शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

जो नही मिला उसे भूल जा....

‘आता हे वर्ष संपत आले. नवीन वर्ष येईल. पण सगळे तसेच आहे. काही फरक पडला नाही. कॅलेंडर बदलते, तारखा बदलतात. परिस्थिती तशीच राहते. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यातील दरी वाढतच आहे. तत्त्वज्ञांनी फक्त जगाचे अनेक प्रकारे विवेचन केले, पण हे जुने जग बदलण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीत’

सखे, बरी आहेस ना? तुला माझ्यापेक्षा मार्क्स जास्त मिळाले होते हे ठीक आहे, पण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सांगायला आलीस आणि हे काय ऐकवत आहेस?

‘तोच संकल्प आहे. काय नाही मिळाले यापेक्षाही काय मिळाले याचा विचार मी पहिल्यांदा करेन, हाच संकल्प आहे. प्रगतीसाठी ‘नाही’ विरुद्ध ‘आहे’ याचा संघर्ष होणे अटळ आहे. मला कायम जे नाही मिळाले तेच पहिल्यांदा आठवते’. 

सखे, तो संघर्ष वगैरे जाऊ दे. त्यामुळे प्रगती वगैरे होते की अधोगती होते, तेही जाऊ दे. आपल्यामध्ये भांडणे मात्र निश्चितच होतात. या दोन्ही गोष्टी सुखात किंवा दु:खात ढकलतात. समाधानाने जगू देत नाहीत. 

‘कितीही तत्त्वज्ञ वगैरे असलास तरी ती गोमंतकीय असल्यामुळे ‘सुशेगाद’ आहेस. जग बदलण्यासाठी तुला काहीच करायचे नाही’.

सखे, तत्त्वज्ञ वगैरे म्हणून शिव्या नको घालूस. मी सामान्य माणूस आहे. ‘सुशेगाद’ म्हणजे तुला वाटते तसे आळशी, कृती न करणे नव्हे; ‘सुशेगाद’ म्हणजे समाधानी असणे.

‘समाधान म्हणजे मनाची समजूत घालणे. नाही मिळाले ना सोडून दे असे म्हणणे. प्रयत्न न करणे’. 

सखे, तुला माझे म्हणणे कधी पटले आहे, जे आज पटेल. त्यामुळे, हे भांडण, वादविवाद सोड आणि मस्तपैकी अमजद इस्लाम अमजद यांची ‘कहाँ आ के रुकने थे रास्ते’ ही गझल ऐक. तोवर मी कॉफी करतो. हृदयाची सतार छेडत येणारा उस्ताद शुजात खान यांचा स्वर ऐक. 

सखे, आपण ‘मिळाले’ आणि ‘मिळाले नाही’, यात फार अडकतो. दु:खात बुडतो आणि सुखात वाहवत जातो. ‘आहे रे’ला ‘नाही रे’च्या विरुद्ध ठेवल्यामुळे आपण कायम संघर्ष करण्यात सगळी शक्ती घालवतो. त्यातून मागणी आणि तक्रार करू लागतो. वास्तविक, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. 

‘तुझे नेहमी काहीतरी वेगळे, विचित्र असते. पूरक कसे असेल, विरुद्धच तर आहे’.

सखे, सगळ्यांजवळ असते किंवा सगळ्यांजवळ नसते तर आहे आणि नाही याला काही अर्थच उरत नाही. गरीब आहे म्हणून कुणीतरी श्रीमंत आहे. सगळेच श्रीमंत असते तर गरिबीला अर्थ उरला नसता आणि सगळेच गरीब असते तर श्रीमंतीला अर्थ उरला नसता. कमी जास्त हे असायचेच. विषमता हा संघर्षाचा पाया नाही तर एकत्र येण्याचा मार्ग आहे. कामगार विरुद्ध नोकर असा संघर्ष निर्माण केल्याने, संपूर्ण आशिया खंडात एकेकाळी प्रथम स्थानावर असलेला पश्चिम बंगाल, आज भिकेकंगाल आहे. हे मालक विरुद्ध नोकर करण्याचं लोण कुटुंबातही पोहोचलं. बायकोचे नवर्‍याला ‘मालक’ म्हणणेही खटकू लागले. ‘मालक म्हणायला बायको काय नोकर आहे का?’ असले प्रश्न विचारले जाऊ लागले. नवरा मालक असेल तर बायको मालकीण असते, हे लक्षांत आले नाही. त्यामुळे, नवरा विरुद्ध बायको असा नाते-संघर्ष निर्माण झाला. स्त्री विरुद्ध पुरुष या प्रकारात सगळी नाती भरडली. स्त्री व पुरुष विरुद्ध नाहीत, ते एकमेकांना पूरक आहेत. 

आपल्या नवर्‍याचा कायम सर्वांसमक्ष पाणउतारा करणार्‍या बायकोने कधीतरी तो किती राबतो याचा विचार करून पाहावा. बायकोने केलेल्या स्वयंपाकाचे शेवटचे कौतुक आपण कधी केले होते हे नवर्‍याने एकदा आठवून पाहावे. नवर्‍याच्या उणीवा काढल्याने बायको चांगली ठरत नाही आणि बायकोच्या उणीवा काढल्याने नवरा श्रेष्ठ ठरत नाही. जिथे उणीव आहे तिथे दोघांपैकी कुणीही उभे राहत नाही, असाच त्याचा अर्थ होतो. 

सखे, आपल्याला नसण्याची तक्रार तेव्हाच करता येते जेव्हा आपण असण्याबद्दल कृतज्ञ असतो. आहे ते टिकवण्यासाठी आणि नाही ते मिळवण्यासाठी धावताना कधी तरी थांबून आपण त्याचा विचार करतो का? प्रत्येक गोष्ट आपण घट्ट धरून बसतो व त्यात अडकतो. बनारसच्या व्यापार्‍यांना माकडे फार त्रास देतात. म्हणून ते व्यापारी अरुंद तोंडाच्या भांड्यात खाद्यपदार्थ घालून बाहेर ठेवतात. माकड त्यात हात घालून मुठीत जे असेल ते घेते, पण हात अडकतो. मुठीत घट्ट धरून ठेवलेले सोडल्याशिवाय हात बाहेर येत नाही. आपलेही तसेच आहे. जे मिळाले व जे मिळाले नाही, त्यांना जोवर आपण घट्ट धरून बसतो तोवर आपली सुटका होत नाही. आपण अडकत जातो. जी परिस्थिती आहे ती स्वीकारत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे. आम्ही परिस्थितीला स्वीकारत नाही हा आमचा दोष आहे, परिस्थितीचा नाही. 

सखे, म्हणूनच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्हींच्या भानगडीत पडू नकोस. अगदीच जमत नसेल तर, अमजद इस्लाम अमजद या गझलेत म्हणतात तसे, ‘जो मिल गया उसे याद रख, जो नही मिला उसे भूल जा’ असे तरी वागून पाहा. एका शब्दात सांगायचे तर ‘सुशेगाद’ राहा!