचनांचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का गं? एकही विचार त्यातून तुला घ्यावासा वाटला नाही का गं? गुण नाही निदान वाण तरी लागायला हवा होता. मारक्या म्हशीसारखी नको बघूस आता. ते जाऊ दे. मी त्याच्या किंवा तुझ्या बाजूचा नाही गं, तुमचाच आहे. तू माझी सखी आहेस. मरणाआधी मरणं आपल्याला जमत नाही, पटतही नाही. पूस पाहू डोळे. काय झालं सांग.

‘तुला माहितीय सगळं. तूच तर साक्षीदार आहेस आमच्या प्रेमाचा. त्यानंही तुझाच सल्ला घेतला होता आणि मीही तुझाच.’

अरे देवा! देशील बर्व्या पुन्हा प्रेमाचे सल्ले देशील? 

‘मी तुला ब्लेम करत नाही. समजून घेऊ शकशील असा तूच आहेस, म्हणून सांगते. त्याचं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावर. त्याच्यावर प्रेम करणार्‍या त्या सुनितेची याला काळजी. जे हवं ते मिळाल्यावर लग्न झालेले सगळे पुरुष मेले असेच वागतात. तू हसू नकोस रे. वंदनाला विचारेन मी.’ 

सखे, हसू नको तर काय करू? सगळ्या पुरुषांना एकाच मापात मोजणं बरं नव्हे. 

‘ते जाऊ दे. मरणाची इच्छा नाही. पण, जगणंच ओझं झालं आहे. त्याचं प्रेम नाही तिच्यावर हे मान्य आहे. पण, माझा काही विचार नको करायला का त्याने? आमच्यातलं नातं बिघडत चाललं आहे, ते कसं सावरावं हेच कळत नाही.’

सखे, रिलॅक्स हो. तुझ्यामाझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करतो. तोपर्यंत तू लताचं ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे’ हे गाणं ऐक. माझ्या आवडत्या मदन मोहनचं गाणं आहे. नक्श लायलपुरी यांना जे सांगायचं आहे, ते थेट हृदयात पोहोचवणारा सूर लताकडे आणि सुरावट मदनमोहनकडे आहे. डोळे मीट आणि ऐक. तोपर्यंत कॉफी बनवतो.

‘ऐकलंय रे. हजारवेळा ऐकलंय. मग आता काय वेगळं समजणार आहे?’

सखे, या अजरामर गीतांची खासियतच ही आहे की, जेवढ्या वेळा ऐकावं तितकी ती नव्याने समजतात. प्रत्येक वेळी अर्थाची एक वेगळीच छटा समोर येते, जिचा आधी कधी अनुभवच नसतो. कदाचित त्या शब्दांचा अर्थ ऐकल्याक्षणी समजतो, पण पटायला तसा अनुभव यावा लागतो. तुला जे दु:ख झालंय ते आधी तुला नव्हतं, म्हणून तू मुद्दाम हे गीत ऐक. या गीतात एकूण पाच वेळा ‘कैसे’ हा शब्द येतो. पण, प्रत्येकवेळी लतादीदीने तो वेगवेगळा गायला आहे. स्वरातलं मला काही कळत नाही. पण, वेदना सुराला चिकटली की तो सूर प्रत्येकवेळी वेगळीच अनुभूती देऊन जातो. आपल्याच लोकांनी उभ्या केलेल्या आपल्यातल्या भिंती पाडणार तरी कशा, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाला हजारो पद्धतींनी सांगता येईल पण, ज्या हृदयाने ते सांगायचं आहे, तेच भंगलेलं असेल तर सांगावं कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाचं ओझं कितीही असतं तर उचललं असतं पण, आयुष्यच ओझं झालं तर ते उचलावं तरी कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ तर अगदीच वेगळं. या प्रत्येक ‘कैसे’तलं वेगळेपण वेदनेची वेगळी अनुभूती देऊन जातं. आपलीच वेदना आपल्याला इतक्या प्रभावीपणे ऐकू येते की, आपणही तिला सहज दाद देऊन जातो. आपल्या वेदनेचं आपण दु:ख करतो. आपली वेदना आपल्याला दु:ख देऊन जाते. पण तीच वेदना लता ऐकवते आणि आपली दाद घेऊन जाते. 

सखे, तुला येत असलेला अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक संसारात येत असतो. आपल्याला त्रास देणारी माणसे आपलीच असतात. त्या त्रासापेक्षाही ती आपली असतात याचंच जास्त दु:ख असतं. ती परकी असती, तर एका मिनिटात प्रश्न सुटतो. हे न सुटणारे प्रश्न अर्जुनापासून द्रौपदीपर्यंत सगळ्यांना पडले व पडत आहेत. उत्तरेही कृष्णाने दिलेली तीच आहेत. वेगळी अजिबात नाहीत. तुला एक प्रश्न विचारतो. तुला त्याच्या मनाची मालकी हवी की शरीराची मालकी हवी आहे?

‘दोहोंपैकी एक हा पर्याय ठेवत आहेस का? तो शरीरानं आणि मनानंही माझाच असावा, असं वाटतं. काही चूक आहे का त्यात?’

सखे, दोन्ही हवं असल्यास दोन्हीवरची मालकी पूर्णपणे सोडावी लागेल. 

‘हा शुद्ध वेडेपण आहे. असं प्रत्येक स्त्री करू लागली तर पुरुषांना रान मोकळंच मिळेल. त्याची काही जबाबदारी उरणारच नाही. तसंही, ‘सगळं हवं तर सगळं सोड’ हे काय लॉजिक आहे? तुझं नेहमी काही तरी वेगळंच असतं. नाही पटत.’

सखे, प्रत्येकीनं असं करावं असं मी नाही म्हणणार. पण, तू तसं करावंस असा माझा आग्रह आहे.  नीट ऐक, मी मालकी सोडायला सांगितली आहे, त्याला नाही. 

‘हे काय भलतंच?’

सखे, नवरा मालक नसतो आणि बायको मालकीण नसते. पण, तरीही दोघे एकमेकांवर मालकीहक्क गाजवत असतात. प्रेमाचा हक्क असावा, हक्काचं प्रेम असू नये. 

सखे, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट जशी महाभारतात आहे, तशी न सांगता थोडी वेगळी सांगतो. दु:शासन जेव्हा द्रौपदीचं वस्त्र ओढू लागतो तेव्हा एकवस्त्रा असल्याने ती पदर घट्ट धरून ठेवते. कृष्णाचा धावा करू लागते. कृष्ण येत नाही. ती याज्ञसेनी रडू लागते, त्याला हाका मारते, तरीही तो येत नाही. दु:शासनाच्या बळापुढे तिचं काही चालत नाही. ती पदराचा नाद सोडून देते. घातलेल्या निर्‍या घट्ट पकडते. तिची अब्रू वाचवणारी ती शेवटची गोष्ट असते. उघडे पडू नयेत म्हणून एक हात वक्षांवर असतो व दुसर्‍या हाताने निर्‍या घट्ट धरून ठेवलेल्या असतात. तशातही कृष्णाचा धावा सुरूच असतो. कृष्ण काही येत नाही. द्रौपदीला खूप दु:ख होतं. दु:शासनाच्या बलप्रयोगापुढे ती हतबल असते. त्याहीपेक्षा आपण धावा करूनही आपला कृष्ण येत नाही, याचं  तिला दु:ख वाटत असतं. शेवटी काय व्हायचं ते होवो, असं म्हणत सावरण्यात गुंतलेले दोन्ही हात वर करून ‘कृष्णा....’, अशी आर्त हाक मारते. 

सखे, एकच असलेलं तिचं वस्त्र दु:शासनाच्या हातात असतं, तिच्या अंगभर वस्त्रे असतात आणि कृष्ण हसत उभा असतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी द्रौपदी विचारते, ‘कृष्णा, कुठे होतास?, किती उशीर केलास रे यायला.’ हसत हसत कृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी मी इथेच तर होतो. जसा मी सर्वत्र आहे, तसाच इथेही आहे, हे तुला माहीत होतं. पण, आला नाही तर, आपण सर्वांसमोर नग्न झाले तर, याची तुला भीती होती. त्यावेळी, सगळं जग, तू आणि मी इथे होतो. मग त्या भीतीची जागा ‘माझा असूनही येत नाही’ या दु:खाने घेतली. तेव्हा जग विसरलीस, फक्त तू आणि मी होतो. जेव्हा तू भीती आणि दु:ख दोन्ही सोडलेस, स्वत:लाही विसरलीस, तेव्हा जग नव्हतं, तू नव्हतीस, फक्त मीच मी होतो. मान खाली घालून बसलेले पांडवही मीच होतो, मदांधतेने हसणारे कौरवही मीच होतो, द्रौपदीही मीच होतो, वस्त्र ओढणारा दु:शासनही मीच होतो. एवढेच कशाला ते वस्त्रही मीच होतो. याची तुला माहिती होती, त्याच माहितीचे ज्ञान झाले तेव्हा मी दिसलो. 

सखे, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला आपण बंधनात बांधून ठेवू पाहतो. आपल्या पोटच्या पोरावरही इतकं प्रेम करतो, की ते पोर त्या प्रेमानेच घुसमटतं. प्रेम सर्वत्र आहे. आपण त्याला आडाख्यांमध्ये बांधू पाहतो. अमुक एखादी गोष्ट केली तर प्रेम आहे, नाही केलं तर प्रेम नाही, असले आडाखे नाती संपवतात. हजारो पहारे बसवलेस तरी व्यभिचार करणारा माणूस, संधी मिळताच केल्याशिवाय राहणार नाही. 

सखे, सुनिताचं दु:ख हे त्याचं आहे म्हणून ते तुझंही आहे. आपण सगळे आधी मित्र होतो, तेव्हाही तुझा नवरा इतरांचे प्रॉब्लेम्स सोडवायचा, मदतीला धावून जायचा. तेव्हा तुला त्यानं मैत्रिणीला केलेली मदत त्रास देत नव्हती. आता काय बदललंय? तेव्हाही तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, आजही तसंच आहे. फरक इतकाच झालाय की, तुम्ही नवराबायको झाले आहात. हक्क म्हणजे प्रेम आणि हक्कभंग म्हणजे प्रेमभंग झालाय. 

सखे, प्रेम करायचं नसतं, ते होतं. ते ‘होणं’ फक्त सांभाळायचं असतं. प्रेम होण्यावर भाळणं सोपं, सांभाळणं कठीण. गाठीशी असलेलं सगळं सोडून द्यावं लागतं. प्रसंगी, ते प्रेमही सोडावं लागतं. 

सखे, तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांत, अवती भवती आणि सगळीकडे आहे. अगदी, कृष्णासारखं. ते शोधू गेलीस, तर सापडणार नाही, पाहू गेलीस तर दिसणार नाही. त्याला जसं आहे, तसंच राहू दे. असं केलंस तर कुठल्याही भिंती आड येणार नाहीत, मन मारावं लागणार नाही किंवा  मन मोडणार नाही आणि आयुष्य ओझं वाटणार नाही! 


शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

लीनते, चारुते, सीते...

सखे, ‘किती यत्नें मी पुन्हा पाहिली तूंते लीनते, चारुते, सीते’ हे गीत आणि यातली शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात. अक्षरश: रडतो. आतल्या आत कोसळतो. तूसुद्धा हे गीत मुद्दाम ऐक. वाल्मिकी रामायणाशी पूर्णपणे प्रामाणिक राहून लिहिलेले हे गीत श्रीरामांची त्यावेळची भावना व्यक्त करतात. हे गीत तू पूर्णपणे लक्ष देऊन ऐक. त्यानंतर तू धाडलेली हिंदी कवी राजेश्वर वशिष्ठ यांची ‘जानकी के लिए’ ही कविता पुन्हा वाच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन तुझ्या लक्षांत येतील. सर्वांत आधी वाल्मिकी रामायणातील युद्धकांडाचे ११२ ते १२० हे सर्ग वाच. म्हणजे राजेश्वर वशिष्ठ यांची कविता, गदिमांचे काव्य आणि त्यांचा दृष्टिकोनही समजेल. ‘लीनते चारुते सीते’ ऐकताना मला का रडू कोसळते, तेही तुला समजेल. सीतेला पूर्णपणे असलेली श्रीरामाची जाणीव,  तुलाही होईल.

सखे, श्रीरामांनी हनुमंताला विभीषणाची अनुज्ञा घेऊन सीतेला आपल्यासह सर्व सक्षेम आहेत व रावणाला मारून युद्ध जिंकल्याचा निरोप द्यायला सांगितलं. युद्ध जिंकूनही लंका रामाची नव्हती. ती विभीषणाची होती. त्याची अनुज्ञा घेऊन सीतेला निरोप द्यायला सांगितला. आपण स्वत: भेटायला गेले नाहीत. हनुमंताकरवी दिलेला निरोपही बारकाईने वाचण्याची आवश्यकता आहे. हनुमंताने सीतेचा निरोप श्रीरामांना दिल्यावरही, श्रीरामांनी विभीषणाला तिला घेऊन यायला सांगितले. सीता आंघोळ न करताच शिबिकेत बसायला निघते तेव्हा, विभीषण म्हणतो, ‘सचैल स्नान करून, उत्तम वस्त्रे, आभूषणे धारण करून यायला श्रीरामांनी सांगितले आहे.’ त्यानंतर सीता डोक्यावरून आंघोळ करते, वस्त्रे, आभूषणे धारण करते. शिबिका सरळ रामाजवळ घेऊन यायला श्रीराम मनाई करतात. तेव्हा सीतेला पडद्याआडून आणावे, अशी सूचना विभीषण करतो, ज्याला राम विरोध करतात. जिच्यामुळे हे भयानक युद्ध झाले तिला युद्धात सहभागी झालेल्या व हयात असलेल्या सर्व सैनिकांनी पाहावे, अशी त्यांची इच्छा होती, म्हणून सीतेला पायी चालत यायला सांगितले. याचा सीतेला त्रास झाला किंवा वाईट वाटले, असे चित्रण वाल्मिकी करत नाहीत. श्रीरामांना भेटण्याची तिची ओढच इतकी तीव्र होती की, रघुवंशाच्या स्त्रीला तिचे स्त्रीत्व ठसेल म्हणून मुद्दाम केलेल्या या गोष्टी तिच्यासाठी गौण ठरणे साहजिक आहे. 

सखे, त्यानंतर श्रीरामांनी जे काही सीतेला सांगितले, ते वाल्मिकींपेक्षाही गदिमांनी उत्कटपणे सांगितले आहे. ते ऐकल्यावर सीता काय म्हणाली, हेसुद्धा वाल्मिकी रामायणातील प्रत्येक शब्दावर लक्ष देत वाचण्यासारखे आहे. त्यानंतर लक्ष्मणला चिता पेटवायला सांगून सीता श्रीरामांना परिक्रमा घालते, तेव्हा श्रीराम मान खाली घालून उभे असल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे. 

सखे, रामायणात श्रीराम स्वत:ला कधीच देव, भगवान असे म्हणत नाहीत. उलट, ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’, असे म्हणत आपण माणूस असल्याची ग्वाही ते अनेक ठिकाणी देतात. याच्या अगदी उलट महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपण भगवान असल्याची ग्वाही देतात. स्वत:ला ‘वासुदेव’ म्हणण्याचा आग्रह धरतात. सोळा सहस्र नारींना स्वत:चं नाव देण्यासाठी भगवान व्हावं लागतं. आपल्या मनात यत्किंचितही शंका नसताना, प्राणप्रिय असलेल्या स्वत:च्याच एकमेव पत्नीला संपूर्ण समाजासमोर पावित्र्य सिद्ध करायला लावताना, स्वत:ला सावरायला माणूस व्हावं लागतं. समाजव्यवस्था घडवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक भावना दूर सारत कर्तव्यकठोर माणसाचा देवत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीराम. स्वत: भगवंत आहोत हे माहीत असूनही माणूस म्हणून वागत समाज घडवण्याचा प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण. आदर्श प्रस्थापित करताना देवत्व कठीण असतं, माणुसकी देवत्वापेक्षाही अधिक कठीण व निष्ठुर असते!

सखे, जिच्यासाठी इतके सायास केले, तिला असं वागवताना श्रीराम नावाच्या माणसाला काहीच दु:ख झालं नसेल का गं? सीतेची अग्निपरीक्षा देताना पाहून, श्रीराम आतल्या आत खाक झाले नसतील का गं? ‘हें तुझ्यामुळें गे झालें, तुजसाठी नाहीं केलें’ आणि ‘मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें’ या दोन ओळी उच्चारताना श्रीरामांची वेदना माझ्या डोळ्यातून ओघळते. या सर्व वेदनांचा आणि मर्यादांच्या छळवादाचा कडेलोट, ‘सखि, सरलें तें दोघांमधलें नातें’ या ओळींनी होतो. माझा प्रत्येक अश्रू पापण्यांची साथ सोडत मुक्तपणे कोसळतो. श्रीरामाला मोकळेपणी रडताही आलं नाही. 

सखे, एक दुसरा, थोडासा वेगळा विचार करून पाहा. सीतेचं दु:ख पाहताना श्रीरामाच्या दु:खाकडेही पाहा. ‘स्त्री-पुरुष भेदभाव’, ‘स्त्रीवर अन्याय’, ‘पुरुषप्रधान संस्कृती’ वगैरे सिद्ध करताना आपण पुरुष असलेल्या श्रीरामाचं दु:ख पाहणेही आवश्यक आहे. स्त्रीची न्याय्य बाजू मांडताना, पुरुषावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्यक आहे. स्वाभाविक सहानुभूती मिळालेल्या दु:खाकडे पाहताना, त्याच दु:खाची दुसरी बाजू ‘अन्याय करणारीच आहे’, असे ठरवत तर नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे. 

सखे, गालांवर ओघळलेली आसवे दु:खाची मर्यादा सांगतात आणि पापण्यांच्या काठावर संयमाने रोखलेले अश्रू दु:खाची व्याप्ती सांगतात. ओघळणेही महत्त्वाचे आणि रोखणेही महत्त्वाचेच. ‘तुला दाही दिशा मोकळ्या आहेत’, ‘सीतेला वनात सोडून ये’ हे राजाराम सांगताना, त्याच्या आत असलेल्या आपल्या रामराजाला काय दु:ख झालं असेल याची जाणीव सीतेला पूर्णपणे होती. म्हणूनच ती प्रत्येक प्रसंगाला सामोरी गेली. सीतेला असलेली रामाची हीच जाणीव आपल्याला आहे?


रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कार्पे डिअम

‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे.

‘शरीराशिवाय एखाद्या व्यक्तीला भेटणं प्रत्यक्षात शक्य आहे का रे? अरे मी आज एक चित्रपट पाहिला, ‘जस्ट लाइक हेवन’. खरंच असं घडू शकतं का रे आयुष्यात?  तू पाहिला आहेस का तो? ’

सखे, शांत हो, धाप लागली आहे बघ तुला. येता येता किती प्रश्न विचारशील? ‘कधी एकदा विचारेन’ अशी अवस्था होते तुझी हे माहीत आहे. पण, थोडा धीर धर.  बैस तरी आधी. आणि हो, पाहिलाय तो चित्रपट मी.

‘कोमामध्ये असलेली नायिका त्याला प्रत्यक्षात भेटते, इतरांना दिसत नाही, फक्त त्याला दिसते. ती भूत नसते, पण तरीही त्याला भेटते, बोलते आणि तो तिला कोमातून बाहेर आणतो वगैरे. हे सगळं खरंच असं घडतं? जे दिसतं त्या पलीकडेही काही असणं शक्य आहे का? सरळ, सोपं सांग. तुझं ते पुनर्जन्म, ब्रह्म सत्य वगैरे तत्त्वज्ञान नको सांगूस. डोक्यावरून जातं..’

सखे, आपलंच दर्शन, तत्त्वज्ञान, ओव्या आणि चक्क शिव्याही इंग्रजीतून ऐकल्या की, लाखमोलाच्या वाटतात. जाऊ दे. जमेल तेवढं सोपं सांगायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या कुठल्याच क्षणाशी स्वत:ला जोडत नाही. वास्तविक योग म्हणजे तेच आहे, ‘जोडले जाणे’.

‘ए! सोप्या मराठीत सांग..’ 

अरे देवा! आपण आयुष्यातील कुठल्याच गोष्टीशी कनेक्ट होत नाही. आयुष्य जगत नाही, ते फक्त ढकलत राहतो. 

‘असं कसं म्हणतोस? प्रत्येकाला आपली कुठली ना कुठली गोष्ट आवडत असतेच. ती गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. मग, कनेक्ट असल्याशिवाय हे कसं शक्य आहे? आज आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड आहोत. वी लिव्ह ऑल द टाइम, एव्हरी सेकंड.’

सखे, थोडासा फरक आहे. आपण क्षणापुरते जगतो, प्रत्येक क्षण जगत नाही. आपलं कनेक्टेड असणं तेवढ्यापुरतं प्रामाणिक असतं. त्यानंतर आपल्या आत त्याची साधी जाणीवही नसते. आता तुझंच पाहा, तू कायम सोशल मीडिया, मोबाइल यावर अ‍ॅक्टिव्ह असतेस. पण, त्यातील किती माणसांना तू प्रत्यक्ष भेटली आहेस? त्यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारल्या आहेस? अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच माणसांना तू प्रत्यक्षात ओळखतेस. 

सखे, आभासी जगणं आणि प्रत्यक्षात जगणं यात फरक आहे. माझा दादा, त्याने फुलवलेल्या प्रत्येक झाडाला स्पर्श करतो. त्या फुलांशी बोलतो. त्याला व्यवहारातलं काही कळत नाही, पण हे फुलांचं जग समजतं. डॉक्टरी भाषेत त्याला ‘बॉर्डरलाइन आयक्यू असलेला’ म्हणतात आणि सामान्य भाषेत वेडा. त्याच्या डोक्याला जन्मत: चिमटा लागला नसता, तर तो कदाचित फुलं, झाडं यात एखादा तज्ज्ञ, शास्त्रज्ञ झाला असता. तो फक्त त्यांच्याशी कनेक्टेड आहे आणि इतर सगळ्या गोष्टींशी डिसकनेक्टेड आहे, म्हणून तो सब-नॉर्मल गणला जातो. आपण कुठल्याच गोष्टीशी कनेक्टेड नसतो, म्हणून आपण स्वत:ला नॉर्मल, सोशल वगैरे समजतो.

सखे, पाहुणे घरी आले की, तू खोलीत पळतेस. आईवडिलांसाठी आलेल्या फोनवर त्या व्यक्तीशी बोलून, विचारपूस करून तो त्यांना देण्याऐवजी तसाच देतेस. त्यांच्याशी बोलणेही टाळतेस. असं नाही की, तू बोलत नाहीस किंवा तुला बोलायला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणीशी तासन्तास बोलतेस. चॅट करतेस.

‘ती फार बोअर करतात रे. मला नाही आवडत त्यांच्याशी कनेक्ट व्हायला.’

सखे, तरीही कनेक्ट हो. नको असलेल्या नातलगांशीही दोन मिनिटे बोलल्याने काही फरक पडत नाही. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीचीच असते असं नाही. पण, तरीही ती जीव लावून करावी. साधं टेबल आवरणं असो की, आपले कपडे हँगरला लावणं असो, त्यावर जीव जडवावा. सजीव नसलेलीही वस्तू आपल्याशी संवाद साधते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्यक्षात कनेक्टेड राहा. आजकाल जेव्हा कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा पलीकडच्या टेबलवर बसलेलं चौकोनी कुटुंब पाहून चकित होतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो, प्रत्येक जण त्यात गुंग असतो. आपल्याच समोर किंवा बाजूला बसलेल्या कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र पाहत नाही, बोलत नाही. एकत्र जेवावं, बोलावं, सुख दु:ख शेअर करावं असंही कुणाला वाटत नाही. आपण आपल्या माणसांना भेटत नाही, इतकंच कशाला आपण आपल्यालाही भेटत नाही. 

सखे, विरह, दुरावा जाणवण्यासाठी गुंतावंच लागतं. मीलन म्हणजे काय, हे समजण्यासाठी विरह सहन करावाच लागतो. तुला हवी ती माणसं भेटण्यासाठी त्यांच्यासोबत, त्यांच्याशिवाय त्यांचं व्हावं लागतं. आपल्याला हवं असतं, योग्य असतं ते सगळं आपल्याला मिळतं. फक्त आपण त्यात त्या आर्ततेने गुंतावं लागतं, जगावं लागतं. कनेक्ट होणं, गुंतणं म्हटलं की आपण त्याला शारीरिक पातळीवर घेतो. नवराबायको एकमेकांसोबत राहतात, जगत नाहीत. प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगणार्‍या जोडप्यांच्या मनात एकाच वेळी तोच विचार सहजपणे येतो. न सांगताही एकमेकांना समजतं. यालाच आपल्याकडे ‘सखा सप्तपदी भव’ असं म्हटलं आहे.

सखे, ‘जस्ट लाइक हेवन’ या चित्रपटात ती त्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तो तिला, म्हणूनच ती कोमात जाऊनही एकमेकांना भेटतात. हा चित्रपट ज्या फ्रेंच कादंबरीवर बेतला आहे, त्या ‘इफ ओन्ली इट वर ट्रू (इंग्रजी भाषांतर) त्यात एक संकल्पना आहे, ती फार महत्त्वाची आहे. लॅटिन भाषेत त्याला ‘कार्पे डिअम’ असं म्हणतात. ‘कार्पे डिअम’ म्हणजे आता जो क्षण आहे तो प्रिय व्यक्तीसोबत सर्वार्थाने घालवणे, भविष्याचा विचार न करणे. वेगळ्या भाषेत सांगायचं तर आलेला प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, या आर्ततेने आपलासा करणं म्हणजे जगणं. जगणं म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं. असं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, जे माहीत आहे, त्यापेक्षाही खूप काही शक्य आहे. 



चित्र : श्रिया प्रसन्न बर्वे


मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

काय उत्तर देऊ तूच सांग...

पूजाने लिफाफा आणून दिला आणि तंद्री भंगली. लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं, वर्तमानपत्राचा पत्ता होता. त्या अक्षरात माझं नाव आणि पत्ता वाचताना माझे डोळे भरून आले. ते अक्षर माझ्या सवयीचं होतं. व्हॉट्सअ‍ॅप व एफबीच्या जमान्यात स्वहस्ते मला पत्र लिहील आणि तेही ती? का? आयुष्यातून सहज वजा करताना जिला जराही काही वाटलं नाही, तिला पत्र लिहावसं का वाटावं?

सखे, बराचवेळ मी तो लिफाफा हाती घेऊन तसाच बसून होतो. वॉशरूममध्ये जाऊन गरम पाणी चेहर्‍यावर मारले. कॉफीचा कप भरला. एक दोन घोट प्यायल्यावर बरं वाटलं. लिफाफा फोडला. क्लासमेट वहीच्या फाडलेल्या कागदावर पहिलाच शब्द होता, ’सख्या‘. पत्रातलं अक्षर तिचं नव्हतं. कदाचित कुणाकडून लिहून घेतलं असावं किंवा स्वत:च डाव्या हाताने लिहिलं असावं. पुढं लिहिलं होतं;

’ओळखलंस मला? तू मला ओळखणार नाहीस, असं होऊच नाही शकत. खरं तर कधी कधी वाटतं की, मला तू माझ्यापेक्षाही जास्त ओळखतोस!! बरं ते सोड. तू कसायस? आणि तुझं काम कसं चाललंय? हल्ली काहीही वाचायला लागले की, तुझी आठवण होते. तू बोलता बोलता पुस्तकातल्या चार ओळी सणसणीत ठेवून देतोस, ते आठवतं. गेल्या काही दिवसांत स्वत:साठी असं काही लिहिलंच नव्हतं. तर आता म्हटलं तुझ्यापासूनच सुरुवात करूयात. आपण नेहमी पैलतीरावर राहतो आणि आजूबाजूला असलेल्या गोष्टी निरखत राहतो. आपल्याला वाटतं की, जे पलीकडे आहे, ‘तेवढंसं’ आकर्षक नाही. आणि त्याची किंमत आपल्याला किनार्‍यापेक्षा कमीच. पलीकडच्या लोकांनासुद्धा आपल्याविषयी तसंच वाटत असतं बहुधा!! पण हे ऐलतीर आणि पैलतीर एकमेकांचेच रिजेक्टेड सोल्स (नाकारलेले आत्मे) असतात. त्यांना जसंच्या तसं स्वीकारलं नाही की, जगणं कठीण होऊन बसतं!! असो. जास्त लिहायची सवय नाहीये. तुला सगळं माहीत असतंच. त्यामुळे जास्त सांगण्यात काहीच अर्थ नाही. तू क्षणात समजून घेशील. अक्षर खराब आहे. चालवून घे. चालवून घेत आलायस!! उत्तराची वाट बघेन!! मुद्दाम लिही!! माणसं जपता येतील की नाही माहीत नाही. निदान पत्र तरी जपायचा प्रयत्न करेन!!

तुझीच

कुणी लिहिलं आहे ते तुला एव्हाना कळलं असेलच

(उत्तर लिही बरं का!!)’

सखे, ती आयुष्यात आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. पण, तरीही मी तिच्यात गुंतत गेलो. शारीरिक दृष्ट्या नव्हे, मनाने. काही माणसांचं व्यक्तिमत्त्वच असं असतं की, आपण आपल्याही  नकळत त्यांच्यात गुंतत जातो. हे गुंतणं जेवढं जास्त, तेवढाच त्यातून बाहेर निघताना त्रास होतो. कधी कधी निघणं जमतंच नाही. मलाही आजपर्यंत जमलं नाही. यापुढेही जमणार नाही. काही गोष्टी स्वत:बरोबरच संपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. असो!

सखे, माझ्या आयुष्यातले सर्वांत चांगले क्षण कुठले म्हणशील तर ते जे मी तिच्यासोबत घालवले. ती होतीच तशी. झोकून देणारी. माझी अशी कुठलीच गोष्ट नव्हती, जी तिला माहीत नव्हती. तिला सगळं सांगायचो. तिच्यापासून काही लपवणं, मला जमलंच नाही. हे प्रेम होतं की माहीत नाही. पण, जे काही होतं ते होत गेलं. कुठल्या मुलीने माझ्यामध्ये गुंतावं असं माझ्यात काहीच नव्हतं. ना रूप, ना देहयष्टी, ना बुद्धी, ना कर्तृत्व, ना पैसा. तशातच इतरांना फशी पडण्याचा माझा जन्मजात स्वभाव. मला माणसं ओळखता नाही येत. आई म्हणायची मला, ‘माणसांच्या आहारी जाऊ नकोस.’ मी प्रत्येक माणसांच्या आहारी जात राहिलो, स्वत:चा वापर होऊ देत गेलो.  मैत्री, आपुलकी आणि प्रेम यांच्या आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या व्यवहाराला भुलत गेलो. 

सखे, पतीपत्नीमधील नातं दृढ होण्यासाठी पतीला एक मैत्रीण आणि पत्नीला एक मित्र अवश्य असावा. दोघांच्याहीसाठी ‘सेफ झोन.’ नवरा बायकोचं नातंच अधिकार गाजवण्याचं असतं. प्रेम नसतं असं नव्हे, त्याहीपेक्षा अधिकार प्रबल असतो. सगळ्याच गोष्टी बायको नवर्‍याला आणि नवरा बायकोला सांगू शकत नाही त्याला कारणही हे अधिकाराचं प्राबल्य असतं. मित्राच्या कितीही मैत्रिणी असल्या तरी फरक न पडणार्‍या स्त्रीला, तोच मित्र नवरा झाल्यानंतर त्याची एकही मैत्रीण चालत नाही आणि नवर्‍याला बायकोचा मित्र चालत नाही. समाजही एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या नात्याकडे निर्भेळपणे नाही पाहत. म्हणूनच सांगता न येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक संबंध कायम ‘अनसेफ’ असतात. 

सखे, कालांतराने तिचं लग्न झालं. ती मला घाबरू लागली. मी तिच्यासाठी कमालीचा ‘अनसेफ’ होत गेलो. आमच्यातलं अंतर वाढत गेलं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप होतं. पण, आता तिला ऐकायचंच नव्हतं. गप्पा करण्यासाठी तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. ती म्हणाली हे शेवटचं. आता आपण भेटायचं नाही, फोन करायचा नाही. काहीच नाही.  अगदी सहजपणे म्हणाली, झालं गेलं विसरायचं. माझ्या ओठावर जितक्या लवकर हसू उमटतं, त्याहीपेक्षा जलद पापण्यांच्या किनार्‍यावर अश्रूंची गर्दी जमते. त्यांना थांबवत तिला विचारलं, 

‘झालं गेलं असं जे म्हणतेस ते काय होतं? ते प्रेम नव्हतं?’ 

तितक्याच सहजतेने ती म्हणाली, 

‘नव्हतं. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.’

’तुला तुझ्या संसारात अडचणीचं वाटत असेल कदाचित. नको भेटूयात आपण. वाईट नाही वाटणार मला. पण, जे होतं, त्याला तू नव्हतंच असं म्हणतेस त्याचं फार वाईट वाटतं. प्रचंड त्रास होतो.’ हे सांगताना मी स्वत:ला सावरलं, आसवं ओघळलीच. 

तरीही ती तितक्याच सहजपणे पुन्हा एकदा ‘नव्हतंच’ असं म्हणाली आणि त्याहीपेक्षा जास्त सहजपणे निघूनही गेली. त्यानंतर कित्येक दिवसांनी हे पत्र. 

सखे, काय उत्तर देऊ तूच सांग.