गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

‘आय लव्ह यू’, ‘आय डोन्ट’


सखे, आपण अनेक वाक्यं फारच सहज उच्चारत असतो. त्याच्यामागे असलेल्या अर्थाशी आपण प्रामाणिक असतोच असं नाही. अनेकदा तो अर्थ आपल्याला माहीतही नसतो. तरीही आपण अर्थाशिवाय वाक्य उच्चारतो आणि अर्थाशिवाय ऐकतो. आश्‍चर्य वाटलं ना. आता प्रेमाचंच बघ ना! म्हणताना म्हणतो आपण, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ खरंच असतं का आपलं प्रेम? की आपण सवयीनं म्हणायचं म्हणून म्हणतो? तुझ्या चेहराच सांगतोय तुला नाही पटलं. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो, ती ऐक..

फार फार वर्षांपूर्वी एक तरुण एका तरुणीला भेटला. पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली. ती दिसायला सुंदर होती, तो नव्हता. नंतर पुढे भेटी वाढत गेल्या. त्यांचं जुळलं, यथावकाश लग्नही झालं. मुलंही झाली. प्रत्येकाच्या संसारात अडचणी येतात, सुखाचे क्षण येतात, दु:खाचे क्षण येतात तसेच त्यांच्याही आयुष्यात आले. कुठलाही क्षण स्थिरावला नाही, कायमचा झाला नाही. एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे दोन वाक्यं.  


तो म्हणायचा आय लव्ह यू

ती म्हणायची आय डोन्ट


सखे, आपण थोडं मागे जाऊ. अगदी सुरुवातीला जेव्हा ती दोघं भेटली तेव्हा. ती नोकरी करायची. त्याचा फिरस्तीचा व्यवसाय होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण, अनेक आडकाठ्या होत्या. त्याच्या नातलगांनी, ‘तुला आणखी कोण मुलगी देणार?’, ‘म्हशीबरोबर लग्न कर’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे लग्न करणे ही त्याच्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट झाली होती. तिला ती करत असलेली नोकरी सोडायची नव्हती. तिला सांगून येत असलेली स्थळं, लग्नानंतर नोकरी केलेली चालणार नाही अशी अट घालणारी होती. ती दोघंही त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून भेटली. गप्पा झाल्या. लग्नानंतरही नोकरी करण्यास त्याची काहीच हरकत नव्हती. त्यामुळे तिच्यासाठी एक मार्ग मोकळा झाला होता. ती तयार झाली. त्यालाही तिचं तयार होणं हवंच होतं. कारण; 


त्याची ती गरज होती

तिच्यासाठी सोय होती


सखे, त्यांचा संसार सुरू झाला. सुखाचा होता का? माहीत नाही. पण, बहुधा दु:खी नसावा. कारण तो टिकला. त्याला आयुष्यात कुठलीच गोष्ट साधी सरळ मिळाली नव्हती. म्हणजे बघ ना, समजा एखाद्याला दोन अधिक दोन चार एवढं साधं सरळ गणित सुटतं. त्याच्याबाबतीत एक अधिक दोन वजा एक अधिक दोन असं करत करत कसंबसं चार हे उत्तर यायचं. उत्तरही तेव्हा सापडायचं जेव्हा प्रश्‍न निरर्थक झालेला असायचा. तिचं सगळी गणितं व्यवस्थित सुटायची. पण, हे व्यवस्थित सुटणंच तिला नको असायचं. आयुष्य सरळ आणि सोपं झालं तर जगण्यात अर्थच उरणार नाही असं तिला वाटायचं. 


त्याला सुख मिळत नव्हतं

तिला सुख पचत नव्हतं


सखे, परस्पर विरोधी स्वभावामुळे त्यांची कायम भांडणं व्हायची. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ सुखाचा गेला असं कधी झालंच नाही. पण, तरीही तो तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि ती त्याला आय डोन्ट. आता मला सांग, त्या त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ होता का? असलाच तर त्यांना तो माहिती होता का?

‘तू मला असे विक्रम वेताळ टाइप प्रश्‍न नको विचारूस. हे बरं आहे, कथा सांगायची आणि शेवटी प्रश्‍न विचारायचे. नशीब माझं, चुकीचं उत्तर दिलंस तर डोक्याची शंभर शकले होतील म्हणाला नाहीस.’

सखे, रागावतेस काय अशी? बरं मीच देतो उत्तर. मग तर झालं? शब्द हे अर्थ, भावना पोहोचवण्याचं माध्यम असतात. आपल्याला जे सांगायचं आहे, ते नेमकेपणाने पोहोचवण्याचं काम शब्दांचं. पण, शब्द त्याच गोष्टीचा प्रत्यय देतात ज्याला आकार आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. 

‘झालं, तुझं अगम्य तत्त्वज्ञान सुरू झालं. काही कळत नाही. तू बोलतोस ते.’

सखे, मी साखर हा शब्द उच्चारला तर तुला साखर म्हणजे काय ते कळेल. तू आणूनही दाखवशील. पण, समजा मी म्हणालो, ‘साखर गोड आहे’, तर गोड असणं म्हणजे काय, हे तू सांगू शकशील? जे निर्गुण आणि निराकार आहे, ते शब्दातून व्यक्त करता येत नाही, ही शब्दाची मर्यादा आहे. प्रेम हे निर्गुण निराकार आहे. ते शब्दांतून प्रत्ययाला येत नाही. मग, आपण जे एकसारखं 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' म्हणतो, त्याला अर्थ काय असतो?

‘मला काही कळालं नाही. कळणारही नाही. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. तो आय लव्ह यू म्हणायचा आणि ती आय डोन्ट म्हणायची, त्याचं काय ते सांग.’


तो खोटं बोलत होता

ती खरं बोलत होती

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

मन लोभले मनमोहने ...

सखे, आपलं मन कधी कुणावर लुब्ध होईल आणि कुणावर कधी क्षुब्ध होईल, हे आपलं आपल्यालाही कळत नाही. त्याचं वर्णन शब्दात करणं तर फारच अवघड. तू मला का आवडतेस हे सांगणंही तसंच अवघड. भावना ही फार थोड्या प्रमाणात शब्दातून व्यक्त होऊ शकते. शब्द हे भावना व्यक्त होण्याचं, करण्याचं सशक्त माध्यम नाही. साधं पाहणं, एक स्पर्श जेवढ्या प्रभावीपणे भावना व्यक्त करू शकेल, तेवढ्या प्रभावीपणे शब्द करू शकतीलच असं नाही. शब्दाला जसं अर्थाचं वरदान असतं, तसंच अनर्थाचा शापही असतो. शब्दाचा अर्थ शब्दातच असतो असं म्हणणं काही अंशी खरं आहे. पण, तो शब्दाच्या उच्चारणातही असतो. ज्या पद्धतीने तो उच्चारला जाईल त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. शब्दामागे लावलेला सूर त्याच्यातला शब्दार्थ बदलून टाकतो. 

‘शब्द हा अर्थ घेऊन जाणारं माध्यम आहे, असं तू नेहमीच म्हणतोस. मग, आता असं कसं म्हणतोस की, शब्दात अर्थही असतो आणि अनर्थही असतो?’

सखे, मला शब्दांत पकडायला तुला फार आवडतं. त्याऐवजी मलाच पकडलं असतस ना, तर सगळे अर्थ आपोआप समजले असते. आता, हेच बघ ना! मिठीतली मिठास ‘मिठी’ या शब्दातून जास्त प्रभावीपणे व्यक्त होईल की प्रत्यक्ष तुझ्या मिठी मारण्याने होईल?

‘तुला दुसरं काही सुचतं का रे त्याशिवाय? आपलं म्हणणं दुसर्‍याच्या गळी कसं उतरवायचं हे छान जमतं तुला. या रोमेंटिसिझममध्ये तू कायम रममाण असतोस. त्याऐवजी काही केले असतेस, तर आज खूपच श्रीमंत, यशवंत झाला असतास. पण नाही. सदान्कदा मेला तो रोमेंटिसिझम. काय मिळतं रे यातून?’

सखे, कशातून काय मिळतं, याचा विचार करणं मी फार आधी सोडून दिलं आहे. आपल्यातला हा वाद काही संपता संपणार नाही. प्रसिद्ध असलेल्या हिंदी किंवा मराठी गाण्याचे बोल नीट समजावून, त्यातला अर्थ समजून मग ते उच्चारले तरच गाणं व्यवस्थित होतं. ‘शब्द म्हणजे सूर अडकवण्याच्या खुंट्या’ हा विचार एकदा परिधान केला  म्हणजे गायक उघडा पडतो. एका कार्यक्रमात मी अभिषेकीबुवांनी गायलेलं ‘मन लोभले, मनमोहने’ हे गाणं ऐकलं. गाणार्‍या गायकाने ते, ‘मन लोभले, मन मोहले’ असं गायलं होतं. मोघ्यांनी यमक जुळवण्यात चूक केली असावी, असं कदाचित त्याला वाटलं असावं. त्यासाठी गाण्याचा विशेष अभ्यास करावा लागतो. अभिषेकी बुवांनी गायलेलं मूळ गीत ऐक. शब्दांचं उच्चारण, शब्दावर जोर देणं, हे खरंच अभ्यासाचे विषय आहेत. बुवा आणि बाबुजी, ‘ष’ अक्षराचं उच्चारण कसं करतात, हे मुद्दाम ऐक. अनेकांना जमत नाही. 

सखे, राम फाटक हे अभिषेकीबुवांच्या घरी गेले असता, बुवांनी त्यांना मनरंजनी या रागातील एक बंदीश ऐकवली. त्या बंदिशीतले सूर काही रामभाऊंच्या डोक्यातून जाईना. ते तडक सुधीर मोघ्यांकडे आले आणि त्यांना हे सूर ऐकवले. रामभाऊंनी अधीरपणे सुधीर मोघेंना विचारलं, ‘लिहिशील का  रे एखादी कविता या सुरावटीवर?’ त्या रागाचं ‘मनरंजनी’ हे नाव मोघ्यांना फार आवडलं. त्यातूनच मनमोहने हा शब्दही सुचला. त्यानंतर हे अप्रतिम गीत जन्माला आलं.

सखे, ऐकताक्षणी आवडलेलं हे गीत तू भेटल्यानंतर अधिकच आवडू लागलं. आपल्याला आलेल्या व्यक्तिगत अनुभवाशी जेव्हा एखाद्या गीताची नाळ जुळते, तेव्हा ते गीत माणसाला आवडतं. तुला पाहिल्यानंतर, तुझ्या सहवासात जे जे अनुभवलं त्याचं शब्दांकन मोघ्यांनी केलं. तुझ्याशी परिचय झाल्यानंतर सुरुवातीला झालेले जुजबी संवादही माझ्या मनात झंकारत राहायचे. बोलता बोलता तुझं ते केसांच्या बटा मागे सारणं, लयीत हलणारे हात, ब्रेसलेटला लटकणार्‍या लहान घंटांचा नाद आणि या सगळ्यावर वरताण करणारं तुझं स्मितहास्य. हे सगळं जीवघेणं होतं. तुझं बोलणं साधंच होतं, पण प्रत्येक शब्द नादमधूर गाण्याखाली नुकतीच आंघोळ करून केस पुसत यायचा. एरव्ही कानांना तृप्त करणारे तुझे शब्द, नेत्रांनाही तेच सुख देऊन जायचे. 

सखे, तुला आठवतं आपली पहिली भेट कुठे झाली होती? बागेत. तू मोगरीचे कळे वेचत होतीस आणि माझं तुझ्याकडे लक्ष गेलं. तू वाकून कळ्या वेचत होतीस आणि तुझी प्रत्येक हालचाल माझे हाल करीत होती. तुला अनिमिष पाहत असताना अचानक मागे वळून तू माझ्याकडे पाहिलंस. नजरेला नजर मिळाली आणि त्या क्षणी हृदयाचा ठोका चुकला. हृदयात प्रेमाची कळी उमलली, फुलली. हृदयी प्रेमाची कळी फुलली की स्पंदनेही सुगंधी होतात. आतबाहेर सर्वत्र सदासर्वदा ऋतू वसंत ठाण मांडतो. ज्या क्षणी तू पाहिलंस त्या क्षणी आत जाणीव झाली की, जिला शोधत होतो ती हीच आहे. जन्मजन्मांतरीचं नातं असल्याची खूणगाठ एका नजरभेटीने समजली होती. तू माझीच आहेस हे समजायला उशीर नाही लागला. माझ्याही नकळत माझं मन तुझं झालं. एका नजरेने केलेली ही नजरबंदी शब्दात सांगणं कठीण आहे. शब्दांनी फक्त शब्दच पोहोचतील. ही नजरबंदी कशी पोहोचेल?

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

आनेवाला पल जानेवाला है...


सखे, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो क्षण, त्या क्षणीच जगायचा असतो. तो येण्याआधी त्याला जगणे हे दिवास्वप्न आहे आणि तो निघून गेल्यानंतर आपल्यासाठी तो स्वप्न म्हणून आठवणीत राहतो. आधी आणि नंतर फक्त वंचनाच पदरी येते. त्याला त्या क्षणी जगणारे जगून जातात. 

’प्रत्येक क्षण जगला पाहिजे, हे समजलं. पण, आधीची आणि नंतर होणारी वंचना नाही समजली.’ 

सखे, आपण एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्यकाळात. भूतकाळातील घटना कितीही रमणीय असल्या तरी त्या घडून गेलेल्या असतात. भविष्यकाळ असा चांगला असेल, तसा चांगला असेल याच्या कल्पनासुद्धा रमणीय असतात. दोन्ही ठिकाणी मन रमतं. वास्तविक ते वर्तमानकाळात रमलं पाहिजे. ज्यांचं मन केवळ वर्तमानात असतं, त्यांचा गतकाळही संस्मरणीय असतो आणि येणारा काळही. 

’हे खरं आहे की, माणूस बहुतांशी भूतकाळातल्या चांगल्या आठवणींशी आणि भविष्यातील स्वप्नांत गुंग होऊन जातो. पण, असं का घडतं? वर्तमानात फार वेळ का राहता येत नाही?’

सखे, याचं उत्तर कदाचित माझ्याकडेही नाही. मी ते शोधतोय. गेलेले क्षण आणि येणारे क्षण हे फसवे समाधान देणारे असतात. त्यांना ओढून ताणून वर्तमानाशी जोडू लागलो की, आत्मवंचनेशिवाय हाती काहीच लागत नाही. आपण गृहीत धरून चालतो, ’जे आहे ते असंच राहणार आहे’. जे आज मिळत आहे, ते कायम असंच मिळत राहणार आहे. जे आहे ते जाईल, याचा विचारही मनात भीती निर्माण करून जातो. ’जाणं’ सूचित करणारी प्रत्येक गोष्ट माणूस अप्रिय किंवा वाईट ठरवत जातो.  मग तो नाश असो, र्‍हास असो, मृत्यू असो, सवयी घालवणारा नियम असो किंवा प्राण हरण करणारा यम असो. अगदी दक्षिण दिशाही आपण अपवित्र ठरवतो. येणारा क्षण असाच राहणार आहे, तो जाणार नाही, यासारखी दुसरी फसगत नाही. आपण असो किंवा क्षण असो, जाण्यासाठीच येतो. 

सखे, बघ तुझा चेहराही बदलला. चल. तुझा मूड ठीक करण्यासाठी एक छानसं गाणं ऐकवतो. गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. संगीत पंचमदांचं आणि आवाज किशोर कुमार यांचा. ’आनेवाला पल जानेवाला है’ हे गीत तू ऐकलं असशील, तरीही पुन्हा ऐक. खूप सुंदर शब्द आहेत. खूप चांगला विचार आहे. सामान्यत: आपले विचार हे एका मर्यादेपर्यंत जाणारे असतात. त्यापलीकडे जाणं आपल्याला जमत नाही. आपलं आयुष्य म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्राप्त झालेल्या क्षणांचा संचय असतो. आयुष्यात अनेक क्षण घालवणे आपल्याला माहीत असतं, पण एका क्षणात संपूर्ण आयुष्य सामावणं आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असतं. समुद्रात अनेक थेंब आहेत याची कल्पना असते. प्रत्येक थेंबात समुद्र असतो, ही आपल्या कल्पनेपलीकडली गोष्ट असते. 

’तुझं आपलं काहीतरीच. कविकल्पना म्हणून ठीक आहे. पण, एका क्षणात कसं आयुष्य जगता येईल?’

सखे, येणारा क्षण हा शेवटचाच क्षण आहे या आर्ततेने तो क्षण जग. जे सबंध आयुष्य जिवंत राहून मिळालं नाही, ते हा एक क्षण जगण्यानं मिळून जाईल. अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं तर, ’बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.’ हे बघ. आता कशी हसलीस!  एका क्षणात सबंध आयुष्य जगता येईल, असा क्षणच आयुष्याचं सोनं करून जातो. आपल्या आयुष्याचं सोनं करून जाणारा तो क्षण नेमका त्यावेळी पकडता येत नाही, सांगता येत नाही आणि धरूनही ठेवता येत नाही. 

एकदा एका वाटसरूला एका निर्जन स्थळी एक म्हातारा दिसतो. म्हातार्‍याच्या पाठंगुळीला सोन्याच्या सळ्यांची मोळी असते. एका हातात लोखंडाचा लहानसा तुकडा घेऊन तो म्हातारा मिळेल तो दगड त्या तुकड्याला लावून पाहतो व फेकून देतो. त्याला वाकवत नसतं, चालवत नसतं. तरीही तो म्हातारा कसातरी कण्हत, कुढत पुन्हा पुन्हा दगड उचलून लोखंड्याच्या तुकड्याला लावून पाहत असतो व फेकून देत असतो. वाटसरूला मोठं आश्‍चर्य वाटतं. हा वयोवृद्ध माणूस पाठीवर सोन्याच्या सळ्यांची मोळी वागवीत, हातातल्या लोखंडाला दगड का लावतो? वाटसरू त्याला थांबवतो आणि विचारतो, ’आजोबा, तुम्ही हे काय करता आहात?’ 

’मी परीस शोधतोय’

’परीस म्हणजे तोच दगड ना जो लोखंडाला सोनं करतो तो? तुमच्या पाठीवर तर सोन्याची मोळी आहे. मग, एवढ्याशा लोखंडाच्या तुकड्याला सोनं करायच्या मागे का लागला आहात?’

म्हातारबुवा विषण्ण हसतो.

’मुला मी तरुणपणी पाठीवर लोखंडाचा भरा घेऊन बाहेर पडलो होतो. परिसाच्या शोधात. मिळेल तो दगड उचलायचो आणि पाठीवरच्या लोखंडाला लावायचो. लोखंडाचं सोनं झालं नाही हे पाहून निराशेने दगड टाकून द्यायचो. लोखंडाला दगड लावून तो टाकून द्यायची इतकी सवय झाली होती, की पाठीवरल्या लोखंडाचं सोनं कधी झालं हे कळलंच नाही.’

सखे, आपल्या वाट्याला येणारा क्षणही असाच कधीतरी आपल्या आयुष्याचं सोनं करून गेलेला असतो. त्याला धरून ठेवता येत नाही. येणारा क्षण जाणाराच असतो. मग तो दु:खाचा असो किंवा सुखाचा. येणारा प्रत्येक क्षण एक हुरहुर मात्र कायम देऊन जातो. क्षण दु:खाचे असतील तर सुखाची हुरहुर आणि क्षण सुखाचे असतील तर ते धरून ठेवता आले नाहीत, याची हुरहुर.

सखे, क्षण हे फुलपाखरासारखे असतात. आपण त्यांना चिमटीत धरायला जावं तर ते उडून जातात. जाताना आपल्या बोटांना रंग लावून जातात. निसटलेल्या फुलपाखरावर भाळायचं की बोटांना न कळत चिकटलेल्या रंगांना आपल्या अंतरंगात सांभाळायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. क्षणावर भाळणारी माणसं त्याच्यामागे पळतात. क्षण सांभाळणारी माणसं स्थिर असतात. कारण, त्यांना माहीत असतं, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा जगण्यासाठीच असतो.