अगं झालं काय ते तरी सांगशील? मघापासून नुसते हुंदके. चला काही चार शब्द ऐकू आले तर तेही असंबद्ध. काय सखे, काय झालंय? तो काही म्हणाला का तुला?
‘हे बघ! तू त्याची बाजू घेणार असशील तर मी सरळ निघून जाईन. संपवेन स्वत:ला. तुलाही ऐकून घ्यायचं नसेल, माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग जगून काय फायदा?’
सखे, माझ्या एवढ्या बोअरिंग प्रवचनांचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही का गं? एकही विचार त्यातून तुला घ्यावासा वाटला नाही का गं? गुण नाही निदान वाण तरी लागायला हवा होता. मारक्या म्हशीसारखी नको बघूस आता. ते जाऊ दे. मी त्याच्या किंवा तुझ्या बाजूचा नाही गं, तुमचाच आहे. तू माझी सखी आहेस. मरणाआधी मरणं आपल्याला जमत नाही, पटतही नाही. पूस पाहू डोळे. काय झालं सांग.
‘तुला माहितीय सगळं. तूच तर साक्षीदार आहेस आमच्या प्रेमाचा. त्यानंही तुझाच सल्ला घेतला होता आणि मीही तुझाच.’
अरे देवा! देशील बर्व्या पुन्हा प्रेमाचे सल्ले देशील?
‘मी तुला ब्लेम करत नाही. समजून घेऊ शकशील असा तूच आहेस, म्हणून सांगते. त्याचं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावर. त्याच्यावर प्रेम करणार्या त्या सुनितेची याला काळजी. जे हवं ते मिळाल्यावर लग्न झालेले सगळे पुरुष मेले असेच वागतात. तू हसू नकोस रे. वंदनाला विचारेन मी.’
सखे, हसू नको तर काय करू? सगळ्या पुरुषांना एकाच मापात मोजणं बरं नव्हे.
‘ते जाऊ दे. मरणाची इच्छा नाही. पण, जगणंच ओझं झालं आहे. त्याचं प्रेम नाही तिच्यावर हे मान्य आहे. पण, माझा काही विचार नको करायला का त्याने? आमच्यातलं नातं बिघडत चाललं आहे, ते कसं सावरावं हेच कळत नाही.’
सखे, रिलॅक्स हो. तुझ्यामाझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करतो. तोपर्यंत तू लताचं ‘रस्म-ए-उल्फ़त को निभाएँ तो निभाएँ कैसे’ हे गाणं ऐक. माझ्या आवडत्या मदन मोहनचं गाणं आहे. नक्श लायलपुरी यांना जे सांगायचं आहे, ते थेट हृदयात पोहोचवणारा सूर लताकडे आणि सुरावट मदनमोहनकडे आहे. डोळे मीट आणि ऐक. तोपर्यंत कॉफी बनवतो.
‘ऐकलंय रे. हजारवेळा ऐकलंय. मग आता काय वेगळं समजणार आहे?’
सखे, या अजरामर गीतांची खासियतच ही आहे की, जेवढ्या वेळा ऐकावं तितकी ती नव्याने समजतात. प्रत्येक वेळी अर्थाची एक वेगळीच छटा समोर येते, जिचा आधी कधी अनुभवच नसतो. कदाचित त्या शब्दांचा अर्थ ऐकल्याक्षणी समजतो, पण पटायला तसा अनुभव यावा लागतो. तुला जे दु:ख झालंय ते आधी तुला नव्हतं, म्हणून तू मुद्दाम हे गीत ऐक. या गीतात एकूण पाच वेळा ‘कैसे’ हा शब्द येतो. पण, प्रत्येकवेळी लतादीदीने तो वेगवेगळा गायला आहे. स्वरातलं मला काही कळत नाही. पण, वेदना सुराला चिकटली की तो सूर प्रत्येकवेळी वेगळीच अनुभूती देऊन जातो. आपल्याच लोकांनी उभ्या केलेल्या आपल्यातल्या भिंती पाडणार तरी कशा, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाला हजारो पद्धतींनी सांगता येईल पण, ज्या हृदयाने ते सांगायचं आहे, तेच भंगलेलं असेल तर सांगावं कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ वेगळं आहे. दु:खाचं ओझं कितीही असतं तर उचललं असतं पण, आयुष्यच ओझं झालं तर ते उचलावं तरी कसं, हे विचारतानाचं ‘कैसे’ तर अगदीच वेगळं. या प्रत्येक ‘कैसे’तलं वेगळेपण वेदनेची वेगळी अनुभूती देऊन जातं. आपलीच वेदना आपल्याला इतक्या प्रभावीपणे ऐकू येते की, आपणही तिला सहज दाद देऊन जातो. आपल्या वेदनेचं आपण दु:ख करतो. आपली वेदना आपल्याला दु:ख देऊन जाते. पण तीच वेदना लता ऐकवते आणि आपली दाद घेऊन जाते.
सखे, तुला येत असलेला अनुभव थोड्या फार फरकाने प्रत्येक संसारात येत असतो. आपल्याला त्रास देणारी माणसे आपलीच असतात. त्या त्रासापेक्षाही ती आपली असतात याचंच जास्त दु:ख असतं. ती परकी असती, तर एका मिनिटात प्रश्न सुटतो. हे न सुटणारे प्रश्न अर्जुनापासून द्रौपदीपर्यंत सगळ्यांना पडले व पडत आहेत. उत्तरेही कृष्णाने दिलेली तीच आहेत. वेगळी अजिबात नाहीत. तुला एक प्रश्न विचारतो. तुला त्याच्या मनाची मालकी हवी की शरीराची मालकी हवी आहे?
‘दोहोंपैकी एक हा पर्याय ठेवत आहेस का? तो शरीरानं आणि मनानंही माझाच असावा, असं वाटतं. काही चूक आहे का त्यात?’
सखे, दोन्ही हवं असल्यास दोन्हीवरची मालकी पूर्णपणे सोडावी लागेल.
‘हा शुद्ध वेडेपण आहे. असं प्रत्येक स्त्री करू लागली तर पुरुषांना रान मोकळंच मिळेल. त्याची काही जबाबदारी उरणारच नाही. तसंही, ‘सगळं हवं तर सगळं सोड’ हे काय लॉजिक आहे? तुझं नेहमी काही तरी वेगळंच असतं. नाही पटत.’
सखे, प्रत्येकीनं असं करावं असं मी नाही म्हणणार. पण, तू तसं करावंस असा माझा आग्रह आहे. नीट ऐक, मी मालकी सोडायला सांगितली आहे, त्याला नाही.
‘हे काय भलतंच?’
सखे, नवरा मालक नसतो आणि बायको मालकीण नसते. पण, तरीही दोघे एकमेकांवर मालकीहक्क गाजवत असतात. प्रेमाचा हक्क असावा, हक्काचं प्रेम असू नये.
सखे, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट जशी महाभारतात आहे, तशी न सांगता थोडी वेगळी सांगतो. दु:शासन जेव्हा द्रौपदीचं वस्त्र ओढू लागतो तेव्हा एकवस्त्रा असल्याने ती पदर घट्ट धरून ठेवते. कृष्णाचा धावा करू लागते. कृष्ण येत नाही. ती याज्ञसेनी रडू लागते, त्याला हाका मारते, तरीही तो येत नाही. दु:शासनाच्या बळापुढे तिचं काही चालत नाही. ती पदराचा नाद सोडून देते. घातलेल्या निर्या घट्ट पकडते. तिची अब्रू वाचवणारी ती शेवटची गोष्ट असते. उघडे पडू नयेत म्हणून एक हात वक्षांवर असतो व दुसर्या हाताने निर्या घट्ट धरून ठेवलेल्या असतात. तशातही कृष्णाचा धावा सुरूच असतो. कृष्ण काही येत नाही. द्रौपदीला खूप दु:ख होतं. दु:शासनाच्या बलप्रयोगापुढे ती हतबल असते. त्याहीपेक्षा आपण धावा करूनही आपला कृष्ण येत नाही, याचं तिला दु:ख वाटत असतं. शेवटी काय व्हायचं ते होवो, असं म्हणत सावरण्यात गुंतलेले दोन्ही हात वर करून ‘कृष्णा....’, अशी आर्त हाक मारते.
सखे, एकच असलेलं तिचं वस्त्र दु:शासनाच्या हातात असतं, तिच्या अंगभर वस्त्रे असतात आणि कृष्ण हसत उभा असतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी द्रौपदी विचारते, ‘कृष्णा, कुठे होतास?, किती उशीर केलास रे यायला.’ हसत हसत कृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी मी इथेच तर होतो. जसा मी सर्वत्र आहे, तसाच इथेही आहे, हे तुला माहीत होतं. पण, आला नाही तर, आपण सर्वांसमोर नग्न झाले तर, याची तुला भीती होती. त्यावेळी, सगळं जग, तू आणि मी इथे होतो. मग त्या भीतीची जागा ‘माझा असूनही येत नाही’ या दु:खाने घेतली. तेव्हा जग विसरलीस, फक्त तू आणि मी होतो. जेव्हा तू भीती आणि दु:ख दोन्ही सोडलेस, स्वत:लाही विसरलीस, तेव्हा जग नव्हतं, तू नव्हतीस, फक्त मीच मी होतो. मान खाली घालून बसलेले पांडवही मीच होतो, मदांधतेने हसणारे कौरवही मीच होतो, द्रौपदीही मीच होतो, वस्त्र ओढणारा दु:शासनही मीच होतो. एवढेच कशाला ते वस्त्रही मीच होतो. याची तुला माहिती होती, त्याच माहितीचे ज्ञान झाले तेव्हा मी दिसलो.
सखे, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं, त्याला आपण बंधनात बांधून ठेवू पाहतो. आपल्या पोटच्या पोरावरही इतकं प्रेम करतो, की ते पोर त्या प्रेमानेच घुसमटतं. प्रेम सर्वत्र आहे. आपण त्याला आडाख्यांमध्ये बांधू पाहतो. अमुक एखादी गोष्ट केली तर प्रेम आहे, नाही केलं तर प्रेम नाही, असले आडाखे नाती संपवतात. हजारो पहारे बसवलेस तरी व्यभिचार करणारा माणूस, संधी मिळताच केल्याशिवाय राहणार नाही.
सखे, सुनिताचं दु:ख हे त्याचं आहे म्हणून ते तुझंही आहे. आपण सगळे आधी मित्र होतो, तेव्हाही तुझा नवरा इतरांचे प्रॉब्लेम्स सोडवायचा, मदतीला धावून जायचा. तेव्हा तुला त्यानं मैत्रिणीला केलेली मदत त्रास देत नव्हती. आता काय बदललंय? तेव्हाही तुमचं एकमेकांवर प्रेम होतं, आजही तसंच आहे. फरक इतकाच झालाय की, तुम्ही नवराबायको झाले आहात. हक्क म्हणजे प्रेम आणि हक्कभंग म्हणजे प्रेमभंग झालाय.
सखे, प्रेम करायचं नसतं, ते होतं. ते ‘होणं’ फक्त सांभाळायचं असतं. प्रेम होण्यावर भाळणं सोपं, सांभाळणं कठीण. गाठीशी असलेलं सगळं सोडून द्यावं लागतं. प्रसंगी, ते प्रेमही सोडावं लागतं.
सखे, तुमच्या दोघांतलं प्रेम, तुमच्या दोघांत, अवती भवती आणि सगळीकडे आहे. अगदी, कृष्णासारखं. ते शोधू गेलीस, तर सापडणार नाही, पाहू गेलीस तर दिसणार नाही. त्याला जसं आहे, तसंच राहू दे. असं केलंस तर कुठल्याही भिंती आड येणार नाहीत, मन मारावं लागणार नाही किंवा मन मोडणार नाही आणि आयुष्य ओझं वाटणार नाही!

