सखे, त्यासाठी तुला बोरकरांची आयुष्याची आता झाली उजवण, ही कविता ऐकावी लागेल. सलिल कुलकर्णी यांनी ती ‘संधिप्रकाशात’ या कवितेशी जोडून सादर केली आहे. आयुष्याची झाली उजवण ही मृत्यूपूर्वीची देवाकडे केलेली अपेक्षा आहे, तर संधिप्रकाशात ही सखीकडे मृत्यूनंतर केलेली अपेक्षा आहे. ‘आयुष्य कसं कृतार्थ जगून दाखवलंय’ या संचितावर देवाला भक्तीने आणि सखीला प्रेमाने केलेली प्रार्थना म्हणजे या दोन कविता आहेत.
सखे, उजवण या शब्दाला दोन अर्थ आहेत. भूमी, वस्त्र, मनुष्य इत्यादींची ऊर्जित अवस्था म्हणजे उजवण हा एक अर्थ. उजवण म्हणजे समाप्ती, अखेर असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ घेतल्यास त्या जागी, तो शब्द अगदी योग्य ठरतो. ऊर्जित किंवा समाप्तीची अवस्था आयुष्याला प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे दु:ख नाही उरत. कारण, बोरकर म्हणतात की, येतो तो तो क्षण अमृताचा. प्रत्येक क्षण अमृताचा असेल, तर मृत्यू कसा संभवेल? मग ती अवस्था कोणती? चैतन्यात विलीन होऊन जाणे, सद्-चित-आनंद होणे ही ती अवस्था.
सखे, आयुष्याची कृतार्थता स्थितप्रज्ञतेत आहे. मागणी किंवा अपेक्षा आणि तक्रारी थांबल्या की आपण स्थितप्रज्ञ होत जातो. वेगळं काही करण्याची आवश्यकता राहत नाही. ‘तो करी तो परमार्थु’ या अवस्थेला आपण येऊन पोहोचतो. ज्याला हात लावू तो दगड, धोंडा इतरांसाठी परीस, चिंतामणी होतो. ज्या पाण्याला स्पर्श करू, ते पाणी गंगोदक होते. कुठलातरी परीस माझ्या आयुष्याचे सोने करेल, कुणीतरी चिंतामणी नावाचा दगड माझ्या चिंता हरण करेल, या अपेक्षाच शिल्लक राहत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वर्गीच्या नवलाईचे कौतुकही उरत नाही. जे जे स्वर्गात जाऊन मिळवायचे ते ते सर्व इथे या गोव्याच्या भूमीने मला दिले आहे, हा सार्थ अभिमान झळकतो. पृथ्वीवरल्या नश्वर गोष्टींची फिकीर उरत नाही ती नाहीच, त्याही पुढे जाऊन त्या ईश्वराचीही फिकीर, कौतुक उरत नाही.
सखे, आपण जे पाहतो, ते परब्रह्माचेच प्रतिबिंब असते. फक्त जे दिसते ते कायम टिकणारच आहे, असे आपण धरून चालतो. ब्रह्म, चैतन्य कायम आहे, त्याचे झालेले प्रकटीकरण न टिकणारे किंवा बदलत जाणारे आहे, हे सत्य आपल्याला मान्य नसते. आपल्यासह या सर्व स्थिरचराला ‘एक्स्पायरी डेट’ आहे, हे आपण नाकारतो. आपणच चैतन्य आहोत याची जाणीव झाली की, आयुष्य कृतार्थ होते.
सखे, या ब्रह्मचैतन्यात विलीन व्हायची ओढ लागते. सासरी येताना संपून न संपणारी वाट, सासरहून माहेरी जाताना मात्र लवकर संपते. वाट तीच असते, अंतर तेच असतं. हृदयीचा जिव्हाळा पायीं आला की पावलांनाही स्थळकाळाचे भान राहत नाही. आतबाहेर आनंद भरून राहतो. श्वास कस्तुरीसारखे परिमळतात. बोरकरांंनी इथे दरवळ असा शब्द न वापरता परिमळ असा शब्द वापरला आहे. दरवळ सुरुवातीला खूप उग्र असतो, नंतर हळूहळू कमी कमी होत जात नाहीसा होतो. परिमळ हा कायम तसाच राहतो, तो उग्र नसतो आणि नाहीसाही होत नाही. आतबाहेर आनंदी असलेला माणूस, सकारात्मक ऊर्जेने भारलेला असतो. त्याचा सहवास इतरांनाही आनंदी करतो. अगदी कस्तुरीसारखा.
सखे, ही रडकी, नकारात्मक अवस्था अजिबात नाही. हा सुखाचा उत्सव आहे. तरीही त्याचे अप्रूप नाही. ‘शिव’ होण्यासाठी ‘जीव’ अनावर झालेला आहे. सोनेरी पिंजर्यात अडकलेला हा जीव चैतन्यमयी होण्यासाठी आतुर आहे.
सखे, बोरकरांची ही कविता म्हणजे मृत्यूपूर्वी कशी अवस्था असावी, याचा वस्तुपाठ आहे. तृप्त आयुष्य जगल्यानंतर चैतन्यमयी होण्याचं मागणं आहे. इथे रडारड नाही. चैतन्यमय होण्याचं साधन म्हणून मृत्यूकडे पाहिलं आहे. मरण येत नाही म्हणून जिवंत असणं नाही. जिवंत असणं असह्य झालं म्हणून मरण हवंय असंही नाही. उलट इतरांना जेव्हा, ‘आता मृत्यूने येऊच नये’, असे वाटेल अशावेळी केलेली मृत्यूची मागणी आहे. तृप्त, कृतार्थ आणि व्रतस्थ आयुष्याचं हे उद्यापन आहे, ही उजवण आहे.

कवितेचे खूपच सुंदर विवेचन.
उत्तर द्याहटवाहृदयीचा जिव्हाळा पायी आला की पावलानाही स्थळकाळाचे भान राहत नाही.
उत्तर द्याहटवाश्वास कस्तुरीसारखे परमळतात.
शिव होण्यासाठी जीव अनावर होणे
मृत्यूचे मागणे हे तृप्त, कृतार्थ आणि व्रतस्थ आयुष्याचे उद्यापन आहे.
जबरदस्त.
अतिसुंदर۔۔۔۔
उत्तर द्याहटवाही कविता खूप वर्शापूर्वी वाचली होती. आता समजली. तुम्ही कुठे शिकवता? खरोखर ते विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत.
उत्तर द्याहटवाOn which channel?
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवामीरा प्रभूवेर्लेकर
खुप सुंदर लिहिलंय! सुंदर सखोल विवेचन!हर एक शब्द मनाला स्पर्शून जातात अप्रतिम!सुगम रित्या समजावून सांगितला अर्थ! अप्रतिम! रसग्रहण
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लिहिलंय! सुंदर सखोल विवेचन!हर एक शब्द मनाला स्पर्शून जातात अप्रतिम!सुगम रित्या समजावून सांगितला अर्थ! अप्रतिम! रसग्रहण
उत्तर द्याहटवाव्रतस्थ आयुष्याची उजवण आहे "किती यथार्थ ओळ!अभ्यासपूर्ण हे रसग्रहण !"डॉ नीता कुमठेकर
उत्तर द्या