सखे, आपलं मन कधी कुणावर लुब्ध होईल आणि कुणावर कधी क्षुब्ध होईल, हे आपलं आपल्यालाही कळत नाही. त्याचं वर्णन शब्दात करणं तर फारच अवघड. तू मला का आवडतेस हे सांगणंही तसंच अवघड. भावना ही फार थोड्या प्रमाणात शब्दातून व्यक्त होऊ शकते. शब्द हे भावना व्यक्त होण्याचं, करण्याचं सशक्त माध्यम नाही. साधं पाहणं, एक स्पर्श जेवढ्या प्रभावीपणे भावना व्यक्त करू शकेल, तेवढ्या प्रभावीपणे शब्द करू शकतीलच असं नाही. शब्दाला जसं अर्थाचं वरदान असतं, तसंच अनर्थाचा शापही असतो. शब्दाचा अर्थ शब्दातच असतो असं म्हणणं काही अंशी खरं आहे. पण, तो शब्दाच्या उच्चारणातही असतो. ज्या पद्धतीने तो उच्चारला जाईल त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. शब्दामागे लावलेला सूर त्याच्यातला शब्दार्थ बदलून टाकतो.
‘शब्द हा अर्थ घेऊन जाणारं माध्यम आहे, असं तू नेहमीच म्हणतोस. मग, आता असं कसं म्हणतोस की, शब्दात अर्थही असतो आणि अनर्थही असतो?’
सखे, मला शब्दांत पकडायला तुला फार आवडतं. त्याऐवजी मलाच पकडलं असतस ना, तर सगळे अर्थ आपोआप समजले असते. आता, हेच बघ ना! मिठीतली मिठास ‘मिठी’ या शब्दातून जास्त प्रभावीपणे व्यक्त होईल की प्रत्यक्ष तुझ्या मिठी मारण्याने होईल?
‘तुला दुसरं काही सुचतं का रे त्याशिवाय? आपलं म्हणणं दुसर्याच्या गळी कसं उतरवायचं हे छान जमतं तुला. या रोमेंटिसिझममध्ये तू कायम रममाण असतोस. त्याऐवजी काही केले असतेस, तर आज खूपच श्रीमंत, यशवंत झाला असतास. पण नाही. सदान्कदा मेला तो रोमेंटिसिझम. काय मिळतं रे यातून?’
सखे, कशातून काय मिळतं, याचा विचार करणं मी फार आधी सोडून दिलं आहे. आपल्यातला हा वाद काही संपता संपणार नाही. प्रसिद्ध असलेल्या हिंदी किंवा मराठी गाण्याचे बोल नीट समजावून, त्यातला अर्थ समजून मग ते उच्चारले तरच गाणं व्यवस्थित होतं. ‘शब्द म्हणजे सूर अडकवण्याच्या खुंट्या’ हा विचार एकदा परिधान केला म्हणजे गायक उघडा पडतो. एका कार्यक्रमात मी अभिषेकीबुवांनी गायलेलं ‘मन लोभले, मनमोहने’ हे गाणं ऐकलं. गाणार्या गायकाने ते, ‘मन लोभले, मन मोहले’ असं गायलं होतं. मोघ्यांनी यमक जुळवण्यात चूक केली असावी, असं कदाचित त्याला वाटलं असावं. त्यासाठी गाण्याचा विशेष अभ्यास करावा लागतो. अभिषेकी बुवांनी गायलेलं मूळ गीत ऐक. शब्दांचं उच्चारण, शब्दावर जोर देणं, हे खरंच अभ्यासाचे विषय आहेत. बुवा आणि बाबुजी, ‘ष’ अक्षराचं उच्चारण कसं करतात, हे मुद्दाम ऐक. अनेकांना जमत नाही.
सखे, राम फाटक हे अभिषेकीबुवांच्या घरी गेले असता, बुवांनी त्यांना मनरंजनी या रागातील एक बंदीश ऐकवली. त्या बंदिशीतले सूर काही रामभाऊंच्या डोक्यातून जाईना. ते तडक सुधीर मोघ्यांकडे आले आणि त्यांना हे सूर ऐकवले. रामभाऊंनी अधीरपणे सुधीर मोघेंना विचारलं, ‘लिहिशील का रे एखादी कविता या सुरावटीवर?’ त्या रागाचं ‘मनरंजनी’ हे नाव मोघ्यांना फार आवडलं. त्यातूनच मनमोहने हा शब्दही सुचला. त्यानंतर हे अप्रतिम गीत जन्माला आलं.
सखे, ऐकताक्षणी आवडलेलं हे गीत तू भेटल्यानंतर अधिकच आवडू लागलं. आपल्याला आलेल्या व्यक्तिगत अनुभवाशी जेव्हा एखाद्या गीताची नाळ जुळते, तेव्हा ते गीत माणसाला आवडतं. तुला पाहिल्यानंतर, तुझ्या सहवासात जे जे अनुभवलं त्याचं शब्दांकन मोघ्यांनी केलं. तुझ्याशी परिचय झाल्यानंतर सुरुवातीला झालेले जुजबी संवादही माझ्या मनात झंकारत राहायचे. बोलता बोलता तुझं ते केसांच्या बटा मागे सारणं, लयीत हलणारे हात, ब्रेसलेटला लटकणार्या लहान घंटांचा नाद आणि या सगळ्यावर वरताण करणारं तुझं स्मितहास्य. हे सगळं जीवघेणं होतं. तुझं बोलणं साधंच होतं, पण प्रत्येक शब्द नादमधूर गाण्याखाली नुकतीच आंघोळ करून केस पुसत यायचा. एरव्ही कानांना तृप्त करणारे तुझे शब्द, नेत्रांनाही तेच सुख देऊन जायचे.
सखे, तुला आठवतं आपली पहिली भेट कुठे झाली होती? बागेत. तू मोगरीचे कळे वेचत होतीस आणि माझं तुझ्याकडे लक्ष गेलं. तू वाकून कळ्या वेचत होतीस आणि तुझी प्रत्येक हालचाल माझे हाल करीत होती. तुला अनिमिष पाहत असताना अचानक मागे वळून तू माझ्याकडे पाहिलंस. नजरेला नजर मिळाली आणि त्या क्षणी हृदयाचा ठोका चुकला. हृदयात प्रेमाची कळी उमलली, फुलली. हृदयी प्रेमाची कळी फुलली की स्पंदनेही सुगंधी होतात. आतबाहेर सर्वत्र सदासर्वदा ऋतू वसंत ठाण मांडतो. ज्या क्षणी तू पाहिलंस त्या क्षणी आत जाणीव झाली की, जिला शोधत होतो ती हीच आहे. जन्मजन्मांतरीचं नातं असल्याची खूणगाठ एका नजरभेटीने समजली होती. तू माझीच आहेस हे समजायला उशीर नाही लागला. माझ्याही नकळत माझं मन तुझं झालं. एका नजरेने केलेली ही नजरबंदी शब्दात सांगणं कठीण आहे. शब्दांनी फक्त शब्दच पोहोचतील. ही नजरबंदी कशी पोहोचेल?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा