
सखे, पाऊस मला खूप आवडतो. अगदी, तिच्यासारखा. पाऊस अनेकांना अनेक अर्थांनी आठवत असतो. पाऊस, ती आणि मी यांच्यात वेगळंच नातं आहे; दु:खाचं. तुला गंमत वाटली असेल ना हे मी सगळं तुला का ऐकवतोय?. अगं, आमचे दोघांचे वाद व्हायचे पाऊस यायच्या आधी आणि नंतरही. पाऊस पहिल्यांदा चिंब भिजवून गेला. तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी परत देऊन गेला. तिच्यासोबतचा प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण असा थेंबा थेंबांतून बरसवून गेला. तिची आणि माझी भेट त्याच्या सोबतीनेच झाली होती. पहिली मिठी, पहिलं चुंबन, पहिलं भांडण या सगळ्याचा साक्षीदार हा पाऊस आहे. तिची पहिली भेट आणि शेवटची भेट, पहिल्या पावसातच झाली होती. प्रत्येकवर्षी येणारा पाऊस मला असा शेवटपर्यंत छळत राहणार बहुतेक.
सखे, एरव्हीसुद्धा मला आवडणारा पाऊस, तिच्यामुळे खूपच आवडतो. तिलाही आवडतो. नाही, असं नाही. पण, ती त्याचा राग करते. तो नाही आला तरीही रागावते आणि खूप आला तरीही रागावते. मला मात्र त्याचं वाट पाहायला लावणं आणि बेधुंद बरसणं दोन्ही आवडतं. अगदी, तिच्या प्रेमासारखं. कुठल्यातरी एका शायरानं म्हटलंच आहे,
मरतो दुष्काळातही अन् पुरातही
ती खूप हळवी होती. पाऊस नाही आल्याने होणारी त्राही त्राही तिला कधीच पाहावत नव्हती. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या झोपड्या तिला विचलित करून सोडायच्या. वास्तविक नेमेचि येणार्या पावसाळ्यात या गोष्टी घडतच राहायच्या. पण दरवर्षी असं व्हायचं आणि दरवर्षी आमचं भांडण व्हायचं. ती पावसाबरोबर मलाही हृदयशून्य, कठोर म्हणायची. ’पावसाला हृदय असतं का गं?’ या प्रश्नावर आणखीनच चिडायची. तिला पाऊस आवडायचा. पण, तिला हवा तसा तो कधी बरसलाच नाही. मलाही ती खूप आवडायची. पण, मला हवी तशी ती कधी माझी झालीच नाही. हे आमच्यामध्ये असलेलं अंतर, आपल्या अंतरात ठेवून हा पहिला पाऊस मला उभा आडवा छळतो. तरीही खूप आवडतो, अगदी तिच्यासारखा.
सखे, अचानक आलेल्या पावसाने चिंब भिजवून टाकलं. सगळे कपडे यथासांग ओले झाले. घरी परतलो. मस्तपैकी कॉफी करून घेतली. तिची आठवण मनात घोळवत गाणी ऐकत होतो. हरीहरन यांनी गायिलेली एक गझल लागली. कुठेतरी झालेल्या लाइव्ह कार्यक्रमाचं ते ध्वनिमुद्रण होतं. झाकिर हुसेनांचा तबला आणि हरिहरन यांचा आवाज. ’दर्द के रिश्ते न कर डाले उसे बेकल कहीं' ही गझल तू मुद्दाम ऐक. ही गझल कुणी लिहिली आहे हे माहिती नाही, पण फारच सुंदर गझल आहे. ही गझल मी तिलाही ऐकवली होती, आमचं भांडण झालं तेव्हा. ते भांडण जसंच्या तसं आठवलं.
सखे, विचाराला अहंकार चिकटला की भांडणं होतात.
विचार, हा ’विचार’ म्हणून केला तर आपण तो साकल्याने करू लागतो. पण, जेव्हा हाच विचार, ’माझा विचार’ होतो तेव्हा त्याला अहंकार चिकटलेला असतो. त्यापेक्षा वेगळा विचार बरोबर असू शकतो हे आपण मनातही आणत नाही.
सखे, आटत चाललेल्या विहिरी, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या बातम्या ऐकून ती खूपच विचलित व्हायची. स्वत:च्या घरात चोवीस तास पाणी असतानाही, पाण्याचा थेंब मिळत नाही अशांसाठी तिच्या डोळ्यात पाणी यायचं. मग, पाय आपटत आपटत ती माझ्याकडे यायची. थेट मलाच प्रश्न विचारायची,
’कुठे गेला तुझा तो पाऊस? एकेका थेंबासाठी मैलो न मैल चालत जातात माणसं. त्याला दया येत नाही?’
पाऊस काही माझ्या सांगण्यावरून कोसळत नाही. पण, तो मला आवडतो म्हणून तिची बोलणी मला खावी लागायची. तिच्या भाबडेपणाला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. रक्ताच्या नात्यातही एवढा कळवळा नाही सापडत. नात्यांमध्ये संबंध कोणते व कसे असावेत हे व्यवहार ठरवतो, नाती नाहीत. नाती या शब्दाचा अर्थच बहुधा ना ती म्हणून ’नाती‘ असा झाला असावा. फक्त व्यवहारापुरती असतात, एरव्ही नसतात म्हणून नाती. बातम्या ऐकून आपल्यालाच पाणी मिळत नाही अशा पद्धतीने ती कळवळायची म्हणून थोडं विचित्र वाटायचं. मुसळधार पावसामुळे घरात शिरलेलं पाणी, वाहून गेलेल्या झोपड्या तिला अशाच विचलित करून जायच्या. वास्तविक दु:ख करण्यासाठी यातलं कुणीही तिच्या नात्याचं नव्हतं. दुसर्याचं दु:ख माणसाला कायम आपल्या दु:खापेक्षा कमीच वाटत असतं. म्हणूनच इतरांच्या दु:खाचा आपण किती त्रास करून घ्यायचा याचेही ठोकताळे आपण ठरवलेले असतात. नात्यातली दु:ख सगळ्यानाच समजतात पण ही दु:खाची नाती समजायला थोडी अवघड होती. मग, मी म्हणायचो, बाई गं, तू बातम्या बघू नकोस, सिरियली बघ. ती आणखीन चिडायची.
सखे, तिचं हे भावुक होणं मला फार आवडायचं. या गोष्टी होतच असतात असं म्हणून त्या सोडून देणं, तिला पटत नसे. या तिच्या भावविश्वातून तिला बाहेर काढणं अनेकदा खूपच कठीण होत असे. लहान मूल जत्रेत रमतं, तेव्हा त्याला रमू द्यायचं असतं. फक्त त्याचं बोट सोडायचं नसतं. तिच्या उसन्या दु:खातून ओढून बाहेर काढणं तिला आणखी यातना देणारं ठरलं असतं. ती माझ्यापासून दूर जाईल अशीही भीती वाटायची. तिचा हात हाती धरून लांब कुठे तरी निघायचो. तिची लांबसडक बोटं स्वत:च्या बोटात गुंफून घ्यायचो. चांदण्यात गुंडाळलेलं रेशीम हाती यावं तसा तिचा तो मृदू मुलायम हात हाती आला की सुखाच्या स्वर्गात घेऊन जायचा. त्याचवेळी नेमका पाऊस कोसळायचा. ती बिलगायची. चिंब भिजायची माझ्यासोबत. नको असलेलं बेरंग आयुष्य हवंहवंसं वाटायचं. तिनं कधीच सोडून जाऊ नये असं वाटायचं.
सखे, आपल्याला जसं वाटतं तसं घडत नाही. तिची प्रत्येक कृती, भेट हे आपल्यावरचं तिचं प्रेम आहे असं मला वाटायचं. तिच्या डोळ्यातून ते नेहमी जाणवायचं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी ती सांगायची. खूप बोलायची, खूप भांडायची. पहिल्यांदा एखादी गोष्ट केली की ती आणून दाखवायची. ड्रेस असो की ड्रेसिंग केलेला खाद्यपदार्थ. आयुष्याची प्रत्येक चव ती माझ्याकडून चाखायची. न विसरता, हवं, नको ते सगळं सांगायची. फक्त तिचं माझ्यावर प्रेम नाही, हे सांगायला विसरली. आता पुन्हा आपली भेट नाही, हे सांगून ती निघाली तेव्हा मी कोसळलो. आपण तहानेने गतप्राण व्हावे आणि पाऊस भलतीकडेच धो धो कोसळावा, असंही वागतो पाऊस कधी कधी. अगदी तिच्यासारखा.
चित्रस्रोत : आंतरजाल