शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

तो राजहंस एक...

आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...

‘मी काय करू सांग ना रे?’

सखे, तू असा ओठांचा चंबू करून प्रश्न विचारला की, मला एक प्रश्न पडतो. तुझ्या ओठांनी टाकलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ की, तू विचारलेल्या?

‘चावटपणा पुरे झाला. तू मला सखी म्हणतोयस खरा, पण आपल्या वयातील अंतर पाहिले आहेस का? यावर ते गेल्या खेपेला ऐकवलंस तसं, ‘ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो’ या ओळी  असलेलं गीत नको ऐकवूस.’

सखे, तुझं वयात येणं खरं तर माझ्यासाठी अडचणीचं झालं आहे. आधी तू किती छान मोकळेपणी बोलायचीस. त्या संवादाला आधीच ठरवलेल्या अर्थाचे कंगोरे नसायचे. जाऊ दे. भांडण होईल आपलं. काय झालं ते सांग.

‘ही दहावी म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखी झाली आहे. ‘पुढे काय करणार तू?’ हा प्रश्न मला सगळ्या नातेवाइकांनी विचारून झालाय. मला काय करायचं आहे, हे सांगितलं तर ते कसं चुकीचं आहे, हेच प्रत्येकजण ऐकवतो. बरं, ‘नाही ठरवलं अजून’, असं म्हटलं तर प्रत्येका जास्तच चेव येतो. मोबाइलमध्ये गुरफटलेल्या पिढीपासून ते ‘आमच्यावेळी हे असं नव्हतं’ इथपर्यंत सगळे विषय येऊन जातात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता मी आर्टस्ला जायचं ठरवलं तर केवढा गहजब घरात! एका नातेवाइकांनी तर अशा काही तुच्छतेने पाहिलं की, बेचाळीस पिढ्या नरकातच गेल्याचा भास झाला.  मला इंग्रजी हा विषय घेऊन आर्टस् करायचे आहे, तर आईबाबांना वाटते मी एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग करावे. आता मला सांग मी करू तरी काय?’

सखे, ही शेकडा नव्वद घरांतल्या मुलांची समस्या आहे. आईवडिलांच्या अपेक्षा, नातेवाइकांचे सल्ले यातून गोंधळलेली मुलं हे घराघरांतील चित्र आहे. याला एकच एक कारण जबाबदार आहे, असं म्हणता येणार नाही. शिक्षणव्यवस्थेपासून ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व गोष्टी याला जबाबदार आहेत. त्या सगळ्या घोळात तू नको पडूस. तू छानपैकी एक गीत ऐक. गदिमांनी लिहिलं आहे आणि खळेकाकांनी स्वरबद्ध केलेलं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे अप्रतिम गीत ऐक. आशाताईंनी गायलेल्या या गीतातील शेवटच्या कडव्याचा शेवट जिथे होतो, तिथून पुन्हा ध्रुवपद येत नाही. एकदा ते अढळपद प्राप्त झालं की, ध्रुवपदावर यायचंही नसतं.

सखे, आपण सर्वांना सर्व शिक्षण या चक्रात अडकलो आहोत. यात उपजत आपल्याजवळ काय आहे, याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही. हे उपजत गुण वेळेत शोधले तर कुठल्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्याचा मार्ग निश्चित होतो. एखादे मूल गणितात हुशार असेल तर त्याला इंग्रजी व इतिहास या विषयांत कमी पडलेले गुण त्याची एकूण मार्कांची टक्केवारी खाली आणतात. केवळ गणित हाच विषय घेऊन त्याला पुढे जाता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. इतर विषयांत जरी त्याला काठावर मार्क पडले तरी जेवढे गणितात पडले आहेत, तेवढी त्याची एकूण टक्केवारी धरली जात नाही. याचा सर्वांत मोठा दोष म्हणजे पडलेल्या गुणांवरून गुणवत्ता ठरवली जाते.

ज्या दिशेने आपल्याला जायचे आहे, तेवढे मार्क मिळवण्यासाठी आपण धडपडतो. अन्यथा, जेवढी आपली टक्केवारी आहे त्यानुसार आपला मार्ग निवडणे हा पर्याय शिल्लक राहतो. ‘शिक्षणाची कुठलीच शाखा दुय्यम नसते’ असं कायम म्हणणारी माणसं कला शाखेत जाणार्‍या मुलांकडे तुच्छतेने पाहतात. अमुक इतके मार्क पडले तर विज्ञान, अमुक इतके पडले तर कॉमर्स, अमुक इतके पडले तर इंजिनिअरिंग अशी गुणांप्रमाणे केलेली गुणवत्तेमधील उच्चनीचता या समानताप्रेमी विचारवंतांना खटकत नाही. 

सखे, आपली दिशा काय असावी, हे आपल्याला पडलेले ‘मार्क्स’ ठरवतात आणि समाजाची दिशा काय असावी, हे ‘मार्क्सवादी’ ठरवतात यासारखे दुर्दैव दुसरे नाही! 

सखे, आपले नातेवाईक आप्तही विद्येच्या या शाखांकडे पोटापाण्याच्या व्यवस्थेपलीकडे जाऊन पाहत नाहीत. ‘कुठे गेल्यावर अधिक स्कोप आहे?’ हा विचार पालकांच्या मनात येणे चुकीचे नाही. आपल्या मुलांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता लाभावी, पुढील आयुष्य किमान पैशाच्या दृष्टीने तरी ‘सेफ झोन’मध्ये असावं असं वाटण्यात काहीच गैर नाही. 

‘त्यांचे चूक नाही, याचा अर्थ माझं चुकतंय असं तुला म्हणायचं आहे का?’

सखे, कायम चूक विरुद्ध बरोबर असा संघर्ष नसतो. आईबाबा बरोबर म्हणजे तू चूक आणि तू बरोबर म्हणजे ते चूक असं नसतं. दोघेही आपापल्या विचारांच्या कक्षेत बरोबर आहात. फक्त ते सिद्ध करण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. 

‘म्हणजे तू म्हणतोयस की, आय हॅव टू प्रूव्ह देम राँग.’

नाही सखे, ते चुकत आहेत हे तुला नाही सिद्ध करायचं. तुला हे सिद्ध करायचं आहे की, तू बरोबर आहेस. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण, त्यासाठी तुला आधी स्वत:ला ओळखलं पाहिजे. बुद्धी ही एक ऊर्जा आहे. आपण तिला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने ती वळते. आपल्याच मनाला घातलेले भीतीचे बांध आपल्याला ऊर्जेला वळवण्यापासून रोखतात. तुला इंग्रजी विषय घेऊन आर्टस् का करायचं आहे, याचा पक्का व पूर्ण विचार तू कर. आत्तापर्यंत तू किमान जेवढे टक्के मिळवीत आली आहेस, ते ९५ टक्के मार्क मिळव आणि  मग तू आर्टस्ला जा. कमी मार्क मिळाले म्हणून आर्टस्चा पर्याय नाइलाजाने निवडावा लागला, असे म्हणायला जागा ठेवू नकोस. त्यावरही तुझा निर्णय कसा चुकीचा आहे, हे इतरांच्या अनुभवाने तुला सांगण्याचा प्रयत्न होईलच. तो अजिबात मनावर घेऊ नकोस. ठामपणे वाटचाल करीत राहा. 

सखे, सर्वांत आधी आपल्याला ज्या दिशेने, ज्या शाखेला जायचे आहे, त्यात उपजत गती आहे का, याचा विचार कर. केवळ तुझी मैत्रीण किंवा मित्र आर्टस् करतात म्हणून तू जाऊ नकोस. आपली आवड आणि आपली गती यांचा ताळमेळ कितपत बसतो याचा विचार कर. ‘मी कोण आहे’, ‘मला काय येतं’ आणि ‘मी आता काय केलं पाहिजे’ या तीन प्रश्नांची उत्तरे कायम स्वत:ला विचारत राहा. या प्रश्नांची तुला स्वत:ला मिळालेली उत्तरे तुझ्यातील भय आणि वेड दोन्ही घालवतील. मग, ‘मी काय करू?’ हे मला विचारावं लागणार नाही. तुझं तुलाच समजेल की, तू राजहंस आहेस...


रविवार, ६ मार्च, २०२२

देवबाप्पा बघतोय....

देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे.










देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’


सखे, तुला हे असं कधीपासून होतंय? काल परवापर्यंत विज्ञाननिष्ठ वगैरे होतीस ना तू? कपाळावर कुंकू लावायलाही लाज वाटायची तुला. आज अचानक एवढी जिज्ञासा?


‘खवचटपणा बंद कर. तू प्रश्न न विचारता उत्तर देणार आहेस का?’


सखे, मी उत्तर देईन गं. पण, तुला ते बोअरिंग फिलॉसॉफी वगैरे वाटणार असेल तर मग कठीणच आहे.


‘देतोसच तू बोअरिंग, न कळणारे अवघड शब्द वापरून बोजड भाषेतील लेक्चरे. अनेकदा पटत नाहीत मला. पण, तू गाणी ऐकायला सांगतोस ते जाम आवडतं. तू सोप्या शब्दांत सांग ना.’


सखे, तुला पुरुषसूक्तातला पहिलीच ऋचा ऐकवतो. 

ॐ स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः स॒हस्र॑पात् ।

स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥


आता त्याच अर्थाची मोरोपंतांची आर्याही ऐक

भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला।

स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला ॥ 

संस्कृतातील ऋचेचा अर्थ तुला कळणार नाही. मोरोपंतांच्या मराठीतल्या आर्येचा अर्थही कळणे कठीणच जाईल. न कळण्यासाठी दोष ऋचेच्या कर्त्यांना द्यायचा, आर्या रचणार्‍या मोरोपंतांना द्यायचा की, तो अर्थ शोधण्याची तसदी न घेणार्‍या आपणाकडे घ्यायचा याचा विचार ज्याचा त्याने करावा. शब्दार्थ शोधण्याचा रस्ता आपण ‘क्रॉस’ करणे सोपे की, ‘ओलांडणे’ सोपे हे ज्याचे त्याने ठरवावे. ‘ओलांडणे’ समजत नसेल आणि ‘क्रॉस करणे’ समजत असेल तर दोष रस्त्याचा कसा?


‘बर्वेबुवा पुरे आता. देतोस माझ्या प्रश्नाचे उत्तर की, जाऊ?’


सखे, तू रागावल्यानंतर फारच सुंदर दिसत असलीस तरी रागावू नकोस आणि निघूनही जाऊ नकोस. दोष माझ्या सांगण्यात आहे, हे मी अमान्य करत नाही. जसं जमेल तसं सांगतो. तरीही तू ऐकतेस, मला सहन करतेस हेच  मोठं आहे. 

देव ही मानवनिर्मित संकल्पना नाही. माणसाच्या संकल्पनेतून देवाची निर्मिती झाली नाही. माणूस नव्हता तेव्हाही देव होता आणि नसेल तेव्हाही देवच असेल. विश्वातच असलेल्या रचनेला माणसाने आपल्याला समजावे म्हणून किंवा समजेल अशा एका  संकल्पनेत बसवले, ज्याचे नाव ‘देव’. एका अर्थाने मर्यादित केले. ज्या रचनेला आकार नाही, त्याला साकार केले. पण, समजण्यास सोपे केले. या वैश्विक रचनेला समजण्याचे दोन मार्ग आहेत. एक ज्ञान आणि दुसरा भक्ती. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांनी ती रचना ज्ञानाने समजून घ्यावी आणि ज्यांच्याजवळ भक्ती आहे, त्यांनी ती भक्तीने समजून घ्यावी. 


‘ज्ञानाने जे समजेल ते ज्ञान नसलेल्यालाही भक्ती केल्याने समजेल, हे पटत नाही. ज्ञान हा बुद्धीचा भाग आहे आणि भक्ती श्रद्धेचा प्रांत आहे. विज्ञान देव मानीतच नाही. मग, विज्ञाननिष्ठ, ज्ञानवंत आणि भक्त यांना देव कसा समजेल?’ 


सखे, हाच प्रश्न उद्धवाने (महाभारतकालीन) कृष्णाला विचारला होता, जेव्हा कृष्णाने त्याला देव समजण्यासाठी गोपींच्याकडे जायला सांगितले. कृष्ण सांगतो म्हणून उद्धव गोपींच्याकडे जाऊन राहिला. ज्या निर्गुण, निराकाराला  उद्धवाने ज्ञानाच्या माध्यमातून जाणले होते त्याच देवाला निरक्षर, अशिक्षित गोपी भरवत होत्या, त्याच्यासोबत खेळत होत्या, भांडत होत्या, त्याच्यावर प्रेमही करत होत्या. सर्व मानवी भावनांमधून आणि नात्यांमधून त्यांना विश्वाची रचना समजली होती. ज्ञानाच्या विरुद्ध भक्ती नाही. अहंकारविरहित ज्ञान म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे, टिळा, गंध, उपासना नव्हे. ज्ञान वजा अहंकार म्हणजे भक्ती. भक्त, ज्ञानी असण्यापेक्षाही ज्ञानी, भक्त असणे फार महत्त्वाचे आहे. आपण आजकाल सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत नाही. आपण ज्ञानी आहोत, सश्रद्ध व भक्त नाही. म्हणूनच, आपल्याला देव समजत नाही.

सखे, देव हा शब्दच मुळात दिव् या धातूपासून तयार झाला. ‘दिव्’ म्हणजे प्रकाशणे, चकाकणे.  देव याचे इतर संस्कृतीमध्ये समानार्थी शब्द पाहिले तर आश्चर्य वाटतं. संस्कृत ’देव’, प्राचीन नॉर्स ’तिवार’ लॅटिन ’देयूस’, लिथुनिअन ’दिवास’, इराणी ’दिअ’, केस्टिक- ’दिओस’, गॅलिक ’दिओग्नत’.  निसर्गपूजक सर्व संस्कृतींमध्ये हे देवासाठी एकसमान शब्द काय सांगतात? संपूर्ण जगात निसर्गपूजक व विश्वरचना जाणणार्‍या संस्कृतींचे सहअस्तित्व होते. प्रेषितांच्या पंथांनी जगभरातील या संस्कृती संपवल्या. उंच पिकांतून डोलणारा आणि बाळमुखातून बोलणारा देव केवळ प्रेषितांच्या माध्यमातून सांगू लागला आणि आपल्यापासून दूर गेला. इतका दूर की त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागली. त्याची भीतीही गेली आणि त्याच्यावरचा विश्वासही नष्ट झाला. त्याला समजणे कठीण, दुरापास्त झाले.

सखे, उपनिषदांमध्ये एक कथा आहे. शिष्य गुरूला विचारतो 'देव, ज्ञान म्हणजे काय?' गुरू सूर्याकडे बोट दाखवतो. रात्र होते. शिष्य विचारतो, 'आता ज्ञान म्हणजे काय?' गुरू चंद्राकडे बोट दाखवतो. अमावास्येच्या रात्री शिष्य पुन्हा तोच प्रश्न विचारतो. गुरू मिणमिणत्या दिव्याकडे बोट दाखवतो. थोड्यावेळाने वार्‍याचा झोत येतो आणि दिवा विझतो. शिष्य विचारतो, 'गुरुजी सूर्य दाखवून झाला, चंद्र दाखवून झाला शेवटी दिवाही दाखवलात. आता दिवा विझला. अंधार झाला आहे. आता कुणाकडे बोट दाखवणार?' गुरू त्याला विचारतात, 'वत्सा, अंधार आहे हे कशामुळे समजलं? अंधार आहे हे ज्याच्यामुळे समजलं तेच आत्मज्ञान, तेच ब्रह्म, तोच देव.' हेच सूत्र गौतम बुद्धांनी ‘आत्मदीपो भव:’ म्हणत मांडले आहे. या वैश्विक जाणिवेलाच चैतन्य, ब्रह्म अशी अनेक नावे वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ही वैश्विक जाणीव सर्वत्र आहे. 


‘देव देवळात आहे, तर तो सर्वत्र कसा असू शकेल आणि देव सर्वत्र आहे, तर त्याला देवळातच का बंदिस्त करायचे?’ 


सखे, आपण त्याला कसे पाहतो, समजतो त्यावर ते अवलंबून आहे. निर्गुण, निराकार चैतन्य सर्वत्र आहे. ते ब्रह्म एकच आहे. जेव्हा आपण त्याला सगुण साकार पाहतो, तेव्हा देव, देवस्थान याला महत्त्व येते. देवस्थानात आहे, म्हणजे तो इतरत्र नाही, असा त्याचा अर्थ नाही. तो निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही आहे. तो सर्वत्र आहे, मग देवळात का जावे, हा प्रश्न विचारणार्‍याने आधी स्वत:ला विचारावे, ‘तो सर्वत्र आहे, याची जाणीव मला झाली आहे, की फक्त तर्क मांडायचा म्हणून मांडतोय?’ खरोखरच ही जाणीव जर झाली असेल तर देवळाचे प्रयोजन त्याच्यापुरते राहत नाही. देवळाच्या असण्यानेही फरक पडत नाही आणि नसण्यानेही पडत नाही. फरक पडत नसल्याने देवाची मूर्ती फोडण्याची आणि देवळे पाडण्याचीही गरज उरत नाही. आपण बुतपरस्त (मूर्ती पूजा करणारे) नाही याचा अर्थ आपण बुतशिकन (मूर्ती तोडणारे) झालेच पाहिजे, असे नाही. ज्ञानवंतांनी श्रद्धावानांचा आदर राखावा आणि श्रद्धावानांनी ज्ञानवंतांचा. 

सखे, लहानपणी आई सांगायची, ‘वाईट बोलू नकोस, देवबाप्पा ऐकतोय. चुकीचं वागू नकोस, देवबाप्पा बघतोय...’ माझ्याही नकळत मी या मला पाहणार्‍या, ऐकणार्‍या देवबाप्पाला शोधायचो. तो दिसला नाही, पण तो आहे याची भीतीही वाटायची आणि धीरही वाटायचा. पुढे पुढे जास्त अक्कल आली तशी, देवबाप्पा वगैरे काही नसतो. उगाच आपल्याला भीती घालण्यासाठी सगळं सांगितलं जातं अशी भावना दृढ होत गेली. विज्ञानाचं वारं अंगावरून गेलं आणि आमच्या देवभक्तीला लकवा मारला. आयुष्याच्या संध्याकाळी आता पुन्हा देवाचा शोध सुरू केला तेव्हा तोच देव विज्ञान, ज्ञान आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन स्वत:च्या डोक्यात मोरपीस खोवून बासरी वाजवत बसलेला आढळला. 

सखे, आपण विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे देवपूजेला विरोध करणे किंवा हीन समजणे, असा भ्रम जाणीवपूर्वक तयार केला आहे. म्हणूनच आपण देवपूजा करणार्‍या शास्त्रज्ञाची, विज्ञाननिष्ठाची टिंगल उडवतो. विज्ञानाच्या अभ्यासकाने देव मानणे हे महापाप समजतो. विज्ञाननिष्ठ किंवा नास्तिक म्हणतात, 'देव असल्याचा पुरावा द्या मग आम्ही देव मानू. अन्यथा देव आहे, ही आस्तिकांची केवळ श्रद्धाच आहे. त्याला पुरावा नाही.' त्याच न्यायाने देव नसण्याचाही पुरावा नाही. म्हणजेच नास्तिकांनी देव नाही, असे म्हणणे हीसुद्धा नास्तिकांची श्रद्धाच आहे, त्याला पुरावा नाही.  

श्रद्धा आणि ज्ञान एकमेकांच्या विरुद्ध नाही, ते एकमेकांना पूरक असलेले आत्मविकासाचे टप्पे आहेत.  हे ओलांडल्यानंतर देव, ब्रह्म, चैतन्य, विश्वरचना याची प्रचिती येते. त्यामुळे, आपल्या मानण्यावर देवाचे अस्तित्व नाही. मानले तरी देव आहेच, नाही मानले तरी देव आहेच. हे देवाचे आपल्या आयुष्यातले अस्तित्व आपण लहानपणीच घालवून बसलो आहोत. आपल्या मुलांच्या बालपणातूनही देव नाहीसा करत चाललो आहोत. ‘देवबाप्पा बघतोय’ ही केवळ भीती नाही, ‘देवबाप्पा बघतोय’ हा विश्वासही आहे, हेच आपण विसरतो. तो आहे, याची भीतीही असायला हवी आणि तो आहे, हा विश्वासही आवश्यक आहे. 

सखे, चल आपण त्यांच्या आयुष्यात देवबाप्पाला पुन्हा आणू. आपणही त्यांच्यासोबत लहान होऊ. म्हणजे मग त्यातील कुणीही मोठे झाल्यानंतर एक प्रश्न विचारणार नाहीत.


‘कुठला?’


‘देव म्हणजे काय रे? तो खरोखरच असतो का?’

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मानसीचा चित्रकार तो...




सखे, चित्र काढायला काय काय लागतं?

‘असा काय लहान मुलांना विचारल्यासारख प्रश्न मला विचारतोस? माझी फिरकी घ्यायची आहे का? चित्र काढायला पेन्सिल, कॅनव्हास आणि रंग लागतो.’

बस एवढंच?

‘हो! आणखी काय लागणार?’ 

सखे, चित्र म्हणजे काय? घाबरू नकोस. प्रश्नोत्तरांचा तास सुरू नाही करत. असे प्रश्न मला अनेकदा पडतात. अनेकांना विचारतोही. वेगवेगळी उत्तरे मिळतात. कुणी म्हणतं अनेक कलांपैकी एक कला आहे, तर कुणी म्हणतं कागदावर मारलेल्या रेघोट्या. ही केवळ उत्तरं नाहीत, हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. गणित आणि कला ही एकाच प्रवाहाची दोन टोकं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गणितच असतं. हे गणित जमू लागलं की त्याची कला होते. गणित सोडवणं किचकट असतं, कलेचा आविष्कार मनमोहक असतो. गणितं सोडवणार्‍याला चित्रापलीकडे असलेली कला पाहता येते. गणितातच अडकून पडलेल्यांसाठी त्या रेघोट्याच असतात.

सखे, अनेक वर्षांपूर्वी दीनानाथ दलालांचे चित्रप्रदर्शन पाहायला सेंट्रल लायब्ररीत गेलो होतो. तेव्हा, प्रत्येक चित्रासमोर स्तब्ध झालो. माझ्यामागून चित्र पाहून जाणार्‍यांचे चेहरे, ’काय यडपटासारखा बघत राहिला आहे?’ असं न बोलताही बोलून जायचे. दलालांच्या चित्रातली रेषन रेष बोलकी असते. प्रत्येक रंग आपला वेगळाच रंग दाखवत असतात. आपण जे पाहतो ते चित्र नसतच. आपल्याच भावभावना आपण पाहत असतो. चित्रामध्ये दिसणारी ’ती’, दलालांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रवती नसते, ती तर आपलीच सखी असते.  प्रत्येक चित्रामध्ये तू दिसू लागल्यानंतर मी वेड्यासारखा स्तब्ध होणार नाही तर आणखी काय होणार? 

‘पुरे हां! तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, हे दाखवायची एकही संधी सोडू नकोस.’

सखे, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही मी असाच स्तब्ध झालो होतो. तो क्षण आजही जसाच्या तसाच मनावर रेंगाळला आहे. पी. सावळारामांचं एक गीत ऐकलं की तो क्षणही मनमोहक होतो. ’मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो’ हे गीत तू नक्की ऐक. हे गीत लिहिलंय सावळ्या रामाची उपाधी लाभलेल्या निवृत्तीनाथानेे, त्याला संगीत दिलं आहे वसंत प्रभूंनी आणि मखमली गळ्यातून उतरवलं आहे हृदयाच्या नाथाने. असा त्रिवेणी संगम नियती नावाच्या विचित्रकारालाही क्वचितच जमतो. 

सखे, या गीतामध्ये एक गंमत आहे. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र अशा तीन वेळा या गाण्यातून रेखाटल्या आहेत. रणरणती दुपार मात्र कवीने टाळली आहे. ही पोळून काढणारी दुपार कदाचित आयुष्याचा कॅनव्हास असावा ज्यावर हे तीन काळ आपले रंग, रूप दाखवून जातात. 

सखे, माझा एक चित्रकार मित्र आहे. अप्रतिम चित्रे काढतो. तो एकदा प्रेमात पडला. मग काय विचारता? प्रत्येक चित्र प्रेयसीचेच काढू लागला. ती कठड्यावर हात ठेवून उभी आहे आणि निसर्गसौंदर्य पाहते, हे चित्र त्यानं इतकं सुंदर काढलं होतं की, मलाही ते फार आवडलं. विचारलं त्याला, हा वेडेपणा का करतोस. तो म्हणाला, दुसरं काही सुचतंच नाही, तिच्याशिवाय कुंचल्यातून कुणीच कॅनव्हासवर साकारत नाही. त्याची प्रेयसी मात्र व्यवहारी निघाली. एका श्रीमंताशी लग्न ठरलं, तेव्हा बोलेनाशीच झाली. त्याचा फोनही घेईनाशी झाली. तो चित्र काढेल म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर स्वत:चे फोटोही ठेवणे तिने बंद केले. त्याला भेटणे तिने बंद केले. ती त्याला टाळू लागली.  अर्थात पुढे जे व्हायचं तेच झालं. 

तिचं लग्न झाल्यानंतर सहज एकदा मित्राला भेटायला गेलो. त्याच्या प्रेयसीचं त्यानं काढलेलं जे चित्र मला आवडलं होतं तेच तो पुन्हा चितारत होता. तोच निसर्ग होता, तोच कठडाही होता. फक्त त्यात कठड्यावर हात ठेवून उभी असलेली प्रेयसी नव्हती. विचारलं त्याला, चित्रात ती का नाही? तो एवढंच म्हणाला, चित्रातून तिला दूर करणं सोपं होतं, मनातून कसं दूर करू? त्याच्या मनाच्या कॅनव्हासवरून तिच्या स्मरणाचं चांदणं काही केल्या सरतच नव्हतं. त्याच्या मानसीचा चित्रकार तिचंच चित्र काढत होता आणि माझा मित्र तिचं चित्र काढत नव्हता, कुठलंंच चित्र काढत नव्हता. ही अवस्था म्हणजेच त्या गाण्यात टाळलेली टळटळीत दुपार. 

सखे, तिची भेट त्याच्यासाठी पहाटेचे रंग भरणारी निळी मोहिनीच होती. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत विरह देणारी संध्याकाळही मोहकच होती. नक्षत्रांचा निळा चांदवा झरवणारी रात्रही स्वप्नवत होती. पण, ती सोडून गेल्यानंतर पुन्हा कधीच, काहीच रम्य राहिलं नाही. त्याला चित्र काढणं त्यानंतर जमलंच नाही कधी. का माहिती आहे? 

‘का?’

सखे, त्याच्याकडे कॅनव्हास होता, पेन्सिल होती, रंग होते. फक्त अंतरंग नव्हते.

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

ती असं का वागली?

स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते.



’ती असं का वागली?’

हा त्याचा प्रश्‍न माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता. त्रास देत होता. सखे, दु:ख त्रासदायक असतं. पण, त्या दु:खाचं कारण न समजणं त्याहूनही जास्त त्रासदायक असतं. झालं असं की माझ्या मित्राने त्याच्या मैत्रिणीचं एक काम करून दिलं. तिनच त्याला ते सांगितलं होतं. त्या कामासंदर्भातच त्यानं तिला बोलावलं. पण ती आली नाही. सवड नसेल, असं म्हणून तो गप्प बसला. परंतु, असं चार पाच वेळा घडलं, तेव्हा त्याला त्याचं दु:ख झालं. यथावकाश त्या कामातल्या अडचणी दूर सारून त्यानं कामही करून दिलं. त्याने परहस्ते ते काम पाठवूनही दिलं. तिने मेसेज पाठवून त्याचे धन्यवाद मानले. केलेल्या कामाचे पैसेही देण्याबद्दल सांगितलं. काम करणे, कामाबद्दलच्या पैशांची देवाणघेवाण हा व्यवहार होता. त्याला दु:ख झालं ते तिच्या न येण्याचं. त्यानं मला त्या दु:खावर शेरही ऐकवला;

हो गया हिसाब पाई पाई का बाकी न आना रह गया

न रही उम्मीदें जिंदगीसे बस तेरा न आना रह गया

त्यानं ’आना‘ हा एकच शब्द ’आणे‘ आणि ’येणे’ या अर्थाने वापरणं मला आवडलं. त्यामागचं दु:ख जाणवलं. ’ती असं का वागली?’ हा त्याचा प्रश्‍न खूप त्रास देऊन गेला. आपल्याला माहीत असलेलं दु:खाचं कारण इतरांच्या अनुभवास आलेलं असलं तरीही त्रास देऊन जातं. 

सखे, तू सुद्धा अशी जेव्हा रुसून जातेस तेव्हा मला त्रास होतो. कधी कधी येतेस बोलावल्यावर. पण, इतक्या लवकर निघून जातेस, की असं वाटतं न आली असतीस तरी चाललं असतं. तुझं येऊन लवकर निघून जाणं, तुझ्या न येण्यापेक्षाही जास्त त्रास देतं. बघ, आला ना राग? खरं सांगितलं की माणसाला राग येतो. लटकं सांगितलं की लगेच पटतं. तुझा राग घालवण्यासाठी एक गझल ऐकवतो. ’ले चला जान मेरी’ ही गझल लाइव्ह ऐकण्यात खूप मजा आहे. यातल्या अनेक जागा  

गुलाम अली अशा काही खुलवतात की दु:खही सुख देऊन जातं. हीच गझल मी अबिदा परवीन यांच्या आवाजातही ऐकली आहे. पण, ती ध्वनिमुद्रित होती. 

सखे, किती रागावशील? ही गझल ऐक. फणकार्‍याने मान वळवल्यानंतर तुझ्या बटा वार्‍यावर अधिकच उडू लागतात. त्या इतक्या अस्वस्थ का आहेत? डोळे न वळवताही डोळ्यांच्या कोपर्‍यातून नको ना पाहूस. बहुतेक, तू हृदय तोडलेल्या कुठल्यातरी प्रियकराच्या आठवणीने त्या बटा व्याकूळ झाल्या असाव्यात. कित्ती हा राग? तू रागावून पाहिलंस आणि डोळ्यासमोर वीज चमकली बघ माझ्या. अगं गंमत केली तुझी. तुझ्या केसांच्या बटा प्रियकराच्या आठवणीने नाहीत तर वार्‍यामुळे अस्वस्थ आहेत, हे मला पक्कं माहीत आहे. सोड ना हा रुसवा हे रागावणं. 

सखे, मला माहिती आहे तुला उत्सुकता त्या मित्राची ती मैत्रीण असं का वागली, हे जाणून घेण्याची. कारणं अनेक असू शकतात. देता येण्यासारखी आणि देता न येण्यासारखीही. तू नाही का, यायचं तुझ्या मनात असलं की केव्हाही, कधीही बिनधास्त येतेस. नसेल यायचं, तर मग हजारो कारणं. पटणारी, न पटणारी. ती का आली नाही, हे तिचं तिलाच ठाऊक. 

सखे, माणसाला माणसं हवी असतात. बरेचदा ती काही कारणपरत्वे असतात. एखादी गरज, एखादे कार्य होईपुरतीच त्यांची आवश्यकता असते. त्यापेक्षा अधिक ती नको असतात. प्रत्येक माणूस स्वत:भोवती अनेक वर्तुळं आखून घेत असतो. अगदी आतल्या वर्तुळात तो स्वत:लाच ठेवत असतो. इतर कुणीही त्याला नकोसं असतं. यालाच साहेबाच्या भाषेत ’प्रायव्हेट स्पेस’ म्हणतात. यानंतरच्या वर्तुळात अगदी जवळची नाती आईवडील, नवराबायको, मुलं येतात. त्यानंतरच्या वर्तुळात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, सगे सोयरे असतात. त्याही बाहेरील वर्तुळात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणारे सहयोगी असतात. अशी असंख्य वर्तुळे बदलत्या प्राधान्यक्रमाने असतात. ही वर्तुळे अंतर ठेवण्यासाठी, दाखवून देण्यासाठी असतात. 

सखे, मला आवडलेली गाणी अनेकांना मेल करण्याची सवय आहे. काही माणसं प्रतिसाद देतात. आपल्याला आवडलेल्या जागा, त्या गाण्याबद्दलचे अनुभवही शेअर करतात. सुरुवातीला प्रतिसाद आला नाही की, मला प्रचंड त्रास व्हायचा. एरव्ही इतरांशी प्रचंड बोलकी असणारी माणसं आपल्याशी दुर्मुखलेली का वागतात? असा प्रश्‍न पडायचा. आपल्याबद्दल त्यांच्या मनात काही गैरसमज तर नाही ना, हा विचार छळून जायचा. मी गाणी पाठवण्यामागे त्यांनी भलताच हेतू चिकटवला नसेल ना, असही वाटायचं. मित्राला सांगितलेल्या विनोदावर तो पोटशूळ असल्यासारखा चेहरा करायचा. तोच विनोद त्याला दुसर्‍या कुणी ऐकवला की, पोट धरून हसायचा. विनोद वाईट नसतो, सांगणाराही चुकीचा नसतो. फक्त तो हव्या असलेल्या वर्तुळातला नसतो. चौकोनी कुटुंबात ही आखलेली वर्तुळे स्पष्ट दिसतात. त्यावर उभारलेल्या अदृश्य परंतु अभेद्य भिंती प्रचंड छळतात. नवरा बायकोमध्येही ही वैयक्तिक वर्तुळे असतात. त्या जागेमध्ये नवर्‍यानं किंवा बायकोनं किती आत शिरायचं याचे वज्रलेपित ठोकताळे असतात. आपल्या माणसाला जपण्याऐवजी ही ‘प्रायव्हेट स्पेस’ जपली जाते. 

सखे, स्त्री, पुरुषाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जवळ येऊ देते. अनेकदा तिच्या स्वैर वागण्यातून पुरुष भलतेच अर्थ काढून मोकळा होतो. वास्तविक वर्तुळबाह्य पुरुषाशी स्त्रीचं लाघवी बोलणं, मधाळ हसणं हे सोयीपुरतं, गरजेपुरतं असतं. ती गरज संपली की, स्त्री वर्तुळबाह्य पुरुषाला लगेच ’जागा’ दाखवून देते. 

'प्रत्येक खेपेला स्त्रीच्या असं वर्तुळं आखून वागण्यामागे गरज किंवा स्वार्थच असतो, असं तुला म्हणायचं आहे का?'

सखे, तू अशी लगेच पर्सनली घेऊन भांडू नकोस ना. तिला तिच्या सुरक्षिततेसाठी तसं वागणं अपरिहार्य असतं, हे मान्यच आहे. त्याबद्दल वादच नाही. पण, जशी प्रत्येक स्त्री स्वार्थी नसते, त्याप्रमाणेच प्रत्येक पुरुष ’त्याच’ अर्थाने स्त्रीकडे पाहतो, असा पूर्वग्रह बाळगणेही चुकीचेच नाही का? त्याचा त्रास संवेदनशील माणसाला होतो. 

'म्हणजे तू असं म्हणतोस की, स्त्रीने वर्तुळे आखणे ही स्त्रीचीच चूक आहे? समजा तिने अशी वर्तुळे आखलीच नाहीत तर त्याचा गैरफायदा पुरुष घेणारच नाही याची काय गॅरंटी? तू एक पुरुष आहेस, म्हणून तुझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तसाच आहे. एकदा स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्त्रीकडे पाहा. म्हणजे मग कळेल.'

अरे देवा! तुझा माझ्याशी भांडायचा मूड आहे का? सखे, तू म्हणतेस तसेही असेल कदाचित. मी पुरुष असल्याने स्त्रीच्या भावना मला कळत नसाव्यात. मी जे म्हणतोय त्याचं तू सार्वत्रिकरण नको करूस. सगळ्याच स्त्रिया व सगळेच पुरुष तसेच असतात असे म्हणणे योग्य नाही. सर्वस्व बहाल करून बसलेल्या स्त्रीला जसा प्रतारणेचा त्रास होतो, त्याहीपेक्षा जास्त त्रास, स्त्रीने ही वर्तुळे आखून वापर करून घेतल्यामुळे एखाद्या पुरुषाला होतो. 

सखे, या वर्तुळांचा त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीमध्ये भावनेने गुंतलेले असतो. निखळ मैत्री हवी  असलेली माझ्यासारखी माणसं, या वर्तुळांकित वागण्याने प्रचंड दुखावली जातात. आपुलकीच्या आडून साधला जाणारा स्वार्थ छळतो. आपला वापर झालाय ही भावना बोचते. सेवा पुरवणे, विक्री करणे हा ज्यांच्या व्यापाराचा भाग असतो, त्यांना या आपुलकीशी काही देणंघेणं नसतं.  समोरच्याने कितीही सलगी, आपुलकी दाखवली तरीही आपला फायदा व्यापारी सोडत नाही. आखलेली वर्तुळं स्वत:च्या स्वार्थासाठी  भेदून पुढे होणारी माणसं, दुसरा माणूस त्या वर्तुळात येऊ लागला की जागी होऊन त्याला ’जागा’ दाखवतात. अशा ’वापरून’ घेणार्‍या माणसांपेक्षा ’व्यापारी’ खूप चांगला. 

सखे, मित्राला त्रास झाला कारण त्यानं निखळ मैत्रीची अपेक्षा ठेवली. तिच्या येण्याची अपेक्षा ठेवली. त्याला बोचणी आहे, ती तिच्या न  येण्यापेक्षाही, तिने न येऊन दाखवून दिलेल्या, तिच्या आयुष्यातल्या  त्याच्या स्थानाबद्दलची आहे. ज्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात खूप स्थान देतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसल्याचं ते दु:ख आहे.  आपल्या भावना अव्यक्त, निरपेक्ष ठेवाव्या. त्या व्यक्त केल्या किंवा समोरच्या व्यक्तीकडून भावना समजण्याच्या अपेक्षा ठेवल्या की, एक प्रश्‍न आपल्याला कायम छळतो;

’ती असं का वागली?’

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

भय इथले संपत नाही...






‘अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...’

सखे, तू प्रेमात पडली आहेस असं म्हणतेस आणि घाबरतेसही. ज्याच्या प्रेमात पडली आहेस, त्याची भीती वाटते की, आई बाबांची?

‘तेच कळत नाही म्हणून तर तुझ्याकडे आले ना? सगळी जगावरची तत्त्वज्ञानं सांगतोस. आपले अनेक मित्रमैत्रिणी, ‘व्हेअर देअर इज नो वे देअर इज बर्वे’ असं म्हणत तुझ्याकडे येतात. तू त्यांचे प्रॉब्लेम सोडवतोसही. मी तर तुझी सखी आहे. मग, मला भीती कशाची वाटते हे तूच मला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकशील.’

घाल, माझे पाय माझ्याच गळ्यात घाल. वरून मी प्रचंड बोअर करतो, असं म्हणायलाही तू मोकळीच.  

‘रागावू नकोस ना रे! तुझी लांबलचक, जड भाषेतील तत्त्वज्ञानं जाम बोअर करतात. पण, तुझ्याकडे उत्तरे असतात, मार्ग असतो. उशिरा का होईना, पण तू सांगतोस ते पटतं.’

सखे, लोण्याचा स्टॉक संपला? मला सांगायला, शेअर करायला आवडतं हे खरं आहे. पण, प्रत्येकाला ते त्याच्या सोयीनेच ऐकायला आवडतं हेही तितकंच खरं. असो! हरकत नाही. ‘भय इथले संपत नाही..’ या ग्रेस यांच्या प्रासादिक कवितेला लतादीदींचे स्वरदान लाभले आहे. सखे, ती मुद्दाम ऐक. घाबरू नकोस त्या कवितेचे विवेचन करणार नाही. तेवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञाही नाही. त्यातील शेवटची ओळ जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा तू स्मरतेस. तुझे हे स्मरण, मला मरण येईपर्यंत काही जाणार नाही. 

‘नको ना रे मरणाविषयी बोलूस. मला भीती वाटते.’

सखे, तुला ही भीती अगदी लहानपणापासून वाटते. अंधाराची, वेगाची, गणिताची आणि अनेक गोष्टींची भीती. तुला कुठल्या गोष्टींची भीती वाटते हे सहज, नकळत माझ्यासमोर उघड व्हायचं. त्यानंतर तू अगदी मोकळेपणाने माझ्याशी खूप बोलायचीस. मीही तुला माझ्या पद्धतीने त्याचे त्याचे विवेचन करायचो, अनेक उपाय सांगायचो. तूही निर्भय होऊन मला खूप काही सांगायचीस. का कोण जाणे पण, तुला नंतर माझीच भीती वाटू लागली. कदाचित माझंच काही चुकलं असावं किंवा मग, ‘हया यक-लख्त आयी और शबाब आहिस्ता आहिस्ता’ असंही झालं असावं. काहीही असो, जे अंतर पडलं ते आजवर काही अंतरलं नाही. असो!

सखे, भीती हा प्राण्यांचा मूलभूत गुण आहे, ती ओळख आहे प्राणी असण्याची. ही भीती का वाटते, याची अनेक कारणे आहेत. ज्यांची कारणे आपल्याला आता सापडत नाहीत किंवा भीती कशाची वाटते हेच समजत नाही, त्यामागे आपल्या पूर्वजन्मीचे काही संकेत असतात. बहुतांश आपला मृत्यू ज्या कारणाने पूर्वजन्मी झालेला असतो, ते या जन्मात आपल्या भयाचे कारण असते. या जन्मात घाबरण्यासारखे ठोस कारण नसूनही किंवा तसे काही न घडताही एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यामागे पूर्वजन्मात त्यामुळे आलेला मृत्यू हे कारण असू शकते. 

सखे, वयोमानाप्रमाणेही आपली भीती कमी जास्त होत जाते, बदलत जाते. सामान्यत: लहानपणी बहुतांशी गणिताची, कठीण विषयांची भीती वाटते. प्रयत्न केला तर हे कठीण विषय आपल्यासाठी सोपे होऊन जातात. कालांतराने लक्षात येतं की, आपण ज्या विषयांना घाबरत होतो ते तर खूप सोप्पे होते, नाहीतर आयुष्यात अजिबात उपयोगाचे नव्हते. भीती आपल्याला तो विषय येत नाही म्हणून असते असे नव्हे तर तो परीक्षेमध्ये ठरावीक वेळेत तो कसा सोडवायचा याची भीती असते. दुसरा एक मुद्दा मांडतो. आपण का कोण जाणे पण, विद्यालयीन अभ्यासक्रमात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध जोडला आहे. त्यामुळे साहजिकच नापास होण्याची, कमी गुण मिळण्याची भीती डोक्यात बसते. प्रत्येक विद्यार्थ्याचे शास्त्रीय मूल्यमापन करून त्याला उपजत कुठल्या विषयात गती आहे, त्याच विषयात त्याला पुढे नेण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. ट्रिगॉनोमेट्रीची प्रमेये सोडवण्याचा जो हट्टाग्रह आपण प्रत्येक मुलाकडून का करवून घेतो, ज्याचा उपयोग केवळ आणि केवळ तो एका विशिष्ट क्षेत्रात गेला तरच होतो, अन्यथा नाही. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. 

सखे, ज्याला ज्यात गती आहे, तेच शिक्षण त्याला सर्वार्थाने दिलं गेलं पाहिजे. अशी शिक्षण पद्धती गुरुकुल व्यवस्थेमध्ये होती. आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय, वैज्ञानिक पद्धतीने आपण कोवळ्या वयातच मुलांचे मूल्यमापन करू शकतो. पण, त्याउलट आपण आपण ज्या क्षेत्रात इच्छा असूनही जाऊ शकलो नाही किंवा ज्या क्षेत्रात आपण नाव कमावले आहे, तिकडेच मुलांना ढकलत आहोत. ती आयुष्यात अयशस्वी होतील, चांगली नोकरी मिळणार नाही, आयुष्य सेटल होणार नाही याची भीती आपल्याला असते. तीच भीती आपण त्यांच्या डोक्यात घालतो. ज्याला आपण जन्म दिला आहे, त्याच्यात काय उपजत गुण आहे, त्याचा वर्ण कुठला आहे, त्याला कशात गती आहे याचे मूल्यमापन आपण करतो का? 

सखे, आपण आपल्या मुलांना चुकूच देत नाही. ही चुका करण्याची, नापास होण्याची भीती, त्यांच्यात असलेले निसर्गदत्त गुण, कला दाबून टाकते. त्यांनी इच्छा व्यक्त करण्याआधीच सर्व काही त्यांच्यापुढ्यात हजर करतो. नकार ऐकण्याची सवयच लावत नाही. मग, पुढे हा नकार, अपयश पचवणे त्यांना शक्यच होत नाही. अपयश, नकार यांची कायम भीतीच वाटत राहते. अपयश आले तरीही आपण त्यातून मार्ग कसा काढावा, याचा विचारही होत नाही. पर्यायांचा विचार होत नाही. त्यामुळे, परिणामांची भीती वाटते. 

सखे, सगळ्या पर्यायांचा विचार केला आणि कुठलाच पर्याय परिणाम म्हणून स्वीकारला नाही तर आपण निर्भय होतो. निर्भय होणे म्हणजेच भीती नसणे आणि निष्काळजी असणे यात फरक आहे. करोना, ऑमिक्रोन याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याचा विचार केला आणि तसं वागलं की, झालं. 

‘तू ना, पर्याय आणि परिणाम या तुझ्या संकल्पनेवर पेटंट लावून घे. किती वेळा ऐकवशील? तरीही ती कळत नाही. तिचा भीतीशी काय संबंध?’

सखे, चिडू नकोस ना. आता तुझंच उदाहरण घेऊ. तुझं प्रेम सफल होईल की, नाही ही भीती तुझ्या मनात आहे. आता आपण पर्यायांचा विचार करू. तो तुला फसवेल, आईबाबा लग्नाला परवानगी देणार नाहीत, आईबाबा आपलं काहीतरी बरंवाईट करून घेतील, ते आजन्म आपल्यासोबत काहीच संबंध ठेवणार नाहीत, असे असंख्य पर्याय प्रत्यक्षात घडू शकतात. यातील प्रत्येक पर्याय परिणाम म्हणून समोर आला तर आपण काय करायचं, तो परिणाम आपण कितपत स्वीकारू शकतो याचा पूर्ण विचार कर. पण, कुठलीच गोष्ट अशी होईल किंवा होणार नाही, असे स्वीकारू नकोस. यामुळे तू कुठल्याही परिस्थितीसाठी तयार होशील. निर्भय होशील. विचार केलेल्या पर्यायाशिवाय वेगळंच काही परिणाम म्हणून समोर आलं तरी त्याचं दु:ख होत नाही. उलट, ‘अरेच्चा! आपण याचा विचारही केला नव्हता’, असा विस्मय वाटेल. हे बुद्धिबळ खेळण्यासारखं आहे. हरलो तरी त्याचं दु:ख होत नाही. आपलं प्रत्येक हरणं नवीन चाल शिकवून जातं. त्याही पुढे जाऊन आपल्याला हरवणार्‍याचं कौतुक वाटतं. 

सखे, भीती आवश्यकही आहे आणि अनावश्यकही आहे. ‘मी कुणालाही घाबरत नाही’ असं म्हणणारा माणूसच सगळ्यात जास्त भित्रा असतो. घाबरणं वाईट, चुकीचं किंवा कमीपणा आणणारी गोष्ट नाही. आपण त्यासाठी तयार नसणं हे चुकीचं आहे. 

‘तुला एक विचारू?’

माझ्या होकारासाठी तू कधी थांबली आहेस? नको म्हटलं तरी विचारणारच आणि उत्तरासाठी हट्ट धरून बसणारच. 

‘तुला आठवतं, आपण तुझ्या खोलीत बसलो होतो. तू टेबलला हात लावून भिंतीला टेकून बसला होतास. मी हेतुपूर्वक तुझ्या हाताला स्पर्श केला होता. तू घाबरून लगेच हात काढून घेतलास. त्या क्षणी कुठली भीती वाटली होती तुला?’

अनेकदा आपली भीती अनामिक असते. ती सांगता येत नाही...





नोंद घेण्यासारखे : 

या लेखाच्या चित्रामध्ये वापरलेले सुलेखन माझे मित्र अमित वाघचौरे यांचे आहे.... 


शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

आनंदाचे डोही आनंदतरंग...



सखे, आपल्या आयुष्यात सुख हे प्राधान्यक्रमाने येतं. आपण जे जे काही करत असतो ते ते सर्व सुखासाठी करत असतो. स्वत: दु:खी होण्यासाठी कुणी प्रयत्न करीत नाही. असं असूनही सुख म्हणजे नक्की काय? याचा कुणीही गांभीर्याने विचार करीत नाही. म्हणूनच आपण नेहमी ’कशात तरी‘ सुख शोधतो. मुळात सुखी होणे म्हणजे काय, याचा विचार आपण सहसा करीत नाही. केवळ सुखी माणसाचे सदरे शोधत फिरतो. 

’जगात सदा सर्वकाळ सुखी असा कुणीच नसतो. दुसर्‍या बाजूने विचार केला तर सदा सर्वकाळ दु:खी असाही कुणीच नसतो. प्रत्येकाला आपलं दु:ख इतरांपेक्षा मोठ्ठं वाटत असतं.’

सखे, तूसुद्धा लागलीस की माझ्यासारखी प्रवचनं झोडायला. गंमत केली गं. तुझा विचार बरोबर आहे. 

’तुझं ऐकून ऐकून असा विचार आपोआप येत असेल कदाचित. समर्थ रामदास स्वामींनीही प्रश्‍न विचारलाच आहे, ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ 

सखे, थोडासा वेगळा विचार मांडतो. चुकत असेनही कदाचित, पण ऐक. समर्थांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर आपण नकारार्थी घेतो. ’विचारी मना’ या दोन शब्दांनंतर आपण थांबतो आणि मग म्हणतो ’तूचि शोधून पाहे’. मनाला विचार, तूच शोधून पहा. म्हणजे तुला पटेल की, जगात कुणीच सुखी नाही, असा त्याचा अर्थ आपण घेतो. त्याऐवजी आपण विचारी या शब्दापाशी थांबलो, तर एक वेगळा विचार, निराळा अर्थ समोर येतो. समर्थ प्रश्‍न विचारतात आणि त्याचं उत्तरही देतात. जगात सर्वसुखी असा कोण आहे? याचं उत्तर विचारी असं समर्थांनी दिलं आहे. आणि वर पुन्हा सांगत आहेत की, आपण सांगतो म्हणून विश्‍वास ठेवू नकोस, स्वत: शोधून पाहा. विचार केला तर लक्षात येतं की, ज्याच्यासाठी आपण एवढी धडपड करतो, त्यात सुख नसतच. म्हणूनच आपला प्रवास सुखाकडून दु:खाकडे आणि दु:खाकडून सुखाकडे एकसारखा होत राहतो. आपण सुखी होतो, दु:खी होतो. पण कधी सुखरूप होण्याचा, आनंदी होण्याचा विचारही आपण करीत नाही. 

’एक मिनिट. तू ना काहीच्या काही बोलतोस. सुखी माणूस सुखरूप किंवा आनंदी नसतो असं तुला म्हणायचं आहे का? सुखात असलेला माणूस म्हणतो ना, मी सुखात आहे, मी आनंदात आहे.’

सखे, सुख वेगळं आणि आनंद वेगळा. नाही पटत. सुख याला विरुद्धार्थी शब्द दु:ख. तसाच आनंद याला विरुद्धार्थी शब्द सांग पाहू! सापडणारच नाही, कारण तो नाहीच. सुखामध्ये दु:ख अनुस्यूत असतं. सुखी झाला की समजावं तो दु:खी होणारच. आनंदामध्ये आनंदच अनुस्यूत असतो. दुसरं काहीच असत नाही. जे परिवर्तनीय असतं ते सुख आणि जो अपरिवर्तनीय असतो तो आनंद. अवघड होत चाललं आहे का? तुला तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवतो. मुद्दाम ऐक. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अभंग लतादिदींच्या तोंडून ऐकताना वेगळाच अनुभव येतो. त्यात खळेकाकांची चाल म्हणजे, ऐकायला सोपी व नादमधूर. पण, त्यातले खाचखळगे गाणार्‍यालाच समजतात.  

सखे, मला वांगी आणि वांग्याचा कुठलाही खाद्यपदार्थ खूप आवडतो. भरलेली वांगी खाल्ली की, मला बरं वाटतं. सुख मिळाल्याचा आभास निर्माण होतो. वास्तविक वांगं खाल्ल्यामुळे सुख मिळालेलं नसतं, तर माझं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत व स्थिर झाल्यामुळे मला सुख प्राप्त होतं. वांगं हे फक्त निमित्त असतं. वांगं खावं अशी वासना झाली की, त्याचा संकल्प मन करतं. बाजारात जावं, वांगी विकत घ्यावी, हे मनाचे संकल्प सुरू होतात. आत्ता जावं की उद्या, भाजीवालीकडे वांगी नसलीच तर, एटीएमपुढे लांबच्या लांब रांग असली तर, असे नाना तर्‍हेचे विकल्प मन करू लागतं. मनाचं कामच आहे संकल्प आणि विकल्प करणे. हो, नाही करता करता जायचा निश्‍चय होतो. बाजारातून वांगी आणल्यानंतर ते त्याची भाजी होऊन पानात पडेपर्यंत आपण अनेक अवस्थांमधून गेलेले असतो. पानात वाढलेल्या भाजीचा पहिला घास घेतल्याबरोबर मन, बुद्धी,चित्त आणि अहंकार शांत झालेल्या अनुभवास आपण सुख म्हणतो. चव बिघडली तर मन विचलित होतं. चव तीच असली आणि बायकोचा मूड बिघडला की आपलं चित्त बिघडतं. जे सुख त्या पदार्थातून अपेक्षित असतं ते मिळत नाही. कारण, अंत:करणचतुष्टय अशांत, अस्थिर असतं. 

सुख साधनांत किंवा विषयात नाही. अमुक एखादी गोष्ट केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं वाटणं हा आपला भ्रम आहे. त्याहीपुढे जाऊन त्या गोष्टीत सुख आहे, असा दृढनिश्‍चय होणं ही भ्रांतीची परिसीमा आहे. 

’ज्यापासून सुख मिळतं, त्यात ते नसतं असं कसं म्हणतोस तू?’

सखे, समजा असं धरू की वस्तू किंवा विषय यामध्ये सुख असतं. तर जेवढी ती वस्तू आपल्या संग्रही जास्त तेवढं सुख जास्त मिळालं पाहिजे. ज्यात सुख आहे त्या विषयाचं सेवन जेवढं आपण जास्त करू तेवढं सुख आपल्याला जास्त मिळालं पाहिजे. प्रत्यक्षात तसं होत नाही. तुला माझ्यासारखीच कॉफी आवडते. तुझ्या म्हणण्याप्रमाणे कॉफी प्यायल्याने सुख मिळतं, म्हणून कॉफीत सुख आहे. मग, जेवढी तू कॉफी जास्त पिशील तेवढं सुख तुला जास्त मिळालं पाहिजे. तेही प्रत्येक वेळी. असं घडत नाही. कॉफी पिऊन पिऊन किती पिशील? एका मर्यादेनंतर कॉफीचं नाव काढलं तरी तुला मळमळायला लागेल. म्हणूनच कॉफीत सुख नाही, कॉफी पिण्यात सुख नाही. ज्याला आपण सुख म्हणतो, ते अंत:करण चतु:ष्टय आत्मसुखात लीन झाल्यानंतर येणारा तात्पुरता अनुभव आहे. 

सुख हे बाहेर नाही आपल्या अंत:करण चतु:ष्टयातच आहे, असा पक्का निश्‍चय झाला, की आपण सुखरूप होण्याच्या दिशेने आपोआप जाऊ लागतो. पण, शेकडा नव्याण्णव लोकांना हे पटत नाही. तुलाही ते अजिबात पटणार नाही. आपल्या गुणसूत्रांमध्येच ही धारणा पक्की बसलेली आहे की, ज्यामुळे सुख मिळतं, त्यातच सुख आहे. ते मिळवण्यासाठी अखंड धडपड सुरू राहते. साधनांचं सामर्थ्य संपलं, की दुसरं साधन शोधायचं. साधनांचा संग्रह करत रहायचं. एकातून एक असं न संपणारं चक्र सुरूच राहतं. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण फक्त पळत राहतो. वयोपरत्वे सुखाची साधनं बदलत राहतात. कायम राहते ती तृष्णा. संसारात सुख, मुलाबाळांमध्ये सुख, पैशात सुख, घरादारात सुख. हे सगळं मिळवण्यासाठी पैसा. पैशासाठी काम, नोकरी. प्रत्येकाने एकदा तरी थांबावं आणि विचार करावा. ज्यासाठी पळत होतो ते मिळालं आहे? ज्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण धडपडत आहोत, त्या मुलांना देण्यासाठी वर्तमानात आपल्याकडे वेळ आहे? ज्याक्षणी आपण थांबून या सगळ्याचा आढावा घेऊ, तेव्हा ते आपण सुखरूप होण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल. 

सखे, सुखी असणं वेगळं आणि सुखरूप असणं वेगळं. आपलं सुखी असणं कशावर तरी आधारित असतं. ते नसलं की आपण दु:खी होतो. मनासारखं अनुकूल घडलं तर सुखी होतो आणि प्रतिकूल घडलं तर दु:खी होतो. आपलं सुखी असणं साधनांवर अवलंबून असतं. चहात साखर हवी तशी पडली की सुखी आणि जरा कमी जास्त झाली की दु:खी. आयुष्यातील लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी, प्रत्येक गोष्ट आपण सुखाशी किंवा दु:खाशी जोडतो. या ना त्या कारणाने आपला मूड लगेच ऑफ होऊ लागला की समजावं आपण अजून सुखरूप झालो नाही. ’मी सुखी आहे’ इथपासून ’माझ्यात सुख आहे‘ इथपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखरूप करत जातो. ’मी सुखी आहे’ आणि ’माझ्यात सुख आहे’ या दोन अवस्थांमधून पुढे गेल्यानंतर एकच अवस्था शिल्लक राहते, ती म्हणजे ’मीच सुख आहे’ याची जाणीव. इथे आपण सुखरूप होतो. ’मीच सुख आहे’ यातही कुठेतरी मी म्हणजे अहं शिल्लक राहतो. तोही निसटला की जे शिल्लक राहतं त्याला ’आनंद’ असं म्हणतात. तीच शांती, तेच ब्रह्म. वेगळं काही नाही.

सखे, आनंदात आनंद मिसळला तरीही आनंदच आणि आनंदातून आनंद वजा केला तरीही आनंदच शिल्लक राहतो. डोहाच्या तळापर्यंत, जे अथांग, अंतरंग असतं ते पाणी असतं आणि डोहाच्यावर उठणारे उथळ तरंगही पाण्याचेच असतात. तसंच या आनंदाच्या डोहाचंही आहे. आत बाहेर आनंदच आहे. दुसरं काही नाही. 

सखे, इथे सगळी धडपड, पळापळ थांबते. आपण स्थिर होतो, आपलं अंत:करण स्थिर होतं. जे मिळवायचं ते आधीच प्राप्त झालेलं असतं. याचा अर्थ बरेच प्रयत्नवादी निष्क्रियता असा घेतात. उलट आनंदी माणूस जेवढा क्रियाशील असतो, तेवढा सुखासाठी धडपडणाराही नसतो.  आनंदी माणूस आणि आपल्याच जगात वावरणारा वेडसर माणूस यात बाह्यांगाने काही फरक नसतो. अगदी तसाच कोडगा मनुष्य आणि स्थितप्रज्ञ यातही बाह्यांगाने काही फरक नसतो. दोघांचेही वर्तन सारखेच दिसते. फरक असतो तो दृष्टिकोनात.  दैनंदिन व्यवहार होतच राहतात. त्याच्या परिणामांचा कोणताच परिणाम आनंदी माणसावर होत नाही. आनंदी माणूस सुखाचा अव्हेर करतो असं नव्हे. सुखाला महत्त्वच देत नाही. मिळालं तरी आनंदी आणि नाही मिळालं तरी आनंदी. 

सखे, सुखापेक्षाही सुखाचं व्यसन वाईट असतं. सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने सुखाचा अनुभव येतो. पण, चहा प्यायल्याशिवाय सकाळच होत नसेल किंवा न पिण्यामुळे दिनचर्या बिघडत असेल तर समजावे, चहा पिणं हे आपलं ते व्यसन बनलं आहे. सुखाच्या अनुभवाला आपल्या क्रियाशीलतेशी जोडल्याने व्यसनाची निर्मिती होते. आमचे एक मस्त डिझायन मित्र आहेत. तोंडात चुना तंबाखूचे मिश्रण ठेवूनच काम करतात. मी त्यांना एकदा विचारलंही, साहेब, काय मिळतं हो यातून? ते म्हणाले, ’तुम्हांला नाही कळणार बर्वे. त्यातून ’किक’ येते‘. ते मिश्रण तोंडात ठेवलं की सुचतं, असा त्यांचा समज होता. त्याशिवाय त्यांना सुचत नाही, ही वस्तुस्थिती होती. हीच ’किक’ येण्यासाठी लागणारे मिश्रण, द्रव्य यांची मात्रा सेवनागणिक वाढत जाते. आपण स्वत:ला निर्व्यसनी म्हणवून घेणारी माणसं, ’सुख’ नावाच्या व्यसनामध्ये गुरफटलो आहोत. तेही इतके की, सुख हे व्यसन आहे, असंही आपल्याला वाटत नाही. ’आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणणार्‍या तुकाराम महाराजांचं आयुष्य सुखाचं नव्हतं. पण, ते स्वत: आनंदी होते. 

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

ती रात्र कुसुंबी बहराची...
























सखे, एक विचार ऐकवतो.

मरणानंतरच्या यात्रेकडे नेतो तो यम आणि जिवंतपणी मरणयातना देतो तो संयम. 

वास्तविक पाहता संयम हा माणसामधला चांगला गुण आहे. पण सभोवतालची परिस्थितीच अशी विचित्र आहे की, माणसातले दुर्गुण त्याला पोषक ठरतात आणि सद्गुण मारक. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणार्‍यांना होतो. गेलेले क्षण पुन्हा आणता येत नाहीत, आपण त्यावेळी तसे का वागलो हे ठरवता येत नाही. मागे वळून पाहताना, हे न ठरवता येणंच आयुष्यातले चांगले क्षण विस्कटून टाकतात. खूप कष्ट घेऊन काढलेली एखादी देखणी रांगोळी लहान मुलाने सहजपणे विस्कटून टाकावी ना, अगदी तसे.

विस्कटलेल्या रांगोळीतला प्रत्येक कण आपला रंग बाळगून असतो. तेच कण घेऊन त्याहीपेक्षा सुंदर रांगोळी पुन्हा रेखाटता येते. आयुष्याची राखरांगोळी करणारे क्षण कितीही मोहक असले तरी ते क्षण घेऊन विस्कटलेलं आयुष्य पुन्हा  रेखाटता येत नाही. 

सखे, जे घडून गेलं आहे त्या वृत्ताकडे निवृत्त मनाने पहावं. पण, हे फार कर्मकठीण असतं. आपलं मन त्यात गुंतलेलं असतं. आयुष्यातले चांगले क्षण सुखावून जातात आणि दु:खाचे क्षण दु:ख देऊन जातात. क्षण धरून ठेवता येत नाहीत. त्यातली क्षणभंगुरता कायम त्रास देत राहतेच. या न विसरता येण्यार्‍या क्षणांना आपल्या काव्यामध्ये नेमकेपणाने टिपणे  पाडगावकरांना छान जमते. आयुष्यातले जीवघेणे क्षण पाडगावकर अशा रितीने मांडतात की, ते क्षण पुन्हा जगणं शक्य होतं. त्यांचं काव्य अनुभव देत नाही तर अनुभूती देतं. अनुभव आणि अनुभूती यातला फरक सांगेन नंतर पण त्याआधी अरुण दातेंनी गायलेलं ’ती रात्र कुसुंबी बहराची’ हे गीत ऐक. खळेकाकांंनी अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच ’स्पर्शाच्या’ हा शब्द जसा उच्चारला आहे तो डोळे मिटून ऐक, तुला सगळे स्पर्श जाणवू लागतील. मला तर हे गीत ज्या ज्या वेळी कानावर येतं त्या त्या वेळी तिच्यासोबत घालवलेले ते क्षण सजीव होतात. तिच्या मिठीतली मिठास जाणवू लागते. तिचा स्पर्श गात्रागात्रांतून विहरू लागतो. 

सखे, हे गीत जेव्हा पहिल्यांदाच ऐकलं तेव्हा त्यातल्या ’कुसुंबी’ या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. अनेक कादंबर्‍यांतून डोकावलेला ’सांद्र’ हा शब्दही मला ’सांद्र’ करून गेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुसुंबी नावाचं एक गाव आहे. कुसुंबी नावाचा एक वृक्षही असतो. केशरी आणि किरमिजी रंग एकत्र येऊन तयार होणार्‍या अत्यंत देखण्या रंगालाही  कुसुंबी म्हणतात. रंग या अर्थानं हा शब्द पाडगावकरांनी योजला असावा असं मला वाटतं. प्रत्येक रंगाला स्वत:ची वृत्ती असते. केशरी हा विरागी, विरक्त, त्यागी वृत्ती दर्शवतो. किरमिजी रंग उत्कट प्रणयार्तता प्रकट करतो. कमालीची आसक्ती आणि कमालीची अनासक्ती जेव्हा प्रणयाच्या पटलावर एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यातून जो जहरापेक्षाही अधिक खोलवर भिनणारा रंग तयार होतो. तो म्हणजे कुसुंबी. 

सखे, त्या रात्री ती मला भेटायला आली होती. कोणती दिव्ये तिने पार केली होती तीच जाणे. पण, तिची प्रणयार्तता तिच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होती. धावत येऊन तिने घातलेली मिठी, तिच्या हृदयातली धडधड माझ्या हृदयी कवळून गेली. तिला मिठीत घेण्यासाठी सरसावलेले बाहू, काही क्षण तसेच राहिले. तिच्या मिठीला जे सांगायचं होतं त्याची जाणीव हातांना झाल्यानंतर ते तिच्या पाठीवर जाण्याऐवजी खांद्यांवर स्थिरावले. बाहूपाशातून मुक्त करणं तिला अनपेक्षित असावं. तिच्या डोळ्यातही ते स्पष्ट जाणवलं. 

’हे मीलनाचे क्षण पुन्हा येणार नाहीत.’ हे तिने आपले डोळे माझ्या डोळ्यांत जडवून सांगितलं.  तिच्या आर्ततेच्या कहरातून सावरताना संयमाची पराकाष्ठा झाली. जे हवं होतं, ते वेळेआधीच मिळत होतं. अयाचित मिळत होतं, आपणहून मिळत होतं. संधी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस सज्जनच असतो. संधी मिळाल्यानंतरही सज्जनत्व टिकून राहण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो. 

’का? लग्न झालं नाही म्हणून?’ तिनं विचारलं. मी मानेनेच होकार दिला. काही क्षण असेच मुग्धतेत निघून गेले.

’फक्त लग्न झालं नाही म्हणून नव्हे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुझ्यासकट तुझ्या चारित्र्याला मी जबाबदार आहे म्हणून.’ बोलता बोलता माझा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. तिलाही अश्रू आवरेनात. तिने पुन्हा मिठी मारली. तो वेग आणि आवेग एवढा जबरदस्त होता की, दोघेही गवतावर कोसळलो. आधी मारलेल्या मिठीत प्रणयार्तता होती, आता प्रेम ओसंडून वहात होतं. 

प्रत्येक मिठी वेगळी असते आणि तिची मिठासही. 

सखे, त्या ’अलौकिक’ अवस्थेतून सावरल्यावर माझ्या तोंडून सहज शीळ निघून गेली.  पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिच्या रूपसौंदर्याच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी विधात्याने तिच्या गालावर तीळ बहाल केला होता. एरव्ही कृष्णवर्णीय असणारा सौंदर्यांचा राखणदार तीळ, चांदण्यात भिजून पिठूरला होता. त्या चंद्रालाही हेवा वाटावा असा चंद्र माझ्यासमोर होता. मी एकवार आकाशीच्या चंद्राकडे पाहिलं आणि मला त्याचं हसू आलं. गालावरच सुकलेल्या आसवांकडे पहात तिने विचारलं, 

’का रे हसलास?’

काही नाही गं. या चंद्राच्या संसारव्यथेने हसू आलं. हा चंद्र पुरुषासारखा पुरुष असूनही हे कविलोक त्याची उपमा सुंदर स्त्रीच्या चेहर्‍याला देतात. आधीच कायम तारकांच्या गराड्यात असणार्‍या चंद्राची बायको रोहिणी त्याच्यावर किती रागवत असेल, याची कल्पना करून हसू आलं. लग्न झाल्यानंतर  तू नाही ना रागावणार माझ्यावर? 

माझ्या प्रश्‍नावर का कोण जाणे ती गंभीर झाली. लगेच चेहरा बदलत खो खो हसत सुटली. क्षणात चेहरा पालटण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या चेहर्‍यात ओतणार्‍या मदनाचा प्रहर आठवणीच्या साम्राज्यात जो झिंगला तो झिंगलाच. 

सखे, दोघांची हृदये प्रेमाच्या माधुर्यात बुडून गेली होती. हा प्रेमाचा गोडवा मोठा विलक्षण असतो. स्वत:बरोबर सर्व गोष्टींना तो मधात बुडवून काढतो. रातराणीच्या मोहक सुगंधालाही मधुर करून सोडतो, सारा आसमंत माधुर्याने भारावतो. ’मधुरधिपते: अखिलं मधुरं’ म्हणजे कोणती अवस्था आहे, हे समजण्यासाठी हृदये प्रेमाने ओतप्रोत भरलेली असणे आवश्यक आहे. आम्ही हातात हात घेऊन चांदणे सांडलेल्या वाटेवर हरवलो.  या वाटेवर पाहिलेली स्वप्नं धूसर होती.  याची जाणीव थोड्याच दिवसांनी झाली जेव्हा त्याच वाटेवरून गेलेली ती पुन्हा आली नाही तेव्हा. मीच कदाचित समजू शकलो नाही, तिची मीलनोत्सुकता विरहाच्या जाणिवेतूनच आली होती. पुन्हा कधीच भेटणार नाही याची पक्की खात्री होती म्हणून ती भेटण्यासाठी आली होती. ती जे द्यायला आली होती, ते शरीरसुख मला नको होतं का? याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. पण, ते घेणं मात्र माझ्याकडून घडलं नाही. 

सखे, जे घडलं ते बरोबर होतं की चुकीचं हे सापेक्ष आहे. त्या क्षणी जसा मी वागलो तसा पुन्हा वागेन की नाही, हे माझं मलाही सांगता येणार नाही. एवढच का, ते मला ठरवताही येत नाही. कधी कधी आपल्या दुर्गुणांपेक्षाही आपला पराभव आपल्यामधले चांगले गुणच करतात.  आयुष्यात घायाळ करणं जेवढं सौंदर्याला जमलं नाही, तेवढं घायाळ आणि त्याहूनही अधिक विदीर्ण मला माझ्या संयमाने केलं आहे.