गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

ती रात्र कुसुंबी बहराची...
























सखे, एक विचार ऐकवतो.

मरणानंतरच्या यात्रेकडे नेतो तो यम आणि जिवंतपणी मरणयातना देतो तो संयम. 

वास्तविक पाहता संयम हा माणसामधला चांगला गुण आहे. पण सभोवतालची परिस्थितीच अशी विचित्र आहे की, माणसातले दुर्गुण त्याला पोषक ठरतात आणि सद्गुण मारक. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणार्‍यांना होतो. गेलेले क्षण पुन्हा आणता येत नाहीत, आपण त्यावेळी तसे का वागलो हे ठरवता येत नाही. मागे वळून पाहताना, हे न ठरवता येणंच आयुष्यातले चांगले क्षण विस्कटून टाकतात. खूप कष्ट घेऊन काढलेली एखादी देखणी रांगोळी लहान मुलाने सहजपणे विस्कटून टाकावी ना, अगदी तसे.

विस्कटलेल्या रांगोळीतला प्रत्येक कण आपला रंग बाळगून असतो. तेच कण घेऊन त्याहीपेक्षा सुंदर रांगोळी पुन्हा रेखाटता येते. आयुष्याची राखरांगोळी करणारे क्षण कितीही मोहक असले तरी ते क्षण घेऊन विस्कटलेलं आयुष्य पुन्हा  रेखाटता येत नाही. 

सखे, जे घडून गेलं आहे त्या वृत्ताकडे निवृत्त मनाने पहावं. पण, हे फार कर्मकठीण असतं. आपलं मन त्यात गुंतलेलं असतं. आयुष्यातले चांगले क्षण सुखावून जातात आणि दु:खाचे क्षण दु:ख देऊन जातात. क्षण धरून ठेवता येत नाहीत. त्यातली क्षणभंगुरता कायम त्रास देत राहतेच. या न विसरता येण्यार्‍या क्षणांना आपल्या काव्यामध्ये नेमकेपणाने टिपणे  पाडगावकरांना छान जमते. आयुष्यातले जीवघेणे क्षण पाडगावकर अशा रितीने मांडतात की, ते क्षण पुन्हा जगणं शक्य होतं. त्यांचं काव्य अनुभव देत नाही तर अनुभूती देतं. अनुभव आणि अनुभूती यातला फरक सांगेन नंतर पण त्याआधी अरुण दातेंनी गायलेलं ’ती रात्र कुसुंबी बहराची’ हे गीत ऐक. खळेकाकांंनी अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच ’स्पर्शाच्या’ हा शब्द जसा उच्चारला आहे तो डोळे मिटून ऐक, तुला सगळे स्पर्श जाणवू लागतील. मला तर हे गीत ज्या ज्या वेळी कानावर येतं त्या त्या वेळी तिच्यासोबत घालवलेले ते क्षण सजीव होतात. तिच्या मिठीतली मिठास जाणवू लागते. तिचा स्पर्श गात्रागात्रांतून विहरू लागतो. 

सखे, हे गीत जेव्हा पहिल्यांदाच ऐकलं तेव्हा त्यातल्या ’कुसुंबी’ या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. अनेक कादंबर्‍यांतून डोकावलेला ’सांद्र’ हा शब्दही मला ’सांद्र’ करून गेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुसुंबी नावाचं एक गाव आहे. कुसुंबी नावाचा एक वृक्षही असतो. केशरी आणि किरमिजी रंग एकत्र येऊन तयार होणार्‍या अत्यंत देखण्या रंगालाही  कुसुंबी म्हणतात. रंग या अर्थानं हा शब्द पाडगावकरांनी योजला असावा असं मला वाटतं. प्रत्येक रंगाला स्वत:ची वृत्ती असते. केशरी हा विरागी, विरक्त, त्यागी वृत्ती दर्शवतो. किरमिजी रंग उत्कट प्रणयार्तता प्रकट करतो. कमालीची आसक्ती आणि कमालीची अनासक्ती जेव्हा प्रणयाच्या पटलावर एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यातून जो जहरापेक्षाही अधिक खोलवर भिनणारा रंग तयार होतो. तो म्हणजे कुसुंबी. 

सखे, त्या रात्री ती मला भेटायला आली होती. कोणती दिव्ये तिने पार केली होती तीच जाणे. पण, तिची प्रणयार्तता तिच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होती. धावत येऊन तिने घातलेली मिठी, तिच्या हृदयातली धडधड माझ्या हृदयी कवळून गेली. तिला मिठीत घेण्यासाठी सरसावलेले बाहू, काही क्षण तसेच राहिले. तिच्या मिठीला जे सांगायचं होतं त्याची जाणीव हातांना झाल्यानंतर ते तिच्या पाठीवर जाण्याऐवजी खांद्यांवर स्थिरावले. बाहूपाशातून मुक्त करणं तिला अनपेक्षित असावं. तिच्या डोळ्यातही ते स्पष्ट जाणवलं. 

’हे मीलनाचे क्षण पुन्हा येणार नाहीत.’ हे तिने आपले डोळे माझ्या डोळ्यांत जडवून सांगितलं.  तिच्या आर्ततेच्या कहरातून सावरताना संयमाची पराकाष्ठा झाली. जे हवं होतं, ते वेळेआधीच मिळत होतं. अयाचित मिळत होतं, आपणहून मिळत होतं. संधी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक माणूस सज्जनच असतो. संधी मिळाल्यानंतरही सज्जनत्व टिकून राहण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो. 

’का? लग्न झालं नाही म्हणून?’ तिनं विचारलं. मी मानेनेच होकार दिला. काही क्षण असेच मुग्धतेत निघून गेले.

’फक्त लग्न झालं नाही म्हणून नव्हे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तुझ्यासकट तुझ्या चारित्र्याला मी जबाबदार आहे म्हणून.’ बोलता बोलता माझा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. तिलाही अश्रू आवरेनात. तिने पुन्हा मिठी मारली. तो वेग आणि आवेग एवढा जबरदस्त होता की, दोघेही गवतावर कोसळलो. आधी मारलेल्या मिठीत प्रणयार्तता होती, आता प्रेम ओसंडून वहात होतं. 

प्रत्येक मिठी वेगळी असते आणि तिची मिठासही. 

सखे, त्या ’अलौकिक’ अवस्थेतून सावरल्यावर माझ्या तोंडून सहज शीळ निघून गेली.  पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिच्या रूपसौंदर्याच्या खजिन्याचं रक्षण करण्यासाठी विधात्याने तिच्या गालावर तीळ बहाल केला होता. एरव्ही कृष्णवर्णीय असणारा सौंदर्यांचा राखणदार तीळ, चांदण्यात भिजून पिठूरला होता. त्या चंद्रालाही हेवा वाटावा असा चंद्र माझ्यासमोर होता. मी एकवार आकाशीच्या चंद्राकडे पाहिलं आणि मला त्याचं हसू आलं. गालावरच सुकलेल्या आसवांकडे पहात तिने विचारलं, 

’का रे हसलास?’

काही नाही गं. या चंद्राच्या संसारव्यथेने हसू आलं. हा चंद्र पुरुषासारखा पुरुष असूनही हे कविलोक त्याची उपमा सुंदर स्त्रीच्या चेहर्‍याला देतात. आधीच कायम तारकांच्या गराड्यात असणार्‍या चंद्राची बायको रोहिणी त्याच्यावर किती रागवत असेल, याची कल्पना करून हसू आलं. लग्न झाल्यानंतर  तू नाही ना रागावणार माझ्यावर? 

माझ्या प्रश्‍नावर का कोण जाणे ती गंभीर झाली. लगेच चेहरा बदलत खो खो हसत सुटली. क्षणात चेहरा पालटण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या चेहर्‍यात ओतणार्‍या मदनाचा प्रहर आठवणीच्या साम्राज्यात जो झिंगला तो झिंगलाच. 

सखे, दोघांची हृदये प्रेमाच्या माधुर्यात बुडून गेली होती. हा प्रेमाचा गोडवा मोठा विलक्षण असतो. स्वत:बरोबर सर्व गोष्टींना तो मधात बुडवून काढतो. रातराणीच्या मोहक सुगंधालाही मधुर करून सोडतो, सारा आसमंत माधुर्याने भारावतो. ’मधुरधिपते: अखिलं मधुरं’ म्हणजे कोणती अवस्था आहे, हे समजण्यासाठी हृदये प्रेमाने ओतप्रोत भरलेली असणे आवश्यक आहे. आम्ही हातात हात घेऊन चांदणे सांडलेल्या वाटेवर हरवलो.  या वाटेवर पाहिलेली स्वप्नं धूसर होती.  याची जाणीव थोड्याच दिवसांनी झाली जेव्हा त्याच वाटेवरून गेलेली ती पुन्हा आली नाही तेव्हा. मीच कदाचित समजू शकलो नाही, तिची मीलनोत्सुकता विरहाच्या जाणिवेतूनच आली होती. पुन्हा कधीच भेटणार नाही याची पक्की खात्री होती म्हणून ती भेटण्यासाठी आली होती. ती जे द्यायला आली होती, ते शरीरसुख मला नको होतं का? याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. पण, ते घेणं मात्र माझ्याकडून घडलं नाही. 

सखे, जे घडलं ते बरोबर होतं की चुकीचं हे सापेक्ष आहे. त्या क्षणी जसा मी वागलो तसा पुन्हा वागेन की नाही, हे माझं मलाही सांगता येणार नाही. एवढच का, ते मला ठरवताही येत नाही. कधी कधी आपल्या दुर्गुणांपेक्षाही आपला पराभव आपल्यामधले चांगले गुणच करतात.  आयुष्यात घायाळ करणं जेवढं सौंदर्याला जमलं नाही, तेवढं घायाळ आणि त्याहूनही अधिक विदीर्ण मला माझ्या संयमाने केलं आहे. 

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

यूँही नहीं दिल लुभाता कोई...


सखे, तू मला का आवडतेस, हे नाही सांगता येत. तू अनेकदा ’मी तुला इतकी का आवडते’ हा प्रश्न विचारून मला भंडावून सोडतेस. नेमकं असं एकच कारण नाही. फक्त ते कारण मला माहिती नाही. या जगात काहीच अकारण घडत नाही. एखाद्या घटनेमागचं कारण आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण आपल्यापरिने त्याची संगती लावण्याचा प्रयास करीत असतो. आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या माणसांना भेटतो, ते अचानक, योगायोगाने वगैरे नव्हे तर ऋणानुबंधांच्यामुळे भेटतो. म्हणूनच एखादा माणूस आपल्याला इतरांपेक्षा अधिक का आवडतो हे तर्कानं पटवता येत नाही. बस तो आवडतो, या पलीकडे आपल्याला काही सांगता येत नाही. 

सखे, तू बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. त्यामुळं तर्कानं न पटवता येणं तुला पटणार नाही. बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर काही अनाकलनीय असतच नाही हा तुझा ठाम ग्रह आहे. त्यावरून आपली अनेकदा भांडणेही झाली आहेत. वादग्रस्त मुद्दे विसंवाद घडवतात. ’असं असू शकेल’ असं मान्यच नसणं, कुठेही श्रद्धा नसणं म्हणजे विज्ञाननिष्ठ असणं असा तुझा दृढ समज आहे. अरे देवा! तुझा कोमल चेहरा रागाने करपू लागला आहे, यथेच्छ, तुडुंब भांडणाची नांदी तुझ्या चेहर्‍यावर दिसू लागली आहे. तेव्हा शांत हो माझ्या आई!

’मी तुझी आई नाही.’

माहिती आहे. रागावू नकोस. प्रेम नाही, निदान रागावू तरी नकोस. सोड ना, किती रागावशील? चल मी तुला किशोर कुमारचं मस्त गाणं ऐकवतो. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं ’तेरा मुझ से है पहले का नाता कोई’ हे गाणं तू ऐक.  पंचमदांचं मस्त मनमोहक संगीत आहे. मस्तपैकी अशी खुर्चीत बैस. कॉफी घे, गाणं ऐक. तुझा मूडही ठीक होईल. 

’हे बरं जमतं तुला. माझा राग कसा घालवायचा, त्यासाठी कोणती कळ फिरवायची हे तुला चांगलंच माहिती आहे. तुम्हा पुरुषांना बायकांना पटवण्यासाठी ही अशी अतर्क्य गाणी बरी ऐनवेळी सुचतात. मॅन विल बी मॅन हेच खरं.’

सखे, आता मी म्हणू का, तुम्हा बायकांचा पुरुषांकडे पाहण्याचा हा परंपरागत, अतर्क्य दृष्टिकोन आहे? पुरुष स्त्रीकडे ’त्याच’ एका कारणासाठी आकर्षित होतो, तिच्याशी लाडीगोडी करतो, जवळीक साधायचा प्रयत्न करतो, असं स्त्रियांना नेहमी वाटतं. स्वत:च्या प्रमाणबद्ध सौंदर्याची प्रमाणाबाहेर जाणीव झालेली असेल, तर मग प्रत्येक पुरुष आपल्याकडे ’त्याच’ नजरेने पाहतो असा दृष्टिकोन तयार होतो. 

’पुरुष ज्या पद्धतीने स्त्रीकडे पाहतात आणि त्या पाहण्याचा त्या स्त्रीला किती त्रास होतो, हे तू स्त्री असतास तर तुला कळालं असतं.’

मान्य आहे. बहुतांशी पुरुषांचा दृष्टिकोन तसा असतो. पण त्यामुळे संपर्कात येणारा पुरुष तसाच असतो असं म्हणणं कितपत योग्य आहे? स्त्रीवर तिच्या देहापलीकडे जाऊन प्रेम करणार्‍या पुरुषावर हा अन्याय नाही का? अमृत मासिकामध्ये एक गोष्ट आली होती. एक नवरा आपल्या बायकोला वाचवा म्हणून डॉक्टरच्या पाया पडत असतो. ’डाक्टरसाब कैसा भी करके जोरू को बचाओ. गरीब हूं लेकीन पाई पाई चुकाउंगा. पांव पडता हूं साहब’. पाया पडणारा, गयावया करणारा माणूस दिसायला हॅन्डसम असतो. त्याची मरणासन्न बायको कुरूप असते. त्याला अजिबात शोभणारी नसते. डॉक्टरला आश्चर्य वाटतं. डॉक्टर त्याला म्हणतो, ’वाईट वाटून घेऊ नकोस. पण, तुझी बायको गेली तर तू सुटशील. एखादी सुंदर स्त्री तुझ्यावर सहज भाळेल. मग तू हिला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का करतोस?’ तेव्हा तो माणूस म्हणतो, ’साब, इसे मेरी आंखोसे देखो’. 

एखाद्याचं सगळ्या गोष्टी अनुकूल असताना नाकारणं आणि सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतानाही स्वीकारणं, बुद्धिप्रामाण्याने पटवता येणार नाही. हे अनेक जन्मांचे ऋणानुबंध, पूर्वी कुठेतरी ओळख असणं, नातं असणं मान्य करावं लागतं. 

’म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की, पुनर्जन्म असतो. पुनर्जन्म वगैरे असं काही खरंच असतं का?’  

सखे, पुनर्जन्म असतो. नसते ती स्मृती. जन्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म या शृंखलेला जोडणारी स्मृती नसते. वेगळ्या अर्थाने सांगायचे तर, स्मरण नसणे हेच मरण. तू संगणकातली एखादी संचिका (फाईल) नाहीशी (डिलीट) करतेस तेव्हा नेमकं काय होतं? त्या संचिकेचे हेडर आणि फूटर वेगळे होतात, त्यातली माहिती तशीच राहते. हेच हेडर व फूटर पुन्हा जुळवता आले तर नाहीशी केलेली संचिका परत मिळवता येते. कमी अधिक फरकानं तसंच पुनर्जन्माचं असतं. 

सखे, एखाद्याला एखादी गोष्ट चटकन समजते, करताही येते. त्याच्याहीपेक्षा हुशार गणलेल्याला त्याच गोष्टीचे लवकर आकलन होत नाही, असं का? मला आंबा प्रचंड आवडतो, माझ्या धीरज म्हांबरे नावाच्या मित्राला अजिबात आवडत नाही. असं का? मन, मेंदू, बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, दोघांनाही असते. तरी मग असं का होतं? क्रिया प्रतिक्रियांच्या प्रक्रियेतून ज्याचा जिथपर्यंत अभ्यास झालेला असतो, तिथून पुढे तो जात असतो. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचं, विचारांचं मुद्रण आपल्या गुणसूत्रांवर होत असतं. मेल्यानंतर आपण काहीच घेऊन जात नाही असं नाही. मिळवलेलं ज्ञान,  अभ्यास, आवड निवड, विचार आपण घेऊन जात असतो.  

सखे, हीच आवड निवड, ज्ञान घेऊन आपणच पुन्हा जन्माला येतो. मागील पानावरून पुढे प्रवास सुरू होतो.  हे मागचं पुढे घेऊन जाणं म्हणजे संचित.  संचित वासनेला प्रेरित करतं, वासना बुद्धीला, बुद्धी मनाला, मन इंद्रियांना प्रेरित करतं आणि पुन्हा कार्य घडतं. 

आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन इतरांपेक्षा सहज का होतं, एखादी गोष्ट का आवडते, त्यामागे ही कारणपरंपरा असू शकते. तू मला का आवडतेस, हे नेमकं सांगता येत नसलं तरी, काही तरी ऋणानुबंध आहेत एवढं निश्चित...

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

तुला जर द्यायचे आहे...


"अरे, असा काय बघत बसला आहेस त्या वस्तूंकडे? अगदी आयुष्यभराचं नुकसान झाल्यासारखा! असं असूनही तुझा चेहरा तुझ्या नावासारखाच आहे. पण, असा जेव्हा तुझा चेहरा प्रसन्न असतो ना, तेव्हा खूप काही घडून गेलेलं असतं, तुझ्या हृदयात खूप खोल काहीतरी तुटलेलं असतंं. हा माझा आजवरचा अनुभव आहे. सांग ना काय झालं? "

सखे, ती येऊन गेली. ज्या ज्या भेटवस्तू तिला दिल्या होत्या त्या सगळ्या देऊन गेली. खरं तर नकोच होत्या मला त्या. त्या नको असलेल्या वस्तू परत दिल्याचं दु:ख नाही. नातं तोडल्यानंतर परत देण्यासारखं तिच्याजवळ एवढंच राहिलं होतं, याचंच दु:ख मला जास्त झालं. तिचा झाल्यानंतर मी माझ्यासाठी माझ्यापुरताही उरलो नव्हतो. तिच्याजवळ ती, तिची प्रायव्हेट स्पेस आणि मी दिलेल्या भेटी उरल्या होत्या. खांद्याला लावलेली बॅग टेबलवर घस्‌कन रिती करताना तिला त्या वस्तू आपटतील, फुटतील, त्यांना तडा जाईल असं जराही वाटलं नाही. जिथे माझ्या हृदयाला तडा देताना, जिला जराही काही वाटलं नव्हतं, तिला भेट दिलेल्या वस्तू परत देताना त्यांना तडा जाईल, याची फिकीर असण्याची अपेक्षा तरी मी का बाळगावी? तिच्यासाठी ज्या केवळ वस्तू होत्या, त्या माझ्यासाठी बहुमूल्य होत्या. त्यामागे असणार्‍या भावनेची मोजदाद तर कुठल्याच किमतीत होणारी नव्हती. 

सखे, आता तुला टेबलवर पडलेल्या वस्तू दिसत आहेत त्या वस्तू आणि मी कालपासून असेच आहोत. विखुरलेले आणि दिग्मूढ. असंख्य भेटकार्डे, आद्याक्षराचे पेन्डण्ट, टेडी बेअर, पैंजण आणि टेबलवर पर्स रिती करताना पडून फुटलेली रिकामी अत्तराची बाटली. या प्रत्येक वस्तूसोबत जोडलेले प्रत्येक क्षण मला यथेच्छ छळून गेले. तिला ती वस्तू विकत घेऊन देता यावी यासाठी स्वत:चं मारलेलं मन, न केलेले खर्च, अटोकाट केलेली काटकसर आणि सर्वांवर कडी करणारं तिच्या चेहर्‍यावरचं असमाधान. दिलेल्या वस्तूच्या किमतीवर देणार्‍याच्या प्रेमाचं मोल ती ठरवत होती. किंमत आणि मूल्य यातलं अंतर तिला जिथे समजत नव्हतं तिथे अमूल्य असणारं प्रेम तिच्या लेखी काय असेल याची कल्पनाही माझ्याने करवत नव्हती. 

’तुझ्यासारखा वेडा मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. जिला तुझं प्रेम कळत नव्हतं तिच्याशी संबंध तुटले, अर्थात तिनेच  तोडले, ते एका अर्थी चांगलंच झालं की. ज्यांना जीव लावणं म्हणजे काय हे समजत नाही त्यांच्यावर जीव लावावा तरी कशाला? एकतर्फी वाताहात करणारे संबंध टिकवून तरी  का ठेवावेत? इतर प्रत्येकजण तुझा वापर करून घेतो, तसा वापर करून घेण्यासाठी? तोही फुकट? यात तुला काय मिळालं? तुझा काय फायदा झाला?’ 

सखे, तिला विसरता येत नाही. तिला विसरणं शक्य नाही. माझ्या आयुष्यातून ती दूर गेली आहे, पण हृदयातून जात नाही त्याचं काय करू? तिच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण भूतकाळात गेलाच नाही. तो माझ्यासोबत वर्तमानातच राहिला आहे. हे प्रेमही आहे आणि हा छळवादही. न संपणारा, न जाणारा. कदाचित जाईलही, पण मी गेल्यावर. जाऊ दे ना! चल तुझा मूड बदलण्यासाठी एक मस्त गीत ऐकवतो. अनिल कांबळेंनी लिहिलेलं, सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं ’तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे’  हे गीत ऐक.  याला संगीतबद्ध केलं आहे, डॉ. सलील कुलकर्णी यांनी. 

सखे, तिच्यासोबतचे प्रत्येक प्रहर, प्रत्येक क्षण मला आठवत आहेत. आठवले असं म्हणणं ही कदाचित चुकीचं ठरेल. कारण त्यांना कधी विसरलोच नव्हतो. ती आणि मी सकाळी चालायला जायचो. धुकं कापत येणारी सूर्यकिरणे कॅमेर्‍यात कैद करायला तिला फार आवडायचं. ढगांना दूर करत, झाडांच्या आडून गवताच्या पातीवर ओथंबलेल्या दवबिंदूंचे चुंबन घेण्याकरता आसुसलेली सूर्याची किरणे आणि त्यामुळे धुक्याच्या कॅनव्हासवर तिरपे होणारे कवडसे, मला जसे आहेत तसेच पाहायला फार आवडत. तिला ते कधी एकदा कॅमेर्‍यात बंद करते, असे होऊन जायचे. निसर्गाच्या कॅनव्हासवर रेखाटलेले चित्र दरक्षणी बदलणारं, दर खेपेला वेगळं आणि नवं, ताजं वाटतं. तेच कॅमेर्‍यात कैद झाले की, प्रत्यक्षाहून उत्कट दिसतं. पण, ते चित्र फक्त उत्कट दिसतं, त्यात निसर्गाची उत्कटता नसते. म्हणूनच कितीही वेळा पाहिलं तरी तसंच दिसतं. तिला कुपीत बंद झालेलं अत्तर आवडायचं. मला तेच अत्तर फुलासोबतच हवं असायचं. तुला ही फुटलेली अत्तराची बाटली आहे ना, ती तिच्या आग्रहाखातर दिली होती. एकदा वाटून गेलं फुटलेली बाटली जोडावी. नंतर म्हटलं राहू दे. नाती आणि काचेची बाटली सारखीच असतात. फुटलेली बाटली आपण कितीही चांगल्या पद्धतीने चिकटवली, तरी ती चिकटवलेली बाटली, ’जोडली आहे’ यापेक्षाही ’फुटली होती’ याचीच जाणीव जास्त करून देते. 

सखे, तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नव्हे. ते समजण्याची गल्लत होती. तिने प्रेमाला महागड्या भेटवस्तूंशी आणि त्या देण्याशी जोडलं होतं. किमती भेटवस्तू दिल्या म्हणजे प्रेम आहे, नाहीतर नाही अशा काहीतरी विचित्र कल्पना तिच्या प्रेमाबद्दल आहेत. तिच्या पायांत पैंजण घातले तेव्हाही पाय हलवत सोन्याचे हवे म्हणून हट्ट धरून बसली होती. हा टॅडी बेअर दिला ना तेव्हा तिने आनंदाने  नाचली होती, जीन्सवर घातलेला एकमेव टॉप काढून, त्याला हाताने फिरवत फिरवत नाचली होती. तशीच मलाही घट्ट मिठीही मारली. आवरता नाही आलं गं स्वत:ला. ते अनावर होणं म्हणजे प्रेम नव्हे,   देहाचं मीलन म्हणजे प्रेम नव्हे, प्रणयोत्सुकता म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाच्या ओघात देहाचं समर्पण सामान्य गोष्ट आहे. पण, ते आणि त्याच्यासाठी जवळ येणं म्हणजे प्रेम नव्हे. तो शुद्ध चैतन्याचा महोत्सव आहे. ते देणं आहे, घेणं नाही. ही देणी परत करता येत नाहीत. उत्तररात्री रतिक्लांत होऊन विसावलेले देह पहाटे पुन्हा उमलताना अनावर होत गेलेले सुखाचे बहर तिला नाही परत करता येणार. संध्याकाळी दीपमाळेतला एक एक दिवा लागत असल्यापासून पहाट होता होता शेवटचा दिवा विझेपर्यंत तिची वाट पाहणं, ती नाही परत देऊ शकणार. ती काहीच परत नाही देऊ शकत म्हणून तिने भेटवस्तू परत दिल्या. तिच्याकडे देण्यासाठी फक्त वस्तू शिल्लक होत्या. माझ्याकडे वस्तूंशिवाय सगळं काही.

’एक विचारू? तिनं तुझा वापर करून घेतला. तिनं काय कमावलं माहीत नाही. तू सर्वस्व गमावलंस. तुला काय मिळालं? ’

सखे, प्रेमात घेणं - देणं, कमावणं - गमावणं, फायदा - नुकसान असं काही व्यवहारी नसतं गं. तरीही तुला पटेल असं उत्तर देतो. 

मी तिला गमावलं जिचं माझ्यावर प्रेमच नव्हतं. तिनं अशा माणसाला गमावलं, ज्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. 

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

पहाटे पहाटे मला जाग आली...

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.  https://aiksakhe.blogspot.com/2021/09/blog-post.html



सखे, पहाटे पहाटे आपल्याला जाग कशी यावी, हे आपल्या हातात नसतं. काल भल्या पहाटे सात वाजता बायकोने गदागदा हलवून जागं केलं. मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती काहीतरी बोलत होती. तारस्वरामुळे शब्दही कानी पडत होते. पण, अर्थ कळत नव्हता, संगती लागत नव्हती.

’अहो, उठा. आंघोळी करून घ्या पटापट. पाणी आठ वाजता जाणार आहे. टाकीला पाणी चढत नाही. नळाला येतं तेवढ्यातच सगळी कामं उरकून घ्या. अहो, चला उठा पटापट.‘

तिच्या तोंडाचा पट्टा पटापटा सुरूच होता. अर्ध ऐकू जात होतं, ऐकू गेलेल्यातलं अर्धच समजत होतं, अशा "अलौकिक" अवस्थेत मी होतो. त्यामुळे साहजिकच मी फक्त कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेलो. स्वयंपाकघरात गेलेली बायको पुन्हा कानाकडे येऊन ओरडू लागली. 

’अहो झोपताय काय कुंभकर्णासारखे! आधीच पाण्याचा दुष्काळ. त्यात तुम्ही घसाघसा पाणी ओतून संपवता. पाणी वाचवण्याचं तुमच्या मनातही कधी येत नाही. मीच मेलीनं एकटीनं काय काय म्हणून सांभाळायचं, कुठं कुठं लक्ष द्यायचं? संसाराचं तुम्हांला काही पडलं .................... ‘

स्वयंपाकघरातून विळीवर नारळ खवण्याचा तालावर संसाराचं खवट गाणं सुरू झालं आणि माझ्या डोक्याचा नारळ व झोपेचं खोबरं करून गेलं. मी उठून बसलो. पाणी वाचवण्याचं मनात येत नाही असं सांगताना, पाणी आणि वेळ वाचावा या सद्हेतूने कित्येकवेळा आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या आंघोळी मात्र हिला आठवल्या नाहीत. मला मात्र या आठवणी बसल्या बसल्या न्हाववून गेल्या. त्या सुखद आठवणीत मी पुन्हा झोपी गेलो, बायको पुन्हा कडाडली. तेव्हापासून आमच्या घरात अबोली फुलली आहेत.

सखे, माणसाला पहाटे अशी जाग यावी की दिवस चांगला जावा. दिवस रमणीय होण्यासाठी रात्रही रमणीयच असावी लागते. पहाट होऊच नये असे वाटायला लावणारी रात्र, नंतर येणारा दिवस सोनेरी करून जाते. तुझ्यासोबत जागवलेल्या अनेक रात्रींमुळे माझे अनेक दिवस सोनेरी झाले आहेत. अगं लाजतेस काय अशी? खरंच तर आहे. सुरेश भटांनी ’पहाटे पहाटे मला जाग आली’ हे गीत माझ्यासाठीच लिहिलं आहे असं मला कायम वाटतं. आपलाच अनुभव, आपलीच भावना गीतातून कवीने मांडली आहे, एवढेच नव्हे तर हे गीत माझ्यासाठीच लिहिले आहे, असे प्रत्येकाला वाटणे हे कवीचे सामर्थ्य असते. सुरेश भटांकडे हे सामर्थ्य अतोनात आहे आणि हे सामर्थ्य नेमकेपणाने वापरण्याचं कौशल्यही. अशी भावलेली गाणी प्रत्येक सहृदय माणूस आपल्या पद्धतीने गातो. तालात, सुरात आपण ते गात नाही याची जाणीव असतानाही गातो. आपणच ते गायलं आहे असं प्रत्येकाला वाटायला लावणं हे गायकाचं सामर्थ्य आहे. हे गीत तू ऐक. आपण जागवलेली प्रत्येक रात्र, प्रत्येक पहाट तुला झोपू देणार नाही.

सखे, येऊच नये असे वाटणारी पहाट तुझ्या मिठीतून दूर होण्याने येते. जागं करून जाते. गच्च असली तरी ती रेशमाची असते. करकचून आवळणं एरव्ही त्रासदायक असतं. पण, तुझी मिठी सुटल्यानंतर त्रासदायक होते. बेधुंद प्रणयानंतर आलेली झोप मिठीची मिठास वाढवते. निद्रा आणि जागृती यांची परमोच्च स्थिती व अनुभूती एकच असते. तुझ्या मिठीतली गाढ निद्रा ही माझ्यासाठी जागृतीची अलौकिक परमोच्च अवस्थाच असते. तू मिठी सैल केल्यानंतर मी लौकिकार्थाने जागा होतो. मिठी सैल झाल्यामुळे अग्रेही विलग होतात. दूर झाल्याने त्यांचं न ’टोचणं’ दुखतं. एरव्ही छातीवर रुतलेली असताना ही अग्रे टोकाचे सुख देऊन जातात. तू रागावलीस ना, की माझ्या ओठावर ’नच सुंदरी करू कोपा’ हे नाट्यगीत सहज येतं. तुला राग आणणार्‍या माझ्यासारख्या महतपाप्याला, तू काय दंड  द्यावास, हे दुसर्‍या कडव्यातल्या ’टोचुनी दुखवी मजला‘च्या आधीच्या ओळीत कृष्णानेच सांगितले आहे. असा दंड, अशी शिक्षा आजन्म भोगायला मिळण्यासारखं भाग्य दुसरं नाही.

ज्या स्त्रिया नवरा आपलं ऐकत नाही अशी तक्रार करतात त्यांनी नवर्‍याला मुठीत ठेवणं आधी बंद करावं. नवरा मुठीत कितीसा मावेल? त्याऐवजी मिठीत संपूर्णच मावेल ना! आपल्या माणसावर अधिकार गाजवणं त्याला दूर लोटतं आणि प्रेम गाजवणं जास्त जवळ आणतं. तस्मात, नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवावा.

सखे, इतर कुठलीही तात्पुरती धुंदी माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. प्रणयातली बेधुंदी माणसाला खर्‍या अर्थाने धुंदी म्हणजे काय असते हे समजावते. अख्खी रात्र कशी गेली हे आम्हांला दोघांनाही कधीच आठवलं नाही. आठवायचा प्रयत्न केला तरीही अंगावरील शहारे आणखीनच फुलून यायचे. अनावृत देहावरील शहारे म्हणजे शरीरविणा झंकारल्यानंतर जुळलेले सूर असतात. हे सूर जुळवण्यासाठी माझी बोटे फिरायची तेव्हा तुझा गुलाबी चेहरा आणि गाल, आणखीनच गुलाबी व्हायचे. मदनालाही जाळून टाकेल इतका तुझा देह तप्त व्हायचा. नको नको म्हणत तू आणखीनच जवळ ओढायचीस. उत्कट आर्ततेचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर, मन शांत व्हायचं, देह तप्तच असायचे. ती ग्लानी, ती क्लांतअवस्था आणखीनच तप्त व्हायची. यावर कुठेतरी वाचलेला शेर आठवला,

रतिक्लांत सखी माझ्यावर झोपली
वाटले जसे आग आगीवर झोपली

नेमकी हीच अवस्था असल्याने रात्र कधी सुरू झाली आणि कधी संपली हे पहाटेपर्यंत समजतच नसे. पहाट झाली तरी नभाला लाली काही चढत नसे.

सखे, तू उगाच घाई करतेस. किती कामं पडली आहेत, चहा करायचा आहे, आंघोळ, नाश्ता, ऑफिसला जायची तयारी, किती हे उठण्याचे बहाणे करशील. माझ्यासाठी हे महत्त्वाचे नाही. कामाचं रहाटगाडगं नेहमीचंच आहे. हे रेंगाळलेले क्षण आणखी लांबवण्यात जे सुख आहे, ते अलमदुनियेत कशातही नाही. तुला हा उल्लूपणा वाटेल. पण, तो तसा नाही. प्रणय म्हणजे दोन देहांची लगट आणि मल्लयुद्ध नाही. हा चैतन्याचा महोत्सव आहे. हे सुख दिल्याने मिळतं. हे सुख जितकं जास्त घेण्याचा प्रयत्न कराल, तितकं ते कमीच मिळेल. ओरबाडून तर ते मिळतच नाही. स्वत:च्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हासुद्धा बलात्कारच असतो. त्यातून सुख मिळतच नाही. प्राप्त होतो ’मी घेतलं‘ हा अहंकार आणि ’ती माझी आहे’ हा अधिकार सिद्ध करण्याचा अट्टहास. 

सखे, प्रणयात देह हे साधन आहे, साध्य नाही. देहाने मिळवायचे आहे, देह मिळवायचा नाही. जे मिळवायचं आहे त्याला चैतन्य म्हणतात. समजा, आपण फोंड्याला आहोत आणि आपल्याला पणजीला जायचं आहे. फोंड्यातून वाहनाने आपण पणजीपर्यंत येतो. आपण वाहनातून उतरलोच नाही, तर पणजीत पोहोचूनही पोहोचत नाही. नेमकं तेच प्रणयाच्याबाबतीत होतं. देहातून चैतन्याकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे प्रणय. म्हणूनच, कुठं जायचं हे माहीत नसलं की होते ती फक्त फरपट.  

सखे, या चैतन्याच्या महोत्सवात असंच भिजत राहूया. तुला शपथ आहे तुझ्या देहावरील मोजलेल्या तिळांची, तुला शपथ आहे त्या वेचल्या तारकांची, आमच्या समवेत प्रणयधुंद अवस्थेत जागणार्‍या शेजेवरील फुलांची. तू नाही म्हणू नकोस. या पहाटेला मिठी सोडवून घेऊ नकोस. या विवस्त्र देहावर पांघरूणही घेऊ नकोस. पांघरायचेच असेल तर मला लपेटून घे. प्रत्येक पहाट अशीच यावी. पहाटे पहाटे आपल्याला अशीच जाग यावी.


(चित्र सौजन्य इंटरनेट..)