रविवार, ३ जुलै, २०२२

जीवन क्या है...

सखे, एखादी गोष्ट आपल्याला आत्यंतिक आवडावी, ती मिळावी यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असावं. पण, ती त्या वेळेस मिळू नये. वेळ निघून गेल्यावर जेव्हा ती मिळावी, तेव्हा तिचं अप्रूप निघून गेलेलं असावं. तेव्हाची आसक्ती खरी म्हणावी की, आजची अनासक्ती खरी म्हणावी? की, दोनही खोटीच? हा संभ्रम, ही जी अवस्था आहे ना, ती माझी गेले दोन दिवस आहे. बरं झालं तू आलीस. कुणाला तरी हे सांगायचंच होतं. अन्यथा वेडा झालो असतो.

‘ऐक सखे, म्हणत मला प्रचंड ऐकवणार्‍या बर्व्यांची ही अवस्था? कसा दिसतो आहेस बघ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा, देणारा तू, आज असा गोंधळलेला? पाहवत नाही.’

माझ्या आई! प्रश्न मलाही पडतातच. मी कुणी स्थितप्रज्ञ योगी नव्हे. मलाही दु:ख, वेदना, सुख, न सुटलेले प्रश्न आहेतच की. पोहणार्‍या माणसाला, तो बुडत असलेला पाहून फक्त आठवण करून द्यायची असते की, ‘त्याला पोहता येतं’. त्यावेळेला त्याचे पोहण्याचे क्लास घेत बसायचं नसतं. तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतो, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तू शोध.

‘ठीक आहे. त्या सुकून गेलेल्या कॉफीच्या मगमधली शिल्लक कॉफी सांगतेय, तिला गार होऊन गेल्याला आता बराच वेळ झालाय. रिकाम्या कपाचेही घुटके नकळत घेणारा तू, एकवेळ मला विसरशील, कॉफी विसरणार नाहीस. जाऊ दे! मस्तपैकी कॉफी करून देते. मग ऐकव काय झालंय ते.’

ठीक आहे सखे, कॉफी करता करता तू जगजित सिंग यांच्या आवाजातलं ‘जीवन क्या है, चलता फिरता एक खिलौना है’ हे सुंदर गीत ऐक. 

‘अरे हे तर तुझ्या त्या खूप आवडत्या ‘सैलाब’ सिरियलमधलं ना?’

हो सखे! परवाच त्या सिरियलचे सगळे एपिसोड एका मित्राने आणून दिले. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायची मला ती. अगदी पहिल्या एपिसोडपासून माझ्या मनाचा कब्जा घेतला होता या सिरियलने. अप्रतिम मांडणी, अप्रतिम पटकथा, अप्रतिम संवाद...

‘आणि अप्रतिम हसणारी रेणुका शहाणे...’

तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या. जाऊ दे! हो, तिच्यासकट सगळंच आवडायचं मला. एकही एपिसोड चुकवायचा नाही असं पहिला एपिसोड पाहिला तेव्हाच ठरवलं होतं. पण, तेव्हा आमच्याकडे टीव्ही होता पण डिश नव्हता. शेजारी राहणार्‍या जिवलग मित्राकडे त्यावेळचा तो मोठ्ठा डिश एन्टेना आणि टीव्ही होता. मी न चुकवता जाऊ लागलो. सिरियल सुरू झाली की, माझं लक्ष कुठेच नसायचं. काही इतर ऐकूही यायचं नाही. पण, जाहिराती लागल्या की, त्यावरच्या टिप्पण्या ऐकू यायच्या. 

आता मित्र म्हटलं की, रुसवे-फुगवे असायचेच. नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण, जोराचं भांडण झालं होतं. मी पुन्हा दारावर पाय ठेवणार नाही, असं सांगून वगैरे बाहेर पडलो असेन बहुधा. घरच्या सगळ्यांना वाटलं होतं की, मी काही आता त्यांच्या घरी पुन्हा पाऊल ठेवणार नाही. पण, त्याला खात्री असावी. मलाही एकेक पायरी चढत जाणं खूप कठीण गेलं. प्रत्येक पायरी ही स्वत:च्या अगतिकतेची चीड आणणारी होती. तरीही मी गेलो, कारण मला ती सीरिअल पाहायची होती. शेवटच्या पायरीवर मला पाहताच मित्र हसला. त्याच्या हसण्यात माझ्या अगतिकतेचा उपहास होता. मी गेलोच नसतो तर कदाचित माझ्या ठाम राहण्याचा त्याला अभिमान वाटला असता. त्याच्या त्या हसण्यामुळे मला रेणुका शहाणेच्या स्मितहास्याचा का कोण जाणे आनंद झाला नाही. कशाचाच झाला नाही. 

तो भाग संपताच मी खाली उतरलो. कुणीतरी माझी वाट पाहत उभे होते. 

‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तू तिच्या प्रेमात आहेस का?’

जिच्यावर माझे प्रेम होते, तिच्याबद्दलच तो विचारत होता. अभावितपणे तोंडातून ‘नाही’, असा शब्द निघून गेला. केवळ मलाच माहीत असलेली ही गोष्ट त्याला कशी समजली, हा विचारही डोक्यात आला नाही.  

‘ही तीच मुलगी ना जिचं स्मितहास्य तुला फार आवडायचं?’

हो. त्यानंतर मी ती सिरीयल पाहायला पुन्हा कधीच गेलो नाही. इतर प्रसंगी खूपवेळा गेलो. अक्षरश: दर दिवशी गेलो. पण, ज्या दिवशी ती सिरियल लागायची तो दिवस, ती वेळ सोडून गेलो. परवा, एका मित्राने त्याच ‘सैलाब’ सिरियलचे सर्व एपिसोड आणून दिले. ‘दहावा एपिसोड मिळाला नाही’, असेही त्याने सांगितले. पण, तो गेल्यापासून मी एकही एपिसोड पाहिला नाही. 

गतकालातील सुख माणसाला त्याच्या नंतरच्या आयुष्यात दु:ख देतं. ते सुख खरं की, आजचं त्याचंच दु:ख खरं, असं कायम वाटत राहतं. जे पाहण्यासाठी एवढा प्रचंड आटापिटा केला, ते पाहण्याची आज इच्छाच होत नाही. तेव्हा ते उपलब्ध नव्हतं आणि आज सहज उपलब्ध आहे. तरीही ते का नकोसं वाटावं? कुठलं खरं असावं? दोन्ही गोष्टी खर्‍या, प्रामाणिक की, दोन्ही मृगजळासारख्या फक्त भासल्या? 

त्या  एपिसोडमध्ये रोहित शिवानीला सांगतो, 

‘मी एका मृगजळाच्या मागे वेड्यासारखा धावलो. आज ते समोर आलं तेव्हा स्वत:ला थांबवू शकलो नाही.’

त्यावर शिवानी म्हणते,

‘होतं असं रोहित. सुखाशी पुन्हा झालेली भेट दु:ख देते. मनावर ताबा ठेवणं कठीण होतं. मन सुखदु:खाच्या मागे वेड्या घोड्यासारखं मिळेल त्या दिशेने धावत राहतं. आयुष्य तसं असत नाही. त्याला नियम असतात.’

सखे, आयुष्यात आपल्याला  हवं ते, हवं तेव्हा, हवं तेवढं कधीच मिळत नाही. ते मिळावं हे जसं आयुष्य आहे, तसंच ते मिळू नये हेसुद्धा आयुष्यच आहे. 

हा प्रसंग असलेला एपिसोड त्या सिरियलचा मी पाहिलेला शेवटचा एपिसोड होता आणि त्यात शेवटी जे गाणं होतं, तेच तू आत्ता ऐकलंस.

‘जीवन क्या है....’

शनिवार, २५ जून, २०२२

अजी कुछ तो बोलिए...

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.
सखे, आठवतंय तू एकदा विचारलं होतस मला, रडणं हे दुबळेपणाचे लक्षण नव्हे का? रडत रडत जन्माला येणार्‍या माणसाला समज आल्यानंतर तेच रडणं अप्रशस्त वाटू लागतं. पण तुला सांगू, जसं दिलखुलासपणे हसायला सामर्थ्य लागतं तसंच साचलेल्या दु:खाला वाट करून द्यायलाही प्रचंड सामर्थ्य लागतं. रडणं हा दुबळेपणा नाही. फक्त पापण्यांच्या आड अश्रू किती संयमाने साचले आहेत, त्यावर दु:खाचं सामर्थ्य ठरतं.  

‘आपलं दु:ख इतरांना सांगितल्याने मन हलकं होतं, असं म्हणतात ते चुकीचं आहे का मग?’ 

सखे, प्रत्येक व्यक्तीचं आपल्या दु:खावर प्रचंड प्रेम असतं. दु:ख कुरवाळण्यासारखं सुख नसतं. समदु:खी माणसांचं दु:ख समान असतं, त्यातली तीव्रता नाही. म्हणूनच प्रत्येकाला आपलं दु:ख मोठं वाटतं. आपण जेवढे आपल्या दु:खाने दु:खी होतो, तेवढे इतरांच्या दु:खाने होत नाही. दु:खाची तुलना होते, जाणीव होत नाही. १९२४ साली याच दिवशी जन्मलेला मदनमोहन चुन्नीलाल कोहली हा अवलिया केवळ आपल्या संगीताच्या जोरावर त्याचं दु:ख आपलं करून टाकतो.  या जादूगाराने संगीत दिलेलं ‘यूं हसरतों के दाग’ हे अदालत(१९५८) या चित्रपटातील नर्गिसवर चित्रित झालेलं अप्रतिम आणि माझं खूप आवडतं गीत मुद्दाम ऐक. तुला जाणवेल की, हे दु:ख चित्रपटातील निर्मलेचं नाही, गीत लिहिणार्‍या राजेन्द्र कृष्ण दुग्गल यांचं नाही, लतादीदीचं नाही. हे दु:ख मदनमोहनचं आहे. आपल्या दु:खाची यथार्थ जाणीव केवळ सुरावटीतून करून देण्याचे जगावेगळं सामर्थ्य लाभलेला मदनमोहन हा बहुधा एकमेव संगीतकार असावा. 

सखे, प्रेमात आपण मारलेल्या आपल्या इच्छा पुढे येणार्‍या एकलेपणात छळतात. इच्छेमधला ओलावा निघून गेला की त्याचे डाग होतात. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते दिसू नये म्हणून प्रेमानेच ते धुवावेही लागतात, अगदी कितीही ‘अच्छे’ असले तरीही. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला हे दु:ख समजतच नाही. म्हणून आपण आपल्यालाच ते सांगायचं आणि आपणच ते ऐकायचं. वक्ता, श्रोता दोनही आपणच.

सखे, घर सोडून सुखाच्या शोधात निघावं. सुख काही शेवटपर्यंत सापडत नाही. वाटेत उभी असलेली दु:खं मग आपल्यासोबत प्रवासाला निघतात. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अश्रू आणि दु:खच साथ देतात. बाकी सुखांचे काय? ती येतात, निघून जातात. पडद्यावर हे कडवं जेव्हा येतं, तेव्हा प्राण येताना दिसतो. तोही पान ठेवलेल्या तबकाच्या आरशात. 

सखे, फूल सुकलं तरीही ते फूलच असतं. त्याचा काटा नाही होत. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला ते समजतं का? त्याला त्याची किंमत आहे का? तुझ्या तोंडीही हे वाक्य मी बर्‍याचदा ऐकले आहे, ‘त्याला काही माझं पडलेलंच नाही’. त्याला काय वाटतं यावरून आपलं प्रेमाचे मूल्य ठरवणार्‍या तमाम प्रेमिकांनी या गीतातील दुसरे कडवे अवश्य ध्यानात ठेवावे. आपल्याला समजून घेतलं जात नाही हा दोष आपला नाही. आपण जसे आहोत, तसे आहोत. तो किंवा ती आपल्याला काय समजते, ते त्या व्यक्तीवर सोडून द्यावे. सुकलेल्या फुलाला काट्यामध्ये कुणी तोलत असेल तर तो दोष फुलाचा कसा? असे करण्यात त्या व्यक्तीला सुख मिळत असेल तर ते सुखही मान्य असणे, ही प्रेमाची उत्कट अवस्था आहे.

सखे, मदनमोहनला आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागली. जाणूनबुजून त्याची गळचेपी करण्यात आली. त्याच्या पासंगालाही न पुरणार्‍या संगीतकारांनी त्याला संपवला. आपलं नाणं बावनकशी असून चालत नाही. ते वाजवून दाखवावं लागतं. गाण्याशिवाय इतर काही वाजवणं हा या संगीतकाराचा पिंडच नव्हता. संगीतकारांच्या गळेकापू स्पर्धेत हा सुरांचा राजा गप्प राहिला. 

पाठीमागून घाव घालणार्‍या माणसालाही, ज्याच्यावर घाव घातला आहे, तो ओरडला नाही की त्रास होतो.

मदनमोहनचं हे गप्प राहणं अनेकांना मानवलं नाही. ते विचारू लागले,  ‘अहो गप्प का? बोला ना काही तरी!‘ मदनमोहनने स्वत:ला मदिरेत बुडवून टाकले. त्यातच त्याचा शेवट झाला. कमालीचा एकलेपणा आणि कमालीचे मदिरासेवन, त्याला हवा असलेला मृत्यू देऊन गेले.

राजेंद्रकृष्णांनी लिहिलेल्या या गीतातल्या शेवटच्या दोन कडव्यांतले शेवटचे ‘तोलिये’ आणि ‘बोलिये’ हे शब्द जेव्हा मदनमोहनचं दु:ख घेऊन लताच्या गळ्यातून बाहेर पडतात ना सखे, तेव्हा काळीज चिरून जातात. लता हे दु:ख ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालते. गाणं थांबतं. स्वर विरून जातात. राहतं ते मदनमोहनचं साचलेलं दु:ख. खरं तर ते दु:ख त्याचं असं उरतच नाही. ते आपलं होतं. आपण नि:शब्द होतो आणि सुकून गेलेल्या आपल्याच इच्छांचे डाग आपल्याला म्हणतात,

‘अजी अजी कुछ तो बोलिए...’


शुक्रवार, ३ जून, २०२२

हात छोड दिया...

इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं.

‘आपण घेण्यासाठी हात पुढे करावा आणि देण्यासाठी पुढे झालेल्या हाताने वस्तू आपल्या हातात न देता टेबलवर ठेवावी, तेव्हा जसं वाटेल ना, तसं वाटतंय रे...’

सखे, तू कधी कधी दु:ख इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त करतेस की, ते तुझं न राहता माझं होऊन जातं. दु:ख दु:खात मिसळलं की, ‘काय झालं?’ असं विचारण्याची आवश्यकता राहत नाही. तपशिलाची माहिती विचारणार्‍या प्रश्नांची टरफले गळून पडतात. वेदना शिल्लक राहते. 

‘मला आणि तुलाही माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतेय. तुला काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही. पण, इतकं कळतं की, मला काय म्हणायचं आहे, हे तुला नेमकं समजतं. त्याच्या वागण्याचा त्रास होतोय रे. तो नव्हता असा. आम्ही दोघेही एकमेकांना आतबाहेर ओळखतो. तरीही तो ओळखच नसल्यासारखा का वागतो? का बदलला तो? माझं काही चुकतंय का? मी आणखी काय केलं की, तो पूर्वीसारखा वागेल? सगळे प्रश्न भुंग्यासारखे छळत राहतात.’

सखे प्रश्नांचा फार त्रास करून घेऊ नये आपण. ते त्रास देऊ लागले की, मस्त गझल ऐकावी. मला गझल का आवडते माहितीये, कारण ती माझ्यासारखी नाही. मी जास्तीत जास्त शब्दांत कमीत कमी सांगतो. गझल कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगून जाते. तुझा मूड ठीक होईल आणि कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातील. कतील शिफाई यांची ‘किया है प्यार जिसे हमने जिंदगी की तरह’ ही जगजित सिंग यांच्या आवाजातील गझल ऐक. 

‘तू खपल्या नको ना काढूस. माझीही अत्यंत आवडती गझल आहे. त्यालाही प्रचंड आवडायची. तुला माहिती आहे, त्याला व मला गझल, सिनेमा, गाणी, कविता एकमेकांना शेअर करायला आवडतं. त्याहीपेक्षा एकमेकांची त्याबद्दलची मतं ऐकायला तर त्याहून जास्त आवडतं. आता आवडायचं असं म्हणावं लागेल. तो तुझ्यासारखाच खूप बारीक बारीक जागा सांगायचा. प्रत्येक शेर उलगडून सांगायचा. आता जागा असतो, पण मोबाइलमध्ये तोंड खुपसण्यासाठी. सगळी आवडच संपली आहे त्याची.’

सखे, यातला पहिला शेर आपल्याला खेचून घेतो, तो शेवटपर्यंत सोडत नाही. एखादी गझल आपल्याला आवडते कारण शायराने त्यात आपली वेदना नेमक्या शब्दांत मांडलेली असते म्हणून. एरव्ही यातना देणारे आपले दु:ख इतके छान वाटते की, आपल्या तोंडून सहज, ‘वाह क्या बात है!’ अशी दाद नकळत निघते. आपली वेदना आपलीच दाद घेऊन जाते. 

सखे, आपलं आयुष्य आपल्या ओळखीचं असतं. त्यात जे घडतं, बिघडतं ते आपल्या ओळखीचं असतं. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यावर प्रेम करतो. ते आपलं असतं. असंच आपल्या आयुष्यासारखं आपण कुणावर तरी प्रेम करावं आणि त्यानं ओळखही दाखवू नये, याचं दु:ख प्रचंड असतं. आश्ना म्हणजे ओळखीचा, मित्र, प्रियकर. आता तुझ्याबाबतीत या सगळ्या पायर्‍या पार करून इथवर पोहोचलेला तुझा नवरा. त्याचं परक्यासारखं वागणं, तुला असह्य होत आहे, यात शंकाच नाही. तारीकी म्हणजे काळोख, रात्र. पण इथे, दुर्लक्ष करणे, बेफिकिरी असा त्याचा दुसरा अर्थही एकदम लागू होतो. तो लपेल, तो दिसणार नाही. त्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे लपणार नाही. ते दिसेल. नाहीच दिसले तर तो दाखवून देईल. आपल्या या दु:खाची त्याला जाणीवही नसणं कायम जाणवत राहील. 

सखे, या नंतरचं कडवं खूप लक्षपूर्वक ऐक. हा ऑडिओ २००६साली टॉरोन्टो येथे झालेल्या लाइव्ह कार्यक्रमातील आहे. या कडव्याची पहिली ओळ म्हणून जगजित सिंग एक तान घेतात. त्यानंतर ‘हाथ छोड दिया’ म्हणताना एक जागा घेतात. एकदम लाजवाब. आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातातून निसटत आहे, आपण काहीही करू शकत नाही, ही अगतिक अवस्था त्या दोन शब्दांतून जगजित सिंग व्यक्त करतात त्याला तोड नाही. त्या सुरातून परित्यक्त झालेलं दु:ख थेट काळजात उतरतं. एका क्षणासाठी गाणारा, ऐकणारा नाहीसे होतात. राहते ते फक्त कारुण्य. आपण भानावर येतो ते त्यानंतरच्या ओळी आपल्याला छेदून वास्तवात घेऊन येतात म्हणून. मुरव्वत म्हणजे संकोच, भीड, चांगुलपणा, सौम्य वागणूक, मन राखणे अशा अर्थाने घेतला जातो. दिल-लगी म्हणजे करमणूक, मनोरंजन. आपलं मन राखणं हे त्याचं मनोरंजन होतं. तो आपलं मन राखतोय, हे त्याचं आपल्यावरचं प्रेम आहे हा भ्रम होता. तो त्याचा मन रमवण्याचा उद्योग होता. जवळ न येण्याच्या दु:खापेक्षाही त्याचं हळूहळू दूर जाणं जास्त वेदना देणारं आहे. ज्याची प्रत्येक वेदना आपण आपली मानली त्याचं आपलं नसणं जास्त वेदनादायी आहे. 

‘तुला माहिती आहे आता मोबाइलमधून चेहरा वर करून पाहतही नाही. त्याला काही ऐकावसं वाटत नाही आणि काही सांगावसंही वाटत नाही. त्याला ट्विस्ट एन्ड असलेले सिनेमा खूप आवडतात. मी त्यातला ट्विस्ट उलगडून सांगितला की, त्याला ते खूप आवडायचं.एन्सेंडिस (एंसादी) या फ्रेंच सिनेमातील प्युअर मेथमेटिक्स, कोलात्झ कॉन्जेक्चर आणि त्यातील सायमनने आपली बहीण जेनीला ‘वन प्लस वन, डज इट मेक वन?’ विचारलेला हा प्रश्न, यावरून आम्ही प्रचंड खल केला होता. मी त्या सिनेमातील त्याला कळालेलं  मर्म सांगेपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. आमच्यात वादही झाला होता. आताशा तो वाद टाळतो. तो वाद टाळतो याचं दु:ख करू की, तो संवाद टाळतो याचं दु:ख करू तेच कळेनासं झालंय.’

सखे, कतील शिफाई यांचा;

कभी न सोचा था हम ने ’क़तील’ उस के लिए 
करेगा हम पे सितम वो भी हर किसी की तरह

हा शेर जगजित सिंग यांच्या या व्हर्जनमध्ये नाही. इतर लोक आपल्याशी कसेही वागले तरी आपल्याला त्याचं वैषम्य वाटत नाही. आपलीच माणसं आपल्याशी परक्यासारखी वागतात त्याचा त्रास होतो. आपलेपणातील हे परकेपण छळतं. वस्तू हातात न देणं छळत नाही. ती टेबलवर ठेवणं छळतं. वाढत चाललेलं अंतर, दुरावा दाखवून देणं छळतं. तुला त्रास होतोय तो नेमका या गोष्टीचा. 

सखे, त्यावरचा उपाय मला नको विचारूस. तो माझ्याकडेही नाही. तसा तो कुणाचकडे नसतो. नवरा बायकोतील नातं स्थिरावणं कधी कधी दूर जाण्यासारखं भासतं. लग्नाच्या सुरुवातीला असलेल्या प्राथमिकता कालांतराने बदलतात. आपण आपल्या रूटीनमध्ये अडकत जातो. पत्नी माता होऊन संसारात गुरफटते. पती एककल्ली किंवा बाहेरख्याली होतो. सप्तपदीमधील शेवटचं वचन हे ‘सखा सप्तपदी भव’ आहे याचा आपल्याला विसर पडतो. मित्र-मैत्रीण, प्रियकर प्रेयसी, नवरा-बायको यापेक्षाही सखा-सखी यातील सख्यत्व फार महत्त्वाचं आहे, हे उलगडेपर्यंत हे खूप जवळ येऊन दूर होत जाण्याचं दु:ख भोगावं लागतं. तुझ्या माझ्यात सख्यत्व आहे, ते आपण दोघेही नवरा-बायको नाही, म्हणून आहे. तुमच्या नात्याकडे नवरा बायको या दृष्टिकोनातून पाहूच नकोस. तू त्याची सखी हो आणि त्याला तुझा सखा होऊ दे. मग दोघांचेही हात आवळलेही जाणार नाहीत आणि सुटणारही नाहीत.

‘तू म्हणतोस तसंच होईल की, नाही माहीत नाही. पण, तुला दु:ख समजतं. तुला ते आपलंसं करणं जमतं. तुझ्याकडे असलेल्या गाण्यांचा संग्रहही प्रचंड आहे व तू तो मला ऐकवत असतोस. म्हणूनच तर मी तुझ्याकडे येते.’

हो सखे, अशीच येत राहा, ऐकत राहा!

मंगळवार, १० मे, २०२२

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता

सखे, तू उदास असलीस, खिन्न असलीस की मला त्रास होतो. का कोण जाणे, पण तू नेहमी प्रसन्न असावंस असच वाटतं. तुझ्या मनातली प्रसन्नता चेहर्‍यावर झळकते, तेव्हा त्या निर्व्याज स्मितहास्याच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये असं वाटतं. अपूर्णत्व मनाला खिन्नता आणतं. ही खिन्नता घालवण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुला भेटलो की मनाची मरगळ नाहीशी होते. धकाधकीचं आयुष्य सहन करण्याची ताकद मिळते. 

‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’

सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही. 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता 
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता 

सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्‍या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता 

सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्‍याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्‍या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं. 

बुझा सका है भला कौन वक्त के शोले
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता 

सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.

तेरे जहाँ में ऐसा नही के प्यार न हो
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता 

सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला. 

सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो. 

सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे. 

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

तो राजहंस एक...

आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...

‘मी काय करू सांग ना रे?’

सखे, तू असा ओठांचा चंबू करून प्रश्न विचारला की, मला एक प्रश्न पडतो. तुझ्या ओठांनी टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ की, तू विचारलेल्या?

‘चावटपणा पुरे झाला. तू मला सखी म्हणतोयस खरा, पण आपल्या वयातील अंतर पाहिले आहेस का? यावर ते गेल्या खेपेला ऐकवलंस तसं, ‘ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो’ या ओळी  असलेलं गीत नको ऐकवूस.’

सखे, तुझं वयात येणं खरं तर माझ्यासाठी अडचणीचं झालं आहे. आधी तू किती छान मोकळेपणी बोलायचीस. त्या संवादाला आधीच ठरवलेल्या अर्थाचे कंगोरे नसायचे. जाऊ दे. भांडण होईल आपलं. काय झालं ते सांग.

‘ही दहावी म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखी झाली आहे. ‘पुढे काय करणार तू?’ हा प्रश्न मला सगळ्या नातेवाइकांनी विचारून झालाय. मला काय करायचं आहे, हे सांगितलं तर ते कसं चुकीचं आहे, हेच प्रत्येकजण ऐकवतो. बरं, ‘नाही ठरवलं अजून’, असं म्हटलं तर प्रत्येका जास्तच चेव येतो. मोबाइलमध्ये गुरफटलेल्या पिढीपासून ते ‘आमच्यावेळी हे असं नव्हतं’ इथपर्यंत सगळे विषय येऊन जातात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता मी आर्टस्ला जायचं ठरवलं तर केवढा गहजब घरात! एका नातेवाइकांनी तर अशा काही तुच्छतेने पाहिलं की, बेचाळीस पिढ्या नरकातच गेल्याचा भास झाला.  मला इंग्रजी हा विषय घेऊन आर्टस् करायचे आहे, तर आईबाबांना वाटते मी एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग करावे. आता मला सांग मी करू तरी काय?’

सखे, ही शेकडा नव्वद घरांतल्या मुलांची समस्या आहे. आईवडिलांच्या अपेक्षा, नातेवाइकांचे सल्ले यातून गोंधळलेली मुलं हे घराघरांतील चित्र आहे. याला एकच एक कारण जबाबदार आहे, असं म्हणता येणार नाही. शिक्षणव्यवस्थेपासून ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत. त्या सगळ्या घोळात तू नको पडूस. तू छानपैकी एक गीत ऐक. गदिमांनी लिहिलं आहे आणि खळेकाकांनी स्वरबद्ध केलेलं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे अप्रतिम गीत ऐक. आशाताईंनी गायलेल्या या गीतातील शेवटच्या कडव्याचा शेवट जिथे होतो, तिथून पुन्हा ध्रुवपद येत नाही. एकदा ते अढळपद प्राप्त झालं की, ध्रुवपदावर यायचंही नसतं.

सखे, आपण सर्वांना सर्व शिक्षण या चक्रात अडकलो आहोत. यात उपजत आपल्याजवळ काय आहे, याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही. हे उपजत गुण वेळेत शोधले तर कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग निश्चित होतो. एखादे मूल गणितात हुशार असेल तर त्याला इंग्रजी व इतिहास या विषयांत कमी पडलेले गुण त्याची एकूण मार्कांची टक्केवारी खाली आणतात. केवळ गणित हाच विषय घेऊन त्याला पुढे जाता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. इतर विषयांत जरी त्याला काठावर मार्क पडले तरी जेवढे गणितात पडले आहेत, तेवढी त्याची एकूण टक्केवारी धरली जात नाही. याचा सर्वांत मोठा दोष म्हणजे पडलेल्या गुणांवरून गुणवत्ता ठरवली जाते.

ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे, तेवढे मार्क मिळवण्यासाठी आपण धडपडतो. अन्यथा, जेवढी आपली टक्केवारी आहे त्यानुसार आपला मार्ग निवडणे हा पर्याय शिल्लक राहतो. ‘शिक्षणाची कुठलीच शाखा दुय्यम नसते’ असं कायम म्हणणारी माणसं कला शाखेत जाणार्‍या मुलांकडे तुच्छतेने पाहतात. अमुक इतके मार्क पडले तर विज्ञान, अमुक इतके पडले तर कॉमर्स, अमुक इतके पडले तर इंजिनिअरिंग अशी गुणांप्रमाणे केलेली गुणवत्तेमधील उच्चनीचता या समानताप्रेमी विचारवंतांना खटकत नाही. 

सखे, आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही! 

सखे, आपले नातेवाईक आप्तही विद्येच्या या शाखांकडे पोटापाण्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन पाहत नाहीत. ‘कुठे गेल्यावर अधिक स्कोप आहे?’ हा विचार पालकांच्या मनात येणे चुकीचे नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता लाभावी, पुढील आयुष्य किमान पैशाच्या दृष्टीने तरी ‘सेफ झोन’मध्ये असावं असं वाटण्यात काहीच गैर नाही. 

‘त्यांचे चूक नाही, याचा अर्थ माझं चुकतंय असं तुला म्हणायचं आहे का?’

सखे, कायम चूक विरुद्ध बरोबर असा संघर्ष नसतो. आईबाबा बरोबर म्हणजे तू चूक आणि तू बरोबर म्हणजे ते चूक असं नसतं. दोघेही आपापल्या विचारांच्या कक्षेत बरोबर आहात. फक्त ते सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. 

‘म्हणजे तू म्हणतोयस की, आय हॅव टू प्रूव्ह देम राँग.’

नाही सखे, ते चुकत आहेत हे तुला नाही सिद्ध करायचं. तुला हे सिद्ध करायचं आहे की, तू बरोबर आहेस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण, त्यासाठी तुला आधी स्वत:ला ओळखलं पाहिजे. बुद्धी ही एक ऊर्जा आहे. आपण तिला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने ती वळते. आपल्याच मनाला घातलेले भीतीचे बांध आपल्याला ऊर्जेला वळवण्यापासून रोखतात. तुला इंग्रजी विषय घेऊन आर्टस् का करायचं आहे, याचा पक्का व पूर्ण विचार तू कर. आत्तापर्यंत तू किमान जेवढे टक्के मिळवीत आली आहेस, ते ९५ टक्के मार्क मिळव आणि  मग तू आर्टस्ला जा. कमी मार्क मिळाले म्हणून आर्टस्चा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला, असे म्हणायला जागा ठेवू नकोस. त्यावरही तुझा निर्णय कसा चुकीचा आहे, हे इतरांच्या अनुभवाने तुला सांगण्याचा प्रयत्न होईलच. तो अजिबात मनावर घेऊ नकोस. ठामपणे वाटचाल करीत राहा. 

सखे, सर्वांत आधी आपल्याला ज्या दिशेने, ज्या शाखेला जायचे आहे, त्यात उपजत गती आहे का, याचा विचार कर. केवळ तुझी मैत्रीण किंवा मित्र आर्टस् करतात म्हणून तू जाऊ नकोस. आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, ‘मी काय करू?’ हे मला विचारावं लागणार नाही. तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...


रविवार, ६ मार्च, २०२२

देवबाप्पा बघतोय....

देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे.










देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’


सखे, तुला हे असं कधीपासून होतंय? काल परवापर्यंत विज्ञाननिष्ठ वगैरे होतीस ना तू? कपाळावर कुंकू लावायलाही लाज वाटायची तुला. आज अचानक एवढी जिज्ञासा?


‘खवचटपणा बंद कर. तू प्रश्न न विचारता उत्तर देणार आहेस का?’


सखे, मी उत्तर देईन गं. पण, तुला ते बोअरिंग फिलॉसॉफी वगैरे वाटणार असेल तर मग कठीणच आहे.


‘देतोसच तू बोअरिंग, न कळणारे अवघड शब्द वापरून बोजड भाषेतील लेक्चरे. अनेकदा पटत नाहीत मला. पण, तू गाणी ऐकायला सांगतोस ते जाम आवडतं. तू सोप्या शब्दांत सांग ना.’


सखे, तुला पुरुषसूक्तातला पहिलीच ऋचा ऐकवतो. 

ॐ स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः स॒हस्र॑पात् ।

स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥


आता त्याच अर्थाची मोरोपंतांची आर्याही ऐक

भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला।

स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला ॥ 

संस्कृतातील ऋचेचा अर्थ तुला कळणार नाही. मोरोपंतांच्या मराठीतल्या आर्येचा अर्थही कळणे कठीणच जाईल. न कळण्यासाठी दोष ऋचेच्या कर्त्यांना द्यायचा, आर्या रचणार्‍या मोरोपंतांना द्यायचा की, तो अर्थ शोधण्याची तसदी न घेणार्‍या आपणाकडे घ्यायचा याचा विचार ज्याचा त्याने करावा. शब्दार्थ शोधण्याचा रस्ता आपण ‘क्रॉस’ करणे सोपे की, ‘ओलांडणे’ सोपे हे ज्याचे त्याने ठरवावे. ‘ओलांडणे’ समजत नसेल आणि ‘क्रॉस करणे’ समजत असेल तर दोष रस्त्याचा कसा?


‘बर्वेबुवा पुरे आता. देतोस माझ्या प्रश्नाचे उत्तर की, जाऊ?’


सखे, तू रागावल्यानंतर फारच सुंदर दिसत असलीस तरी रागावू नकोस आणि निघूनही जाऊ नकोस. दोष माझ्या सांगण्यात आहे, हे मी अमान्य करत नाही. जसं जमेल तसं सांगतो. तरीही तू ऐकतेस, मला सहन करतेस हेच  मोठं आहे. 

देव ही मानवनिर्मित संकल्पना नाही. माणसाच्या संकल्पनेतून देवाची निर्मिती झाली नाही. माणूस नव्हता तेव्हाही देव होता आणि नसेल तेव्हाही देवच असेल. विश्वातच असलेल्या रचनेला माणसाने आपल्याला समजावे म्हणून किंवा समजेल अशा एका  संकल्पनेत बसवले, ज्याचे नाव ‘देव’. एका अर्थाने मर्यादित केले. ज्या रचनेला आकार नाही, त्याला साकार केले. पण, समजण्यास सोपे केले. या वैश्विक रचनेला समजण्याचे दोन मार्ग आहेत. एक ज्ञान आणि दुसरा भक्ती. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांनी ती रचना ज्ञानाने समजून घ्यावी आणि ज्यांच्याजवळ भक्ती आहे, त्यांनी ती भक्तीने समजून घ्यावी. 


‘ज्ञानाने जे समजेल ते ज्ञान नसलेल्यालाही भक्ती केल्याने समजेल, हे पटत नाही. ज्ञान हा बुद्धीचा भाग आहे आणि भक्ती श्रद्धेचा प्रांत आहे. विज्ञान देव मानीतच नाही. मग, विज्ञाननिष्ठ, ज्ञानवंत आणि भक्त यांना देव कसा समजेल?’ 


सखे, हाच प्रश्न उद्धवाने (महाभारतकालीन) कृष्णाला विचारला होता, जेव्हा कृष्णाने त्याला देव समजण्यासाठी गोपींच्याकडे जायला सांगितले. कृष्ण सांगतो म्हणून उद्धव गोपींच्याकडे जाऊन राहिला. ज्या निर्गुण, निराकाराला  उद्धवाने ज्ञानाच्या माध्यमातून जाणले होते त्याच देवाला निरक्षर, अशिक्षित गोपी भरवत होत्या, त्याच्यासोबत खेळत होत्या, भांडत होत्या, त्याच्यावर प्रेमही करत होत्या. सर्व मानवी भावनांमधून आणि नात्यांमधून त्यांना विश्वाची रचना समजली होती. ज्ञानाच्या विरुद्ध भक्ती नाही. अहंकारविरहित ज्ञान म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे, टिळा, गंध, उपासना नव्हे. ज्ञान वजा अहंकार म्हणजे भक्ती. भक्त, ज्ञानी असण्यापेक्षाही ज्ञानी, भक्त असणे फार महत्त्वाचे आहे. आपण आजकाल सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत नाही. आपण ज्ञानी आहोत, सश्रद्ध व भक्त नाही. म्हणूनच, आपल्याला देव समजत नाही.

सखे, देव हा शब्दच मुळात दिव् या धातूपासून तयार झाला. ‘दिव्’ म्हणजे प्रकाशणे, चकाकणे.  देव याचे इतर संस्कृतीमध्ये समानार्थी शब्द पाहिले तर आश्चर्य वाटतं. संस्कृत ’देव’, प्राचीन नॉर्स ’तिवार’ लॅटिन ’देयूस’, लिथुनिअन ’दिवास’, इराणी ’दिअ’, केस्टिक- ’दिओस’, गॅलिक ’दिओग्नत’.  निसर्गपूजक सर्व संस्कृतींमध्ये हे देवासाठी एकसमान शब्द काय सांगतात? संपूर्ण जगात निसर्गपूजक व विश्वरचना जाणणार्‍या संस्कृतींचे सहअस्तित्व होते. प्रेषितांच्या पंथांनी जगभरातील या संस्कृती संपवल्या. उंच पिकांतून डोलणारा आणि बाळमुखातून बोलणारा देव केवळ प्रेषितांच्या माध्यमातून सांगू लागला आणि आपल्यापासून दूर गेला. इतका दूर की त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागली. त्याची भीतीही गेली आणि त्याच्यावरचा विश्वासही नष्ट झाला. त्याला समजणे कठीण, दुरापास्त झाले.

सखे, उपनिषदांमध्ये एक कथा आहे. शिष्य गुरूला विचारतो 'देव, ज्ञान म्हणजे काय?' गुरू सूर्याकडे बोट दाखवतो. रात्र होते. शिष्य विचारतो, 'आता ज्ञान म्हणजे काय?' गुरू चंद्राकडे बोट दाखवतो. अमावास्येच्या रात्री शिष्य पुन्हा तोच प्रश्न विचारतो. गुरू मिणमिणत्या दिव्याकडे बोट दाखवतो. थोड्यावेळाने वार्‍याचा झोत येतो आणि दिवा विझतो. शिष्य विचारतो, 'गुरुजी सूर्य दाखवून झाला, चंद्र दाखवून झाला शेवटी दिवाही दाखवलात. आता दिवा विझला. अंधार झाला आहे. आता कुणाकडे बोट दाखवणार?' गुरू त्याला विचारतात, 'वत्सा, अंधार आहे हे कशामुळे समजलं? अंधार आहे हे ज्याच्यामुळे समजलं तेच आत्मज्ञान, तेच ब्रह्म, तोच देव.' हेच सूत्र गौतम बुद्धांनी ‘आत्मदीपो भव:’ म्हणत मांडले आहे. या वैश्विक जाणिवेलाच चैतन्य, ब्रह्म अशी अनेक नावे वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ही वैश्विक जाणीव सर्वत्र आहे. 


‘देव देवळात आहे, तर तो सर्वत्र कसा असू शकेल आणि देव सर्वत्र आहे, तर त्याला देवळातच का बंदिस्त करायचे?’ 


सखे, आपण त्याला कसे पाहतो, समजतो त्यावर ते अवलंबून आहे. निर्गुण, निराकार चैतन्य सर्वत्र आहे. ते ब्रह्म एकच आहे. जेव्हा आपण त्याला सगुण साकार पाहतो, तेव्हा देव, देवस्थान याला महत्त्व येते. देवस्थानात आहे, म्हणजे तो इतरत्र नाही, असा त्याचा अर्थ नाही. तो निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही आहे. तो सर्वत्र आहे, मग देवळात का जावे, हा प्रश्न विचारणार्‍याने आधी स्वत:ला विचारावे, ‘तो सर्वत्र आहे, याची जाणीव मला झाली आहे, की फक्त तर्क मांडायचा म्हणून मांडतोय?’ खरोखरच ही जाणीव जर झाली असेल तर देवळाचे प्रयोजन त्याच्यापुरते राहत नाही. देवळाच्या असण्यानेही फरक पडत नाही आणि नसण्यानेही पडत नाही. फरक पडत नसल्याने देवाची मूर्ती फोडण्याची आणि देवळे पाडण्याचीही गरज उरत नाही. आपण बुतपरस्त (मूर्ती पूजा करणारे) नाही याचा अर्थ आपण बुतशिकन (मूर्ती तोडणारे) झालेच पाहिजे, असे नाही. ज्ञानवंतांनी श्रद्धावानांचा आदर राखावा आणि श्रद्धावानांनी ज्ञानवंतांचा. 

सखे, लहानपणी आई सांगायची, ‘वाईट बोलू नकोस, देवबाप्पा ऐकतोय. चुकीचं वागू नकोस, देवबाप्पा बघतोय...’ माझ्याही नकळत मी या मला पाहणार्‍या, ऐकणार्‍या देवबाप्पाला शोधायचो. तो दिसला नाही, पण तो आहे याची भीतीही वाटायची आणि धीरही वाटायचा. पुढे पुढे जास्त अक्कल आली तशी, देवबाप्पा वगैरे काही नसतो. उगाच आपल्याला भीती घालण्यासाठी सगळं सांगितलं जातं अशी भावना दृढ होत गेली. विज्ञानाचं वारं अंगावरून गेलं आणि आमच्या देवभक्तीला लकवा मारला. आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा देवाचा शोध सुरू केला तेव्हा तोच देव विज्ञान, ज्ञान आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन स्वत:च्या डोक्यात मोरपीस खोवून बासरी वाजवत बसलेला आढळला. 

सखे, आपण विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे देवपूजेला विरोध करणे किंवा हीन समजणे, असा भ्रम जाणीवपूर्वक तयार केला आहे. म्हणूनच आपण देवपूजा करणार्‍या शास्त्रज्ञाची, विज्ञाननिष्ठाची टिंगल उडवतो. विज्ञानाच्या अभ्यासकाने देव मानणे हे महापाप समजतो. विज्ञाननिष्ठ किंवा नास्तिक म्हणतात, 'देव असल्याचा पुरावा द्या मग आम्ही देव मानू. अन्यथा देव आहे, ही आस्तिकांची केवळ श्रद्धाच आहे. त्याला पुरावा नाही.' त्याच न्यायाने देव नसण्याचाही पुरावा नाही. म्हणजेच नास्तिकांनी देव नाही, असे म्हणणे हीसुद्धा नास्तिकांची श्रद्धाच आहे, त्याला पुरावा नाही.  

श्रद्धा आणि ज्ञान एकमेकांच्या विरुद्ध नाही, ते एकमेकांना पूरक असलेले आत्मविकासाचे टप्पे आहेत.  हे ओलांडल्यानंतर देव, ब्रह्म, चैतन्य, विश्वरचना याची प्रचिती येते. त्यामुळे, आपल्या मानण्यावर देवाचे अस्तित्व नाही. मानले तरी देव आहेच, नाही मानले तरी देव आहेच. हे देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे. 

सखे, चल आपण त्यांच्या आयुष्यात देवबाप्पाला पुन्हा आणू. आपणही त्यांच्यासोबत लहान होऊ. म्हणजे मग त्यातील कुणीही मोठे झाल्यानंतर एक प्रश्न विचारणार नाहीत.


‘कुठला?’


‘देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मानसीचा चित्रकार तो...




सखे, चित्र काढायला काय काय लागतं?

‘असा काय लहान मुलांना विचारल्यासारख प्रश्न मला विचारतोस? माझी फिरकी घ्यायची आहे का? चित्र काढायला पेन्सिल, कॅनव्हास आणि रंग लागतो.’

बस एवढंच?

‘हो! आणखी काय लागणार?’ 

सखे, चित्र म्हणजे काय? घाबरू नकोस. प्रश्नोत्तरांचा तास सुरू नाही करत. असे प्रश्न मला अनेकदा पडतात. अनेकांना विचारतोही. वेगवेगळी उत्तरे मिळतात. कुणी म्हणतं अनेक कलांपैकी एक कला आहे, तर कुणी म्हणतं कागदावर मारलेल्या रेघोट्या. ही केवळ उत्तरं नाहीत, हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. गणित आणि कला ही एकाच प्रवाहाची दोन टोकं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गणितच असतं. हे गणित जमू लागलं की त्याची कला होते. गणित सोडवणं किचकट असतं, कलेचा आविष्कार मनमोहक असतो. गणितं सोडवणार्‍याला चित्रापलीकडे असलेली कला पाहता येते. गणितातच अडकून पडलेल्यांसाठी त्या रेघोट्याच असतात.

सखे, अनेक वर्षांपूर्वी दीनानाथ दलालांचे चित्रप्रदर्शन पाहायला सेंट्रल लायब्ररीत गेलो होतो. तेव्हा, प्रत्येक चित्रासमोर स्तब्ध झालो. माझ्यामागून चित्र पाहून जाणार्‍यांचे चेहरे, ’काय यडपटासारखा बघत राहिला आहे?’ असं न बोलताही बोलून जायचे. दलालांच्या चित्रातली रेषन रेष बोलकी असते. प्रत्येक रंग आपला वेगळाच रंग दाखवत असतात. आपण जे पाहतो ते चित्र नसतच. आपल्याच भावभावना आपण पाहत असतो. चित्रामध्ये दिसणारी ’ती’, दलालांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रवती नसते, ती तर आपलीच सखी असते.  प्रत्येक चित्रामध्ये तू दिसू लागल्यानंतर मी वेड्यासारखा स्तब्ध होणार नाही तर आणखी काय होणार? 

‘पुरे हां! तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवायची एकही संधी सोडू नकोस.’

सखे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही मी असाच स्तब्ध झालो होतो. तो क्षण आजही जसाच्या तसाच मनावर रेंगाळला आहे. पी. सावळारामांचं एक गीत ऐकलं की तो क्षणही मनमोहक होतो. ’मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो’ हे गीत तू नक्की ऐक. हे गीत लिहिलंय सावळ्या रामाची उपाधी लाभलेल्या निवृत्तीनाथानेे, त्याला संगीत दिलं आहे वसंत प्रभूंनी आणि मखमली गळ्यातून उतरवलं आहे हृदयाच्या नाथाने. असा त्रिवेणी संगम नियती नावाच्या विचित्रकारालाही क्वचितच जमतो. 

सखे, या गीतामध्ये एक गंमत आहे. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र अशा तीन वेळा या गाण्यातून रेखाटल्या आहेत. रणरणती दुपार मात्र कवीने टाळली आहे. ही पोळून काढणारी दुपार कदाचित आयुष्याचा कॅनव्हास असावा ज्यावर हे तीन काळ आपले रंग, रूप दाखवून जातात. 

सखे, माझा एक चित्रकार मित्र आहे. अप्रतिम चित्रे काढतो. तो एकदा प्रेमात पडला. मग काय विचारता? प्रत्येक चित्र प्रेयसीचेच काढू लागला. ती कठड्यावर हात ठेवून उभी आहे आणि निसर्गसौंदर्य पाहते, हे चित्र त्यानं इतकं सुंदर काढलं होतं की, मलाही ते फार आवडलं. विचारलं त्याला, हा वेडेपणा का करतोस. तो म्हणाला, दुसरं काही सुचतंच नाही, तिच्याशिवाय कुंचल्यातून कुणीच कॅनव्हासवर साकारत नाही. त्याची प्रेयसी मात्र व्यवहारी निघाली. एका श्रीमंताशी लग्न ठरलं, तेव्हा बोलेनाशीच झाली. त्याचा फोनही घेईनाशी झाली. तो चित्र काढेल म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर स्वत:चे फोटोही ठेवणे तिने बंद केले. त्याला भेटणे तिने बंद केले. ती त्याला टाळू लागली.  अर्थात पुढे जे व्हायचं तेच झालं. 

तिचं लग्न झाल्यानंतर सहज एकदा मित्राला भेटायला गेलो. त्याच्या प्रेयसीचं त्यानं काढलेलं जे चित्र मला आवडलं होतं तेच तो पुन्हा चितारत होता. तोच निसर्ग होता, तोच कठडाही होता. फक्त त्यात कठड्यावर हात ठेवून उभी असलेली प्रेयसी नव्हती. विचारलं त्याला, चित्रात ती का नाही? तो एवढंच म्हणाला, चित्रातून तिला दूर करणं सोपं होतं, मनातून कसं दूर करू? त्याच्या मनाच्या कॅनव्हासवरून तिच्या स्मरणाचं चांदणं काही केल्या सरतच नव्हतं. त्याच्या मानसीचा चित्रकार तिचंच चित्र काढत होता आणि माझा मित्र तिचं चित्र काढत नव्हता, कुठलंंच चित्र काढत नव्हता. ही अवस्था म्हणजेच त्या गाण्यात टाळलेली टळटळीत दुपार. 

सखे, तिची भेट त्याच्यासाठी पहाटेचे रंग भरणारी निळी मोहिनीच होती. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत विरह देणारी संध्याकाळही मोहकच होती. नक्षत्रांचा निळा चांदवा झरवणारी रात्रही स्वप्नवत होती. पण, ती सोडून गेल्यानंतर पुन्हा कधीच, काहीच रम्य राहिलं नाही. त्याला चित्र काढणं त्यानंतर जमलंच नाही कधी. का माहिती आहे? 

‘का?’

सखे, त्याच्याकडे कॅनव्हास होता, पेन्सिल होती, रंग होते. फक्त अंतरंग नव्हते.