
सखे, आता तुला टेबलवर पडलेल्या वस्तू दिसत आहेत त्या वस्तू आणि मी कालपासून असेच आहोत. विखुरलेले आणि दिग्मूढ. असंख्य भेटकार्डे, आद्याक्षराचे पेन्डण्ट, टेडी बेअर, पैंजण आणि टेबलवर पर्स रिती करताना पडून फुटलेली रिकामी अत्तराची बाटली. या प्रत्येक वस्तूसोबत जोडलेले प्रत्येक क्षण मला यथेच्छ छळून गेले. तिला ती वस्तू विकत घेऊन देता यावी यासाठी स्वत:चं मारलेलं मन, न केलेले खर्च, अटोकाट केलेली काटकसर आणि सर्वांवर कडी करणारं तिच्या चेहर्यावरचं असमाधान. दिलेल्या वस्तूच्या किमतीवर देणार्याच्या प्रेमाचं मोल ती ठरवत होती. किंमत आणि मूल्य यातलं अंतर तिला जिथे समजत नव्हतं तिथे अमूल्य असणारं प्रेम तिच्या लेखी काय असेल याची कल्पनाही माझ्याने करवत नव्हती.
’तुझ्यासारखा वेडा मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. जिला तुझं प्रेम कळत नव्हतं तिच्याशी संबंध तुटले, अर्थात तिनेच तोडले, ते एका अर्थी चांगलंच झालं की. ज्यांना जीव लावणं म्हणजे काय हे समजत नाही त्यांच्यावर जीव लावावा तरी कशाला? एकतर्फी वाताहात करणारे संबंध टिकवून तरी का ठेवावेत? इतर प्रत्येकजण तुझा वापर करून घेतो, तसा वापर करून घेण्यासाठी? तोही फुकट? यात तुला काय मिळालं? तुझा काय फायदा झाला?’
सखे, तिला विसरता येत नाही. तिला विसरणं शक्य नाही. माझ्या आयुष्यातून ती दूर गेली आहे, पण हृदयातून जात नाही त्याचं काय करू? तिच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण भूतकाळात गेलाच नाही. तो माझ्यासोबत वर्तमानातच राहिला आहे. हे प्रेमही आहे आणि हा छळवादही. न संपणारा, न जाणारा. कदाचित जाईलही, पण मी गेल्यावर. जाऊ दे ना! चल तुझा मूड बदलण्यासाठी एक मस्त गीत ऐकवतो. अनिल कांबळेंनी लिहिलेलं, सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं ’तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे’ हे गीत ऐक. याला संगीतबद्ध केलं आहे, डॉ. सलील कुलकर्णी यांनी.
सखे, तिच्यासोबतचे प्रत्येक प्रहर, प्रत्येक क्षण मला आठवत आहेत. आठवले असं म्हणणं ही कदाचित चुकीचं ठरेल. कारण त्यांना कधी विसरलोच नव्हतो. ती आणि मी सकाळी चालायला जायचो. धुकं कापत येणारी सूर्यकिरणे कॅमेर्यात कैद करायला तिला फार आवडायचं. ढगांना दूर करत, झाडांच्या आडून गवताच्या पातीवर ओथंबलेल्या दवबिंदूंचे चुंबन घेण्याकरता आसुसलेली सूर्याची किरणे आणि त्यामुळे धुक्याच्या कॅनव्हासवर तिरपे होणारे कवडसे, मला जसे आहेत तसेच पाहायला फार आवडत. तिला ते कधी एकदा कॅमेर्यात बंद करते, असे होऊन जायचे. निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेले चित्र दरक्षणी बदलणारं, दर खेपेला वेगळं आणि नवं, ताजं वाटतं. तेच कॅमेर्यात कैद झाले की, प्रत्यक्षाहून उत्कट दिसतं. पण, ते चित्र फक्त उत्कट दिसतं, त्यात निसर्गाची उत्कटता नसते. म्हणूनच कितीही वेळा पाहिलं तरी तसंच दिसतं. तिला कुपीत बंद झालेलं अत्तर आवडायचं. मला तेच अत्तर फुलासोबतच हवं असायचं. तुला ही फुटलेली अत्तराची बाटली आहे ना, ती तिच्या आग्रहाखातर दिली होती. एकदा वाटून गेलं फुटलेली बाटली जोडावी. नंतर म्हटलं राहू दे. नाती आणि काचेची बाटली सारखीच असतात. फुटलेली बाटली आपण कितीही चांगल्या पद्धतीने चिकटवली, तरी ती चिकटवलेली बाटली, ’जोडली आहे’ यापेक्षाही ’फुटली होती’ याचीच जाणीव जास्त करून देते.
सखे, तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नव्हे. ते समजण्याची गल्लत होती. तिने प्रेमाला महागड्या भेटवस्तूंशी आणि त्या देण्याशी जोडलं होतं. किमती भेटवस्तू दिल्या म्हणजे प्रेम आहे, नाहीतर नाही अशा काहीतरी विचित्र कल्पना तिच्या प्रेमाबद्दल आहेत. तिच्या पायांत पैंजण घातले तेव्हाही पाय हलवत सोन्याचे हवे म्हणून हट्ट धरून बसली होती. हा टॅडी बेअर दिला ना तेव्हा तिने आनंदाने नाचली होती, जीन्सवर घातलेला एकमेव टॉप काढून, त्याला हाताने फिरवत फिरवत नाचली होती. तशीच मलाही घट्ट मिठीही मारली. आवरता नाही आलं गं स्वत:ला. ते अनावर होणं म्हणजे प्रेम नव्हे, देहाचं मीलन म्हणजे प्रेम नव्हे, प्रणयोत्सुकता म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाच्या ओघात देहाचं समर्पण सामान्य गोष्ट आहे. पण, ते आणि त्याच्यासाठी जवळ येणं म्हणजे प्रेम नव्हे. तो शुद्ध चैतन्याचा महोत्सव आहे. ते देणं आहे, घेणं नाही. ही देणी परत करता येत नाहीत. उत्तररात्री रतिक्लांत होऊन विसावलेले देह पहाटे पुन्हा उमलताना अनावर होत गेलेले सुखाचे बहर तिला नाही परत करता येणार. संध्याकाळी दीपमाळेतला एक एक दिवा लागत असल्यापासून पहाट होता होता शेवटचा दिवा विझेपर्यंत तिची वाट पाहणं, ती नाही परत देऊ शकणार. ती काहीच परत नाही देऊ शकत म्हणून तिने भेटवस्तू परत दिल्या. तिच्याकडे देण्यासाठी फक्त वस्तू शिल्लक होत्या. माझ्याकडे वस्तूंशिवाय सगळं काही.
’एक विचारू? तिनं तुझा वापर करून घेतला. तिनं काय कमावलं माहीत नाही. तू सर्वस्व गमावलंस. तुला काय मिळालं? ’
सखे, प्रेमात घेणं - देणं, कमावणं - गमावणं, फायदा - नुकसान असं काही व्यवहारी नसतं गं. तरीही तुला पटेल असं उत्तर देतो.
मी तिला गमावलं जिचं माझ्यावर प्रेमच नव्हतं. तिनं अशा माणसाला गमावलं, ज्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा