‘सगळ्यांची आयुष्यं अपूर्णच असतात का रे? कुणीच पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही का?’
सखे, सगळ्यांचं आयुष्य अपूर्ण असतं. आपल्या सगळ्या आकांक्षा, इच्छा पूर्ण होतातच असं नाही. ‘मागणं’ आणि ‘मिळणं’ यातलं अंतर जेवढं जास्त, तेवढं जगणं जास्त त्रासदायक. सगळ्यांना सगळं नाही मिळत. आयुष्याच्या याच अपूर्णत्वावर निदा फाजलींची ‘कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता’ ही अप्रतिम गझल आहे, ती तू ऐक. मूळ गझल त्यांच्या ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील आहे. १९८१साली आलेल्या ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटासाठी त्यात थोडासा बदल केला गेला. भूपेंद्र सिंग यांचा आवाज आहे आणि संगीत खय्याम यांचं. यातला एक शेर जेव्हा ऐकला तेव्हापासून आत्तापर्यंत तो विसरलो नाही.
कहीं ज़मीं तो कहीं आसमां नही मिलता
सखे, मुकम्मल याचा अर्थ पुरेसा किंवा पूर्ण. प्रत्येकाचं स्वत:च असं विश्व असतं. त्याच्या स्वत:च्या भावना, इच्छा, अपेक्षा असतात. कधी स्वत:कडून तर कधी इतरांच्याकडून त्या पूर्ण व्हाव्या असं त्याला वाटत असतं. पण त्या होत नाहीत. एका अपेक्षेची पूर्तता दुसर्या अपेक्षेला जन्म देते. म्हणूनच तृप्ती ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. जसा माणूस विचाररहित असू शकत नाही, तसाच तो इच्छारहितही असू शकत नाही. इच्छा, अपेक्षा कधीच थांबत नाहीत. आपण कुठं थांबायचं, हे समजलं की अपेक्षांचं ओझं होत नाही, इच्छा त्रास देत नाहीत.
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबाँ नही मिलता
सखे, मूळ शेर ‘जिसे भी देखिये वो अपने आपमे ही गुम है’ या ऐवजी ‘ये क्या अज़ाब है सब अपने आप में गुम हैं’ असा आहे. ‘अज़ाब’ याचा अर्थ दु:ख किंवा शिक्षा. आपल्याला असंख्य माणसं आयुष्यात भेटतात. ज्याला बघावं तो आपल्याच विश्वात गर्क असतो. प्रत्येकजण दुसर्याला ऐकवत असतो. जिंकणं, हरणं, सुख, दु:ख या भोवती गुरफटलेलं स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडत राहतो. ऐकवणारी माणसं खूप आहेत. उणीव ऐकणार्या माणसांची आहे. फारशी जवळीक नसणारी माणसं आपल्याशी खूप बोलतात. दु:ख, आपल्याच माणसांना आपल्याशी बोलावसं वाटत नाही याचं आहे. ज्यांच्या सुखाने आपण सुखी होतो, ज्यांच्या दु:खात आपण दु:खी होतो, त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नसतो. गुजगोष्टी करणारी असंख्य माणसं अवतीभवती सतत वावरत असतात. ज्यांच्याशी हितगुज करावं अशी माणसं आपल्यापासून लांब असतात. त्यांचं लांब असणं छळत नाही, त्यांचं हितगुज न करणं प्रचंड त्रास देतं.
ये ऐसी आग है जिस में धुँआ नही मिलता
सखे, मनावर झालेल्या जखमा, त्यांना वेळ दिला की भरतात. निदान तसं आपल्याला वाटतं तरी. दु:खाला कवटाळत बसण्यापेक्षा त्याला विस्मृतीत ढकलणं जास्त सोयीचं असतं. आपण विसरू म्हटलं तरी काही गोष्टी विसरता येत नाहीत. प्रसंगाप्रमाणे त्यांची आठवण नको त्या वेळी होतेच. त्यांचं चिंतन चिंता वाढवीत जातं. मेल्यावर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता. हा अनुस्वाराचा फरक आपल्यामध्ये किती जाळ घेऊन वावरतो हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आठवणींच्या या वणव्याला ज्वाळाही नसतात आणि धूरही येत नाही.
जहा उम्मीद हो इसकी वहाँ नही मिलता
सखे, हाच तो शेर जो ऐकताक्षणीच आवडला होता. वेदना नेमक्या शब्दात मांडली की, तिचं काव्य होतं, हे या शेरामुळे पटतं. ‘मौसम आते जाते हैं’ या संग्रहातील गझलेत हा शेर ‘तमाम शहर में ऐसा नही ख़ुलूस न हो, जहाँ उमीद हो सकी वहाँ नही मिलता’ असा आहे. ‘ख़ुलूस’ याचा अर्थ प्रामाणिकपणा, ओढ किंवा सत्य असाही होतो. पण, हा चित्रपटातील गझलेसाठी बदलून लिहिलेला शेर जास्त भावला.
सखे, प्रेम हे निसर्गाने, परमेश्वराने जिवाला जगण्यासाठी दिलेली भेट आहे. आपण श्वास घेणं हे जसं आपण जिवंत असल्याचं लक्षण आहे, तसंच प्रेम हे आपण जगत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच ते सर्वांठायी आहे. प्रेम नाही असं एकही स्थान निसर्गात नाही. तरीही आपल्यासाठी म्हणून आपण या अमर्याद प्रेमाला मर्यादित स्वरूपात पाहतो. एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. ते तिथूनच मिळावं अशी अपेक्षा बाळगतो. खास करून एखाद्या व्यक्तीकडून. प्रेमाच्या बाबतीत, ते मिळावं यापेक्षाही ते कुठून मिळावं या गोष्टीवर आपण ठाम राहतो. तिथून ते नाही मिळालं की आपण दु:खी होतो.
सखे, हा विचार तुला कदाचित पटणार नाही, तरीही ऐक. प्रेम आपल्याला जिथून हवं असतं तिथून ते मिळावं यामध्ये जशी प्रेमाची सार्थकता आहे, तशीच सार्थकता ते मिळू नये यातही आहे.
