वाचलीस सगळी?
‘नाही रे. तुझी वाट पाहून कंटाळा आला. मग, तुझ्या टेबलावर ही डायरी सापडली. अंगठ्याने पाने गर्रकन फिरवताना, चिकटलेल्या पानांवर बोट स्थिरावलं. तीच पानं उघडून पाहिली. सुकलेलं फूल होतं आणि खराब झालेली अक्षरं. अरे, एवढा सिरीयस का झालास?’
काही नाही गं. चल, तुला एक गझल ऐकवतो. अहमद फराज यांची ’अब के हम बिछड़े तो शायद’ ही गझल अप्रतिम आहे. मेहंदी हसनचा मखमली आवाज. प्रत्येक शेराच्या शेवटी जीवघेणी आर्तता. तू स्वत:च ऐक.
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें
ये ख़ज़ाने तुझे मुम्किन है ख़राबों में मिलें
सखे, प्रेम, मैत्री, विश्वास, चांगुलपणा ह्या गोष्टी आजकाल फार दुर्मीळ झाल्या आहेत. यांचा वापर आकर्षक वेष्टनासारखा केला जातो. वेष्टनाला भुलून स्वीकारलेली भेट उघडायला जावं तर आत स्वार्थ, सत्ता, संपत्ती आणि सोय ही विष्ठाच सापडते. आपल्याला हव्या असलेल्या मैत्रीपायी, आपुलकीपायी आपला फक्त वापरच झाला, हे लक्षात येईपर्यंत आयुष्य बरबाद झालेलं असतं. म्हणूनच विश्वास, प्रेम वगैरे हे अनमोल, दुर्मीळ मोती शोधायचे असतील, तर तुला या मोत्यांपायी बरबाद झालेल्या, भंगारात निघालेल्या माणसांकडे शोधावे लागतील.
दोनों इंसॉं हैं तो क्यों इतने हिजाबों में मिलें
सखे, भक्ती म्हणजे प्रेमच आहे. मनुष्यावर केलं की त्याला प्रेम म्हणतात आणि परमेश्वरावर केलं की त्याला भक्ती असं म्हणतात. नश्वराने नश्वराची केलेली भक्ती म्हणजे प्रेम आणि नश्वराने ईश्वरावर केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. परमेश्वराची थेट भेट घडत नाही. निर्गुणाच्या आड दडलेला भगवंत भेटावा म्हणून भक्त स्वत:ला समजेल, आवडेल अशा सगुण रूपामध्ये त्याला घेऊन येतो. त्याला माणसांप्रमाणे गुण, अवगुण, नातीगोती चिकटवतो. यालाच ’आलंबन’ असं म्हणतात. मूर्ती हे आलंबन आहे. मूर्तीमधून अमूर्ताकडे पोहोचावं लागतं. भक्त आणि भगवंत यामध्ये असलेले हे पडदे आहेत. हिजाब याचा अर्थ पडदा. तू माझ्यासमोर मूर्तिमंत उभी होतीस. तरीही आमच्यामध्ये सौंदर्य, संपत्ती, नाव, प्रतिष्ठा, वय हे पडदे होतेच. त्यामुळे तू भेटूनही भेटलीच नाहीस. अगदी, त्या परमेश्वरासारखी.
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें
सखे, तू न भेटल्याचे दु:ख तुझ्या प्रत्येक भेटीनंतर व्हायचे. जेवढा मी तुझ्याजवळ जायचा प्रयत्न करायचो, तेवढीच तू दूर जायचीस. मला तुझ्या मनापर्यंत पोहोचण्यापुरतंच तुझं शरीर हवं होतं. तुला मात्र कायम वाटत राहिलं, हा शरीरासाठी मन जवळ करतोय. आमच्यामध्ये हे अंतर कायम राहिलं. तुला कायमचा अंतरलो हे दु:ख आयुष्यातल्या अनेक दु:खांपेक्षा वरचढ होतं. ग़म-ए-दुनिया म्हणजे दुनियेने दिलेली दु:खं आणि ग़म-ए-यार म्हणजे प्रिय व्यक्तीनं दिलेलं दु:ख. ही दोन्ही दु:खं एकमेकात मिसळली तर धुंद करणार्या वेदनेची एक निराळीच चव निर्माण होते. मदिरा मदिरेत मिसळल्यानंतर वाढत जाणारी धुंदी असावी तशी.
क्या अजब कल वो ज़माने को निसाबों में मिलें
सखे, एक गंमत सांगतो. आपण आज जो शहाणपणा म्हणून अभ्यासक्रमातून शिकतो, तो गतकाळातला वेडेपणाच असतो. आपल्याकडे आयुष्यभर छळवाद करून, जिवंतपणी मरणयातना देऊन, मेल्यानंतर संतत्व प्राप्त होतं. जिवंतपणी संतत्व हा आजकाल व्यवसायाचा भाग झाला आहे. इतिहास पाहता, मेल्याशिवाय संतत्व नाही. या संतांनी रचलेले अभंग, मांडलेले विचार, ते जिवंत असताना समाजाच्या लेखी वेडेपणाचेच होते. आज त्याच विचारांवर लिखाण करून आपण पीएचडी मिळवतो. ’दार पे खेंचे’ म्हणजे सुळावर चढवणे आणि ’निसाबों में’ म्हणजे पाठ्यपुस्तकात, अभ्यासक्रमात. न जाणो आज ज्या प्रेमातल्या वेडेपणासाठी तू मला सुळावर देत आहेस, तेच वेडेपण उद्या कदाचित पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल.
जैसे दो शख़्स तमन्ना के सराबों में मिलें
सखे, पाठ्यपुस्तकातून अभ्यासाचा विषय होईल की माहीत नाही, पण तुझं वेड मात्र मला निश्चितच आहे. ही रोजनिशी वाचताना निसटून गेलेला गतकाळ पुन्हा वर्तमानात आला. ते वेड प्रकर्षाने जाणवलं, ती मृगतृष्णा पुन्हा कंठशोष करून गेली. असं असलं तरीही आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. मीही बदललोय, तूसुद्धा बदलली आहेस आणि हा काळही बदलला आहे. आता आपली भेट घडते ती इच्छेच्या मृगतृष्णेमागे धावताना किंवा स्वत:च्याच आयुष्यातली दुमडलेली, चिकटलेली पाने चाळताना. सखे, त्या चिकटलेल्या पानांमध्ये जो सुकलेला गुलाब आहे ना, तो तुलाच देण्यासाठी त्या दिवशी मी घेऊन आलो होतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायचं होतं. तू तुझं लग्न ठरल्याच्या आनंदात एवढी मग्न होतीस की, माझं सांगणं राहूनच गेलं. तुला न सांगितलेलं रोजनिशीत लिहिलं, तुला देता न आलेला गुलाब तिथेच ठेवून दिला. त्यानंतरची पानं आयुष्यभर कोरीच राहिली. त्याआधी लिहिलेली अक्षरं पुसट झाली, गुलाब सुकून गेला आणि पानं चिकटली.
